प्रत्येकाने राजकारणात कसा भाग घ्यावा?
पडघम - देशकारण
इलिनोर ई. रूझवेल्ट
  • इलिनोर ई. रूझवेल्ट आणि ‘You Learn by Living : Eleven Keys For A More Fulfilling Life’चं मुखपृष्ठ
  • Thu , 11 April 2019
  • पडघम देशकारण इलिनोर ई. रूझवेल्ट Eleanor E. Roosevelt यू लर्न बाय लिव्हिंग You Learn by Living लोकशाही Democracy

इलिनोर ई. रूझवेल्ट या प्रसिद्ध अमेरिकन लेखिका. (त्यांचे पती फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे अमेरिकेचे सलग चार वेळा (१९३२ ते ४५) राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले एकमेव राष्ट्राध्यक्ष.) त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. इलिनोर ई. रूझवेल्ट यांच्या ‘You Learn by Living : Eleven Keys For A More Fulfilling Life’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘जगणं म्हणजे शिकणं’ या नावाने मराठीतील प्रसिद्ध लेखिका मालती बेडेकर यांनी केला आहे. वोरा अँड कंपनी, मुंबई यांनी हा अनुवाद १९६३ साली प्रकाशित केला. या पुस्तकातील दहाव्या प्रकरणाचा हा संक्षिप्त अंश… आजपासून देशभरात सुरू होत असलेल्या १४व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने…

............................................................................................................................................................

शासनात नागरीक जो वाटा उचलतो त्याला ‘राजकारण’ म्हणतात. तो वाटा ज्या प्रकारे उचललेला असेल, तशा तऱ्हेचं त्याचं सरकार असतं. नागरीक म्हणून आपलं कर्तव्य समजून घेऊन ते पार पाडायला आपल्यापैकी हरएकजणानं लवकरात लवकर शिकलंच पाहिजे.

मग आपल्या समाजाबाबत किंवा सरकारबाबत नागरीक म्हणून आपली कर्तव्यं कोणती? थिओडोर रूझवेल्ट नेहमी सांगत की, स्वत:चं नि कुटुंबाचं पोषण करणं हे माणसाचं पहिल्य कर्तव्य आहे. लढाईच्या काळातच नव्हे तर जेव्हा नि जेथे गरज असेल तेथे देशाची सेवा करणं दुसरं कर्तव्य आहे.

अगदी मुळातलं नि लहानात लहान काम म्हणून नागरिकानं काही करायचं असेल, तर ते आपलं मत देणं. हे इतकं लहान कामसुद्धा आपले नागरीक करीत नाहीत. निष्काळजीपणानं, उदासीनतेनं, केवळ आळसामुळे मिळालेल्या देणगीचा उपयोग न करता आपण ती फुकट घालवतो. ती देणगी केवढं मोल देऊन आणि केवढ्या त्यागानं मिळालेली आहे!

मत देणं हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्याबरोबरच दुसरं कर्तव्य म्हणजे विचारपूर्वक मत देणं. आणि इथेच काय ती गडबड आहे. विचारपूर्वक मत द्यायची लायकी कशी येईल?

शहाणपणानं मत द्यायचं असेल तर निरनिराळे प्रश्न आणि त्यासंबंधी निरनिराळी मतं माहीत पाहिजेत. ते प्रश्न कसे हाताळायचे हे कळलं पाहिजे. निरनिराळे प्रश्न हाताळण्याची संधी मिळावी म्हणून तुमचं मत मागणारांना पारखण्याची, त्यांची योग्यता ओळखण्याची क्लृप्ती तुमच्याजवळ हवी. राजकारणानं गोष्टी कशा घडतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. बारीक तपशील राहो, सामान्यत: कशा देशात तुम्हाला राहणं आवडेल आणि हे प्रश्न मूळ प्रश्नावर काय परिणाम करतील, हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे.

लोक मला नेहमी विचारतात की, ही माहिती कशी मिळवायची? जग इतकं गोंधळलं आहे, असंख्य प्रश्नांची सुधारणा इतकी गुंतागुंतीची झाली आहे, इतके उमेदवार निवडणुकीला उभे राहतात की, आपण काय करावं हे कळायचं कसं? योग्य कल्पना कोणत्या, कोणते उमेदवार आपले प्रतिनिधी म्हणून चांगलं काम करतील, हे कसं कळायचं? हे सारे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. पण त्यांची उत्तरं सापडली पाहिजेत. नागरिकांची कर्तव्यं ही एका सोप्या धड्याच्या अभ्यासानं आपल्याला कळणार नाहीत. हळूहळू अगदी प्राथमिक माहिती योग्य वेळी समजावून घेतली तर ती आपल्याला कळतील. जबाबदारीनं मत देता येईल. कशासाठी, कुणाला, कसं मत द्यायचं हे कळेल.

हे सोपं नाही. पण ज्यात थोडाफार अर्थ असतो ते काहीच सोपं नसतं. आपल्याला बरीचशी माहिती मिळवण्यासाठी चार आधारांवर अवलंबून राहिलं पाहिजे. युनायटेड स्टेटसचे अध्यक्ष हे लोकांचे फार मोठे गुरू असतात, निदान ते असावे. राष्ट्राचे प्रश्न ते पुढे मांडतील आणि वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट करून सांगतील. वर्तमानपत्रं, रेडिओ, टेलिव्हिजन यांसारख्या जनतेला बातम्या पुरवणाऱ्या मोठ्या साधनांनी कोणतीही बाजू न घेता दिलेले वृत्तान्त. आर्थिक व राजकीय परिस्थितीचे वृत्तान्त लोकांना कळतात, निदान कळावे. आर्थिक व्यवहारांसंबंधी बातम्या, चालू घडामोडींच्या बातम्या, पुढाऱ्यांविषयी माहिती सामान्य मतदारांना फारशी नसते आणि अनुभवही फारसा नसतो. पण टीकाकारांनी व्यापक माहितीच्या आणि अनुभवाच्या आधारानं या साऱ्या गोष्टींचं विवेचन केलं पाहिजे किंवा ते करतात. आपले मित्र आणि शेजारी यांच्याबरोबर राजकारणातील माणसं व त्यांचं धोरण यांबद्दल मन मानेल तशी चर्चा करता येते.

माहितीचे हे चार आधार आहेत. आपली मत यांच्या माहितीवरून बनत असतात. हे आधार ही माहिती घ्यायला समर्थ असले पाहिजेत. पण दुर्दैवानं ते तसे नसतात. लोक मला नेहमी सांगतात की, देशातले कित्येक विभाग असे आहेत की, तेथील बातमी फारच थोडी वर्तमानपत्रं देतात. माहिती मिळवण्याचा हा आधार दिवसानुदिवस घसरत चालला आहे. वर्षावर्षाला वर्तमानपत्रांची संख्या आटत चालली आहे. कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू ऐकणं कठीण होत चाललं आहे. लोक मला सारखं विचारतात, ‘आम्हाला खरं कसं कळायचं? आम्हाला आमची मतं बनवण्याची भीती वाटत नाही. पण पक्का विश्वास ठेवण्याजोगा पुरावा हवा म्हणजे आमच्या मतांना आधार मिळेल.’

सत्य शोधणं – खरी गोम इथंच आहे. लोकांशी संबंध असणारी ही वर्तमानपत्रं पुरेशी माहिती लोकांना देण्याची आपली जबाबदारी गंभीरपणानं पार पाडत नाहीत असं मला वाटतं. बरेच वेळा ती तुटपुंजी माहिती तरी देतात किंवा अयोग्य प्रकारानं तरी देतात. खरं म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रश्नाच्या दोन बाजू पुढे मांडल्या पाहिजेत. म्हणजे लोकांना आपलं मत बनवण्याची खरी संधी मिळेल. काही झालं तरी दोन्ही बाजू म्हणजे बातमीच असते.

एखाद्याला भरपूर सवड असेल किंवा दुसऱ्या कामांतून वेळ काढण्याची इच्छा असेल तर वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं हवं तेवढं वाचायला आहे. त्यातून खरी माहिती मिळेल. खरं काय घडतं आहे ते समजेल. कोणती बाजू न घेता पुरावा तोलून पाहता येईल. पण पुरेसा वेळ नसला किंवा छापील साहित्य मिळण्यासारखं नसलं, तर मग लोक टीकाकारांकडे वळतात. मतदारांची मतं बनवण्यात टीकाकारांचा फार महत्त्वाचा भाग असतो.

बातम्या मिळवण्याची ठिकाणं, अनुभव, बातमीचा खरेखोटेपणा पारखण्याचा प्रामाणिकपणा, या किंवा परदेशात मोठमोठ्या स्थानी असणारांशी संबंध या बाबतीत वर्तमानपत्रांप्रमाणेच टीकाकारांतही खूप फरक असतो. कित्येकांना सूडाच्या भावनेनं पसरवलेल्या कुटाळ बातम्या हेच आपलं कार्य वाटतं. विशिष्ट मतांचा प्रचार हे कित्येकांना कार्य वाटतं. कित्येक विशिष्ट तऱ्हेचं धोरणं उचलून धरतात. सुदैवानं पाच-सहा टीकाकार तरी असे असतात की, ते सार्वजनिक घडलेल्या गोष्टी विकृत न करता किंवा पदरचा मीठ-मसाला न घालता शक्य तितक्या खऱ्या स्वरूपात लोकांच्या कानावर घालतात. चांगल्या वर्तमानपत्राप्रमाणेच ही माणसं सत्य आणि स्वत:ची टीकाही वेगळी ठेवतात.

लोक विचारतात, ‘आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा?’ या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. खरोखरच याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. शक्य झालं तर एकाहून अधिक माणसांचं ऐका. म्हणजे महिना-पंधरा दिवसांत त्यांच्या बोलण्यातलं नि मनातलं सत्य तुम्हाला कळेल. कदाचित तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवण्याचा हाच उत्तम उपाय ठरेल. चालू घडामोडींचा अर्थ समजून घ्यायला आपल्यांपैकी कुणाची तरी मदत हवी असते. चालू घडामोडींना तोंड देण्याचे जे प्रयत्न चालू असतात, त्यात कितपत तथ्य आहे, हे कळायला कुणा जाणत्याची मदत पाहिजे असते.

एकमेकांमध्ये न पडणाऱ्या लोकांशी राजकीय प्रश्नावर चर्चा करणं नुसतं फायद्याचं असतं; एवढंच नाही तर स्फूर्ती देणारं असतं. यासाठीच स्वत:च्या राजकीय पक्षांच्या सभांनाच केवळ हजर न राहता, दुसऱ्या पक्षांच्या सभांना हजर राहणं फायद्याचं ठरेलसं मला वाटतं. लोक काय म्हणतात, कसा विचार करतात, कशावर विश्वास ठेवतात हे समजून घ्यावं. स्वत:च्या कल्पनांना मुरड घालायलाही त्याचा फार उपयोग होईल. आपल्याला वाटतं ते खरं आहे का, की दुसरा चांगला मार्ग आहे? बुरसटलेल्या तत्त्वांना आपण चिकटून बसलो आहो की काय? लोकांना, शासनाला, जगाला कोणतं धोरण सर्वांत हिताचं होईल? बदलत्या जगाबरोबर हुशारीनं मिळतं घ्यायचं असेल तर आपण लवचीक असलं पाहिजे. चालू परिस्थितीत निकामी असणारी मतं सोडून द्यायची आपली तयारी पाहिजे.

निरनिराळ्या माणसांशी तुम्ही बोलता, त्यांचं ऐकलं म्हणजे कधी कधी एखाद्या बाबतीत अगदी नवी दृष्टी तुम्हाला येते. मी एखाद्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार केला, माझ्या मताचा खूप काळजीपूर्वक खल केला असला, तरी दुसरं कुणी अशा काही बाजू पुढे मांडतं की, माझ्या मतांतही बराच फरक पडतो, असं मला आढळलं आहे.

राजकीय प्रश्न आणि सिद्धान्त यांवरील चर्चा अनेक कारणांनी उपयोगी पडते. तुमच्या कल्पना नि श्रद्धा शब्दांत मांडाव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला त्या कोरीव, कातीव व स्पष्ट समजून घ्याव्या लागतात. चर्चा करता करता एखाद्या बाबीवर नवा प्रकाश पडतो. नवी वस्तुस्थिती माहीत होते. विशेष म्हणजे तुमच्या मताशी न जुळणारं मत तुम्हाला स्फूर्ती आणि जिद्द देतं. तुमच्या श्रद्धा नि मतं कसोटीला लागतात. ती पुन्हा नव्यानं तुम्ही पारखून पाहता. न पारखताच स्वत:च्या मताचं मंडन तुम्ही करायला लागला की, त्या चर्चेला काही अर्थच राहत नाही.

नागरीक म्हणून आपली कामं कोणती आणि राजकारणाचं तंत्र काय असतं, हे आपल्याला समजावं म्हणून स्थानिक राजकारणाकडे थोडं लक्ष आपण दिलं पाहिजे. हाच अत्यंत सोपा नि सरळ मार्ग आहे. आपल्या समाजातील प्रश्न तुम्हाला ठाऊक असतात. त्यासंबंधी काय नि कसं करावं, हे तुमचं तुम्हाला ठरवता येतं. त्याबद्दल मोठं गूढ वाटत नाही. इथंही व्यक्ती किंवा उमेदवार यांचे गुण कोणते एवढं तरी सामान्यपणे तुम्हाला कळतं. आजवरचा त्यांचा इतिहास कळतो. ते सांगतात किंवा वचन देतात, ती कितपत पाळतील, हे मागे पाहून तुम्हाला समजतं.

हे एकदा तुम्हाला कळलं, अगदी स्थानिक पातळीवर कळलं, म्हणजे राजकीय बातम्या जास्त समजून वाचता येतात आणि समजून त्यांचा विचार करता येतो, असं आपलं आपल्याला कळेल.

ज्याला राजकारण समजून घ्यायचं आहे त्याला नागरीक म्हणून एक महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे आणि ती म्हणजे मनुष्यस्वभावाचं ज्ञान. राजकारणी पुरुष हे सगळे चांगले असतात असंही नाही, वाईट असतात असंही नाही. इतर माणसामाणसांप्रमाणेच त्यांच्यातही फरक असतो. एखादा नागरीक आपल्या समाजासाठी एखादी गोष्ट करायला पाहत असतो. पण ती करायची म्हटलं की, त्यात अनेक व्यक्ती गुंतलेल्या असतात. त्यामुळे ती गोष्ट करता येत नाही असं त्याला आढळतं. उद्योगधंद्यात पडलेल्या माणसानं आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांना समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे स्वभावविशेष म्हणून असतात. त्यांची जाणीव ठेवून प्रत्येकाशी कसं वागायचं ते ठरवलं पाहिजे. जी गोष्ट मिळवायची आहे, ती मिळवणं कसं योग्य आहे, ही तुमची खात्री झाल्याचं तुम्ही दुसऱ्यांना पटवलं पाहिजे. राजकारणी माणसाशी व्यवहार करताना बारा जणांशी बारा तऱ्हांनी वागावं लागतं, असं तुम्हाला दिसेल. ही वागण्याची गुरुकिल्ली ज्याला लाभली, त्याला पुढारीपणाचं रहस्य सापडतं.

खरी स्थिती समजून घ्यायची, आपल्या संस्था कशा आहेत, त्यांचं कार्य कसं चालतं, हे स्वत: पाहायला शिकायचं हे एक प्रत्येक नागरिकाचं काम आहे.

आपण आहो त्याहून चांगले नागरीक झालो आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कृतीची स्वत: जबाबदारी घ्यायला शिकलो म्हणजे त्यांच्या करण्यावर आपला खूप परिणाम होईल. राजकारणी पुरुषाचा मतदारसंघ जर उदासीन किंवा विरोधी असेल, मतदारांना काय वाटतं, काय हवं हे त्याला कळत नसेल, चांगलं काम केल्याबद्दल प्रशंसा किंवा वाईट केल्याबद्दल निषेधही जर मतदार करत नसतील, तर आपलं काम चांगलं नि जोरदारपणे करायला त्या माणसाला उत्साहच वाटणार नाही.

थॉमस जेफर्शन म्हणाले, ‘लोकशाहीत यशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे एकंदर समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीची जबाबदारी.’ एखादी गोष्ट खरी असली तर ती आवडणार नाही या कल्पनेनं सांगण्यास कचरणारे थॉमस जेफर्सन नाहीत. ते म्हणाले, ‘या तऱ्हेची जबाबदारी गरजेची असल्यामुळेच लोकशाही हा अत्यंत कठीण असा शासनाचा प्रकार आहे.’

अतिशय श्रेष्ठ दर्जाची, विकसित अशी शासनाची ही पद्धत असल्यानं लोकशाहीला अत्यंत शहाणे नागरीक फार गरजेचे आहेत. आपण सर्व अशा तऱ्हेची जबाबदारी घ्यायला तयार आहो का, आणि त्याप्रमाणे वागायला तयार आहो का, याबद्दल मला खात्री वाटत नाही. आपल्या वृत्तीबद्दल आणि आपल्या जीवनाच्या तऱ्हेबद्दल आपणच जबाबदार आहो, या गोष्टीची जाणीव कितीही वेळा दिली तरी थोडीच होणार आहे. कारण त्यामुळे आपल्या सरकारवर परिणाम होणार आहे.

पुन्हा सांगायचं ते हेच की, अतिशय गरजेची मूल्यं आपण आपल्या घरी शिकतो. त्याप्रमाणे नागरीक म्हणून आपली कर्तव्यंही आपण शिकली पाहिजेत असं मला वाटतं. चालू घडामोडींबद्दल मुलांच्या मनात संकुचितपणा, असहिष्णुता, तिटकारा निर्माण करणं सोपं आहे, तितकंच त्यांना माहिती देणं, कुतूहल निर्माण करणं आणि जबाबदार नागरीक म्हणून तयार करणं सोपं आहे.

कोणत्याही माणसाचा त्याच्या अंतरंगातच पराभव झालेला असल्याखेरीज बाहेर पराभव होत नाही.

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................