इम्तियाज जलील : ‘यश-अपयश हा आमच्यासाठी मोठा प्रश्न नाही. प्रत्येकांना समान संधी देऊन आम्ही लोकशाही मार्गानं जाणार...’
पडघम - राज्यकारण
कलीम अजीम
  • एमआयएमचे औरंगाबाद येथील नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील
  • Fri , 24 May 2019
  • पडघम राज्यकारण इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar असदुद्दीन ओवैसी Asaduddin Owaisi एमआयएम MIM All India Majlis-e-Ittehadul Muslimeen

‘वंचित बहुजन आघाडी’ व एमआयएम यांची राजकीय युती झाली आणि प्रस्थापित राजकीय पक्षाचे डोळे विस्फारले गेले. एमआयएमला तोवर असंविधानिक, रझाकारांचा पक्ष, सांप्रदायिक शक्ती म्हणून बदनामी केलं गेलं. युतीनंतर त्याही पुढे जाऊन ‘भाजपची बी’ टीम, कट्टरवादी, अलगतावादी,  फुटीरवादी म्हणण्यापर्यंत मजल गेली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सेक्युलर राजकारणाचा शत्रू’ म्हणून एमआयएमची प्रतिमा मलीन केली गेली. एमआयएमवर टीका करताना प्रस्थापित राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीवरही घसरले. लोकसभा २०१९च्या निवडणुकीत या युतीचं पानीपत झालं. मात्र एमआयएमचे लोकसभा उमेदवार इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून विजयी झाले आहेत. त्यांची ही मुलाखत कालच्या निवडणूक निकालाच्या बरीच आधी म्हणजे डिसेंबरदरम्यान घेतली होती. पण ती काही कारणांमुळे तेव्हा प्रकाशित होऊ शकली नाही. आता या मुलाखतीमधील काही संदर्भ बदलले असले तरी या मुलाखतीमधून एमआयएमची भूमिका जाणून घ्यायला मदत होईल.

.............................................................................................................................................

प्रश्न - ‘वंचित बहुजन आघाडीला घेऊन महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांकडून अप्रचार केला जात आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे. एमआयएमवर वेगवेगळे आरोप होताहेत, याकडे तुम्ही कसं पाहता?

उत्तर - आमच्यावर अशा प्रकारचे आरोप होणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. आताही असे आरोप होताहेत. ते स्वाभाविक आहे. कारण दलित-मुसलमानांना घेऊन अशा प्रकारचा प्रयोग राजकारणात पहिल्यांदा होत आहे. त्यांची पारंपरिक मतं आमच्याकडे येणार या भीतीतून ही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. असा प्रयोग होऊ शकतो याबद्दल कोणीही विचार केला नसेल. काही लोकांना असं वाटत आलं आहे की, दलित, मुसलमान आणि ओबीसी हे फक्त मतदान करण्यासाठीच असतात. त्यांचं काम फक्त निमूटपणे मतं देणं हेच आहे. त्यांना आमदार किंवा खासदार करायची गरज नाही. हा वर्ग फक्त मतं देत राहील आणि आम्ही सत्तेत जाऊन बसू, अशी धारणा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पण हा पायंडा आम्ही बदलू पाहतोय.

महाराष्ट्रात असा एखादा दलित नेता मला दाखवा, ज्याला या ‘सो कॉल्ड सेक्युलर’ म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी घडवलं असावं. मुसलमानांच्या बाबतीतही हेच लागू होतं. मुस्लिमांत अशी एखादी व्यक्ती दाखवा, जी सांगू शकेन की, ‘होय, मी महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांचा नेता आहे.’ काँग्रेस-राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना असं कधीच वाटलं नाही की, राज्यात दलित आणि मुसलमानांतील नेता तळागाळामधून तयार व्हावा. या पक्षांनी नेहमी हाच प्रयत्न केला आहे की, कुणाला तरी उचलायचं आणि विधान परिषद वा राज्यसभेवर पाठवायचं. पण जनतेमधून त्यांनी एकही असा नेता निवडला नाही, जो सामान्य माणसांचे प्रश्न मांडेल. जो कामगार, मजूर व गरीब-वंचिताच्या हक्कांबद्दल बोलेल. सामान्यांना संधी देण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र आलो आहोत. आमच्याबद्दल त्यांच्या मनात भीती आहे. आम्ही जर जनमान्य व प्रभावशाली नसतो, तर त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलं असतं. पण त्यांनी आमची दखल घेतली आहे. याचा अर्थ आमचं समाजातील स्थान व उपद्रवमूल्य त्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळेच ते आमच्याबद्दल प्रत्येक जाहीर सभेत विरोधाभासी बोलतात. भाजपच काय पण बाकीचे पक्षदेखील आमच्याविरोधात बदनामीकारक गरळ ओकत असतात. यातून असा संकेत मिळतो की, आगामी काळात वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात उल्लेखनीय बदल घडू शकतो.

प्रश्न - भारिप-एमआयएम युतीवर रामदास आठवले म्हणाले होते की, सर्वच दलित आंबेडकरांसोबत नाहीत. तसेच सर्व मुस्लीमही एमआयएमसोबत नाहीत. काहीजण असाही आरोप करत आहेत की, दलित मतांमध्ये विभागणीचं हे षडयंत्र आहे.

उत्तर - रामदास आठवलेंनी आपल्या समाजासाठी काय केलं आहे? त्यांनी जर आपल्या समाज बांधवांसाठी काही केलं असतं, तर माझ्या मते समाजात त्यांचा आदर व सन्मान झाला असता. या उलट आज आठवलेंना समाजातून शिव्या व अवहेलनेचा सामना करावा लागत आहे. याचा अर्थ असा की, त्यांनी आधी शिवसेना व नंतर भाजपशी संधान बांधून मंत्रिपद मिळवलं. पद मिळताच त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडलं. आठवलेंनी नेहमी फक्त आपला स्वार्थ बघितला. सरकार कुणाचंही असो त्यांच्यासोबत आपण जोडून घेऊ, आपलं मंत्रिपद पक्कं करू हेच त्यांनी पाहिलंय. केंद्रीय मंत्री असूनदेखील लोकसभा-राज्यसभेत आपल्या समाजाच्या मुद्द्यावर ते बोलत नाहीत. भाजपच्या सत्ताकाळात मुसलमानांसह दलितांचंदेखील मॉब लिचिंग झालं. भीमा कोरेगाव दंगल, भारत बंदवर ते गप्प होते. ज्या मुद्द्यांवर दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलायला हवं होतं, ते मुद्दे असददुद्दीन ओवैसी संसदेमध्ये उचलत आहेत. या उलट आठवले तिथं मुशायरे गात बसतात. संसद हे काही मुशायरा वा कविता सादर करण्याचं व्यासपीठ आहे का? राहिला प्रश्न कोण कोणासोबत आहे, ते येणारा काळ महाराष्ट्राला सांगेन.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

प्रश्न - युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांबद्दलही अप्रचार सुरू आहे. त्यांच्या मतदारसंघावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. जागा वाटपांचा तिढा भारिप-एमआयएम युतीमध्ये निर्माण झाला आहे का?

उत्तर - गैरसमज निर्माण करणारे खूप आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं करतो. आम्ही म्हणतो की, काँग्रेस-राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांना बिनविरोध संसदेत पाठवावं. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला विधानसभेत पाठवलं गेलं. पतंगराव कदम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव विश्वजीतना बिनविरोध निवडून देण्यात आलं. दोन्ही उमेदवाऱ्या देताना जनतेला हात जोडून विनंती केली गेली की, कोणीही निवडणूक लढवू नये. मतदारांना व विरोधी पक्षाला भावनिक आवाहन करून त्यांना निवडून देण्याची विनंती करण्यात आली. या पक्षांना जर दलित समाजाबद्दल एवढी आपुलकी असेल तर त्यांनी असं घोषित करावं की, प्रकाश आंबेडकरांविरोधात आम्ही कुठलाही उमेदवार देणार नाही.

प्रकाश आंबेडकर तर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. प्रकाशजी अनेक दिवस वाट पाहात होते की, कुणीतरी त्यांच्याशी चर्चा करेल. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष मागे वळून पाहतील म्हणून प्रकाश आंबेडकर चार महिने वाट पाहत होते. पण त्या पक्षानं कुठलीच हालचाल केली नाही. आम्ही जशी भारिप-एमआयएम युतीची घोषणा केली, तसे ते बुके घेऊन आंबेडकरांच्या घरी गेले. मग चार महिने दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं? खरं सांगायचं झाल्यास त्यांनी आत्ता भारिप-एमआयएम युतीची धास्ती घेतली आहे. त्यामुळे आमच्याविरोधात अप्रचार केला जात आहे. त्यांनी आमच्याबद्दल खुशाल दुष्प्रचार करावा. आम्ही फक्त त्यांना हिशोब मागत आहोत की, त्यांनी आत्तापर्यंत किती वंचित समुदायातील लोकांना राजकारणात समान संधी देऊन निवडून आणलं आहे? अशोक चव्हाण आणि शरद पवार यांना आम्ही प्रश्न विचारतो की, राज्यात तुम्ही एखादा मुस्लीम खासदार निवडून आणू शकत नाही का? महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी असा एकही मतदारसंघ नाही का, जिथं आमचे लोक निवडून येऊ शकतील? मराठा, दलित आणि मुसलमानांतील सेक्युलर लोकांना एका जागी एकत्र आणून त्यांना हे का पटवून दिलं जात नाही की, आम्हाला मुसलमानांतील एक-दोन खासदार निवडून आणायचे आहेत. आम्ही काय फक्त तुम्हाला मतदान करण्याचं गुत्तं घेतलं आहे?  आम्ही यासाठी बहुजन वंचित आघाडीचा प्रयोग करतोय. आता तर आम्ही शून्य आहोत. याच शून्यात आम्ही हा प्रयोग करत आहोत. पराभव झाल्यास आम्हाला कुठलं असं मोठं नुकसान होणार आहे? त्यामुळे आम्ही राज्यात अनेक जागांवर निवडणुका लढवणार आहोत.

प्रश्न – काँग्रेस-राष्ट्रवादी कुरापती व शह-काटशहाचं राजकारण करतात...

उत्तर – ठिकंय. असं ग्राह्य धरूया की, या पक्षांना मुस्लिमांबद्दल वैर व भेदभाव आहे. मग ते दलितांना का निवडून देत नाहीत? आठवले का गेले सोडून? प्रकाश आंबेडकर तर बाबासाहेबांचे वारसदार आहेत.  मग त्यांना का निवडून आणलं जात नाही? राष्ट्रवादीला आंबेडकरांविरोधात कोणताच उमेदवार उभा करायचा नव्हता ना,  मग २०१४ला अकोल्यामधून आंबेडकरांविरोधात मुस्लीम उमेदवाराला का उभं केलं? कारण पवारांना ठाऊक होतं की, आंबेडकर मुस्लिमांच्या मतांशिवाय जिंकून येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी ही खेळी केली. म्हणजे मुस्लीम उमेदवाराचादेखील पराभव होईल आणि प्रकाश आंबेडकरांचादेखील. पण बाहेर काय संदेश जाणार की, राष्ट्रवादीनं मुसलमानांना उमेदवारी दिली होती. हे शह-काटशहाचं राजकारण प्रस्थापित पक्षांकडून किती दिवस चालणार?

प्रश्न - भारिपशिवाय अन्य प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी एमआयएम कुठला प्रयोग राबवणार आहे का?

उत्तर - सध्या तरी आम्ही फक्त असा निर्णय घेतला आहे की, वंचित बहुजन आघाडीसोबत राहायचं. पुढचा निर्णय आम्ही प्रकाश आंबेडकरांवर सोपवला आहे. आमचा प्रयत्न असा आहे की, ज्या खालच्या थरातील समाजाला गेल्या ७० वर्षांपासून फक्त मतदान करण्याचं काम देण्यात आलं होतं, त्यांना आता राजकारणात समान वाटा हवा आहे. तो मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यश-अपयश हा आमच्यासाठी मोठा प्रश्न नाही, प्रत्येकांना समान संधी देऊन आम्ही लोकशाही मार्गानं निवडणुकांना सामोरं जाणार...

प्रश्न - एमआयएम असं सांगत आहे की, आमचा पक्ष मराठी मुसलमानांचं नेतृत्व उभं करू पाहात आहे. तुमच्या मते इतर पक्षांत मुसलमानांमध्ये नेतृत्व नाही का?

उत्तर - गेल्या ७० वर्षांतली आकडेवारी बोलकी आहे, ती पाहावी. तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. महाराष्ट्रात मराठी मुसलमानांचं नेतृत्व विकसितच होऊ नये अशी मोर्चेबांधणी केली जाते. वेळोवेळी त्यांना संपवण्याचं काम केलं गेलं. एमआयएमला ‘भाजपचे दलाल’ म्हटलं जातं. औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितरीत्या सत्तेत आहेत. राज्यात अशी कितीतरी ठिकाणं आहेत, जिथं काँग्रेसनं भाजप व शिवसेनेसोबत सत्तेसाठी छुपी युती केली आहे. मग आम्हाला ‘बी टीम’ म्हणून शिरजोरी का केली जाते? ते एकत्र येऊ शकतात, मग आम्हालाच का दलाल म्हणतात? खरे दलाल तर हेच पक्ष आहेत. मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा होतो, त्यावेळीदेखील आम्हाला ‘बी टीम’ म्हटलं जात होतं. जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडली असती तर आम्ही जिंकू शकलो नसतो. उलट त्यांचं औरंगाबादमध्ये डिपॉझिट जप्त झालं!

प्रश्न - मध्यंतरी तुमचं खाद्य व पुरवठामंत्री गिरीश बापटांसोबतचं छायाचित्र फिरवून असा प्रचार केला जात होता की, बघा आम्ही सांगत होतो ना, ते ‘बी टीम’चे सदस्य आहेत. आता आमदार इम्तियाज जलीलही सामील झाले संघवाल्यांना...

उत्तर - राज्यात व देशात भाजपचं सरकार आहे. राज्यात कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर भाजपच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटावं लागणार. पक्षीय मतभेदांशिवाय आमच्यामध्ये मैत्री आहे. विधानसभेत त्यांच्या सोबत बसावं-उठावं लागतं. राजकारणात आमचे मतभेद आहेत, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. मी २४ वर्षं पत्रकारिता केली आहे. एकेकाळी मी पश्चिम महाराष्ट्राचा ब्युरो चीफ होतो. सर्व राजकीय व्यक्तींसोबत माझे चांगले व व्यक्तिगत संबंध आहेत. आम्ही आजही भेटतो, बोलतो, एकत्र चहापान घेतो. याचा अर्थ आम्ही त्यांच्यात जाऊन बसलो, असा होत नाही. मी तर म्हणेल की, देशात सर्वांत जास्त धोका कुठल्या संघटना व पक्षाकडून असेल तर तो भाजप व संघाकडून आहे. अशा घटनाविरोधी संघटनेच्या लोकांना आमचा पाठिंबा कसा असेल? भाजप हा मुस्लिमांसाठी हितकारी आहे का? मागील १० वर्षांत जेवढ्या दंगली भारतात झाल्या त्याचा ‘मास्टरमाइंड’ कोण आहे? आणि त्या मास्टरमाइंडला शह देण्याचं काम कुणी केलं? देशात गेल्या साडेचार वर्षांतही भयाण दंगली घडलेल्या आहेत. त्यात मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान झालं. याला कोणता पक्ष जबाबदार आहे याचं उत्तर कोणीही देऊ शकेन. भाजपच काय पण इतर पक्षांच्याही भूमिका स्पष्ट आहेत. त्यांना कोणालाच मुस्लीम प्रश्नांबद्दल काही देणं-घेणं नाही.

प्रश्न - विधानसभेसाठी भारिप-एमआयएम युतीचा प्रयोग झाला, तसाच प्रयत्न लोकसभेसाठी राज्याबाहेरही सुरू आहे का?

उत्तर - थोडासा धीर धरा, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही बघत राहा आम्ही पुढे काय-काय करतो. येणारे बदल काळ ठरवेल.

प्रश्न - लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी होत आहे. यात तुम्ही कुठल्या पक्षांसोबत असणार? काँग्रेससोबत असणार की स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरं जाणार?

उत्तर - आमच्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व पक्ष एकसारखे आहेत. एमआयएमसाठी हे सर्व पक्ष व त्यांचे प्रमुख लोक एकाच माळेचे मणी आहेत. यापैकी कुठल्याच पक्षानं मुस्लिमांना समान राजकीय प्रतिनिधित्व दिलेलं नाही. दुसरं असं की, काँग्रेसनं भारिपला आधी विचारलं असतं तर त्यांना एमआयएमसोबत युती करायची गरजच पडली नसती. मतदारांनी त्याच वेळी म्हटलं असतं की, बाबा रे! काँग्रेस आता दलितांना व मुस्लिमांना निवडून आणणार आहे. त्यांना आमचं नेतृत्व मान्य आहे. पण या पक्षांनी आम्हाला दुर्लक्षित केलं. त्यामुळेच आम्ही एकत्र येण्याचा नवा प्रयोग केला. तुम्ही आमच्यासोबत न्याय केला असता तर आम्हालाही बरं वाटलं असतं. पण तुम्ही अन्याय केला म्हणूनच जनतेनं आम्हाला स्वीकारलं आहे.

प्रश्न - दलित आणि मुस्लिमांनी राजकारणात एकत्र यावं असं आपणास का वाटतं?

उत्तर - हे दोन समाज असे आहेत ज्यांना आजवर सर्व राजकीय पक्षांनी फक्त वापरून घेतलं आहे. गेल्या ७० वर्षांचा कालावधी पाहिला तर त्यांचं आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन झालेलं नाही. आज भारतातील झोपडपट्ट्यात कोणता वर्ग सर्वाधिक असतो, हे प्रत्येकाला माहीत आहे. अशा गलिच्छ वस्त्यांमध्ये फक्त दलित आणि मुस्लीम लोक राहतात. त्या भागात रस्ते, पाणी, गटारं आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांची वानवा असते. पण देशी दारू, चरस-गांजासारखी दुकानं तिथं थाटलेली असतात. सरकारला हे माहीत असतं की, ही दारू, चरस, गांजा शरीराला अपायकारक आहे. तरीही सरकार त्याची परवानगी देतं. म्हणजे हे स्पष्ट आहे की, कुठल्याही सरकारला या वंचित समाजाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती घडू द्यायची नाही.

दिवसा दोनशे कमावणार्‍या व्यक्तीला तुम्ही दारू पाजता. तो आपल्या मुलांना काय खाऊ घालणार? नशेत तो आपल्या पत्नीला मारहाण करतो. एकूण त्या दारूचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. सरकारला हेच हवं असतं. दलित आणि मुस्लीम वंचित व शोषित गटात मोडतात. त्यांच्या वस्त्याही मिश्र स्वरूपाच्या असतात. शोषित, पीडित असल्यानं दोन्ही समाजात आपुलकीचं व सदभावनेचं एक नातं तयार झालेलं असतं. दोन्ही समाजात गरिबी व दारिद्र्य आहे. असे समाज राजकारणाच्या माध्यमातून एकत्र आले तर लोकशाही मार्गानं त्यांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात.

प्रश्न - हिंदू-मुस्लीम जात राजकारणाबद्दल आपल्या पक्षाची कोणती भूमिका आहे?

उत्तर - भारतात जात आणि धर्माच्या नावानं राजकारण खेळलं जाणं काही नवीन नाही. याच आधारावर देशात कुठलीही उमेदवारी जाहीर होते, ही वस्तुस्थिती आहे. शिपायापासून ते पंतप्रधानांपर्यंत जातीला महत्त्व  दिलं जातं. अशात एक मुस्लीम मुसलमानांची भाषा बोलत असेल तर त्यात आम्ही कसलाच गुन्हा करत नाही. यादव यादवांची भाषा बोलतात, ब्राह्मण ब्राह्मणांबद्दल सहानुभूती दाखवतात. संघवाले संघींना संधी देतात. मराठे मराठ्यांना उमेदवारी देतात. राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी असंच झालं. त्या वेळी दलित कार्ड वापरून मतं गोळा करण्यात आली. आम्ही उच्चपदावरील नियुक्त्या व निवडणुकींबद्दल बोलत आहोत. नगरसेवक आणि आमदार तर खूप लांबची गोष्ट राहिली.

२०१४ साली जवखेड्यातील दलित अत्याचार प्रकरणात आम्ही सर्वप्रथम तिथं गेलो. पीडित कुटुंबाला भेटून त्यांचं सात्वंन केलं. पण सुरुवातीचे बरेच दिवस अन्य पक्ष तिथं फिरकलेसुद्धा नाहीत. जिथं दलितांची हत्या होते, तिथं  ‘रिप्रझेंटिटीव्ह पॉलिटिक्स’ खेळलं जातं. पण आम्ही राजकारण न करता पीडितांच्या बाजूनं बोललो. घटनेला महिना उलटला तरी कुठलीच कारवाई झालेली नव्हती. आम्ही स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. इतकंच नाही तर खासदार अससुद्दीन ओवैसींनी सर्वप्रथम हा प्रश्न लोकसभेत लावून धरला. आमचा पक्ष पीडित शोषितांच्या बाजूनं नेहमीच लढा देईल. ‘कास्ट पॉलिटिक्स’ला आमच्याकडे थारा नाही.

प्रश्न -  पत्रकारितेत उत्तुंग यश प्राप्त असताना या नव्या इनिंगमध्ये साडेचार वर्षांनंतर आपण स्वत:ला कुठे पाहता?

उत्तर - माझ्यासाठी राजकारणात येणं म्हणजे एक मोठा जुगार होता.  मला हे माहीत होतं की, मी ज्या एमआयएममध्ये आहे, त्या पक्षाची प्रतिमा माध्यमांत नकारात्मक पद्धतीनं रंगवली गेली आहे. असं असताना पराभवानंतर कोणत्याच राष्ट्रीय वृत्तपत्रानं आणि वृत्तवाहिनीनं मला उभंदेखील केलं नसतं. कारण मला एमआयएमचा टॅग लागलेला होता. तरीही मी राजकारणात येण्याचं आव्हान पेललं. परतीचा कोणताच मार्ग माझ्याकडे नव्हता. मी सो कॉल्ड सेक्युलर पक्षाकडून निवडणूक लढवली असती तर पराभवानंतर मला त्यांनी कोठेतरी सामावून घेतलं असतं किंवा मला काम मिळालं असतं. परंतु मी त्याच शिक्क्याखाली लढायचा विचार केला. पूर्ण ताकदीनिशी लढलो आणि जिंकलो.

गेल्या साडेचार वर्षांत विविध मोर्चांवर आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. मुस्लीम आरक्षणाच्या प्रश्नांपासून ते  नाहक अटक केलेल्या तरुणांपर्यंत. भाजपच्या कथित राष्ट्रद्रोहाविरोधात आंदोलनं केली. मॉब लिचिंग, धर्मवादावर भाजपला घेरलं. विधानसभेत मराठवाड्याचा अनुशेष, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी आंदोलनांवर सातत्यानं बांजू मांडली. औरंगाबादच्या बाह्य नियोजनासंबंधीचा विषय असो की, शहरातील समांतर पाइपलाईन... यांसारख्या अंतर्गत मुद्द्यांवर आम्ही जनतेच्या वतीनं भांडत राहिलो. शहरातील दारूबंदी, रस्ते विकासात योगदान दिलं. शिवसेनेनं घडवून आणलेल्या दंगलीत लोकांचे अश्रू पुसले. सेना खासदारांनी घोषित केलेलं केवळ हिंदूंचं नेतृत्व आम्ही नाकारलं. त्यांना सबंध अठरापगड जाती-जमातींचे प्रतिनिधी असल्याची आठवण आम्ही करून दिली. शहरात वाढत असलेल्या शिवसेनेच्या मुस्लीमद्वेषाला संवादानं उत्तर दिलं. मुस्लीम समाजाच्या प्रत्येक प्रश्नांसोबत मराठी माणसांच्या समस्या व अडचणीसंदर्भात वेळोवेळी विधिमंडळात  बाजू मांडली.  

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

प्रश्न - एमआयएमला कट्टरता आणि अलगतावादाशी का जोडलं जातं?

उत्तर - महाराष्ट्रात स्वतंत्र असं मराठी मुसलमानांचं राजकारण विकसित झालेलं नाहीये. राज्यातील मुस्लीम युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्यांच्यात नेतृत्वक्षमता आहेत. त्यांना नेहमी वाटतं की, आपला कोणी प्रतिनिधी नाही. त्यांच्या प्रश्नांना घेऊन कुणाही बोलत नाही, ही खंत आज राज्यातील मुसलमानांमध्ये आहे. मला वाटलं मी त्यांचा प्रतिनिधी होऊ शकतो. अकबर ओवैसींच्या रॅलीत हजारोंचा मोठा क्राऊड असतो. आमच्या प्रत्येक रॅलीत मोठा जनसमुदाय असतो. मध्यंतरी आमच्या एका रॅलीमध्ये काहींनी चुकीच्या पद्धतीनं घोषणा दिल्या होत्या. दुसर्‍याच दिवशी औरंगाबादला माझी रॅली होती. त्यात आठ ते दहा हजार लोक होते. त्यात पुन्हा त्याच प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मी लगेच रॅली थांबवली. त्यांना म्हणालो, माझ्या पक्षात व रॅलीत अशा घोषणा चालणार नाहीत. दुसर्‍या रॅलीत घोषणा कमी झाल्या. काही लोकांनी परत त्या स्वरूपाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मी लगेच त्यांना थांबवलं. म्हणालो, घोषणा जर थांबवल्या नाहीत  तर मी पदयात्रा इथंच बंद करेन. कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी अशा घोषणा देणाऱ्यांना थांबवलं. मग तिसर्‍या दिवशी एकही घोषणा झाली नाही. मी त्यांचे एकांगी विचार बदलण्यास त्यांना भाग पाडलं.

आज एमआयएमचे कार्यकर्ते सामान्य माणसांच्या समस्यांवर बोलतात. इतरांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या घोषणा किंवा विधानं आम्ही करत नाही. इतरांना शिव्या देऊन आम्हाला सांप्रदायिक राजकारण करायचं नाही. चुकीच्या घोषणांवरून आमची मीडिया ट्रायल होते, हे आमच्या कार्यकर्त्यांना कळलं आहे. काही लोकांमुळे तुम्ही पक्षाला बदनाम करू शकत नाही. आम्ही नेहमी म्हणत आलोय की, मुसलमान मुस्लिमांच्या प्रश्नांना घेऊन लढा देत असतील तर तो कसा काय अलगतावाद होऊ शकतो? आमच्या प्रश्नांवर कुठलाही सेक्युलर म्हणवणारा पक्ष लढा देत नाही. मग आम्हीच आमच्या प्रश्नांवर बोललो, तर बिघडलं कुठे?

२०१४च्या निवडणुकीवेळी अनेक प्रशासकीय अधिकारी भाजपमध्ये सहभागी होत होते. प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी थेट राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले. याचा अर्थ ते प्रशासनात असताना मुस्लीमद्वेषी व सांप्रदायिक होते असंच म्हणावं लागेल. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग, सत्यपाल सिंह, मेजर राज्यवर्धन राठोड  अचानक भाजपमध्ये कसं काय सामील होऊ शकतात? अलीकडे तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा उघडपणे मुस्लीमविरोधी भूमिका घेत आहेत. इतकंच काय पण मुस्लिमविरोधातील दंगलीतही सामील झाल्याच्या अनेक बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. कोण कट्टर आणि कोण अलगतावादी, हे या उदाहरणांवरून स्पष्ट होतं.

प्रश्न - काँग्रेस मुस्लिमांना भाजपची भीती दाखवतं.  तीच भीती भाजप काँग्रेसबद्दल दाखवतं. आपला पक्ष या दोघांची भीती दाखवून मुस्लिमांचा  वापर करत आहे, अशी प्रत्यक्षदर्शी स्थिती दिसते. 

उत्तर - आम्ही भीती दाखवत नाही, तर आम्ही त्यांना उघडं पाडतो आहोत. आम्हाला तर महाराष्ट्रात येऊन साडेचार वर्षं झालीत.  आमचे केवळ दोनच आमदार आहेत. आम्ही मराठी मुसलमानांना त्यांचा राजकीय वाटा देतो आहोत. त्यांच्यातील नेतृत्वक्षमता बघून त्यांना तशी संधी देत आहोत. आमच्याकडे काय आहे की, आम्ही मुस्लीम तरुणांना गंडवणार आहोत? जे काही आहे ते लोकांच्या भरवशावर, लोकांनी उभं केलेलं आहे. मुस्लिमांना वाटतं, एमआयएम हा आमचा पक्ष आहे. ही भावना आमच्यासाठी फार मोलाची आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर असण्याचा आव आणतात. त्यांचा चेहरा सर्वांनाच माहीत आहे. मग आम्ही काय फक्त दोन आमदारांवर धर्मनिरपेक्षतेचं गुत्तं घेतलं आहे का?  मागील काही वर्षांपासून मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. दहशतवादाच्या खोट्या आरोपाखाली उच्चशिक्षित मुस्लीम युवकांना तुरुंगात डांबण्यात येत होतं. मुस्लिमांवर हल्ले केले जात होते. यावर त्या वेळचे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष गप्प होते.

गेल्या साडेचार वर्षांत तर भारतात मुस्लीम प्रचंड असुरक्षित झालेला आहे. या सर्वांचा परिणाम मुस्लीम मानसिकतेवर झाला आहे. देशात मुस्लिमांविरोधात तुच्छतावादाची भावना बळकट झाली आहे. मुस्लिमांविरोधात क्षुल्लक कारणावरून हल्ले वाढले आहेत. ‘मुस्लीम फोबिया’ मोठ्या प्रमाणात वाढून ‘हेट क्राईम’ बळावला आहे. या संबंधी आमच्या पक्षानं लोकसभेत भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. अशा असुरक्षित वातावरणात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय होती, हे सर्वांनाच माहिती आहे. भाजप मुस्लिमांचे चेहरे वापरून, त्यांना प्रलोभनं देऊन आपल्यात सामील करून घेत आहे. त्यामुळे विवेकी मुस्लीम तरुणांमध्ये चलबिचल होऊन मुस्लीम नेतृत्व इतर ठिकाणी विभागलं जात आहे. देशात सक्षम मुस्लीम नेतृत्व नाही. अशा वेळी एमआयएम पक्ष मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करू शकतो. आम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून पुढे येत आहोत. भीतीचं राजकारण तर इतर पक्षांनी निर्माण केलं आहे. आम्ही मुस्लिमांना दिशा वा दृष्टी दिली आहे. आता कोणासोबत व का जायचं याचा विचार युवकांनीच करायचा आहे.

प्रश्न - राज्याच्या राजकारणातील घसरत्या मुस्लीम प्रतिनिधित्वाला कोण जबाबदार आहे?

उत्तर - राज्य विधानसभेत मुस्लिमांचे कधी १४ आमदार होते.  १४ वरून आम्ही कधी १२वर घसरलो आणि नंतर ११ वर आलो. आता फक्त ९ आहोत. विचार करा मुस्लीम लोकसंख्या वाढत आहे, परंतु मुस्लीम प्रतिनिधींचा आलेख खाली घसरत आहे. ही चिंताजनक बाब नाही का?  शरद पवार यांनी तर स्पष्ट म्हटलं होतं की, हिंदू मुस्लिमांना मत देण्यास तयार नाहीत. तर मग आम्ही काय तुम्हाला मतं देण्याचा गुत्ता घेतलाय?  पुण्यात कोंढव्यासारख्या भागात प्रत्येक नॉन मुस्लीम जिंकून येऊ शकतो, परंतु मुस्लिमाचा मात्र पराभव होतो. कारण नॉन मुस्लीम त्यांना मतं देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुस्लीम उमेदवारांचा पराभव होतो. आम्ही शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना मतं द्यावीत, परंतु त्यांनी आम्हाला मतं देऊ नयेत, ही चुकीची पद्धत येऊ घातली आहे. मी औरंगाबादमध्ये बघितलं आहे की, माझ्यासोबत ५० हजार मुस्लीम होते, तर फक्त ५०० गैरमुस्लीम होते. माझ्यासाठी ते ५०० जास्त महत्त्वाचे आहेत. कारण त्यांनी मला मतं दिली आहेत. त्यांनी मुस्लीमद्वेषी विचार केला नाही. 

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे सहसंपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 25 May 2019

इम्तियाज जलील, तुम्ही म्हणता ते 'मुस्लिम खासदार' हे नेमकं काय प्रकरण आहे ? भारताच्या घटनेत जात, धर्म, लिंग वगैरे बाबत समानता आहे. मग लोकप्रतिनिधी हा निव्वळ लोकप्रतिनिधी झाला ना? त्याचा मुस्लिम असण्याशी काय संबंध? संघ/भाजप जेव्हा मुस्लिमबहुल वस्तीतही हिंदू उमेदवार उभा करतो, तेव्हा तो घटनेच्या तत्त्वांना प्रमाण मानून असतो. तरीपण संघ घटनाविरोधी कसा काय बुवा? असो. त्याचं काय आहे की उत्तर भारतातले आझमखान, मुलायम सिंग वगैरे मुस्लिम नेते म्हातारे, आळशी, सुखासीन व कालबाह्य झालेत. त्यांची जागा तुम्हां औवेसी बंधूंना व्यापायची आहे. महाराष्ट्र हा तुमच्यासाठी केवळ एक उड्डाणफळी ( = स्प्रिंगबोर्ड ) आहे. अर्थात यात काही चुकीचं नाही. असे डावपेच असू शकतात. पण मग मराठी मुस्लिमांच्या हिताची बोंब कशाला ठोकता ? ताकाला जाऊन भांडं लपवायची गरज नाही. खुलेआम घुसा की दुआबात. आहे का हिंमत? इथेच मोदी नावाचा घटक प्रवेश करतो. या लबाड माणसाने उत्तर भारतातली मुस्लिम मतपेढी पार नासवली. मग तिथे तुम्ही जाऊन काय दिवे लावणार ? म्हणून साडेचार वर्षांनी तुम्हाला मराठी मुस्लिमांचा पुळका आलाय. ठीके. निवडून आलात तुम्ही. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता खुशाल डोळे मिटून दूध प्या. आमचं लक्ष आहे तुमच्यावर. असो. बाकी संभाजीनगरात वर्षभरापूर्वी दंगल कोणी पेटवली ते आम्हांस माहितीये. पेट्रोल, मोलोटोव्ह कॉकटेल आणि दगडांचा साठा कोणाकडे सापडला ते आम्हांस माहितीये. दगडफेक करण्यासाठी भलीथोरली गलोल कोणी आणि कुठे उभारली हे आम्हांस माहितीये. इंटरनेटवरून तलवारी कोणी मागवल्या ते आम्हांस माहितीये. तुम्ही दंगल पेटवता आणि शिवसेनेवर दोष ढकलता हे आम्हांस माहितीये. सुज्ञ मुस्लिमास हे दिसतं. पण त्याला तुमच्या दहशतीपायी बोलता येत नाही. मोदींनी ही दहशत संपवली. म्हणून तुमचा थयथयाट चाललाय. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......