‘काँग्रेस’ हा एक ‘विचार’ आहे. तो लोकशाहीत टिकला पाहिजे!
पडघम - देशकारण
अमोल शिंदे
  • राहुल गांधी
  • Wed , 29 May 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi नेहरू Nehru नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

राहुल गांधी हे धूर्त राजकारणी नाहीत. सरळ, साधे, चुकांमधून शिकणारे किंवा शिकू पाहणारे नेते आहेत. ते अगदी निरागसपणे आपल्या मर्यादेत राहून पक्षाचे नेतृत्व करत आहेत. आपण आपल्या गांधीवादी विचारसरणीने विरोधकांना मात देऊ शकतो, हा भाबडा आशावाद त्यांनी जपला आहे. त्यांच्या या मवाळ राजकारणाचा फायदा घेत विरोधकांनी सर्व नीतींचा वापर करून त्यांची प्रतिमा एवढी चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे की, ‘पॉलिटिकल सेन्स’ शून्य असलेली व्यक्तीही त्यांना सध्या एक पर्याय म्हणूनही स्वीकारायला तयार नाही. अगदी चार पिढ्या मागे जाऊन लोक फक्त ऐकीव माहितीच्या आधारावर त्यांच्या घराण्यावर खालच्या शब्दांत टीका करतात. सध्या राहुल गांधींमध्ये पूर्वीपेक्षा थोडी आक्रमकता आल्यामुळे लोक व विरोधक त्यांना आधीपेक्षा थोडेसे गांभीर्याने घेऊ लागले आहेत, हीच काय त्यांची तेवढी जमेची बाजू म्हणावी लागेल.

पण आपला भाबडेपणा कळत-नकळतपणे पक्षासाठी आणि देशासाठी घातक आहे, हे राहुल गांधींना कळत नसेल तर मग कठीण आहे. कारण आता लोकांना गांधी घराणे सत्तेत नकोसे झालेले आहे. आणि ही मास मेंटॅलिटी आहे. ती कुणाला पटो न पटो, पण समजून घ्यायलाच हवी.

अलीकडच्या काळात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप मान्य केले तरी, गांधी घराण्याने स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत जे काही योगदान दिले आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. पण जेव्हा लोकांना मागे वळून इतिहास अभ्यासायचाच नसतो, निष्पक्ष भावनेने दोन्ही बाजू तपासायच्या नसतात, सर्व स्त्रोत उपलब्ध असताना ऐकीव माहिती किती खरी आणि किती खोटी हे पडताळून पाहायचे नसते किंवा इतिहास अभ्यासल्यावरही तो स्वीकारायचा नसतो, तेव्हा खरी समस्या ‘गांधी’ या नावात आहे, हे स्पष्ट होते.

एकतर राहुल गांधींकडे आपल्या घराण्याचे व पक्षाचे देशासाठी असलेले योगदान लोकांच्या मनात बिंबवण्याची यंत्रणा नाहीये. आणि सत्ताधाऱ्यांच्या चुका लक्षात आल्यावर लोक आपोआप आपल्याकडे वळतील, याची वाट पाहत राहणे हा त्यांचा सर्वांत मोठा दुर्गुण आहे.

आजही या देशातील जनतेला कोणीतरी एक मसीहा येईल आणि जादूची कांडी फिरवून देशाला महासत्ता बनवेल, असे वाटते. किंवा देशाला महासत्ता विशिष्ट व्यक्तीच बनवू शकते, असे त्यांच्या मनावर कोरले जाते, तेव्हा त्यांना दुसरा पर्याय नको असतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar

.............................................................................................................................................

गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी, महागाई, नोटबंदी, जाचक कर यंत्रणा, पेट्रोल-डिझेल भाववाढ, शेतमालाला भाव न मिळणे, भारतीय रुपयाचे अवमूल्यन, मॉब लिंचिंग, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर आलेली गदा, कोलमडत चाललेली अर्थव्यवस्था इ. अनेक समस्या असतानाही जनतेने नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा का निवडून दिले?

कारण सत्ताधारी पक्षाची यंत्रणा सामान्य जनतेच्या मनात गांधी घराणे व काँग्रेसबद्दल असलेली किंवा कृत्रिमरीत्या निर्माण केलेली चीड अजूनही कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. म्हणूनच काँग्रेस सत्तेवरून पायउतार होऊन आणि मोदींची दुसरी टर्म सुरू होऊनही लोक गांधी घराण्यालाच प्रश्न विचारतात!

हे सर्व असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत आपला मतदारसंघ सोडून बाहेर प्रचारास जात नाहीत. पक्षात बोटावर मोजण्याइतकेच पुढारी शिल्लक राहिले असतानाही तिकीट वाटप करताना त्यांच्यात गट-तट पडतात आणि भांडणे चव्हाट्यावर येतात. जर कोणी नवीन तरुण कार्यकर्ता स्वकर्तृत्वावर पक्षात मोठा होत असेल तर त्याचे पंख जाणूनबुजून छाटले जातात. काँग्रेसमध्ये जनतेला नको असलेली सरंजामशाही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. पक्षातील बहुतांशी पदाधिकारीदेखील घराणेशाहीतूनच येतात.

जर लोकशाहीत विरोधक मजबूत नसतील, ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकत नसतील, तर देश हळूहळू हुकूमशाहीकडे पाऊले टाकू लागतो. अशा परिस्थितीत विरोधकांचे गळे दाबले जातात. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ न राहता सत्ताधाऱ्यांचा मजबूत ‘आधारस्तंभ’ बनतात. आणि मग जोवर ‘जर्मनी’ बरबाद होत नाही, तोवर ‘हिटलर’ लोकप्रियच असतो!

देशात ही संभाव्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी विरोधी पक्षात असलेला, कमकुवत झालेला आणि चोहीकडून पोखरत चाललेला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. देशाच्या विकासाची गती वाढवायची असेल तर एकतर सत्ताबदल हवा किंवा विरोधक तरी मजबूत हवा.

काँग्रेसला या देशाच्या भवितव्याची खरंच चिंता असेल, तर प्रथम राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामाच द्यावा. तसा तो त्यांनी नुकताच दिला आहे. त्यापासून माघार न घेता त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहावे. त्या पदावर प्रियंका गांधींचाही विचार होऊ नये. गांधी घराणे सोडून एखाद्या तरुण, तडफदार व अभ्यासू अशा नेत्याला संधी द्यावी. यामुळे भलेही तात्काळ कायापालट होणार नाही, पण जनतेची व कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्यास नक्की सुरुवात होईल. तसे काही न होता हे असेच सुरू राहिल्यास ‘काँग्रेस ही गांधी घराण्याची जहागिरी आहे आणि त्या जहागिरदारांना आम्ही देशावर राज्य करू देणार नाही’, या मानसिकतेतून जनता बाहेर पडणार नाही. आणि विद्यमान सत्ताधारी त्याचा पुरेपूर फायदा घेत राहतील. म्हणून नेतृत्वात बदल करणे काँग्रेस व देशाच्या भवितव्यासाठी हितकारकच ठरेल.

यासोबत पक्षाने संघटनही वाढवायला हवे. सरंजामशाहीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जाहीररीत्या पक्षासाठी ‘पब्लिक डोनेशन’ मागावे. भाजपला या निवडणुकीत १०२७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेसला त्या तुलनेत फक्त १४३ कोटी रुपयांच्या. भाजपने निवडणूक काळात १० हजार वॉर रूम्स स्थापन केल्या होत्या. जवळपास २० कोटी लोकांशी थेट संपर्क साधता येईल अशी यंत्रणा उभी केली होती. काँग्रेसच्या हाती पैसा व कार्यकर्ता यांपैकी काहीच शिल्लक राहिलेले नाही.

काँग्रेसकडून ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आता तरी योग्य सन्मान झाला पाहिजे. कारण आता कार्यकर्ता पूर्वीसारखा स्वाभिमानशून्य राहिलेला नाही. त्याच्या कामाची यथोचित दखल घेतली गेली, तरच तो पक्षासाठी झटून काम करेल.

या सर्वांच्या जोडीला प्रशांत किशोरसारखा एखादा स्ट्रॅटेजिस्ट सोबत घ्यावा व प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करावा. पक्षाची एक निश्चित दिशा ठरवून नियोजनात्मक आणि संघटनात्मक पद्धतीने वाटचाल करावी.

कोणताच विजय अंतिम नसतो आणि पराभवही अंतिम नसतो. काँग्रेस हा एक विचार आहे. तो लोकशाहीत टिकला पाहिजे. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा मी अण्णा हजारेंच्या ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’मध्ये सक्रिय होतो. त्यामागे अनेक छुपे गणिते होती. तेव्हा रामदेव बाबांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध घेतलेला स्टँड मला गरजेचा वाटायचा. तेव्हा मी काँग्रेसविरुद्ध मतप्रदर्शन करायचो, पण तेव्हा कुठलाही काँग्रेस कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून येत मला ‘भाजपचा चमचा’, ‘देशद्रोही’ असे काही संबोधायचा नाही. पण सध्या सरकार विरोधी काही व्यक्त झाले की, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ढोंगी देशभक्त अंगावर धावून येतात. हे फार गंभीर आणि धोकादायक आहे.

आमच्या घरात आज सत्तेत असलेल्या पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक आहेत. मी आयुष्यात कधी काँग्रेस कार्यकर्ता नव्हतो. बहुतेक यापुढेही कधी नसेल. पण लोकशाही जगवायची असेल तर आपण सर्व एक होऊन कोणत्याच सत्तेचे गुलाम वा भक्त न होता, जे कोणी सत्तेत असतील त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारूया. आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील, यासाठी झटूया.

बाकी सरकारच्या योजनांचा प्रसार करण्यासाठी ‘सूचना व प्रसारण मंत्रालय’ असते. ते काम जनतेच्या पैशातूनच होते. ते सरकारला करू द्यावे. पण जेव्हा प्रसार-प्रचार यातील रेषा पुसली जाते आणि पाच वर्षांत जनतेच्या हजारो कोटी रुपयांचा वापर फक्त जाहिराती व प्रचारासाठी केला जातो, तेव्हा गुलामाप्रमाणे सरकारचे प्रचारक न बनता एक जागरूक नागरिक म्हणून त्याबद्दल प्रश्न विचारणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षाचीही तेवढीच गरज आहे. आणि ती राष्ट्रीय पातळीवरील सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच निभावू शकतो. उद्या सत्ताधारी व्हायचे असेल तर आज विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करावे लागते, हा तर जगभरातला सांगावा आहे!

.............................................................................................................................................

लेखक अमोल शिंदे सिव्हिल इंजीनिअर असून आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

amolvashinde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा