आज कोणती विचारधारा जगण्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकेल?
पडघम - सांस्कृतिक
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 12 March 2019
  • पडघम सांस्कृतिक धर्म Religion विचारधारा Ideology

इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांती होत होत मानवसदृश्य प्राणी सुमारे २५ लाख वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर वावरू लागला. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सुमारे २ ते ३ लाख वर्षांपूर्वी सध्याचा ‘हुशार मानवप्राणी’ पृथ्वीवर अवतरला. त्याने अग्नी नियंत्रित केला. इतर प्राण्यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला. लाखो हेक्टर जंगले साफ करून त्याने ती जमीन शेतीसाठी लागवडीखाली आणली आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. विविध खनिजांपासून अनेक धातू मिळवले. त्याने गेल्या सुमारे ७० हजार वर्षांत अनेक अमूर्त संकल्पना रचल्या, तो त्या व्यक्त करायला शिकला, त्यांचा त्याने प्रसार केला. त्यासाठी स्थळ-काळानुसार त्याने अनेक भाषा जन्माला घातल्या. त्या सतत प्रगल्भ करत राहिला. अमूर्त संकल्पनांच्या मदतीने अनेक धर्म, राजे, राज्ये व राजेशाह्या, राष्ट्र, राष्ट्रवाद, आणि इतर अनेक विचारप्रणाली रुजवल्या. व्यापार-उदीम यात प्रावीण्य कमावले. स्वार्थापायी अनेक युद्धे केली. यंत्रे बनवली. कोणत्याही इतर प्राण्याला न जमलेल्या अशा कितीतरी गोष्टी त्याने जमवल्या. अनेक प्राणी कालौघात नाश पावले, मानवाने अनेक प्राणी समूळ नष्ट केले, तर बाकी काही प्राणी बदलत्या पर्यावरणाशी थोडेबहुत जुळवून घेत तगून राहिले आणि इतर काहींना मानवाने स्वार्थासाठी आश्रय दिला, ते टिकून राहिले आणि संख्येने फोफावलेदेखील. थोडक्यात मानवाला सजीवसृष्टीचे सार्वभौमत्व प्राप्त झाले.

पृथ्वीवरील असंख्य प्राणी-प्रजातींपैकी एकाचेही कर्तृत्व माणसाच्या जवळपासदेखील पोहोचले नाही. त्यामुळे जीवनसंघर्षात टिकून राहणे आणि प्रजातीची संख्या वाढती राहण्याच्या संदर्भात इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त उपयुक्त अशी माणसाची कोणती वैशिष्ट्ये होती किंवा आहेत, हा प्रश्न कुतूहलाचा आहे. मानव दोन पायांवर उभे राहून चालतो. त्यामुळे त्याची नजर समोर लांबवर जाते आणि दोन पायांवर चालताना त्याचे हात मोकळे राहिल्याने चालता चालता किंवा पळतानाही माणूस अनेक हत्यारे किंवा इतर अनेक वस्तू हाताळू शकतो. तसेच, त्याची भाषा सर्व प्राण्यांपेक्षा जास्त प्रगल्भ आहे. माणूस अनेक गुंतागुंतीच्या बाबी दुसऱ्या माणसापर्यंत सहज पोहचवू शकतो. ही दोन वैशिष्ट्ये सहज लक्षात येणारी आहेत.

परंतु रॉबिन डनबर (Robin Ian MacDonald Dunbar, जन्म २८ जून १९४७) हे नामवंत ब्रिटिश मानववंश शास्त्रज्ञ उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञ आणि वानर प्रजातींच्या वर्तणूक अभ्यासाचे अधिकारी व्यक्ती. त्यांनी वानर प्रजातीमधील सदस्यांच्या मेंदूच्या आकारमानाचा व त्यांच्या टोळीच्या सर्वसाधारण सदस्य संख्येचा संबंध तपासला. त्याच्या आधारे मानवी मेंदूच्या सर्वसाधारण आकारमानाच्या प्रमाणात या प्रजातीमधील ‘हुशार मानव’ (Homo Sapiens) फक्त जवळपास १५० (१०० ते २५०) व्यक्तींशी व्यवस्थित सामाजिक नाती ठेवू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. यांतील ‘व्यवस्थित’ सामाजिक नाती याचा अर्थ आहे, या १५० सदस्यांपैकी कुठल्याही चार-पाच व्यक्ती चहा पीत बसल्या असतील, तर त्यांच्यात अचानक टपकायला संकोच वाटणार नाही; त्याला यांच्या परस्परसंबंध मैत्रीच्या नात्याचे ताणेबाणे बऱ्यापैकी माहीत असतील. माणसाच्या या मर्यादेला ‘डनबर अंक’ असे संबोधले जाते. हा अंक डनबर यांनी १९९० या वर्षी सुचवला. इतर प्राण्यांना बऱ्याच अंशी फक्त वर्तमान काळातील केवळ पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या जड वास्तवाचे आकलन होऊ शकते. अमूर्त संकल्पना त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. परंतु मानवाच्या आकलनविषयक क्षमतेमध्ये एक विशेष क्रांती झालेली आहे. तिच्यामुळेच सर्व प्राण्यांपैकी फक्त माणूसच अमूर्त संकल्पना स्वीकारू शकतो, एवढेच नव्हे तर त्या इतर माणसांना पटवू शकतो, आणि त्या आधाराने डनबर अंकाने उलगडून दाखवलेली आणि त्याच्यावर निसर्गाने घातलेली मर्यादा ओलांडू शकतो. आज त्याचा समाज १५० व्यक्तींपेक्षाही कितीतरी मोठा बनला आहे. म्हणूनच परदेशात गेलेल्या व्यक्तीला एखादी भारतीय व्यक्ती किंवा दक्षिण आशियातील पाकिस्तानी व्यक्ती भेटली की चटकन मैत्री होणे सोपे जाते.

पूर्वी एका धर्माची, एका हयात आध्यात्मिक गुरूची शिष्य असणारी माणसे अशीच जोडली जात असत; अजूनही जोडली जातात. प्राचीन इतिहास काळापासून विविध मार्गांनी डनबर अंकाची मर्यादा ओलांडलेल्या अशा मोठ्या गटाच्या हातून किती तरी महाकाय कामे घडली आहेत. अमूर्त कल्पना म्हणजे जड वास्तवात नसणाऱ्या कल्पना. त्या चिकित्सेवर टिकतात का नाही, टिकल्या तर किती काळ टिकतात हा मुद्दा अगदी वेगळा आहे. तो गैरलागूदेखील आहे. याचे कारण अगदी साधे आहे. अनेकांना एखादी अमूर्त संकल्पना पटली की, ते नवे ‘सत्य’ बनते.

एक साधे उदाहरण हा मुद्दा स्पष्ट करेल. समजा एखाद्या व्यक्तीची २००० रुपयांची नोट हरवली, तर तिला वाईट वाटते. वास्तवात ही भारतीय नोट म्हणजे गांधीजींचे एक चित्र असलेला रंगीत कागद, ज्यावर २००० रुपये असे विविध भाषांत छापलेले असते; शिवाय, त्यावर कुणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची छापील सही असते. असा कागदाचा चिटोरा मोलाचा आहे, हे सर्व भारतीयांना मान्य असल्याने त्याला मोल प्राप्त होते. हीच नोट शेजारच्या बांग्लादेशात किंवा श्रीलंकेत कागदाचा चिटोरा आहे. एवढेच नाही तर, उद्या समजा भारतात पुन्हा नोटाबंदी झाली, तर लगेच खरी नोट खोटी शाबित होईल. याचा अर्थ एवढाच की, ‘नोटा मोठ्या मोलाच्या आहेत’ ही अमूर्त संकल्पना आहे.

इतर देशांतही गेल्या दोन शतकांत नोटा वापरत आहेत. त्या देशातील नागरिक या नोटेचे त्यांच्या चलनात रूपांतर करून घेऊ शकतील. परंतु कुठल्याही देशातील माकड, वाघ, जंगलचा राजा सिंह यांना नोटेचे मोल समजणे केवळ अशक्य आहे. ऐहिक अथवा जड जगातील पंचेंद्रियांना जाणवेल त्यालाच ‘सत्य’ मानले, तर मानवाच्या संदर्भात ही जी आकलन क्रांतीची जादू झाली आहे, त्यानंतरचा काळ ‘सत्योतरी काळ’ आहे. नवे सत्योतरी सत्य म्हणजेच ‘अमूर्त संकल्पना’ मांडून ती मोठ्या समुदायाला पटवून देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींचे या विषयाचे चिंतन खूप प्रगल्भ असते. ती व्यक्ती प्रेषित, स्वामी, पीर, विचारवंत-कार्यकर्ता अशी महात्मा पदास पोहोचलेली असते.

डनबर अंकाची मर्यादा ओलांडण्याची युक्ती मानवाला कळाली, तेव्हापासून तो सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ ठरण्याला सुरुवात झाली. अमूर्त संकल्पना कोणतीही असो, तिचा वापर करून माणसाने माणसे जोडली आहेत. त्यांनी परस्पर सहकार्याने प्राचीन काळी पिरॅमिडससारख्या आजही कौतुकमिश्रित आश्चर्य वाटायला लावणाऱ्या वास्तू उभारल्या आहेत. संपूर्ण मानवी इतिहासात माणसाने यातूक्रिया, ईश्वर, पाप, पुण्य, पुनर्जन्म, अमरत्व, कुटुंब, कुटुंबव्यवस्था, धर्म, पंथ, स्मारक, प्रतीक, ध्वज, नीती-अनीती, नीतीनियम, मृत्यूनंतरचे जीवन, राजा, राज्य, चलन, नाणी/ नोटा/ चेक/ या रूपांतील पैसा, राष्ट्र, राष्ट्रवाद, नानाविध विचारधारा (नाझीझम, धार्मिकता वाद, मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद, मानवतावाद- हुमॅनिझम, भांडवलवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, इत्यादी विचारसरणी-आयडिऑलॉजीज), औद्योगिक कंपन्या, आंतरराष्ट्रीयत्व, संयुक्त राष्ट्रसंघ (युनो), ... अशा अनेक अमूर्त संकल्पना काळाच्या विविध टप्प्यांवर वापरल्या आहेत.

ही आकलनविषयक क्रांती कशी झाली असावी याबद्दल अजून तरी निश्चित उत्तर गवसलेले नाही. परंतु बहुधा अपघाताने घडलेल्या उत्परिवर्तनातून (म्युटेशन) ती साकारली असावी, असा एक कयास आहे. काळाच्या विविध टप्प्यांवर माणसाने सोयीच्या अमूर्त संकल्पना वापरून जास्त जास्त माणसे जोडली आहेत. याच अमूर्त संकल्पना ‘आपण’ आणि ‘ते असा फरक करणाऱ्या ओळखीदेखील माणसाला बहाल करतात. त्यांच्यामुळेच माणसे सहकार्याने प्रचंड कामे करतात, कष्ट उपसतात, भांडणे, लढाया ते महायुद्धे करतात. युद्धांत आपले बलिदानही देऊ शकतात.

इतिहासाच्या अशा प्रत्येक टप्प्यावर कालबाह्य, परंतु रूढ अमूर्त संकल्पना नाकारणारे, कालानुरूप नवीन अमूर्त संकल्पना रचणारे आणि ती मोठ्या प्रमाणात रुजवणारी व्यक्तिगत तर कधी सामाईक नेतृत्वे काळाच्या भिन्न टप्प्यांवर निर्माण झाली होती. त्यांना कधी मसिहा, धर्मसंस्थापक, प्रचारक-तत्त्ववेत्ता, विचारवंत, राजकारणी, महात्मा म्हणले गेले. तर कधी असे नेतृत्व सामूहिक होते. स्त्रीवादी आणि पर्यावरणवादी विचारांचे किंवा युनोसारख्या संघटना निर्मितीमागील नेतृत्व सामूहिक होते. तसेच भारत हे राष्ट्र स्वातंत्र्यचळवळीतून साकारले; आधी होती अनेक राजे-सुलतानांची राज्ये आणि त्यातील प्रजा. नव्या अमूर्त संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजवणाऱ्या व्यक्तींनी त्याभोवती अनेक मिथककथा रचल्या, प्रतीके उभारली आणि माणसाच्या जगण्याला वेळोवेळी अर्थ दिला.

ही उत्क्रांती एका सरळ दिशेने झाली नाही; माणसे जोडणे आणि तोडणे या भाषेत कधी प्रवास पुढील दिशेने झाला तर कधी उलटा झाला. मानवी समूहाने कधी आपल्या मोठ्या ओळखी टाकून दिल्या आहेत आणि तुलनेने छोट्या ओळखी पुन्हा मोठ्या शौर्याने स्वीकारल्या आहेत. या प्रवासाच्या प्रत्येक उलटसुलट टप्प्यांवर काही व्यक्तींनी संघर्ष केले. प्रसंगी आयुष्ये वेचली. कधी त्याभोवती संस्था उभारल्या. या आकलनात्मक क्रांतीमुळेच मानवाने कळप, टोळी ते २१व्या शतकातील आधुनिक माणूस हा प्रवास केला आहे.

या प्रवासात मानवाने काही प्राण्यांचा संपूर्ण नि:पात (त्यात वानर प्रजातीच्या अनेक सदस्यांचादेखील समावेश आहे) करून प्राणीजगतावर हुकूमत प्रस्थापित केली. अमूर्त संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजणे आणि नंतर केव्हा तरी तिच्या मान्यतेला ओहोटी लागणे, अशा टप्प्यांच्या आधारे इतिहासाची मांडणी करणे, ही इतिहास लेखनातील नवी पायवाट युव्हाल हरारी या तरुण इस्त्रायली इतिहासलेखकाने परिणामकारकपणे चोखाळली आणि समर्थपणे रुंददेखील केली आहे. त्यांची ‘सेपियन्स – अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्यमनकाइन्ड’ आणि ‘होमो डेउस - अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरो’, ही दोन पुस्तके जगभर गाजली आहेत. लेखाच्या पुढील दोन भागात शेतीकेंद्रित अर्थव्यवस्था आणि उद्योगकेंद्री अर्थव्यवस्था यांच्या काळातील माणसाचा सांस्कृतिक इतिहास रेखाटला आहे. प्रस्तुत विवेचनाला हरारी यांच्या वरील पुस्तकांचा वैचारिक आधार असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद करताना आनंदच आहे.

भविष्यवेधी महाभारत

मानवी इतिहासाचा एक प्रदीर्घ टप्पा राजेशाहीचा होता. याच काळात जगातील बहुतांश धर्मांचा तेव्हा राजे, सम्राट, किंग्ज, इम्पररस, नबाब, सुलतान, ही मंडळी, त्यांचे अधिकारी आणि व्यापारी यांचे मुख्य उत्पन्न शेतीशी निगडीत असे. राजे मंडळी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे सल्ले ऐकून स्वतःच्या मर्जीप्रमाणे प्रजेच्या सार्वजनिक सुविधांसाठी खर्च करत. प्रजेतील स्वप्रतिमा गडद रंगात रंगवण्यासाठी राजे मंडळी स्वतःच्या कुटुंबावर वारेमाप खर्च करत. त्यातून त्यांनी महाल, राजाच्या कुटुंबातील मृत व्यक्तींच्या स्मृती जपणाऱ्या ताजमहालसारख्या इमारती, प्रार्थनास्थळे, अशा धर्तीवर स्वत:च्या ऐश्वर्याची भव्य प्रतीके जगभर जागोजाग उभारली आहेत. राज्याचा कारभार प्रामुख्याने अधिकाऱ्यांच्या मदतीनेच चालत असल्याने त्यांचेही ऐश्वर्य त्यांचा प्रजेतील वचक टिकून राहायला सहाय्य करणारे असावे लागे. यांसाठी साहजिकच राजाची सांपत्तिक परिस्थिती चांगलीच हवी. या जोडीला कुणी सरदार किंवा शेजारपाजारचा किंवा दूरचा राजा राज्य बळकावण्याची शक्यता कायम असल्याने सतत लढायांची तयारी असावी लागे. म्हणजे पोटावर चालणारे सैन्य, त्यांची हत्यारे, घोडे, हत्ती, दारूगोळा, लढाईतील जाळपोळ अशा अत्यंत अनुत्पादक बाबींवर कायम खर्च करावा लागे. या काळातील अर्थव्यवस्थाच शेतीवर अवलंबून असल्याने राज्यातील शेतजमिनीचे क्षेत्रफळ, जमीन कसणाऱ्या शेतकरी कुटुंबांची संख्या, शेतजमिनीची उपजावू क्षमता, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था आणि निसर्गाच्या लहरी, कसलेही उत्पादक काम न करणाऱ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण, अशा अनेक घटकांवर राजाचे एकूण उत्पन्न अवलंबून असे. कारण त्या आधारेच शेतकऱ्याच्या उत्पन्नातील काही भाग शेतसारा रूपांत गोळा करणे शक्य असे.

या काळी सारे महत्त्वाचे निर्णय राजेमंडळी घेत असल्याने मुख्यत: लढाया, युद्धे, महायुद्धे, त्यांतील जय-पराजय, तह, नवी राजघराणी यांनाच या काळाच्या इतिहासात स्थान असे. मोठ्या लढायांसाठी वेगळ्या भागांतून तेथील सरदारांच्या मदतीने सैन्य उभारले जाई. साहजिकच हे सैनिक स्वतःची भाषा, रिवाज, संस्कृती, अनुवांशिक संचित घेऊनच येणार. लढाईतील जय अथवा पराजय वाट्याला आलेल्यापैकी काही मंडळी लढाया खेळून थकलेली, जखमी झालेली असत. काही सैन्य पुरेशी लूट हाती न लागलेली असे. काही जणांचे घोडे लढाईत कामी आलेले असत. कारणे अनेक असली तरी अनेकदा लढाई संपल्यावर सारे सैन्य जेथून आले तेथे अनेकदा परत जातही नसे. परिणामी, त्याभागात मिश्र संस्कृती तयार होत असे. उदाहरणार्थ, पानिपत युद्धात पेशाव्यांसोबत गेलेले शिंदे, गायकवाड, ही सरदार मंडळी सध्याचे राजस्थान आणि गुजरात येथे स्थिरावली. शिवाजीमहाराजांचे काही नातेवाईक विदर्भ, ते तंजावर येथे स्थिरावल्याचे आपल्याला माहीत आहे. अशा अनेक गुंतागुंती लक्षात घेतल्या तर बरेचसे राजे एक दोन पिढ्यांत इतिहासजमा तरी झालेले किंवा नाममात्र तरी उरलेले आढळणे स्वाभाविक वाटते. परंतु या पार्श्वभूमीवर मौर्य, गुप्त, मुगल, विजयनगर अशी भारतातील काही मोजकी राजघराणी तुलनेने दीर्घ काळ कशी काय टिकली, असा प्रश्नच पडतो. त्यांचे अप्रूप वाटते. यामागील कारणांचा शोध घेतला जातो.

शेती हा प्रमुख व्यवसाय असण्याच्या आणि त्यातूनच बहुतांश संपत्ती तयार होण्याच्या काळात जमिनीचे महत्त्व खूप वाढणे स्वाभाविक होते. त्यामुळेच जमीन, शेतीउत्पादन, शेतसारा यांचे मोजमाप याच काळात सुरू झाले. जमीन, पिके, शेतीला पूरक इतर व्यवसायांचे उत्पादन यांच्या खरेदी-विक्रीसाठी लहान-मोठ्या बाजारपेठा उभारल्याचे इतिहासाने पाहिले. जमिनीवरून वाद विवाद, भांडणे, खून, लढाया होऊ लागली. वाद मिटवण्यासाठी न्यायव्यवस्था गरजेची ठरली. शेतीला अनेक पूरक व्यवसाय आणि कारागिरी कौशल्ये रुजली. या सगळ्या ऐतिहासिक घटनांच्या केंद्रस्थानी शेती आणि शेतीसाठी महत्त्वाची असणारी जमीन या गोष्टी होत्या.

या टप्प्यावर शेतीसाठी जमीन हे प्रमुख संसाधन असल्याने शेतजमीन वाढवण्यासाठी लढाया हा एक महत्त्वाचा मार्ग जरूर होता; परंतु तो एकमेव मार्ग नव्हता. अनेक राजांनी आणि त्यांच्या प्रोत्साहनाने प्रजेने जंगले जाळून शेतीसाठी आणि नगरे वसवण्यासाठी जमीन उपलब्ध करून घेतली आहे. अनेक राजांनी नदीकाठी नवी नगरे वसवली. नद्या वळवून, त्यांवर बंधारे आणि छोटी-मोठी धरणे बांधून शेतीसाठी आणि इतर वापरासाठी पाणी मिळवले. शेतीमध्ये कष्ट फार. माणसाने कष्टासाठी बैल, घोडा, उंट अशा पाळीव प्राण्यांची मदत घेतली. पाऊस केव्हा पडेल, पेरणी केव्हा करावी, प्राण्या-पक्ष्यांपासून हाता-तोंडाशी आलेले पीक कसे वाचवावे, पीक केव्हा काढावे, ते कुठे विकावे, अशा कित्येक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माणसाने आपली बुद्धिमत्तादेखील वापरली. त्यासाठी राजाला बुद्धिमान सल्लागारांची आणि अनेक व्यावसायिक कौशल्य असलेल्या प्रजेची गरज होती. ती भागवण्यासाठी जगभरच्या राजे मंडळींनी केलेल्या प्रयत्नांचे चढ-उतार इतिहासाने पाहिले. संबंधित राजांनी प्रजेचे काही अधिकार मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला. त्यातून प्रजाहितदक्ष राजे आणि प्रजाहित-बेफिकीर राजे असे प्रकार समोर आले. ज्या प्रजेला प्रजाहितदक्ष राजे लाभले त्यांच्याप्रती प्रजेची निष्ठा जास्त दिसते. या टप्प्याच्या इतिहासाने अशा राजांच्या प्रती ‘स्वामिनिष्ठा’ हा परवलीचा शब्द अनेकदा ऐकला आहे. तरीही राजा आणि प्रजेचे नाते हे राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. ‘पावसानं झोडलं आणि राजानं मारलं, सांगायचं कुणाला?’, ही म्हण शेती आणि राजा यांचे नाते चपखलपणे सांगते.

त्या काळातील राजेलोक स्वतःच्या पदरी कवने करणारे भाट, राजेमंडळींची प्रजेत प्रतिमा उज्ज्वल करणारे शाहीर आणि बखरी लिहिणारे इतिहासलेखक बाळगत (त्यांना स्वतंत्र प्रज्ञा असणे अवघडच). अशाच काही कारणांमुळे त्या काळच्या इतिहासलेखनाचा मुख्य भर राजे, युद्धे, तह यांच्या सनावळ्या आणि रुक्ष तपशील यांवर असे; भाटांचा भर भाटगीरीवर तर शाहिरांचा मुख्य भर युद्धकाळातील राजांच्या ‘शौर्या’चे गुणगान करण्यावर असे. परिणामी दीर्घकाळ टिकणाऱ्या युद्धांच्या जखमा, मृत्यू, उध्वस्त कुटुंबे टाळून युद्धांच्या कथा ‘रम्य करण्यावर’ असे. ‘महाभारता’सारखे एखादेच महाकाव्य याला अपवाद ठरते. तेच पुढील प्रसंग रेखाटतात :

साक्षात भगवान श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाली,

आपलेच आप्तस्वकीय, गुरुजन, पाहून युद्धाला नकार देणाऱ्या अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम त्याला विश्वरूप दर्शन देतो आणि नंतर साक्षात मित्राऐवजी भगवान बनलेला श्रीकृष्ण श्रीमद्भगवदगीता सांगतो.

अर्जुनावर प्रेम करणारे गुरु द्रोणाचार्य आणि नि:स्वार्थी, ज्ञानी आणि आदरणीय भीष्माचार्य यासारखी मंडळी स्वतःला न पटलेली कौरवांची बाजू घेऊन लढतात.

अर्जुनाचा विजय नक्की करताना श्रीकृष्ण सूतपुत्र कर्णाला तो कुंतीचा पहिला मुलगा असल्याचे सांगतो. एवढेच नव्हे, तर त्याला भेटायला कुंतीला पाठवतो. कुंती त्याच्याकडून शब्द घेते की, युद्धानंतर अर्जुन अथवा कर्ण यापैकी एक पुत्र आणि बाकी चार पुत्र जिवंत राहतील.

देवांचा राजा इंद्र अर्जुनचा पिता. तो युद्धापूर्वी दानशूर कर्णाकडे त्याच्या कवच-कुंडलांचे दान मागतो. कर्ण दानशूरतेच्या प्रतिमेत अडकला असल्याने दान देण्याचे परिणाम माहीत असून कर्ण कवच-कुंडलांचे दान सहज देतो.

द्रोणाचार्यांचे आव्हान पेलता न आल्याने गुरु द्रोणाचार्यांशी साक्षात सत्यवचनी धर्मराज खरे म्हणजे धादांत खोटे बोलतो; वर असत्याला सत्याचा मुलामा देण्यासाठी श्रीकृष्ण भिमाला अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायला लावतो आणि धर्माला ‘अर्धसत्य’ बोलल्याची सूट मिळते.

युद्धानंतर पांडवांना मारायला म्हणून रात्री गेलेला चिरंजीव अश्वत्थामा अंधारात द्रौपदीचे पाच पुत्र ठार करतो आणि शापामुळे डोक्यावर कायम वाहती जखम घेऊन अश्वत्थामा कायम वणवण भटकत राहतो. अश्वत्थाम्याची ‘चिरंजीव भळभळती जखम’ हे भारतीय साहित्यातील केवढे महान प्रतीक बनले आहे!

महायुद्धात नवरे अथवा पुत्र गमावलेल्या दोन्ही बाजूच्या सर्व स्त्रिया महाभारताच्या ‘स्त्रीपर्वा’त श्रीकृष्णाने हे युद्ध घडवून आणल्याबद्दल त्याला अतोनात दूषणे देतात. त्याच्या देवत्वाला आव्हान देतात. गांधारी तर श्रीकृष्णाला त्याच्या राज्यात “यादवी होऊन तुझा यदुवंश नाश पावेल आणि तुलाही अति सामान्य माणसासारखा मृत्यू येईल”, असा जळजळीत शाप देते. पुढे तो शाप खरादेखील होतो.

महाभारताचे युद्ध संपल्यावर म्हणजेच दोन्ही बाजूंचा विनाश अनुभवल्यानंतर येते शांतीपर्व. शांतीपर्वात महाभारतकार व्यास (कदाचित अशी भयाण युद्धे होऊ पुन्हा नयेत आणि शांती नांदावी म्हणून) शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांच्या मुखातून ‘विजयी’ पांडवांसाठी ‘राजधर्म’ वदवतात, सत्याचे महत्त्व विषद करवतात, संवादकुशलतेचे महत्त्व अधोरेखित करतात.

त्यांनतरचे महाभारत पांडवांचे स्वर्गारोहण चितारते. एकेक करत द्रौपदी आणि धर्मराज सोडून बाकी सारे पांडव स्वर्गाच्या वाटेवर पडतात. आयुष्यात एकदाच अर्धसत्य बोलले असल्याने जमिनीपासून ‘थोडा वरून चालणारा’ धर्माचा रथ अनेक खाचखळगे असणाऱ्या वास्तव जमिनीवरून चालत राहतो. शेवटी धर्माला आणि निष्ठेने सोबत केलेल्या श्वानाला स्वर्गात प्रवेश मिळतो.

अशी जबरदस्त आहे महाभारताची प्रतिमासृष्टी आणि रचना. युद्धाचे ‘शंखनाद’ शांत झाल्यावर आणि प्रेतांचे खच पडल्यावर, अर्जुनाचा युद्धाबद्दल सुरुवातीचा विषाद खरा ठरल्यावर महाभारतकार व्यासमुनी स्त्रीपर्व आणि शांतीपर्व सांगतात. ही महाभारताची रचना वाचकाला स्तिमित तर करतेच, परंतु शांतिपर्वासाठी वाचकांची/ श्रोत्यांची मानसिकता प्रचंड ताकदीने जागी करते. ही रचना जणू सांगते की स्वार्थापायी भविष्यात असे घडू शकेल; तेव्हा पुन्हापुन्हा विध्वंस करून घेऊनच शांतीपर्व आळवले पाहिजे असे नाही.

याच टप्प्यावर आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्थेच्या याच प्रदीर्घ काळात जगातील बहुतांश धर्मांची स्थापना झाली आहे. पश्चिम आशियात ज्यू, झोराष्ट्रीयन, ख्रिश्चन, आणि इस्लाम; दक्षिण आशियात वैदिक, बुद्ध, जैन आणि शीख तर अति पूर्वेच्या चीनच्या आसपासच्या प्रदेशात कन्फुशिअस आणि ताओ या तत्त्वज्ञानांची सांगड बुद्ध धर्माशी घालणारे मुख्य धर्म प्रस्थापित झाले. हे धर्म याच काळात तेथून अनेक ठिकाणी अनेक प्रकारे पसरले. त्यांना कमी-अधिक प्रमाणात संस्थात्मकता प्राप्त झाली. अनेक धर्मांची अनेक प्रार्थनास्थळे राजाश्रयामुळे जगभर उभारली. अनेक धार्मिक ग्रंथांच्या, कवनांच्या, कथांच्या रचना निर्माण केल्या गेल्या. अनेक धार्मिक रिवाज, धार्मिक संस्कार आणि धार्मिक विधी पाळणे यांना सामाजिक मान्यता लाभली (या धर्मांच्या उदयापूर्वी आणि शेतीचा अर्थव्यवस्थेत मोठा सहभाग निर्माण होण्यापूर्वी जगात अनेक ठिकाणी अनेक टोळ्यांचे सभासद यातूक्रिया करताना दिसतात. त्यांचा समावेश या लेखात करण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे). जगात अनेक ठिकाणी राजेशाह्या आणि धर्म यांचे संबंध एकमेकांना पूरक होते. हा काळ धर्म आणि (ईश्वरी आदेशाने झालेला) राजा-प्रजा यांचे नाते या अमूर्त संकल्पना त्या काळातील बहुतेक व्यक्तींनी स्वीकारल्या होत्या.

औद्योगिक क्रांती आणि मानवी हक्क

थॉमस न्युकॉमेन या ब्रिटिश लोखंडीसामान विक्रेत्याने १७१२ या वर्षी पहिले वाफेचे इंजिन बनवले. त्याचा वापर कोळशाच्या खाणीत घुसलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी केला जाई. जेम्स वॅट या संशोधक आणि अभियांत्रिकी तज्ज्ञाने त्यात १७६३ साली महत्त्वाच्या सुधारणा केल्या आणि १७८१-८२ मध्ये नव्या इंजिनाची पेटंटस घेतली. पाण्याच्या वाफेमध्ये चाके फिरवण्याजोगी ऊर्जा असल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चिम युरोपभर मानवी इतिहासाने आडीचशे वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीचे नवे वळण घेतले. या क्रांतीचा पाळणा ब्रिटनमध्ये हलला. ब्रिटनमध्ये कोळसा आणि लोहखनिजे भरपूर; शिवाय या देशाचे वसाहतीचे साम्राज्य सर्वांत मोठे. त्यामुळे कापूस आणि कापडाची हुकमी बाजारपेठ हात जोडून तयार. मानवी इतिहासात कापसातील सरकी काढण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा प्रथम वापर झाला आणि पाहता पाहता कापड गिरण्या हा यंत्राधारित नवा व्यवसाय अवतरला. या गिरण्यांनी कापूस-शेतीला चांगले दिवस दाखवले. परंतु यंत्राधारित उद्योगांसाठी कामगार मिळणे अवघड होते. अजून मानवी हक्क सांभाळणारे कायदे व्हायचे होते. सक्तीने गुलाम पकडून आणावेत, तसे विविध आमिषे दाखवून गोरगरीब तरुण आणि मुले शहरांत आणली जायची. कामाच्या तासांवर कसलेही बंधन नव्हते. गिरण्यांची धुराडी साफ करायला लहान मुलांना त्यात उतरवले जायचे; त्यात काहींचे मृत्यूदेखील होत असत. बघता-बघता दोन-तीन घोडागाड्यांच्या लांबीची गाडी वाफेचे इंजिन ओढू लागली. या इंजिनात पाण्याची वाफ करण्यासाठी दगडी कोळसा जाळून आग तयार केली जाई. इंजिनात दिसणाऱ्या आगीची आठवण जागवणारे ‘आगगाडी’ किंवा ‘अगीनगाडी’ हे नाव या गाडीला मराठी भाषेने बहाल केले. यथावकाश गाडीची लांबी वाढली, कोळश्याऐवजी गाडीचे इंजिन डीझेल आणि वीज वापरू लागले; परंतु रुळावरून धावणाऱ्या गाडीला ‘आगगाडी’ हे नाव कायमचे चिकटले. दगडी कोळशातील ऊर्जा रेल्वेशिवाय इतर अनेक ठिकाणी वापरण्यास सुरुवात झाली. योग्य खनिजांपासून लोखंडासह इतर धातू किंवा मिश्रधातू घडविणाऱ्या भट्ट्यांत या कोळशाचा वापर वाढला. धातू वापरून अनेक प्रकारची भांडी, हत्यारे, यंत्रे बनवण्याचे कारखाने उभारले गेले. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळसा जाळला जाऊ लागला. दुसऱ्या टप्प्यावरील या व्यवसायांसाठी जमीन लागत होतीच, फरक इतकाच की तिचे महत्त्व शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेत असणाऱ्या जमिनीच्या महत्त्वापेक्षा खूप कमी होते आणि दिवसेंदिवस ते आणखीन कमी कमी होत होते. विविध यंत्रांची चाके फिरवून चालणाऱ्या या उद्योगांची उत्पादकता वाढण्यासाठी आणि दळण-वळण जास्त कार्यक्षम करण्यासाठी जमिनीपेक्षा संशोधनाची गरज जास्त होती. संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांनी विविध क्षेत्रांतील उत्पादकता प्रचंड वाढविली. यंत्राधारीत उत्पादकता त्यांना लागणाऱ्या जागेत शेती केल्यास मिळणाऱ्या उत्पादनाच्या कित्येक पट जास्त होती. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था यांतील शिक्षणाचा दर्जा सुधारून संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी मानवी सर्जनशीलतेची जास्त गरज असल्याचे जागतिक पातळीवर पटत गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून संशोधनातून नवनव्या प्रक्रिया वापरून किती तरी नवी उत्पादने अवतरली. उदाहरणार्थ विजेचे दिवे, रेडीओ, टेपरेकॉरडर, टीव्ही, फोन, मोबाईल फोन, प्रवासाठी सायकली, मोटारी, विमाने, संगणक, आजारनियंत्रणासाठी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) या सर्व गोष्टी वेगाने उपलब्ध होत गेल्या. त्यांचा वापर ही गरज बनली. मानवी आयुष्यमान वाढले, साक्षरता विस्तारली, युद्धे कमी झाली. थोडक्यात, सामान्य माणसाचे सामाजिक मोल वाढले. युरोपात या औद्योगिक प्रक्रियांची रुजवात लवकर झाली. कदाचित त्यामुळेही तेथेच प्रथम कुणाच्याही मर्जीवर अवलंबून नसणारे मूलभूत असे मानवी अधिकार किंवा हक्क हे परवलीचे शब्द इतिहासाने ऐकले. या टप्प्यावर युरोपांतील राजांचे अधिकार आक्रसत गेले. भाषा, जात-धर्म, वंश यांची बंधने वेगाने सैलावू लागली. सामान्य माणूस महत्त्वाचा ठरू लागला. राज्यांची जागा राष्ट्रांनी घेतली. राजेशाहीची जागा लोकशाहीने घ्यायला सुरुवात केली. हे बदल पूर्व युरोप सोडून बाकी सर्व युरोप आणि अमेरिकेत प्रथम झाले.

याच अडीचशे वर्षांच्या काळात वसाहतीच्या साम्राज्यांचे महत्त्व वेगळ्या कारणाने वाढले. मँचेस्टरमधील खादाड कापूस-गिरण्यांना मिळेल तेथून कापूस हवा होता, तोही स्वस्तात. साहजिकच कापड गिरण्यांचा व्यवसाय फक्त एतद्देशीय शेतीवर टिकू शकत नव्हता. तो जगभरच्या शेतमालाचे उत्पादन आणि कोळसा-उपसा यावर अवलंबून राहू लागला. शिवाय, विलायती कापडाला भारतीय बाजारपेठ उपलब्ध होतीच. औद्योगिक क्रांतीने सारा युरोप ढवळून काढला. अनेक देशांना वसाहतींचे पाठबळ हवे होते. साहजिकच विसाव्या शतकात दोन जागतिक महायुद्धे झाली. या टप्प्यावर युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि लोकशाही शासनव्यवस्था कालपटावर जवळपास एकत्रच अवतरल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारतासारख्या अनेक वसाहतींना स्वातंत्र्याची ओढ लागली. हळूहळू ब्रिटिश, फ्रेंच, डच या राष्ट्रांच्या जगभरातील वसाहती स्वतंत्र होऊ लागल्या. राजेशाह्या नांदलेल्या या प्रदेशांतदेखील राजेशाहीने पुन्हा उचल खाल्ली नाही. राजा-प्रजा हे नाते कागदोपत्री तरी संपले. आता लोकप्रतिनिधींनी लोकांसाठी सत्ता राबवणे महत्त्वाचे ठरले. लोकशाहीची रुजवात होऊ लागली. स्वामीनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची मानली गेली. निष्ठा सरकार, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान यांच्या प्रती नाही, तर राष्ट्राप्रती असणे अभिप्रेत झाले. सामान्य माणूस केंद्रस्थानी आल्याने कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसणारे मानवी हक्क त्याला घटनेने बहाल केले. अनेक देशांच्या घटना मूलभूत हक्क मानू लागल्या. या काळात नवे धर्म प्रस्थापित झाले नाहीत; परंतु अनेक विचारधारा जन्मल्या. जर्मनी, इटली या देशांत वर्णवर्चस्वाच्या बुरख्याआडून हिटलर, मुसोलिनी यांची हुकूमशाही अवतरली. दुसऱ्या महायुद्धानंतर संभ्रम आणि अधांतरीपण दाटून आले. उत्तरे गवसत नाहीत. अशी ही युरोपची अवस्था झाली. ती पूर्वीच्या काळी धर्म सोडण्याइतकीच कठीण. माणसाच्या एकाच आयुष्यात जुनी मिथके, जुन्या धर्म विचारधारांची जनमान्यता डळमळू लागल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनी-इटलीमधील काही शहरांत किमान तीन-चार अत्यंत भिन्न विचारधारा जगलेली माणसे इतिहासाने पाहिली. त्या काळी जग बदलाच्या दिशेने वेगाने झेपावत होते. त्यातून एक प्रश्न प्रत्येकाच्या बरोबर डोक्यावर थेट मध्यान्हीच्या सूर्यासारखा तळपू लागला. त्यातून युरोपात टोकाचा तर्कविसंगतवाद (अॅबसर्डीझम) आणि ‘सर्व मिथ्या’ विचारसरणी (निहीलिझम) उत्पन्न झाली. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आताही पातळीवर भांडवलशाही आर्थिक संकटातून जात असताना अनेक प्रगत राष्ट्रांत टोकाचा राष्ट्रवाद आणि दहशतवाद उफाळून येतो आहे; अण्वस्त्रधारी राष्ट्रांची शस्त्रसज्जता जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊ पाहते आहे; लोकशाहीला ग्रहणाचे वेध लागत आहेत. अशा काळात पुन्हा नवे प्रश्न तयार होत आहेत.

माणसाच्या आयुष्याला अर्थ देण्याला कोणता धर्म जास्त योग्य आहे? असा कोणता धर्म आहे, जो स्वधर्मापलीकडे जाऊन माणसे जोडू शकेल? का असा कोणताच धर्म अस्तित्वात नाही? नवा धर्म निर्माण होणे जवळजवळ अशक्य आहे काय? असेही असेल की आता धर्म उतरणीला लागले असावेत. सध्या धर्माशी नाते सांगणाऱ्या विचारधारा बनत आहेत काय? आम्ही सांगू तोच धर्माचा एकमेव अर्थ आहे, असा दुराग्रह आणि सत्ताकारणासाठी धर्मांचे वाढते महत्त्व त्याच दिशेने बोट दाखवते आहे काय?

गेल्या अडीचशे वर्षांनी अनेक विचारधारांना जन्म दिला आहे. विचारधारा हीदेखील मानवकेंद्री अमूर्त संकल्पनाच आहे शेवटी. तिच्याही भोवती अनेक कथानके, प्रतीके, झेंडे, घोषणा, ‘इतिहास’ यांच्या रचना माणसाने उभारल्या आहेत. आज कोणती विचारधारा जगण्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकेल? कोणती विचारधारा जास्त माणसे जोडू शकेल? कोणती विचारधारा जास्त माणसांच्या भल्याची आहे? नव्याच कुठल्या विचारधारेचा प्रेषित क्षितिजावर दिसतो आहे काय? कदाचित धर्माच्या वर दशांगुळे समाजजीवन जसे उरले होते, तसे ते विचारधारांच्याही वर दशांगुळे उरले आहे काय? कुठल्या विचारधारेने स्त्रियांचा, कष्टकऱ्यांचा, मजुरांचा, दलितांचा, पर्यावरणाचा, जागतिक तापमानवाढीचा, अण्वस्त्र युद्धांचा साक्षेपी आणि सम्यक विचार केलेला आहे? शेवटी विचारधारासुद्धा ‘विचारधारा मानणारे आणि न मानणारे’ असे समाजाचे विभाजन करतेच की! तसे असेल तर, विचारधारादेखील आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत काय? कदाचित एखाद्या व्यक्तीने नवी अमूर्त संकल्पना मांडण्याचा काळ ओलांडून सामूहिक नेतृत्वाकडे ही जबाबदारी आली असेल का? प्रत्येकाने स्वतःशी अशा प्रश्नांचा विचार केला, तर मानवाला नव्या कुठल्या तरी जास्त प्रगल्भ अमूर्त संकल्पनेचा आधार मिळेल आणि त्याचे अधांतर टळेल काय?

.............................................................................................................................................

‘सेपियन्स – अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्यमनकाइन्ड’ आणि ‘होमो डेउस - अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरो’ या पुस्तकांच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4641/Sapiens---Homo-Deus-Combo-Set

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................