...आणि चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू झाला!
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • डावीकडील छायाचित्रात नाशिक कुंभमेळा कव्हरी करणारी आमची टीम. त्या काळी थेट प्रक्षेपण किती किचकट होते याचा अंदाज मागे ठेवलेल्या यंत्रांनी येईल. उजवीकडील छायाचित्रात गणपती विसर्जनाच्या दिवशी. साल २००४.
  • Sat , 13 April 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism वृत्तवाहिन्या News Chanels भक्ती चपळगावकर ‌Bhakti Chapalgaonkar

एका खाजगी वृत्तवाहिनीवर एकेकाळी एक कार्यक्रम सुरू झाला – ‘डंके की चोटपर’. अर्थात दवंडी पिटत पिटत. सध्या टीव्ही वृत्तवाहिन्यांचे जे रूप दिसत आहे, त्या रूपाला कारणीभूत असलेल्या काही ज्येष्ठ मंडळींपैकी एकाने या कार्यक्रमाचे रूप आणि नाव निश्चित केले होते. जे सांगायचे ते दवंडी पिटत सांगायचे, असा त्यांचा सूर होता. बातमीदारी करताना पत्रकाराने सतत आक्रमक किंवा इंग्रजीत ज्याला ‘लाऊड’ म्हणतो, अशा पद्धतीनेच काम करावे, असा संदेश या मंडळींनी टीव्ही पत्रकारितेत येऊ घातलेल्या मंडळींना दिला.

अशा पद्धतीची पत्रकारिता कमी-अधिक प्रमाणात जगभरात बऱ्याच ठिकाणी चालते, अगदी ‘सीएनएन’सारखी नावाजलेली वाहिनी किंवा इंग्लंडमधील टॅब्लॉइड पत्रकारिता अतिरंजक असते. आंतरराष्ट्रीय माध्यमांचा माझा अभ्यास नाही, पण मी स्वतः सीएनएनपेक्षा ‘बीबीसी’ किंवा ‘अल जझिरा’ बघणे जास्त पसंत करते. तर सांगायचा मुद्दा असा की, जेव्हा भारतात टीव्ही वृत्तवाहिन्या सुरू झाल्या, तेव्हा त्यांना सुरू करण्यामागे वेगळा उद्देश होता.

एस. पी. सिंग आणि प्रणव रॉय यांसारख्या मंडळींची व्हिजन फार वेगळी होती. सिंग तर कामात वाघ, शोध पत्रकारितेत रस असणारा आणि टीव्ही माध्यमाला पुढे किती महत्त्व येणार आहे, याची जाणीव असलेला पत्रकार. त्याने दूरदर्शनवर ‘आजतक’ नावाचे बुलेटिन सुरू केले. हा कार्यक्रम फार यशस्वी झाला. याचे कारण, दूरदर्शनवर दाखवण्यात येणाऱ्या काहीशा संथ बातमीदारीला आव्हान देणारी ही पद्धत होती.

प्रणव रॉय सादर करायचे ‘वर्ल्ड धिस वीक’ हा कार्यक्रम. जगभरात काय चालले आहे, याचा गोषवारा या कार्यक्रमात सादर व्हायचा. घरोघरी लोक कुटुंबाबरोबर हा कार्यक्रम बघायचे. प्रणव रॉय आक्रमक नव्हते, पण त्यांची शैली अतिशय स्मार्ट, सोफिस्टिकेटेड होती. भारतातल्या सरकारी वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या सरकारी बातम्या आणि हे कार्यक्रम वेगळे होते.

याचा अर्थ सरकारी माध्यमांचे काही योगदान नव्हते असे नाही. एकतर दूरदर्शन खेड्यापाड्यांपर्यंत पोचले होते. दुसरे म्हणजे इथे सादर होणारे कार्यक्रम रेटिंग आणि त्यावर आधारित जाहिरात उत्पन्न यांच्यावर अवलंबून नव्हते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कलाकार, गृहिणी अशा वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींसाठी इथे कार्यक्रम सादर होत.

अनेक गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित मालिका असोत वा संगीताचे उत्तम कार्यक्रम दूरदर्शनवर प्रक्षेपित झाले. पण शेवटी दूरदर्शनला कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आणि ते संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे अनेकदा हे कार्यक्रम रटाळ असत. त्याचे शेड्युलिंग करताना फार विचार केला जात नसे. कार्यक्रम संपला की, दुसरा कार्यक्रम सुरू व्हायचा आधी सर्रास फिलर्स म्हणून समूहगान किंवा भक्तीगीत सुरू होई. कार्यक्रम बनवणारे लोक नेहमीच दर्जेदार होते असे नाही. त्यामुळे अतिशय सुमार निर्मातेही इथे काम करत होते. त्या पार्श्वभूमीवर टीव्ही वृत्तवाहिन्यांसह खाजगी मनोरंजन वाहिन्यांची सुरुवात भारतीय टेलिव्हिजनवर क्रांती घेऊन आली.   

१९९१  साली तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी देशात आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. खाजगीकरणाच्या लाटेत माध्यमजगही लोटले गेले. याच काळात गल्फ वॉर किंवा आखाती युद्ध सीएनएनने जगभरात लोकांच्या दिवाणखान्यात पोचवले. इतकी वर्षे जनतेने युद्धाबद्दल वर्तमानपत्रांत वाचले होते, त्याची संपादित न्यूज रिल्स थिएटरमध्ये बघितली होती, पण युद्ध घडताना त्याची दृश्ये लोक पहिल्यांदाच बघत होते. त्याची दाहकता, त्याचा थरार अनुभवत होते. या टीव्ही बातमीदारीच्याच्या या प्रभावाला ‘सीएनएन इफेक्ट’ म्हणतात. असेच काहीसे भारतीय जनतेने बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अनुभवले. तोपर्यंत अनेक ठिकाणी घरांवर डिश लागल्या होत्या आणि उपग्रह वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरू झाले होते.

१९९२ साली मी दहावीत होते. एका कॅम्पसाठी आम्ही काही मुलं-मुली दौलताबादला गेलो होतो. संध्याकाळी औरंगाबादला परतायची वाट बघत असताना आज सहा डिसेंबर आहे, काही तरी होणार आहे, अशी चर्चा सुरू होती. गावात परतलो, तोपर्यंत दंगल सुरू झाली होती. अयोध्येत झालेला प्रकार आमच्या कॉलनीत राहणाऱ्या सोलंकी नावाच्या कुटुंबाच्या टीव्हीवर सगळ्या कॉलनीने बघितला होता. हा आमच्यासाठी ‘बीबीसी’ इफेक्ट होता.

घटना घडत असताना त्याची दृश्ये आपल्याला दिसू शकतात, ही जाणीव लोकांना चकित करणारी होती. दूरदर्शनच्या एकसुरी कव्हरेजपेक्षा हा प्रकार काही तरी वेगळा होता. ‘वर्ल्ड धिस वीक’मुळे घरोघरी पोचलेल्या प्रणव रॉय यांच्या एनडीटीव्हीने १९९८ साली स्टार टीव्हीबरोबर पाच वर्षांचा करार केला आणि स्टार टीव्हीने ‘स्टार न्यूज’ नावाची वृत्तवाहिनी सुरू केली. पाठोपाठ २००० साली ‘आजतक’ वाहिनी सुरू झाली. आणि भारतीय वृत्तवाहिन्यांचा उदय झाला.

टीव्ही वृत्तवाहिन्यांचा इतिहास थोडक्यात सांगण्याचे कारण हे, ठरवून जरी नाही तरी शिकत असताना १९९४ साली मी वर्तमानपत्रात काम करायला सुरुवात केली. १९९८ साली मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर काही काळ प्राध्यापकी केली. असं असलं तरी माझ्या आजूबाजूला होत असलेल्या माध्यमजगातल्या उलथापालथीपासून वेगळे राहणे शक्य नव्हते. या घडामोडी होत होत्या मुंबई–दिल्लीसारख्या महानगरांत. माझ्या आवाक्यात असलेले शहर म्हणजे मुंबई. तिथे राहिलो तरच आपल्याला हवे तसे काम करता येईल याची जाणीव असल्याने मी मुंबईत काम मिळवण्याचा प्रयत्न केला. मी ज्या वाहिनीत नोकरीला लागले होते, तिने मला मुंबईत काम करायला बोलावले आणि माझा मार्ग सोपा झाला. पण मला खऱ्या अर्थाने मनासारखे काम करायची संधी जेव्हा मी राष्ट्रीय वाहिनीत काम करायला लागले, तेव्हा मिळाली.  

बातम्या कशा कव्हर केल्या पाहिजेत, कोणत्या प्रकारच्या बातम्या कव्हर केल्या पाहिजेत, कोणत्या बातम्या कव्हर किंवा प्रक्षेपित केल्या तर समाजविरोधी ठरू शकतात, याबद्दल वाहिन्या सुरू करणारांनी विचार केला होता. वाहिनीचा प्रत्येक वार्ताहर कसा दिसला पाहिजे, त्याने किंवा तिने कसा पेहराव केला पाहिजे, त्यांची भाषा कशी असावी, सार्वजनिक ठिकाणी वार्तांकन करताना त्यांची वागणूक कशी असावी याचे काटेकोर नियम होते.

इतकेच नाही तर बहुतेक वाहिन्यांनी आपापले ‘बायबल’ तयार केले होते. बातमीदारांनी किंवा निर्मांत्यांनी कसे वागावे याचे पाठ त्या ‘बायबल’मध्ये असत. एखाद्या बातमीच्या कव्हरेजच्या वेळी काही शंका आली तर या ‘बायबल’चा आधार घेऊन त्यावर उपाय काढला जाई. आपली वाहिनी किती दर्जेदार असली पाहिजे याचा खोलवर विचार एस. पी. सिंग, प्रणव रॉय या मंडळींनी केला होता. आणि त्यांच्या विचारांची शिकवण या वाहिन्यांत प्रवेश करणाऱ्या बातमीदारांनी दिली जात होती. इतकेच नाही तर त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात होती.

सुरुवातीची दोन चार वर्षे वृत्तवाहिन्या ठराविक साच्यात काम करत होत्या. म्हणजे बातमी शक्य तितक्या जलद पद्धतीने कव्हर करायची, पण त्याचे संपादित रूप चॅनलवर सादर व्हायचे. बातमीचे हे रूप पालटले जेव्हा ओबी व्हॅनने प्रवेश केला. ओबी म्हणजे आऊटस्टेशन ब्रॉडकास्टिंग. या तंत्रज्ञानाने बातमीचे थेट प्रक्षेपण सोपे झाले. घटना घडत असताना ही गाडी घेऊन गेले की, बातमीदार थेट बातमी देऊ शकायचा.

पण याच गाड्यांनी एक नवा प्रश्न निर्माण केला, जेव्हा काही घडत नसेल तेव्हा काय करायचे. मग बातम्या निवडताना लावण्यात येणारे निकष पातळी घसरून खाली येऊ लागले. थोडक्यात ओबी व्हॅन्सनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. संपादित बातमी, म्हणजे पॅकेजेसचे प्रमाण कमी झाले किंवा दिवसाच्या शेवटी दिसू लागले. ओबी व्हॅन्स दुभत्या गायी आहेत असा पवित्रा वृत्तवाहिन्यांनी घेतला. काही करून रोज त्यांनी बातम्या पैदा केल्या पाहिजेतच असे संपादकांनी, निर्मात्यांनी ठरवले आणि चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू झाला.

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................