संजय भागवत : उमदा, निरलस मित्र आणि मिश्किलही!
संकीर्ण - श्रद्धांजली
विकास परांजपे
  • संजय भागवत () मौज प्रकाशन गृहाची काही पुस्तके
  • Sat , 16 March 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली संजय भागवत Sanjay Bhagwat मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Griha

संजय भागवत याचे निधन झाले आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. १९८८ सालापासून आमची मैत्री होती. काही वर्षे तर रोजच आम्ही भेटत होतो. ज्योत्स्ना प्रकाशनची प्रिंटिंगची कामे मौजेत सुरू झाली आणि आमची ओळख झाली. दोघांचा व्यवसाय एकच, शिवाय राजकारण, समाजकारण, पुस्तके अशा विविध विषयांवर गप्पा मारणे, संगीत ऐकणे, भटकणे, चवीरवीने खाणे, अशा समान आवडीमुळे आमचे मैत्र पटकन जुळली. मी पूर्वी गिरगावात राहत होतो. आम्ही राहत असलेल्या केशवजी नाईकांच्या चाळीत गणेशोत्सवाची शताब्दी झाली, तेव्हा आम्ही गणेशोत्सवाचा इतिहास संकलित करून एक पुस्तक छापले. त्याची सर्व पूर्वतयारी मौजच्या प्रेसमध्ये वर्षभर चालू होती. संजयने त्या कामात आत्मीयतेने पुष्कळ मदत केली. पुढे तसे कधीही बोलून मात्र दाखवले नाही. अशी नि:स्वार्थ मदत करणे आणि आपण नामानिराळे राहणे, हा त्याचा मोठा गुण होता. याउलट एखादा माणूस मदत करून वारंवार ते बोलून दाखवत असेल तर त्याला ते आवडत नसे. पुढे एकदा आम्ही दोघे एकत्र काहीतरी उद्योग करत असताना मी त्याला आपण एका माणसाची मदत घेऊया असे सुचवले. तर ‘तो माणूस मदत करेल, पण इतके वेळेला ते बोलून दाखवेल की, त्यापेक्षा त्याची आपल्याला मदतच नको’ असे म्हणून ती सूचना त्याने फेटाळली. आपण एखादे काम घेऊन त्याच्याकडे गेलो तर स्वत:चे सुरू असलेले काम बाजूला ठेवून तो आपल्याला मदत करायला तत्पर असे.

तो मोजकेच पण मार्मिक बोलत असे. राम पटवर्धन गेल्यानंतर एका चर्चासत्रात अनेकांनी त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. पटवर्धन कसे बोलत, कसे प्रतिक्रिया देत यावर तिथे पुष्कळ बोलले गेले. पण संजयने सगळ्यांचे बोलून संपल्यावर टिपण्णी केली ती मार्मिक होती. तो म्हणाला ‘पटवर्धन फार चांगले श्रोते होते. ते अगदी खाजगी गप्पातही समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेत. समोरचा वयाने कितीही लहान असला तरी, त्याला बोलताना कधीही मध्येच थांबवत नसत आणि त्याचे बोलणे पूर्ण झाल्यावरच ते प्रतिक्रिया देत. He was a very good listener.’

संजय सुद्धा नि:संशय ‘good listener’ होता. तसाच मिश्किलही! एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावरून तो त्याला टोपणनाव देई आणि ते खासच असे. पण अशी टोपणनावे आमच्या दोघांपुरतीच असत. अशोक कोठावळे यांना तो ‘प्रिन्स’ म्हणे. अरुण टिकेकर ‘थोर संपादक’ तर कुमार केतकर ‘जेम्स बाँड’. खाजगी वाहिनीवरील चर्चेत कुठल्याही विषयावर मते मांडायला चटावलेल्या दोन व्यक्तींचा उल्लेख तो Socrates आणि Aristotle असा करी. मी आणि संजय साहित्य वर्तुळात नेहमी एकत्र वावरलो. संमेलन असो वा अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळ आम्ही पुस्तक विक्रीसाठी एकत्रच फिरायचो. मौजेत चालणारी राम पटवर्धनांची ‘बैठक’ तो कधी चुकवत नसे. एकूणच त्याला घरी जाण्याची कधीही घाई नसे. पूर्वी मौज प्रकाशन रविवारी बंद असे आणि प्रेस मंगळवारी. हा त्यामुळे सातही दिवस प्रेसवर येई. प्रेसमध्ये रविवारी डझनभर पेपर येत ते वाचायला मीही रविवारी तिथे जात असे. संध्याकाळी पाच वाजले की, संजय प्रेसच्या मागे असलेल्या गोरेगावकर लेनमध्ये आपल्यापेक्षा लहान मित्रांबरोबर क्रिकेट किवा व्हॉलिबाल खेळायला जाई.

त्याचे टेबल विविध पुस्तकांनी, कागदांनी भरलेले आणि अस्ताव्यस्त असे. त्याचे व्यक्तिमत्त्व मुळात रुबाबदार आणि देखणे होते, पण जमेल तितके अजागळ राहून तो त्यावर मात करी! तोंडात तंबाखूची गुळणी असेच. बोलण्याचा उत्साह कमीच असल्याने ते तसेही सोयीचेच होते. मीना प्रभूंनी त्याला एकदा तीळगुळ देऊन ‘गोड जाऊ द्या हो, पण काहीतरी बोला’ अशी मिश्किल विनवणी केली होती!

कमी बोलका तरी तो प्रेमळ आणि लाघवी होता. दुसऱ्याला फसवणे त्याच्या हातून कधी झाले नाहीच. इतकेच काय एखाद्याला कसे फसवायचे असते, ते त्याला कधी ‘सुचले’ही नसते, इतका तो निरलस स्वभावाचा होता. आपण कोणाला गंडा न घालणे वेगळे आणि गंडा कसा घालायचा हे न कळणे वेगळे! त्यामुळेच एखाद्या विषयात निरपेक्ष सल्ला घ्यावा तर संजयचा, अशी त्याच्या मित्रांना खात्री होती. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. त्याला संगीत ऐकायला मनापासून आवडे. त्याची ही आवड त्याने प्रयत्नपूर्वक जोपासली होती. तो सीए झाला होता हे अनेकांना माहीत नसते. त्याचे वाचन चांगले आणि चौफेर होते. इंग्रजी वर्तमानपत्रेही तो बारकाईने वाचे आणि अर्थशास्त्राची त्याला आवड होती. मुख्य म्हणजे त्याला साहित्याची चांगली जाण होती.

प्रकाशन, पुस्तक विक्री या दोन्ही क्षेत्रातल्या बहुतेकांशी त्याचे चांगले संबंध होते. तो स्वतः स्वभावाने मोकळा होता आणि दुसऱ्याकडून काहीतरी काढून घेण्याच्या उद्देशाने नाटकी सलगी करणारी, दिलेला शब्द न पाळणारी आणि एकूणच ढोंगी माणसे त्याला आवडत नसत. कमी बोलणारा असला तरी माणसांची त्याला उत्तम पारख होती. निळू दामले, मधु मंगेश कर्णिक, मिलिंद बोकील, श्रीनिवास कुलकर्णी, अरुण टिकेकर, कुमार केतकर, अंबरीश मिश्र, गुरुनाथ सामंत अशा काही लेखक, संपादकाशी त्याचे चांगले व्यक्तिगत संबंध होते.

श्री.पु. भागवत प्रकाशक म्हणून काम पाहत असतानाच त्यांनी आपला वारस म्हणून संजयची निवड केली होती. ते हयात असेपर्यंत, म्हणजे आठ-दहा वर्षे तो उत्साहाने काम करत होता. मुख्य म्हणजे त्याला आपण श्रीपुचा वारसा सांभाळत आहोत याचे अजिबात दडपण नव्हते. स्वतःच्या मतांबाबत तो ठाम होता. त्याने कोणावरही कधीही कसलेही दडपण आणले नव्हते. कदाचित म्हणूनच त्याला दुसऱ्या कोणाचेच दडपण वाटले नसावे!

त्याने श्रीपुना एकदा भेटून आपण वेगळे लेखक घेऊन नवीन काही विषय हाताळायचे ठरवले आहेत, हे सांगितलेही होते. असे असले तरी श्रीपुंच्या पश्चात मौजचा कारभार सांभाळणे हे एकट्या-दुकट्याचे काम नव्हतेच. ते एका टीमला पुरून उरेल असे काम होते आणि त्यासाठी हवा होता नेतृत्वगुण. संजयकडे तो नव्हता असे नाही, पण आपले म्हणणे ठामपणे आणि आत्मविश्वासाने मांडणे म्हणजे दुसऱ्याला दुखावणे असे त्याला वाटे. आणि गप्प बसून त्याने आपलीच घुसमट करून घेतली. कुणाला एकाही शब्दाने दुखावणे त्याच्या स्वभावात नव्हते. इतरांच्या वागण्याने, बोलण्याने तो कितीदा तरी दुखावला गेला तरी! पण समोरचा माणूस आपल्या मौनाचा काहीतरी अर्थ त्याच्या परीने लावत असतो. तसेच काही वेळा न बोलण्यानेही माणसे दुरावतात, हे त्याच्या लक्षातच आले नाही.

तसा मुळात तो ‘उपक्रमशील’ नव्हताच. एखादी नवी कल्पना सुचली वा कोणी सुचवली तर झपाटून त्याच्या मागे लागणे हा त्याचा स्वभाव नव्हताच. पण कोणत्याही उपक्रमात तो मनापासून सहभाग घेई. मराठी ग्रंथ प्रकाशक संघटना अशी एक प्रकाशकांची संघटना काही प्रकाशक, विक्रेते एकत्र येऊन सुरू झाली. त्यात तो हिरीरीने काम करी. जयंतराव साळगावकर, धनंजयशेठ ढवळे, पांडुरंगशेठ कुमठा, अप्पा परचुरे, किरण गोखले असे सर्व लोक यात होते. ‘चार दिवस मौजेचे’ या उपक्रमात तो सुनील वेलणकर या आपल्या मित्राबरोबर बरीच वर्षे रमला.

संजय नेहमी अतिशय निवांत असे. तसे सगळेच भागवत निवांत असत. पण माझ्यासारख्या छोट्याश्या कारणाने जीवाची घालमेल होणाऱ्याबरोबर तो जमवून घेई, तसेच सुनील वेलणकरसारख्या ‘सैनिका’बरोबरही तो जमवून घेई. त्याने सगळ्यांचा ‘आहे तिथे आहे तशा’ तत्त्वावर स्वीकार केला होता आणि हा फार दुर्मीळ गुण आहे. तो सर्वांशी मिळून-मिसळून वागायचा आणि कोणत्याही प्रकारचे काम करायला, अगदी पुस्तकांचे गठ्ठे उचलायालाही त्याला लाज वाटत नसे. इतक्या वर्षांत त्याला मी प्रेसमध्ये एखाद्या कामगाराशी वा सहकाऱ्यांशी चिडून बोललेला पाहिलेला नाही. उलट त्याच्या हाताखालच्या लोकांनी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले आहे.

प्रकाशक म्हणून जबाबदारी आल्यावर मोनिका गजेंद्रगडकरवर संपादक म्हणून त्याने पूर्ण विश्वास ठेवला. तिला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य दिले हे खरे असले तरी कुठेतरी हळूहळू तो आपली जबाबदारी टाळत तर नाहीये ना अशी शंका बहुधा तिलाही यायला लागली. क्रमाक्रमाने त्याचे निष्क्रिय होत जाणे पाहून जवळचे लोक चक्रावून जात. मोनिकाही अनेकदा व्यथित होई. श्रीपु हयात असे पर्यंतचा त्याचा कामाचा उत्साह त्यांच्या पश्चात कमी होत गेला. पूर्वी तो छपाईच्या कामात जास्त लक्ष घालत असे. आता लेखकांशी संवाद साधणे, हस्तलिखिते वाचणे अशा कामांना त्याने प्राधान्य देणे नुसते महत्त्वाचे नव्हे तर क्रमप्राप्त होते. पण तसे झाले नाही. जबाबदारी अंगावर आल्यावर नेमका तो का मागे सरला आणि कासवासारखा आपल्या कवचात का शिरला त्याचे कारण कोणाला कळले नाही.

संजयचे वडील विष्णुपंत तो कॉलेजमध्ये शिकत असतानाच गेले. आई काही वर्षे त्याच्या जवळच होती. त्या मायलेकांचे नाते अगदी घट्ट होते. तिचेही काही वर्षापूर्वी निधन झाले. आपल्याला समजून घेणारे दिलासा देणारे कोणी वडीलधारे सोबत असावे असे त्याला वाटत होते काय? कारण आई गेल्यावर त्याचे कामातून आणखीनच लक्ष उडाले. तो प्रकृतीची हेळसांड करू लागला. खाण्यापिण्याच्या बाबत तो फार चोखंदळ होता. पण नंतरच्या काळात त्याचे आहारावरील नियंत्रणच सुटले होते. शेवटी स्वतःच्या प्रकृतीकडे आणि शरीराकडे दुर्लक्ष कोणालाही महाग पडते. डॉक्टरांनी त्याला काळजी घ्यायला सांगितली होतीच. पण त्याने ते मनावर घेतले नाही. खरे तर त्याने सगळ्यातून आपले मन काढून घेतले. बघता बघता तो आपल्या जवळच्या लोकांपासून तुटत गेला आणि अधिकाधिक एकाकी होत गेला. आणि त्याने आपले ओठ घट्ट मिटून घेतल्यामुळे जवळच्या मित्रांना, घरच्या लोकांना ते सारे हताशपणे पहात राहणेच नशिबी आले.

संजय, प्रदीप चंपानेरकर, राजेंद्र मंत्री, अशोक कोठावळे, दिलीप भोगले आणि मी असे आम्ही व्यवसायातील पाच-सहा मित्र अनेकदा भेटत असू आणि विविध विषयांवर चर्चा आणि वादही घालत असू. त्यापूर्वी काही वर्षे अप्पा परचुरे, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, रवी बेहरे असे आम्ही एकत्र संमेलनालाही जात होतो. एरव्ही गप्प बसणारा संजय अशा मोजक्या मित्रांसंगे भरपूर गप्पा मारी. अशा काही चर्चेत ‘मौजच्या भावी वाटचालीबाबत तुझे नेमके धोरण काय?’ असा प्रश्न आम्ही त्याला अनेकदा विचारला होता. त्यावर मात्र त्याने प्रत्येक वेळी ‘मौनराग’ आळवला.

त्याच्या मैत्रीचा मला झालेला फायदा असा की, या व्यवसायातील अनेक नामवंत आणि गुणी माणसांशी माझा त्याच्यामुळे परिचय झाला. शिवाय संजयचा मित्र म्हणून सगळ्या भागवत कुटुंबाचा स्नेहही मला मिळाला.

मराठी ग्रंथ व्यवहाराचा विचार करता ‘भागवत’ कुटुंबात जन्माला आला म्हणजे एका अर्थाने तो ‘राजघराण्यात’ जन्माला आला होता. चांगले शिक्षण, आकर्षक व्यक्तिमत्त्व, साहित्याची आणि व्यवहाराची उत्तम जाण, हे गुण असलेला तो राजपुत्रच होता. पण त्याच्या या गुणांचा कस लागलेला दिसला नाही. शेवटी शेवटी त्याचा प्रवास चक्रव्यूहात सापडल्यासारखा होत गेला. त्या अर्थाने तो ‘शापित राजपुत्र’ होता. त्याच्या जाण्याचे दु:ख तर सर्वांना आहेच, पण त्याचबरोबर वाटते, त्याला त्याची कोंडी फोडण्यासाठी आपण मदत करू शकलो नाही याची खंतही!

(‘ललित’ मासिकाच्या मार्च २०१९च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखक विकास परांजपे ज्योत्स्ना प्रकाशनाचे संचालक आहेत.

vikas@jyotsnaprakashan.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................