बिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही!
पडघम - देशकारण
विकास लवांडे
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप
  • Thu , 21 March 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP शिवसेना Shivsena भाजप BJP

भारतात संसदीय लोकशाही व्यवस्था बहुमताने स्वीकारली गेली. तेव्हापासून व त्याआधीपासून हजारो वर्षे इथे दोन मुख्य विचार प्रवाह आहेत. ढोबळमानाने उजव्या आणि डाव्या विचारांचे हे प्रवाह आणि त्यांचा एकमेकांत वैचारिक संघर्ष वर्षानुवर्षे सुरू आहे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, तेव्हा घटनेची मूलभूत भूमिका व तत्त्वांना विरोध करणारी तात्काळ प्रतिक्रिया देण्यात उजव्या विचारांचे मूठभर लोक आघाडीवर होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व हिंदू महासभा या दोन प्रमुख संघटना उजव्या विचारसरणीचे नेतृत्व करत आल्या आहेत. त्यांनी कायम हिंदुराष्ट्रवादाचा आग्रह धरलेला आहे. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला भारतीय राष्ट्रवाद मान्य नाही, ही त्यांची भूमिका जगजाहीर आहे. भारतीय राजकारणात आरएसएसप्रणित भाजप-शिवसेना हे पक्ष हिंदुराष्ट्रवाद या मुद्यावर एकत्र आहेत.

मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे सर्व छोटे-मोठे मित्रपक्ष भारतीय राष्ट्रवाद मानतात व त्यासाठी आग्रही आहेत. भारतीय राष्ट्रवादाची बीजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात रोवली गेली होती. आपला देश विविधतेने नटलेला आहे. जिथे विविध जातीधर्माचे व बहुभाषिक लोक राहतात. असा भारत देश राज्यघटनेवर आधारित चालवला गेला पाहिजे. संविधानातील मूलभूत तत्त्वज्ञान अंमलात आणले पाहिजे. त्यानुसार नवा भारत हळूहळू निर्माण होईल. धर्मावर आधारित उभे राहिलेले कोणतेही राष्ट्र सर्वांगीण प्रगती करू शकणार नाही, ही धारणा स्वातंत्र्यलढ्यातील सर्व महान नेत्यांची होती. तोच विचार राज्यघटना समितीने घटनेत मांडला आहे. मात्र त्या स्वातंत्र्यासाठी आरएसएस व हिंदू महासभेचे काहीही योगदान व सहभाग नव्हता, हे सर्वश्रुत वास्तव आहे. देशात अध्यक्षीय लोकशाही अथवा हुकूमशाहीचा पुरस्कार करणारी ही मंडळी आजही त्याच प्रयत्नात आहेत. आजसुद्धा ही मंडळी डॉ. आंबेडकर यांनी प्रतीकात्मक दहन केलेल्या ‘मनुस्मृती’चे जाहीर समर्थन करतात.

हा वैचारिक संघर्ष ज्यांना महत्त्वाचा वाटत नाही, ते लोक गेल्या १०-२० वर्षांत देशाच्या राजकारणात मोठ्या संख्येने जमू लागले आहेत. आरएसएसप्रणित भाजप केडर बेस पार्टी आहे. हिंदुत्ववादी विचारांचे ‘कार्यकर्ते’ नव्हे तर  ‘सैनिक’ ते जाणीवपूर्वक घडवतात.

अशी प्रक्रिया पूर्वी जुन्या काँग्रेसमध्ये असायची. जिथे भारतीय राष्ट्रवाद, सर्वधर्मसमभाव, वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले कार्यकर्ते शिबिरातून घडवले जायचे. मात्र ती प्रक्रिया गेल्या ३०-३५ वर्षांत खंडित झाली असावी. मास बेस पार्टी असल्याने त्या पक्षांचे नेते जनतेला गृहीत धरून आहेत. मात्र जागतिकीकरणाचे धोरण अंमलात आल्यानंतर देशात सर्व पातळ्यांवर अनेक बदल झाले आहेत. संगणक युग आले. १९९० नंतर राजकारणातील नवी पिढी ‘भारतीय राष्ट्रवाद’ या विचारांपासून अनभिज्ञ राहिली. दुसऱ्या बाजूला संख्येने मूठभर असलेली हिंदू राष्ट्रवादी व धर्मांध विचारांची मंडळी बुद्धिभेद करण्यात कायम पटाईत राहिली आहे. त्यांनी त्यांच्या विचारांचे झापडबंद सैनिक तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले.

काँग्रेस विचारधारेशी निगडित पक्षांतर्गत मतभेद होऊन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस असो, यांच्यातील कार्यकर्ते किंवा नेते एकमेकांच्या पक्षात जाऊन सक्रिय झाले तरी त्यांची मूळ विचारधारा तीच असते.

सार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत. अशी छोट्या-मोठ्या हजारो नेत्यांची व कार्यकर्त्यांची नावे सांगता येतील. काँग्रेस व सर्व मित्रपक्ष हे भारतीय राष्ट्रवाद मानतात, याचा अर्थ ते धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभावी, पुरोगामी, लोकशाही व संविधानातील बंधुता, समता व सामाजिक न्याय या मूल्यांवर निष्ठा ठेवणारे असतात.

खेड्यातील जुन्या म्हणीप्रमाणे ‘बिनबुडाची मडकी’ जर आपण पक्षात मोठी करणार असू तर ती कधीही, कुठेही जाऊ शकतात, हे दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. पक्षाच्या मूलभूत विचारांनी बांधलेले कार्यकर्ते कधीही विसंगत पक्षांतर करत नाहीत, याची हजारो उदाहरणे देता येतील. नेता कुठेही गेला तरी कार्यकर्ता जागेवर राहतो. निवडणुकीत याच निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षाने कुणालाही तिकीट दिले तरी प्रस्थापित नेता पक्षाला ब्लॅकमेल करू शकत नाही. कारण पक्ष-संघटना विचारांवर आधारित बांधलेली असते. आपल्याला आपल्यापेक्षा आपला भारतीय राष्ट्रवाद व राज्यघटना सर्वाधिक महत्त्वाची वाटावी, यासाठी हजारोंच्या संख्येने नवयुवकांची जाणीवपूर्वक वैचारिक बांधणी अटळ आहे.

याचे महत्त्व दोन्ही काँग्रेसला किती लवकर सुचेल व तशी अंमलबजावणी होईल, तो सुदिन असेल! राज्यघटना व भारतीय राष्ट्रवादी विचारांची बांधिलकी असलेले समविचारी कार्यकर्ते एकत्र राहू शकतात. ते व्यक्तिनिष्ठ नसतात. मात्र लाभार्थी कार्यकर्ते-नेते, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असलेले नेते-कार्यकर्ते पक्षाला कधीही अडचणीत आणू शकतात. याची मागील १० वर्षांत अनेक उदाहणे देता येतील.

विसंगत विचारधारा असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती हे सध्या दोन मुख्य राजकीय विचारप्रवाह आहेत. राज्यघटनेशी सुसंगत व भारतीय राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्ष पुरोगामी या विचारप्रवाहात कुणी नेता व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर त्याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येईल. मात्र हिंदूराष्ट्रवाद असलेल्या, प्रतिगामी विचारधारा असलेल्या पक्षात जेव्हा आधी त्याच विचारधारेच्या विरुद्ध सक्रिय असलेला कुणी नेता व कार्यकर्ता पक्षांतर करतो, तेव्हा त्याला ‘बिनबुडाचं मडकं’  यापेक्षा वेगळी उपाधी सापडत नाही.

म्हणून भारतीय राज्यघटना, संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, पुरोगामीत्व या विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी यापुढे केवळ गृहितकांवर अवलंबून राहता येणार नाही. तुमच्या विचारांचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतील आणि त्यांची जोपासना करावी लागेल. त्यांनाच पक्षाचा आधार दिला गेला पाहिजे, त्यांचे महत्त्व वाढवले पाहिजे. अन्यथा अनेक सरदार येतील-जातील, बिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक विकास लवांडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......