तेरेखोल नदी यात्रा - उगमापासून संगमापर्यंत
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
हरिहर वाटवे
  • तेरेखोल नदी यात्रेची काही छायाचित्रं
  • Wed , 27 March 2019
  • पडघम कोमविप पंचायत भारती Panchayat Bharti तेरेखोल Terekhol

गेल्या वर्षी २७-२८ ऑगस्टला बोट क्लब कोडाई कॅनाल या ठिकाणी ‘नदी संवाद कार्यक्रम’ (Indian river network, भारतीय नदी-घाटी मंच) झाला. या कार्यक्रमासाठी आठ राज्यातील १४ प्रमुख नद्यांच्या क्षेत्रात काम करणारे ३७ कार्यकर्ते आले होते. नदी या एकाच विषयावर सखोल, अभ्यासपूर्ण अशी विविध अंगांनी मांडणी तिथे करण्यात आली.

विकासाच्या उद्देशाने राबवलेले विविध प्रकल्प/ योजना नदी ही परिसंस्था उद्ध्वस्त करणारे, नदी प्रदूषित करणारे ठरत आहेत, हे ठळकपणे मांडले गेले. शहरांचा विकास, उद्योगांचा विकास, सिंचन, पिण्याचं पाणी, ऊर्जानिर्मिती अशासारख्या सर्व अत्यावश्यक बाबींचा दैनंदिन वापर करताना नदी परिसंस्था आणि अन्य संसाधनांचा विध्वंस केला पाहिजे असे नाही.  अन्य पर्यायही उपलब्ध आहेत, मात्र ते प्रभावीपणे वापरले जात नाहीत.

विकास कामानंतर विधायक बदलांसाठी लोकांनाच पुढे यावे लागते. एखाद्या नदीवरील बांध किंवा धरण या गोष्टी नदी प्रवाहाच्या वरील किंवा खालील संतुलित नैसर्गिक व्यवस्था व सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम जास्त प्रमाणात करतात. अशामुळे दोन्ही तटावरील गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात वितुष्ट निर्माण होतात व न्यायालयीन भांडणात अनेक वर्षं जातात.

ज्या भागातून नदी वाहते त्या भागातील शेतकरी, कामकरी, बुद्धिजीवी, लोकप्रतिनिधी आणि पाण्याचा वापर करणारे नागरिक असा स्थानिकांचा सर्वांत मोठा वर्ग आपल्या नदीविषयी फारसा जागृत नसतो. असे अनेक मुद्दे केस स्टडी मांडणीच्या वेळी चर्चेत येत होते.

चर्चेदरम्यान मी नकळत स्वतःच्या परिसराची पडताळणी करत होतो. १९९२ ते २०१८ या कालावधीत मी पाहिलेल्या नद्या या प्रामुख्याने महानगरांनी, शहरांनी, औद्योगिक वसाहतींनी प्रदूषित केलेल्या अशाच नजरेसमोर येत होत्या. कृष्णा, कावेरी नद्यांच्या पाणी वाटप वादाच्या बातम्या आठवत होत्या. नर्मदा घाटीतील बुडीत जाणाऱ्या गावातून केलेली फिरती आठवत होती. तसेच २००५ पासून गेली १२-१३ वर्षं मी राहत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांची स्थितीसुद्धा माझ्या डोळ्यांसमोर येत होती.

हा जिल्हा निसर्ग सौंदर्याने समृद्ध, शेती, बागायती, मासेमारी यावर आधारित अर्थव्यवस्था. औद्योगिकीकरण फारसे नाही, मोठी शहरे नाहीत, लोकसंख्या पण कमी. त्यामुळे आत्तापर्यंत तरी या भागातील सर्व नद्या स्वच्छ आहेत. पण विकासाच्या नावाने येणारे खाण प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, रासायनिक प्रकल्प, मोठ्या गृहबांधणी योजना आणि नवश्रीमंतांनी घेतलेल्या भरमसाठ जमिनी (त्यांचा वापर काय करणार हे अजून ग्रामस्थांना किंवा कोणालाही माहिती नाही) यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील या सर्व नद्या अशाच स्वच्छ सुंदर राहतील याची शाश्वती नाही. आताच नद्यांतील वाळू उत्खननाचे ठेके मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत. त्यामुळे नदी परिसंस्था वाचवणे हे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या संदर्भात स्थानिक पातळीवर लोकजागृती करणे आतापासूनच आवश्यक आहे असे वाटू लागले. या भागातल्या नद्या मी पाहिलेल्या होत्या, मात्र एकही नदी उगमापासून संगमापर्यंत हिंडून पाहिलेली नव्हती. त्यामुळे नदी संवाद कार्यक्रमानंतर लवकरात लवकर आपल्या परिसरातील नदी उगमापासून संगमापर्यंत एकदा फिरून पाहायची हे मी निश्चित केले आणि नदी संवाद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी तसे जाहीरसुद्धा करून टाकले.

घरी आल्यावर मी नदी यात्रेसंदर्भात मित्र परिवाराबरोबर बोललो. यापूर्वी कोणी अशी उगमपासून संगमापर्यंत यात्रा केली आहे का त्याची चाचपणी केली. यासाठी आमच्या सावंतवाडी तालुक्यातली तेरेखोल नदी निवडली. नदी संदर्भातील उपलब्ध माहिती मिळवायला सुरुवात केली. उगमापासून संगमापर्यंत यात्रा केलेले कोणीही सापडले नाही. मग नदीचा उगम ज्या परिसरात / गावातून होतो, त्या गावातील लोकांशी संपर्क साधला. कलंबिस्त गावातले रूपा सावंत (शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते) माझ्या या सामाजिक उपक्रमात आनंदाने सहभागी झाले. तेही कधी उगमापार्यांत गेलेले नव्हते. आम्ही दोघांनीही प्रथम उगम बघून यायचे ठरवले आणि एक दिवस ठरवून निघालो. कलंबिस्त, शिरशिंगे, गोठवेवाडीपर्यंत पोचलो, पण अर्ध्यावरूनच परतावे लागले. कोणीतरी स्थानिक माहितगार असल्याशिवाय उगमापर्यंत पोचणे शक्य नव्हते. आम्ही गावातील लोकांना भेटायचे ठरवले. लोकांचे अनेक प्रश्न होते, आमच्या हेतूबद्दल साशंकता होती. काही लोकांना वाटत होते की, आम्हाला कोणत्या तरी संस्थेचा मोठा प्रकल्प मिळाला आहे, फंडिंग आहे. कदाचित या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी एखाद्या कंपनीने सर्व्हेचे काम दिले असेल इत्यादी इत्यादी.

या भागात साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. अनेक लोक पुणे, मुंबई अशा महानगरात नोकरी धंदा करून आलेले आहेत, सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. अनेक ठिकाणच्या नद्यांची प्रदूषित झालेली स्थिती त्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे आम्ही नदी उगमापासून संगमापर्यंत फिरून बघण्याचा केलेला संकल्प व पुढे करायचे जल साक्षरतेचे काम समजावून सांगणे फारसे कठीण गेले नाही. ज्यांना ज्यांना आम्ही भेटलो त्यांनी आनंदाने सहकार्य करायचे आश्वासन दिले. शिरशिंगे, मळेवाडीतील सुरेश सावंत आम्हाला उगमापर्यंत घेऊन जायला तयार झाले. उगमापर्यंत जाणारी वाट बेणत (साफ करत) जावे लागणार होते. हातातील कामांचा विचार करून उगमापर्यंत जाण्याचा एक दिवस आम्ही निश्चित केला. ठरलेल्या दिवशी मी आणि रूपा सावंत शिरशिंगेला पोचलो. परंतु येथूनच रूपा सावंत यांना तातडीच्या कामासाठी परतावे लागले.

त्यामुळे संपूर्ण यात्रेत त्यांची साथ इथपर्यंतच मिळाली. सुरेश सावंत यांनी पुन्हा एकदा आमचा जमीन खरेदी करण्याचा विचार नसल्याची खात्री केली. त्यांचे समाधान केल्यानंतर मी आणि सुरेश सावंत यांनी उगमाकडे चालायला सुरुवात केली. सकाळी दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. रस्ता फारसा अवघड नव्हता, मोबाइल टॉवर उभा करण्यासाठी पूर्वी डोंगरापर्यंतचा रस्ता केलेला होता. जुनी पायवाट पण होती. शिरशिंगे मळेवाड ते कावळेसाद उगमापर्यंत पायी प्रवास करायला तीन तास २० मिनिटे लागली. जाताना वाटेत प्रमुख असे चार वहाळ लागले. एक देवराई लागली, जुन्या गोठणी लागल्या, कोंडी लागल्या आणि शेवटी कावळेसाद येथे तीन वहाळांचा संगम, ज्याला कातळ असे म्हणतात तिथे आम्ही पोचलो. या तीन वहाळांच्या संगमापासून नदी सुरू होते व पुढे गोठवेवाडी, वेर्ले अशा गावातील ओहोळांचा प्रवाह मिळत जाऊन नदी प्रवाहीत होऊन तेरेखोल खाडीपर्यंत जाते. उगमापर्यंत आमचा प्रवास अनुभवल्यानंतर उगमापासून संगमापर्यंतची यात्रा आपण निश्चित पूर्ण करू शकू, याची खात्री झाली. आता मी पुढील तयारीला लागलो.

सहकाऱ्यांच्या शोधात युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामकरी, ग्रामपंचायत सदस्य, महिला, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, अभ्यासक अशा अनेकांना मी भेटलो. बरेच जण तयार झाले. अशाच चर्चेदरम्यान भूगोल विषयाच्या प्राध्यापिका सुमेधा नाईक-धुरी (RPD ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) आणि प्रा. एस. ए .ठाकूर (SPK महाविद्यालय, सावंतवाडी) या दोघांबरोबर विशेष तपशीलासह चर्चा झाली. दोघांनाही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी यात्रेत सहभागी व्हायचे नक्की केले. एवढेच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, मालवण तालुक्यातील दोन भूगोल विषयाच्या प्राध्यापकांनाही आपल्या बरोबर सहभागी करायचे निश्चित केले.

मी विचार करीत होतो त्याप्रमाणे यात्रेदरम्यान उगमापासून संगमापर्यंत जाताना वाटेत लागणाऱ्या माध्यमिक शाळा, ग्रामपंचायती अशा ठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी जलसाक्षरतेसंबंधी संवाद साधावा, पण हे करताना वेळेचे गणित सांभाळताना बरीच दमछाक होणार होती. त्याशिवाय ज्या नदी संदर्भाने आपण बोलणार तिची सद्यस्थितीची फारच थोडी माहिती आपल्या जवळ असणार होती. या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून प्रथम आपल्या गटाने नदी यात्रेचा उगमापासून संगमापर्यंतचा कार्यक्रम आणि लोकांशी संवादाचा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम स्वतंत्रपणे घ्यावे असे ठरले.

आम्हाला यात्रा दोन टप्प्यांत करावी लागणार होती. पहिला  टप्पा  हा उगमापासून मुख्य प्रवाहापर्यंतचा होता. पूर्ण डोंगराळ भागातून पायी करावा लागणार होता. आणि दुसरा टप्पा हा मुख्य प्रवाहापासून संगमापर्यंतचा जो चांगल्या रस्त्याने मोटर सायकलने बघत जाण्यासारखा होता.  कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेता एकदम हौशी आणि पर्यटक म्हणून सहभागी होणाऱ्या लोकांना यावेळी न घेता मोजक्या १०-१२ लोकांनी ही  यात्रा  पूर्ण  करावी,  सहा  स्थानिक मंडळी आणि सोबत सहा अभ्यासक इतक्या लोकांसोबत यात्रा करावी असे ठरवले.

२ व ३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी यात्रा निश्चित केली. आमच्या बरोबर सावंतवाडीहून एस. ए. ठाकूर, प्रा. सुमेधा नाईक-धुरी, प्रा. आर. एन. काटकर (मालवण), प्रा. प्रज्ञाकुमार गाठाडे (दोडामार्ग), शिक्षिका संध्या शेखर पवार (शिरशिंगे हायस्कूल), प्रथमेश हळदणकर (विद्यार्थी प्रतिनिधी), राजू बाळू नाईक( विद्यार्थी प्रतिनिधी).  या सोबतच स्थानिक मार्गदर्शक म्हणून सुरेश सावंत (शिरशिंगे) यांना घेऊन आम्ही शिरशिंगे ते कावळेसाद असा पायी प्रवास सुरू केला.  गोठेवेवाडी व वेर्ले या ठिकाणचे लोक त्या त्या गावात सहभागी झाले.

सकाळी ठीक ९ वाजता आम्ही शिरशिंगे माळेवाडी ते कावळेसाद कातळापर्यंतचा प्रवास सुरू केला. प्रवासाच्या सुरुवातीलाच एका बोर्डाने आमचं लक्ष वेधून घेतलं.

नोटीस

सर्वांना माहीत देण्यात येते की शिरशिंगे, ता. सावंतवाडी येथील हा रास्ता श्री. ........... यांच्या मालकीचा आहे. सदर रस्त्याचा वापर ग्रामस्थांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला करण्यास सक्त मनाई आहे. रस्त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- हुकूमावरून”

ही अशी नोटीस वाचतच आम्ही प्रवास सुरू केला. चालता चालता सुरेश सावंत तोंडी माहिती सांगत होते. गावठाण संपून शेते सुरू झाली आणि शेते संपता संपता आम्ही एका पाण्याच्या पाटाजवळ पोचलो. या पाटात सिमेंटचा पाइप टाकून पाणी शेतात नेण्याची व्यवस्था दिसत होती. यानंतर थोडी पडीक जमीन लागली, काही ठिकाणी काजूची लागवड, तर काही ठिकाणी पडीक शेतजमिनीच्या खुणा आढळत होत्या. खुरटी जंगली झाडे, किरकोळ मोठी झाडे दिसू लागली. ओळखीच्या झाडांबद्दल चर्चा रंगू लागली. अशीच चर्चा करत आम्ही बोणगीचे पाणी या पॉइंटपर्यंत पोचलो. इथून जवळच असलेल्या देवाचा वहाळ या प्रसिद्ध ठिकाणी थांबलो. या ठिकाणापासून सुमारे एक एकरचा परिसर देवराई म्हणून राखीव आहे. या देवराईत वेत, धूप आणि अनेक वनौषधी आहेत. या देवराईतली कोणतीही वस्तू, लाकूड वगैरे कोणीही घेऊन जात नाही. लाकडे तोडायची नाहीत किंवा तोडल्यास वापरायची नाहीत असा सामाजिक दंडक आहे जो आजपर्यंत पाळला जातो. हे क्षेत्र पाहून झाल्यावर आम्ही पुढे पालखीचा वहाळ, वाघ उन्हाळा, खोड्याचा कणा अशा तीन वहाळांच्या संगम असलेल्या कातळ या ठिकाणांपर्यंत पोचलो. निवळाचा वहाळ व आडवा गुणा असे दोन्ही आडवळणी वहाळ बघत बघत आम्ही उगमापर्यंत पोचलो. अशा प्रकारे पहिला टप्पा आम्ही साडेतीन तासांत पूर्ण केला. परतीचा प्रवास संपवून ठीक साडेतीन वाजता आम्ही जेवणासाठी सावंत यांच्या घरी पोचलो.

प्रत्येक वहाळ, ओढा, गोठण दाखवताना ललित कथेत शोभतील अशा सुरस कथा ऐकायला मिळाल्या, विस्तारभयास्तव त्या इथे देत नाहीये. दुपारी जेवण आटोपून आम्ही संध्याकाळी गोठवेवाडी या दुसऱ्या गावात गेलो. जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती. गोठवेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष सुर्वे आणि गोठेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शंकर घावरे या दोघांबरोबर आम्ही सर्वजण गोठवेवाडी येथील डोंगरातील गंगोत्री या ठिकाणी पोचलो. गंगोत्रीपासून पुढे ९ कि.मी. वर चढून गेल्यानंतर पठार लागते आणि पठाराच्या पलीकडे गारगोटी, किनवडे कडगाव, मडगाव अशी कोल्हापूर जिल्ह्यातली गावे लागतात. पठारावरील तलावात होणारा पाण्याचा साठा व लहाना ओघळीतून मिळणारे पाणी गंगोत्रीपर्यंत पोचते.

हीच गंगोत्री पुढे मुख्य नदी प्रवाहाला मिळते. या ठिकाणी डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढ्याचे पाणी अडवून गावासाठीची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली आहे. स्वच्छ, थंडगार पाणी चोवीस तास गावातील लोकांना विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. डिझेल, वीज किंवा पेट्रोल अशा कोणत्याही प्रकारचा खर्च त्यावर होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना निश्चित मासिक पाणी पट्टी भरावी नाही. गावाचे मंडळ देखभाल-दुरुस्ती व दैनंदिन व्यवस्था आवश्यकतेनुसार वर्गणी काढून भागवतात. गंगोत्रीपर्यंतचा पाण्याचा उगम हा एकदम डोंगरावर आहे, परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला वेळ पुरला नाही. गंगोत्रीलाच पूर्ण काळोख झाला होता. त्यामळे तिथूनच मागे फिरावे लागले. या गावात गंगोत्रीव्यतिरिक्त धबधब्याचा वहाळ, म्हातारीचा वहाळ, चांदिवड्याचा वहाळ असे बारमाही वाहणारे वहाळ या मुख्य प्रवाहाला मिळतात. अशा प्रकारे २ तारखेची पायी यात्रा आम्ही संपवली.

३ तारखेला सकाळी आम्ही वेर्ले या गावी पोचलो. सरपंच श्री. राऊळ यांना भेटून आम्ही बाध्याची राई व कापल्याचा वहाळ या ठिकाणी पोचलो. या ठिकाणी शांताराम नारायण गुरव यांनी परिसराची माहिती दिली. तर बाध्याची सतत राई ते कापल्याचा वाहाळ असे दोन पॉइंट जोडून धरण बांधण्याची योजना प्रस्तावित आहे, मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी पाणी पूर्ण आटलेले आहे. यानंतर श्री. गुरव यांनी अन्य वहाळांची दिलेली माहिती घेऊन आम्ही त्या त्या जागी भेट दिली, पण बहुतेक सर्व वहाळ पूर्ण आटलेले आढळले. नोव्हेंबरपर्यंतच हे वहाळ प्रवाहीत असतात. प्रवाहाच्या दिशेने येताना करवंदीचा वहाळ या ठिकाणी बंधारा घालून पाणी अडवलेले आढळले. या साठवलेल्या पाण्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी दुबार शेती पिकवलेली दिसत होती.

हे दोन्ही वहाळ व परिसर फिरून बघितल्यानंतर आमच्या लक्षात आले की, उगमापासून यात्रा करण्यासाठी आम्ही निवडलेली वेळ ही चुकली आहे. यासाठी आम्हाला नोव्हेंबरमध्ये येणे गरजेचे आहे.  साधारण ११ च्या दरम्यान नदीचा मुख्य प्रवाह मोटर सायकलवरून बघत जायचे ठरवले. वेर्ले, कलंबिस्त, बावळाट, माडखोल, सांगेली, सरमळे, ओटवणे, वाफोली, बांदा इथपर्यंत आम्ही नदीकाठाचे वेगववेगळे पॉइंट बघत प्रवास पूर्ण केला. दुबार शेती, बागायती, केळी, भाजीपाला, नारळ, सुपारी असे समृद्ध क्षेत्र पाहत पाहत शेरले, मडूरे, बांदा या ठिकाणच्या जुन्या धक्क्याजवळ येऊन पोचलो. या धक्क्यापासून पुढे खारे पाणी असल्यामुळे आमची नदीच्या उगमापासून संगमापर्यंतची यात्रा या ठिकाणी संपवली. नदीकाठी गुरे धुणे, कपडे धुणे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नदीत होत नाही. नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रवास करताना एक गोष्ट विशेषत्वाने जाणवली, नदीच्या उगमापासून मुख्य प्रवाहाला येईपर्यंत समृद्ध अशा जमिनीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना व अन्य नागरिकांना असाच स्वच्छ व सुंदर पाणी पुरवठा होईल का, या विषयी साशंकता आहे. या यात्रेदरम्यान बाबा आमटे यांच्या या ओळी सतत आठवत होत्या.

‘झोपले अजून माळ तापवीत काया,

असंख्य या नद्या अजून वाहतात वाया, 

अजून हे अपार दुःख वाट पाहताहे,

अजून हा प्रचंड देश भीक मागताहे.’

सुपीक पण पडीत पडलेली जमीन, अत्यल्प भावाने विक्री केलेली जमीन दिसत होती. स्वच्छ व सुंदर पाणी वाहून आणणारे अनेक ओढे देखभालीअभावी कोरडे पडत चाललेले दिसत होते. गावात तरुण युवांचे अत्यल्प प्रमाण. असे प्रातिनिधिक चित्र दिसत होते.

तर नदी संगमाच्या दिशेने जाताना गावागावांतील सुंदर अशी बागायती हिरवाई थांबवून फोटो घ्यायच्या मोहात पाडत होती. नारळ सुपारी यांसारख्या पारंपरिक पिकांच्या जोडीने (केरळीयन आलेल्या पासून) यांची लागवडही आता केळी, अननसे लागली आहेत. शेती बागायतीत सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.

या (वेळ चुकलेल्या) यात्रेनेही आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा