एक आवाहन : मोदी समर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना
पडघम - देशकारण
मिलिंद मुरुगकर
  • एक प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 21 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी भाजप हिंदुत्व हिंदूराष्ट्र पुरोगामी लिबरल उदारमतवादी

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येतील की नाही हे कळायला फक्त थोडाच कालावधी उरला आहे. आणि त्याअगोदर मोदीसमर्थक व्यक्ती- स्वातंत्र्यवाद्यांना काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. हे प्रश्न कमालीच्या अगतिकतेतून विचारले जात आहेत, याची कबुली पहिल्यांदा दिली पाहिजे.

इंग्रजीतील ‘Liberal’ या शब्दाचे मराठी भाषांतर ‘उदारमतवादी’ या शब्दाने होते. पण ‘उदारमतवाद’ या शब्दात ‘Liberal’ या शब्दात अध्याहृत असलेला टोकदारपणा किंवा आग्रह व्यक्त होत नाही. आणि ‘Liberalism’मधील आग्रह हा व्यक्तीस्वातंत्र्याचा आहे. व्यक्तीस्वातंत्र्यवादी असणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी तिच्या जात, धर्म, लिंगभेद याच्या निरपेक्ष अशी एक समान प्रतिष्ठा असते आणि अशा व्यक्तींचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य जपणे हे आपल्या लिबरल लोकशाहीचे प्रथम कर्तव्य आहे असे मानणे. जोपर्यंत व्यक्ती दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणणारी कृती करत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जपणे हे भारताने स्वीकारलेल्या लोकशाहीचे प्रथम कर्तव्य आहे असे मानणे. म्हणजे मी एखादा पदार्थ खाल्ल्यामुळे एखाद्या समूहाच्या भावना दुखावतात म्हणून तो पदार्थ मी खाण्यावर बंदी आणणे किंवा मी केवळ एका विशिष्ट धर्मात जन्मलेली स्त्री असल्याने माझ्यासाठी पोटगीसंदर्भात वेगळे कायदे असणे ही सरळ सरळ व्यक्तीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिष्ठेची पायमल्ली आहे. दोन्ही उदाहरणांत व्यक्तीची व्यक्ती म्हणून असलेली ओळख नाकारली जाते. पहिल्या उदाहरणात तिला समूहाला शरण जायला भाग पाडले जाते. तर दुसऱ्या उदाहरणात तिची व्यक्ती म्हणून असलेली ओळख पुसली जाऊन तिची धार्मिक ओळख सर्वांत महत्त्वाची मानली जाते आणि तिची व्यक्तीप्रतिष्ठा नाकारली जाते.

२०१४ ची निवडणूक अभूतपूर्व होती. म्हणजे एका मोठ्या कालावधीनंतर एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले, या अर्थाने ती अभूतपूर्व होतीच. पण त्याहीपेक्षा जास्त खोलवरच्या अर्थाने ती अभूतपूर्व होती. कारण या निवडणुकीत अनेक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांनी पहिल्यांदा मोठ्या उत्साहाने आणि उघडपणे एका हिंदुत्ववादी पक्षाला मतदान केले होते. आणि त्याचे कारण होते नरेंद्र मोदी. त्यांना नरेंद्र मोदींकडून अनेक अपेक्षा होत्या (अजूनही असतील). म्हणजे या सर्व व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांच्या मोदींकडून समान अपेक्षा होत्या असे नाही. कोणाची अपेक्षा मोदी हे खुल्या अर्थकारणाला जोरदारपणे पुढे नेतील अशी होती. म्हणजे मुळात भाकरीचा आकार छोटा असताना तिचे वाटप करण्याची गोष्ट करण्याऐवजी भाकरीचा आकार वाढवण्यावर मोदी हे भर देतील, अशी या लोकांची अपेक्षा होती. त्यामुळे बाजारपेठ जास्तीत जास्त खुली करण्यासाठी नरेंद्र मोदी हे अत्यंत धाडसी असे निर्णय घेतील अशी या लोकांची अपेक्षा होती. काँग्रेस गरिबांची मते मिळवण्यासाठी करदात्यांच्या पैशावर त्यांचे लांगुलचालन करते असे यांना वाटते.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

काही व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांना असे वाटत होते की, २००२ च्या गुजरात दंगलीबद्दल मोदींवर टीकेचा अतिरेक झाला आहे. त्या दंगलीत झालेल्या निष्पाप लोकांच्या हत्येला मोदी जबाबदार नव्हते. फार तर ते या लोकांचे संरक्षण करण्यात ते अपयशी झाले असे म्हणता येईल. पण त्यांनी जाणूनबुजून या हत्या होऊ दिल्या हा आरोप चुकीचा आहे. प्रत्यक्षात नरेंद्र मोदी धर्मवादी, धर्मांध राजकारणाचे पुरस्कर्ते नाहीत. त्यामुळे ते सत्तेवर आले तर ते अशा उन्मादी, हिंसक राजकारणाला कठोरपणे नेस्तनाबूत करतील अशीदेखील अनेकांची अपेक्षा होती.

या लोकांचे असे मत होते की, काँग्रेसने सेक्युलॅरिझमचे फक्त नावच घेतले. पण प्रत्यक्षात स्युडो-सेक्युलर धोरण राबवले. आता मोदी कोणत्याही धर्मसमुदायाच्या लांगुलचालनाचे धोरण बंद करतील आणि एका अर्थाने खरा सेक्युलॅरिझम म्हणजे काय हे कृतीतून दाखवतील अशीदेखील काहींची अपेक्षा होती. (अशी अत्यंत प्रामाणिक अपेक्षा अनेकांची होती).

अशा अनेक अपेक्षा या लोकांच्या होत्या. प्रत्येकाच्या समान नव्हत्या. पण अशा अपेक्षा असणाऱ्या या लोकांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे हे सर्व लोक व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. (आणि तसे ते आजदेखील असतील, या गृहितावर हा लेख लिहिला आहे.)

आता पाच वर्षानंतर व्यक्तीस्वातंत्र्याच्या निकषावर मोदींच्या वर्तनाचा हे मोदीसमर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोक कसा विचार करतात? नरेंद्र मोदींच्या वर्तनाने समजात व्यक्तीस्वातंत्र्याचे मूल्य रुजायला मदत झाली की, त्या मूल्याचे संकोचन करणाऱ्या विचारसरणीला बळकटी मिळाली?

व्यक्तीस्वातंत्र्याला सर्वांत मोठा धोका हा राष्ट्वादाकडून असतो, हे या मोदीसमर्थक लोकांना ठाऊक नसणे शक्य नाही. कारण राष्ट्रवाद शत्रूकेंद्री असतो. आपल्या मताच्या विरोधी मतांच्या लोकांना राष्ट्रद्रोही ठरवणे हे राष्ट्रवादी भूमिकेतून इतिहासात सर्रास घडत आलेले आहे. आणि जगाच्या इतिहासात अशा लोकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. भारतात राष्ट्रद्रोहाचे आरोप हे मोदी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा घडू लागले आणि मोदी त्यावर शांत राहिले इतकेच नाही तर त्यांनी देखील या राजकारणाला पुष्टी दिली, हे या मोदी समर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना मान्य नाही काय? ते याबद्दल या पाच वर्षाच्या काळात शांत का राहिले?

कोणी काय खावे हे सांगणारे मोदी सरकार हे पहिले सरकार असावे. गोहत्याबंदीमुळे शेतीवर झालेल्या मोठ्या अनिष्ट परिणामाचा मुद्दा तर वेगळाच. पण येथे ज्या मोदी समर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांचा विचार आपण करतो आहोत, त्यांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी का नाही वाटली? असे का नाही आम्हाला पाहायला मिळाले की, हे मोदी समर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवादी याचा तीव्र निषेध सोशल मीडियावर किंवा इतरत्र करतायेत आणि मोदींना बजावतायेत की यासाठी नाही आम्ही तुम्हाला मत दिले. तीच गोष्ट गोरक्षकांनी केलेल्या निष्पाप लोकांच्या हत्येबद्दल. या हत्यांच्या निषेधार्थ जेव्हा अनेक कलावंतांनी पुरस्कार परत करायला सुरुवात केली, तेव्हा या लोकांवर ‘पुरस्कारवापसी ब्रिगेड’, ‘फुरोगामी’ आदी शेलक्या शब्दांची टीका झाली.‘

समजा असे गृहीत धरू की, या मोदीसमर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना हे सर्व कलाकार विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आहेत असे वाटले आणि म्हणून त्यांच्यावर झालेली टीका ही योग्य वाटली. पण मग ते स्वतः का नाही या हत्यांचा निषेध करायला पुढे सरसावले? आपल्या देशात धार्मिक दंगली होत आल्या आहेत. पण झुंडीने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करून तिला ठार करणे हे २०१४ नंतर पहिल्यांदाच घडले, हे या व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना कळत नव्हते असे म्हणायचे? या सर्वांचा मोदींशी काय संबंध असा त्यांचा प्रश्न नसेल अशी आशा करूया कारण हा संबंध अगदी उघड उघड आहे. कारण मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी या हत्यांचे समर्थन करणाऱ्या कृती आणि वक्तव्ये केली आणि मोदी शांत राहिले.

लोकशाही म्हणजे बहुमतशाही नव्हे. लोकशाहीत निर्णय बहुमताने घेतले जात जरी असले तरी कितीही का मोठे बहुमत का असेना व्यक्तीचे केवळ एक स्वायत्त व्यक्ती म्हणून असलेले स्वातंत्र्य बाधित करणे त्या बहुमताला शक्य नसते. पण जेव्हा समाजमन बहुमतशाहीकडे वळवले जाते, तेव्हा लोकशाहीचा फक्त सांगाडा शिल्लक राहतो. आज हिंदू बहुमतशाहीकडे देश वेगाने वाटचाल करतो आहे हे मोदी समर्थक व्याक्तीस्वातंत्र्यवाद्यांना दिसत नाही आहे का? आणि या हिंदू बहुमतशाहीचा फटका हिंदूंसकट सर्व धर्मातील व्यक्तींना बसणार आहे, हे या व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना दिसत नाहीये का?

या मोदीसमर्थक व्यक्ती स्वातंत्र्यवाद्यांना आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो की, आपली भूमिका फक्त प्रतिक्रिया म्हणून बदलणे हे खऱ्या व्यक्तीस्वातंत्र्यवाद्याला परवडू शकते का? तुमच्या दुटप्पीपणामुळे आम्ही मोदीसमर्थक बनलो अशा तऱ्हेचा सूर अनेकदा लावला जातो. पण हा प्रतिक्रियावाद व्यक्तीस्वातंत्र्यवादी विचारसरणीला कमकुवत करणारा आहे. इतर जातीत, इतर धर्मात बंदिस्तपणा आहे. तिथे धर्मचिकित्सा होऊ दिली जात नाही म्हणून आम्हीदेखील तितकेच बंदिस्त होवू आणि आमच्या ‘व्यक्ती’ या ओळखीचे रूपांतर धार्मिक अस्मितेत करू ही कमालीची घातक भूमिका आहे. अमेरिकेत इस्लामी कट्टरतेविरुद्ध कठोर प्रहर करणारा sam harris हा तितक्याच कठोरतेने ट्रम्पवर टीका करतो आणि अमेरिकेची लोकशाही धोक्यात आली आहे, हे समजून योद्ध्यासारखा लढतो, हे मोदीसमर्थक व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देश अधिक जोरदारपणे हिंदू बहुमतशाहीकडे वाटचाल करणार आहे, हे उघड आहे. याबद्दल अजूनही कोणाला शंका असेल तर त्यांनी प्रज्ञा ठाकूर-सिंग यांना दिल्या गेलेल्या उमेदवारीकडे बघावे. त्यांना उमेदवारी दिली गेली याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावर दहशतवादी कारवाईचे झालेले आरोप. हे आरोप आजही आहेत आणि त्या केवळ तब्येतीच्या कारणास्तव जेलबाहेर आहेत. आणि ही त्यांची पार्श्वभूमी नसती तर त्यांना उमेदवारी मिळालीच नसती. भाजपकडे अशी पार्श्वभूमी नसलेले दुसरे नेते नव्हते की काय? तेव्हा मोदींनी दिलेले संदेश स्पष्ट आहेत.

मोदी पुन्हा सत्तेवर आले तर व्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांना खूप मोठी आणि अवघड राजकीय लढाई द्यावी लागणार आहे. या लढाईत आजवरचे मोदीसमर्थक कोणाच्या बाजूने असतील? का ही लढाई लढणाऱ्या लोकांची ते ‘स्युडो-सेक्युलर’, ‘फुरोगामी’ अशा शब्दांनी संभावना करत राहण्यात समाधान मानतील?

...............................................................................................................................................................

लेखक मिलिंद मुरुगकर राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

milind.murugkar@gmail.com

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Aditya Apte

Thu , 23 May 2019

अमर्याद, बंधनरहित, स्वैर व्यक्तिस्वातंत्र्यवादातला भंपकपणा आता सगळ्यांंच्या लक्षात आला आहे. तसं लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण तुर्तास मुरुगकरांच्याच विधानातील गंमत पुरेशी बोलकी आहे. "तुमच्या दुटप्पीपणामुळे आम्ही मोदीसमर्थक बनलो" ही वस्तुस्थिती माहिती असूनही मूळ दुटप्पीपणा ऐवजी लेखक जर त्यावरील प्रतिक्रियांंना दोष देत बसत असेल, तर यांचंं खरंच अवघड आहे. त्यामुळे जर ह्यांना "खरेच" काही चाड असेल तर नक्कीच ह्यांची लढाई आव्हानात्मक आहे, पण ती स्वतःशीच करावी लागणार आहे.


Gamma Pailvan

Wed , 22 May 2019

मिलिंद मुरुगकर, गोमांस खाल्ल्याने हिंदूंच्या भावना दुखावतात म्हणून गोमांस खाण्यावर बंदी आणणे ही व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली आहेच. त्यामुळे कोण्याही व्यक्तीने आपलं स्वातंत्र्य निवडतांना काळजीपूर्वक निवडावं. हा धडा त्यातनं मिळतो. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा