निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही, भावनिक मुद्द्यांवर जिंकल्या जातात!
पडघम - देशकारण
कलीम अजीम
  • पंतप्रधान मोदी आणि देशातील तरुणांचं प्राधिनिधिक चित्र
  • Mon , 03 June 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP संघ RSS काँग्रेस Congress

“निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही, भावनिक मुद्द्यांवर जिंकल्या जातात!” हे विधान लोकसभा निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जयपूरमध्ये केलं होतं. २३ मे २०१९ला भाजपने ते सिद्ध करत मोठ्या मत्ताधिक्याने सत्ता हस्तगत केली. २०१४ पेक्षा यंदा अधिक जास्त असुरी बहुमत भाजपला मिळाले. जागतिक प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेत हा विजय ‘धोकादायक’ असल्याचं म्हटलं. काही दैनिकांनी भारतातील अल्पसंख्याकांवर आता संक्रांत येणार असं भाकित केलं. अजूनही देश-विदेशात अशा प्रकारचे तर्कवितर्क व विश्लेषण सुरू आहे.

एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘शत्रू मोठी चूक करत असेल तर प्रतिस्पर्ध्यांनं त्याला रोखायचं नसतं.’ कारण, तो तुमची अर्धी लढाई तुम्हाला जिंकून देतो. यंदाच्या निवडणुकीत असंच काहीतरी घडलं. विरोधी पक्ष रफाएल, गब्बर सिंग टॅक्स, नोटबंदी, अनिल अंबानी, बहात्तर हजार, शेतकरी कर्जमाफी, आर्थिक घसरण आदी मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरला. पण सत्तापक्षाकडे नेहरू, राजीव गांधी, बालाकोट, अणुबॉम्ब, राष्ट्रवाद, दहशतवाद, पाकिस्तान, घुसखोर आदी जास्त शक्तिशाली व त्या अर्थानं निकडीचे मुद्दे होते. याच आधारावर त्यांनी मतांची विभागणी केली. कथित देशभक्तीचा आव आणणारा ‘युरोपीयन राष्ट्रवाद’ हा भाजपला निवडणुकीत जमेची बाजू ठरली.

या उलट विरोधी पक्षाला गट-तट, अंतर्गत कलह, घराणेशाही आणि वर्चस्ववादाच्या आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे प्रतिस्पर्धी सत्तापक्षाची निवडणुकांच्या गणितांना घेऊन काय आखणी सुरू आहे, याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. देशभरात विरोधी पक्ष विखुरलेल्या स्वरूपात सत्ता बळकावण्याची स्वप्न पाहत होता. सर्वांत मोठ्या महामिलावटी (३९ पक्ष) भाजपने युपीएला त्यांच्याच शस्त्रानं चीत केलं. निवडणुकीच्या प्रचारातला प्रत्येक मुद्दे विरोधकांवर उलटवण्याची कामगिरी भाजपला यशस्वीपणे करता आली.

२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘नीच’ म्हटलं होतं. ‘बदनाम हुए यो क्या हुआ, नाम तो हुआ ना!’ या उक्तीप्रमाणे याचा भाजपने फायदा करून घेत मोठ्या जागांवर विजय मिळवला. हा निसटता विजय काँग्रेसला आगामी काळात अनेक पातळीवर धोकादायक ठरला. यंदा सॅम पित्रोदांच्या ‘हुआ तो हुआ’ या कच्च्या हिंदीचा फायदा भाजपला दिल्लीत झाला. तिथं त्यांनी आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवत सातही जागांवर ताबा मिळवला. पंजाबमध्ये मात्र ते कॅप्टन अमरिंदरच्या किल्ल्याला भेदू शकले नाहीत.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

उलटा पंच

विरोधक ‘चौकीदार चौर हैं’ ही घोषणा निवडणुकांच्या सहा महिने आधीपासून देत फिरत होते. याच मुद्द्यावर त्यांनी अनेक सभा गाजवल्या. पण भाजपने याच घोषणेला शस्त्र बनवून शास्त्राप्रमाणे ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. विरोधकांचे सगळे डाव उलटे पडले. हे कळायला निकालाचा दिवस उजाडावा लागला. कारण तोपर्यंत सर्वजण अशा अविर्भावात होते की, भाजपची सत्तेतून हद्दपार होणार. हा (फाजील) आत्मविश्वास केवळ विरोधकांनाच नव्हता तर अभ्यासक व विश्लेषकांनादेखील होता. सगळ्याचे ठोकताळे २३ मे ला सपेशल आपटले. भाजपने अवाढव्य मताधिक्य मिळवून पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचा बेगुसरायचा एक शो आहे. त्यात एकजण म्हणतो, “बाप से बडा मोदी है, जो बाप पैदा किया उससे बडा मोदी हैं.” बेगुसराय मोदीभक्त नावाने हा व्हिडिओ यूट्यूबला आहे. यातला उपहासाचा भाग जर सोडला तर हे मोदींचं यश मानावं लागेल. कारण सामान्य जणापर्यंत पोहोचलेलं मोदी हे अलीकडचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी इंदिरा गांधींनी भारताला गारुड घातलं होतं. आजही आमची आजी ‘ऐंद्रा गांधीको व्होट दो’ म्हणत असते. त्या काळी आजच्यासारखी प्रसिद्धी माध्यमं नव्हती, पण इंदिरा गांधींचं गारुड अकल्पनीय होतं. हीच कमाल मोदींनी सोशल मीडियाच्या बळावर करून दाखवली आहे. आपली ‘विकासपुरुष’ नावाची जी प्रतिमा त्यांनी तयार केली, लोकांनी त्याला दुसऱ्यांदा भरभरून मतं दिली आहेत.

निवडणुकीच्या प्रचार सभेत कार्यकर्ते, विरोधी पक्ष, समांतर मीडिया सर्वांनी सरकारच्या योजनांचा कशा प्रकारे फज्जा उडाला आहे, याचं वार्तांकन सामान्य जनतेत जाऊन केलं. राज ठाकरेंच्या सर्व सभा यावरच आधारित होत्या. अनेक मीडिया संस्थांनी उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, मुद्रा, आवास योजना, शौचालय, जनधन आदी योजनांचा कशा पद्धतीनं बोजवारा उडाला हे लोकांना ओरडून-ओरडून सांगितलं. बीबीसी व एनडीटीव्हीसारख्या मीडिया हाऊसने अशा बातम्यांच्या अनेक श्रृंखला प्रसारित केल्या. याशिवाय सोशल मीडियावर मोदी सरकारची चिरफाड तर नित्याचीच होती. तरीही ‘आयेगा तो मोदीही’ हा आत्मविश्वास सत्तापक्षाकडे ठासून भरलेला होता.

सामान्य जनतेची मतंदेखील यापेक्षा वेगळी नव्हती. हीच भाजपची जमेची बाजू व विरोधकांची दुर्लक्षित बाजू म्हणावी लागेल. पेट्रोलच्या वाढत्या किमती, गॅस सिलेंडरचा चढता भाव, वाढती महागाई, घटत्या नोकऱ्या, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी आदी मुद्दे भाजपने लोकांना विसरण्यास भाग पाडलं. भाजपने राष्ट्रवादाचे सेट केलेलं ‘नरेटिव्ह’ बहुउपयोगी ठरलं. ‘आम्ही उपाशी मरू, पण त्या पाकिस्तानचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे’ ही भावना सामान्य नागरिकांमध्ये होती. कारण निवडणुकीपूर्वी भाजपने ‘गोदी मीडिया’ला हाताशी धरून युद्धज्वर उभा केला होता. त्याला सत्ताधारी पक्षानं खतपाणी घालण्याचं काम प्रचारी मोहिमातून केलं. राष्ट्रीय सुरक्षेला राष्ट्रवादाची जोडत काँग्रेस आणि अन्य विरोधकांनाच संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं.

याउलट सबंध विरोधक ‘मोदी हटाव’च्या घोषणा देत फिरत होते. त्यांच्याकडून भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची आखणी सुरू झाली होती. राज ठाकरेंच्या सभा तर ‘ही दोन लोकं (मोदी-शहा) नकोत’ याच आधारावर गाजल्या. नेमका हीच संधी साधत भाजपची अंतर्गत यंत्रणा कामाला लावली. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिकॉलरचा वापर करून प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधत विरोधकांना तोंडघशी पाडण्याचं काम भाजपनं केलं. व्यक्तिगत पातळीवर नागरिकांशी संपर्क साधून ‘मोदीला नको म्हणणारे देशाचे कसे शत्रू आहेत’ अशा प्रकारे त्याच-त्या युक्तिवादाची उजळणी केली गेली.

टेलिग्राफच्या वृत्तानुसार भाजपने फक्त पश्चिम बंगालमध्ये ५० हजार व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत केले होते. लोकांना प्रचारी (विखारी) मेसेज पोहोचवण्याच्या कामाला तब्बल १० हजार लोक लागले होते. (इतर राज्यात हा आकडा वेगळा असू शकतो!) पश्चिम बंगालमध्ये गेम चेंजर ठरलेल्या या टीमने दररोज लोकांना फोन लावून, मेसेज पाठवून पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम, बालाकोट, पुलवामा, जेएनयू, पुरोगामी आदी साधनं वापरून लोकांचं मत परिवर्तन करण्यास भाग पाडलं.

दुसरीकडे प्रचार सभांमध्येसुद्धा मोदी-शहा जोडीकडून हेच मुद्दे लोकांवर फेकले जात होते. सैन्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणारा काँग्रेस, तुकडे-तुकडे गँगला पाठिंबा देणारा काँग्रेस, साधक हिंदूंना दहशतवादी घोषित करणारा काँग्रेस, रफाएलवर संशय घेणारा काँग्रेस, नक्षलवादाचे समर्थन करणारे डावे, बांग्लादेशींना घर देणाऱ्या ममता बॅनर्जी, दुर्गापूजा बंद करून मुस्लिमांच्या मिरवणुकांना परवानगी देणाऱ्या ममता, गोरक्षकांना गुंड म्हणणारे पुरोगामी, सरकारच्या नीतींवर प्रश्न उपस्थित करणारे सुधारणावादी, मोदींना विरोध करत पुरस्कारवापसी करणारे विचारवंत... असे कितीतरी नेरॅटिव्ह भाजपने सेट केले होते. हे मुद्दे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कसे पूरक आहेत, याचा प्रचार भाजपने आपल्या प्रचारी भाषणांतून केला. वेळेप्रसंगी सैन्याच्या भारतीय आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी भाजपला मतं द्या, हा मोदींचा जुमलादेखील कामी आला. भाजपला ग्रामीण भागातून भरभरून मतं पडली.  

विरोधी वातावरण (लेखकासहीत निवडक लोकांना असं वाटत असावं) असतानासुद्धा भाजपने मोठ्या प्रमाणात लोकांचे मनं परावर्तित केली. यासाठी पक्षाने माईंड कन्डिशनिंगच्या ‘पावलोव सिद्धान्त’चा आधार घेतला. या जगप्रसिद्ध थेरीचा आधार घेत लोकांना संमोहित करण्यात भाजपला यश आलं. एक वेळ अशी आली की, “उपाशी मरू पण भाजपला मते देऊ, कारण भाजप पाकिस्तानचा बंदोबस्त करणार आहे,” ही भावना सामान्य मतदारांमध्ये होती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

नागरी प्रश्न कुठे?

माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ही पहिली निवडणूक असावी, ज्यात ‘नागरी समस्या’ऐवजी ‘राष्ट्रीय प्रश्नां’ना अधोरेखित केलं गेलं. नळ, पाणी, गटारी, लाईट, अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा इत्यादी विषय प्रचारातून गायब होते. (गेल्या वेळी भाजपसाठी गेम चेंजर ठरलेला ‘सबका विकास’ हा मुद्दादेखील भाजपने प्रचारात वापरला नाही.) सत्ताधारी पक्षाला आपण देशवासीयांच्या नागरी समस्या सोडवल्या नाहीत, हे माहिती होतं. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांला प्रचारात केंद्रस्थानी आणलं.

कधी नव्हे ते प्रथमच अन्न-वस्त्र-निवारापेक्षा लोकांना देशभक्ती महत्त्वाची वाटू लागली होती. सामान्य मतदारांनीदेखील मूलभूत गरजांची मागणी न करता सत्ताधारी फकिराच्या झोळीत राष्ट्रावादाच्या नावानं भरभरून मते टाकली. सुब्रमण्यम स्वामीचं भाकित खरं ठरलं. अखेर भावनिक मुद्द्यांवरच भाजपने सत्ता काबीज गेली.

गेल्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तिथं पर्यावरण या मुद्द्याभोवती निवडणूक लढवली गेली. इच्छुक उमेदवारांनी पर्यावरणाला धक्का लावणार नाही, म्हणत मतं मागितली. गेल्या महिन्यात अल्जेरिया व सुडान या दोन राष्ट्रांमध्ये सर्वसामान्य लोकांनी सत्तेला उखडून टाकलं. सुडानचे लोकांनी वाढत्या महागाईविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. जनतेचा आक्रोश पाहता उमर अल् बशीरची ३० वर्षांची सत्ता उलथवली. अल्जेरियामध्येही १० वर्षांपासून सत्तेला चिकटून असलेल्या सत्ताधीश अब्देल अजीजला वाढत्या महागाईमुळे लोकांनी रस्त्यावर खेचलं. या तीन देशाच्या उदाहरणावरून तिथले लोक नागरी प्रश्नांना घेऊन किती सजग आहेत हे दिसून येतं. पण भारतात मात्र परिस्थिती नेमकी उलटी दिसून आली.

उपरोक्त निकालातून हे दिसून आलं की, भारतातील लोकं येत्या काळात दोन हजार रुपये देऊन गॅस सिलेंडर खरेदी करण्याची तयारी ठेवत आहेत. २०१४मध्ये ४५० रुपये गॅस सिलेंडर होता. गेल्या पाच वर्षांत तो ९००च्या घरात गेला. हीच गती असेल तर २०२४ पर्यंत तो दोन हजारापर्यंत नक्कीच जाण्याची शक्यता आहे, पण तरीही लोक तो डोळे, कान बंद करून गपगुमाने खरेदी करतील. पेट्रोल २०० रुपये लिटरने भरतील. देशात मंदी आली तरी ते झेलतील. वाढत्या फीसमुळे शाळा, कॉलेज बंद पडल्या तरी ते घरी निवांत बसून राहतील. नोकऱ्या-रोजगार नसले तरी चालतील, पण भाजपच्या राष्ट्रवादाला (?) भरभरून मतं देण्याची त्यांची तयारी निकालावरून दिसून आली!

वास्तविक, भाजपच्या संमोहनशास्त्राची ही कमाल आहे. याच कामासाठी भाजप २०१४पासून कामाला लागल्याचे काही अभ्यासकांचं मत आहे. २०१४च्या विजयानंतरच भाजपने संघटन बांधणीतून तरुणांना एकत्र करण्याचं काम सुरू केलं होतं. हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान, मंदिर-मस्जिद, ब्राह्मण-दलित, नेहरू-वाजपेयी, गांधी-नथुराम, धर्मद्रोही-श्रद्धाळू, देशभक्त-देशद्रोही, सरकारविरोधक-सरकारप्रेमी अशी फूट पाडण्याचं काम भाजपनं यशस्वीरित्या केलं.

तुलनेत विरोधक फक्त हिटलर, फॅसिझम, मोदी हटाव, सरकारचे अपयश, धार्मिक ध्रुवीकरण आदी मुद्दे ‘अवजड’ भाषेत सांगत सुटली. अघोरी सत्तेची पाच वर्षं उलटले तरीही भाजपविरोधी व पुरोगामी मंडळी हिटलर आणि फॅसिझमच्या पलीकडे मोदींचं विश्लेषण करायला तयार नाहीत. मोदींना माणूस म्हणून त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्नच केलेला दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत मोदी-भाजप समर्थक वाढण्याचं कारण जर समजून घेतलं तर असं लक्षात येईल की, ज्या टारगेट गटांना ‘लक्ष्य़’ करून त्यांनी विचार पेरला, त्या गटांनीच लोकसभा निवडणुकीची धुरा खांद्यावर वाहिलेली दिसून आली. कुठलाही पैसा (?) न घेता सेवाभावातून काम करणारे कसे पुढे येतात, याबद्दल विरोधकांनी कधीच विचार केला नाही.

गेम चेंजर समूह

केवळ देशप्रेमाची प्रचारी महती सांगून भाजपने देशभरातील कोट्यवधी तरुणांना जवळ केलं आहे. पक्षाने त्यांना कृतीकार्यक्रम देऊन व्यस्त ठेवलं. त्यांची उर्जा सत्करणी (?) लागावी यासाठी त्यांचे मेळावे घेतले. त्यांच्यात विशिष्ट विचार रूजवून त्यांना बोलतं केलं. भाजप व संघाने अशा प्रकारचं संघटन देशातच नाही तर परदेशातही तयार केलं. बहुसंख्याकांच्या देशजाणीवेचा विचार करून सत्तापक्षानं राष्ट्रप्रेमाला श्रद्धेशी जोडलं. श्रद्धा आणि राष्ट्र याला समांतर पातळीवर उभं केलं. याउलट विरोधकांनी त्या तरुणांच्या श्रद्धेचं हसं केलं. देशप्रेमाची टिंगल उडवली. राष्ट्रभक्तीवर शंका घेतली. श्रद्धेला विवेकाशी जोडून त्याचा बाजार मांडला. ही मोठी गल्लत विरोधकांकडून झाली.

विरोधकांनी सत्ताधारी पक्षाची संघघन बांधणीचं गमक लक्षात घेतलं असतं तर त्यांच्यासाठी आजचं चित्र जरासं वेगळं ठरलं असतं. २०१४च्या निकालाच्या अवसायानातून विरोधकांना बाहेर पडायला तब्बल दोन वर्षं लागली. नोटबंदीनंतर विरोधकाला बळ आलं. (काहींच्या मते पैसा निसटून गेल्यानं) राफाएलनंतर ते आक्रमक स्वरूपात बाहेर आलं. तत्पूर्वी त्यांना वाटत होतं की, भाजपच्या अन्यायी धोरणांचा विरोध विचारवंत व जनतेवर सोपवू. याच उक्तीप्रमाणे विरोधक हळूहळू निष्क्रिय होत गेला.

विरोधकांकडे जवळ असलेली मंडळी त्यांची कट्टर समर्थक आहे, पण ते मतदार नाहीत. त्यांचं वयही आता साठी पार गेलेलं आहे. त्यांच्या घरातही वेगवेगळ्या पक्षीय विचारसरणीचा व्यावहारिक संघर्ष सुरू आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या काळातील काँग्रेस समर्थक (मतदार) काठावर बसून आहेत. भ्रष्टाचार, महागाई, सरकारचं नैतिक पतन इत्यादी कारणामुळे त्यांची प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची इच्छाही उरली नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

याउलट, प्रचंड उर्जा असलेला तरुणवर्ग हा देशात ५५ टक्क्यांपर्यंत आहे. यातले २५ टक्के तरुण २००० नंतर जन्मलेले आहेत. स्वातंत्र्य आंदोलन, पंडित नेहरूंचा समाजवाद, इंदिरा गांधींचा कणखरपणा, राजीव गांधीची दूरदृष्टी, हाशीमपुरा दंगल, मंडल आयोग, दिल्लीतली शीख दंगल, रामजन्मभूमी आंदोलन, जागतिकीकरण, बाबरी उदध्वस्तीकरण, मुंबई दंगल, गुजरातचा नरसंहार याबद्दल ही पिढी अनभिज्ञ आहे. संघाचं आक्रमक राजकारण, प्रखर मुस्लीमविरोध बघत-बघत ही पिढी मोठी झाली आहे. त्यांना भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाची नीती माहीत नाही. या वर्गाला संघ-भाजपविरोधात असलेल्या प्रागतिक संघटना व पक्षाचा वैचारिक संघर्ष उमजत नाही. त्यांच्या मनावर संघाचा हिंदूराष्ट्रानं गारूड घातलं आहे. ‘हिंदूचं राज्य’ ही कल्पना त्यांना सुखावणारी आहे. याच रंजक कल्पनेतून ही तरुण पिढी भाजपची ‘व्होट बँक’ झालेली आहे.

करिअरच्या मागे लागलेली ही पिढी स्पर्धेमुळे त्रस्त झालेली आहे. भौतिक गरजांच्या मागे पळणारा आजचा हा युवावर्ग स्वप्नाळू जगात वावरतो आहे. शॉर्टकटचा शोध घेणारी ही मंडळी नैतिकता ओलांडून व्यावहारिकतेला कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पिढींसमोर काँग्रेसचा ‘लोकशाही समाजवाद’ काहीच उपयोगी ठरणारा नाहीये. एका अर्थानं तो फोल ठरेल. नैतिकतेच्या पातळीवर हा विचार योग्य असला तरी त्याची व्यावहारिकता अजून या पिढीला उमगलेली नाही. तो रूजावाच असा अट्टाहासही आता योग्य नाही. प्रबोधनाचे डोस द्यायला सुरू केलं की, हा तरुणवर्ग अंतर ठेवायला सुरू करतो. कारण तो तुमच्या अनुभव व ज्ञानमर्यादेच्या फार पुढे गेलेला आहे. गॅझेटच्या माध्यमातून त्यानं जगाला चिमटीत पकडलं आहे. एका क्लिकवर तुमच्याजवळ नसलेला अनुभव व माहितीची असंख्य दालनं त्याच्याजवळ येतात. अशा व्यावहारिक पिढीला कुठला समाजवाद व लोकशाही मूल्यं कळणार?

जनरेशन गॅप असली तरी या वर्गापर्यत पोहोचावं लागणार आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. यांच्यापर्यंत पोहोचण्याची साधनं बदलावी लागणार आहेत. वैचारिकता, प्रबोधन, नैतिकता घेऊन विरोधकांनी तरुण वर्गाकडे कदापि जाऊ नये, तर किमान पातळीवर त्यांचे प्रश्न, समस्या व अभिव्यक्ती समजून घ्यावी लागणार आहे. हा तुमचा उद्याचा मतदार आहे, या नात्यानं त्याला महत्त्व देण्याची गरज आहे. नुसतं कॉलेजमध्ये जाऊन प्रश्न-उत्तरं केली म्हणजे युवावर्गापर्यंत पोहचणं होत नाही. तरुणांच्या भावविश्वाला समजून घ्यावं लागेल. तरुणांच्या मतांना महत्त्व द्यावं लागणार आहेत.

भाजपला हे वेळीच कळाल्यानं त्यांच्या पायात आज यश लोळणं घालत आहे. विरोधकांनी मात्र या समूहगटाकडे डोळेझाक कली आहे. भाजपचा विजयी रथ रोखायचा असेल तर विरोधकांना ‘ओल्ड ग्रूप’ला साइडट्रॅक करायची गरज आहे. दुसरीकडे भाजपला सत्तेत राहायचं असेल तर त्यांना धार्मिक ध्रुवीकरणाची नीती साईटला ठेवावी लागणार आहे. कारण कुठलीही चूक ही एकदाच होत असते. माजी न्या. मार्केडेंय काटजूंनी भारतीय मतदारांना ‘बालीश’ म्हटलं असलं तरी येत्या काळात तो सुज्ञ होईल. त्याला कळायला लागल्यावर भावनिक प्रश्नाला तो कदापि साद घालणार नाही, तर तो शिक्षण, रोजगार सारख्या मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी तुमच्याकडे तो करू शकतो. त्यामुळे भाजपसाठीदेखील येणारा काळ हा धकाधकीचा राहणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे सहसंपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......