तीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या
अर्धेजग - महिला दिन विशेष
धनंजय श्रीराम सानप
  • ‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ शॉर्टफिल्मची पोस्टर्स
  • Fri , 08 March 2019
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day ज्यूस JUICE नयनतारा नेकलेस Nayantara's Necklace नेकेड NAKED

अलीकडच्या काळात कमी वेळेत विचार मांडण्याचं काम शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. सध्याचा काळ हा नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित साधनाचा वापर करणाऱ्या पिढीचा सृजनशील काळ आहे. त्याचाच एक आविष्कार म्हणजे शॉर्टफिल्म. अनेकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचं व्यासपीठ म्हणून शॉर्टफिल्मकडे बघितलं जात आहे.

असंख्य प्रेक्षकांसमोर कमी वेळेत (काही मिनिटांमध्ये) आपले विचार मांडण्याची संधी शॉर्टफिल्ममुळे सहज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जास्त वेळ गुंतून राहणं ज्या वर्गाला आवडत नाही, असा वर्गदेखील या क्षेत्रात कमालीचा रस दाखवत आहे. यूट्यूबसारख्या साधनांच्या माध्यमातून शॉर्टफिल्म सर्वदूर पोहचत आहेत. तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांचा उभा-आडवा विस्तार लक्षात घेता शॉर्टफिल्मच्या क्षेत्रातील नावीन्य आणि आव्हानं शोधून काढता आली, तर कलासंस्कृतीचं एक मोठं दालन यामुळे नक्कीच खुलं होईल.

अलीकडच्या काळात सामाजिक-राजकीय भूमिका मांडणाऱ्या कालसुसंगत शॉर्टफिल्म मोठ्या प्रमाणात युट्यूबवर ‘अपलोड’ होत आहेत. महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या अशाच तीन शॉर्टफिल्मविषयी. खूप काही उदात्त सांगत बसण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न नाही. मात्र वास्तव मांडत असताना त्याला आदर्शाची जोड दिली आहे. साध्या प्रसंगामधून पण परिणामकारकरीत्या शॉर्टफिल्मची मांडणी केलेली आहे.

पहिली शॉर्टफिल्म आहे, ‘रॉयल स्टॅग’ निर्मित आणि नीरज घाय्वान दिग्दर्शित ‘ज्यूस’ या नावाची. ती गृहिणीचं आयुष्य जगणाऱ्या एका महिलेची गोष्ट सांगते. लग्नानंतर नवऱ्याच्या सांगण्यावरून नोकरी सोडून घरची कामं आणि मुलांची जबाबदारी पार पाडत असताना तिची होणारी घुसमट या शॉर्टफिल्ममध्ये अप्रतिम पद्धतीनं मांडली आहे. नवऱ्याचा राजेशाही थाट पूर्ण करताना तिच्या भावना कशा कागदासारख्या चुरगळल्या जातात, याची वास्तवस्पर्शी गोष्ट आपल्या मनात प्रश्न निर्माण करते. महिला आणि वर्चस्ववादी पुरुष हा संघर्ष दाखवताना, महिला विरुद्ध महिला हा संघर्षदेखील पहायला मिळतो. ‘मसान’सारख्या वास्तवस्पर्शी सिनेमानंतर नीरज घाय्वान यांनी हा प्रयोग केला आहे. त्यातून त्यांची मेहनत दिसून येते.

प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्याशी निगडित गोष्ट या शॉर्टफिल्ममध्ये सहज आणि अर्थपूर्णरित्या मांडली आहे. स्त्री-पुरुष भेद दाखवून तो कमी अधिक प्रमाणात सगळीकडे कसा घट्ट होऊन बसला आहे, हे आपल्या लक्षात येते. विचारप्रवृत्त करणारी ही शॉर्टफिल्म अनेक कोडे उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न करते.

‘रॉयल स्टॅग’ निर्मित आणि जयदीप सरकार दिग्दर्शित ‘नयनतारा नेकलेस’ ही शॉर्टफिल्म दोन महिलांच्या आयुष्यातले मूलभूत फरक अधोरेखित करते. दोन मानवी प्रवृत्ती भिन्न भिन्न असतात. दोन महिला ज्या भिन्न समाजात, भिन्न वर्गात, भिन्न संस्कृतीत, भिन्न माणसांत आपलं जीवन जगत असतात. त्यांची जडणघडण आणि त्याच्या आयुष्याची कथा यात मांडली आहे. एक महिला लग्नानंतर घर कामात बुडालेली असते. त्यामुळे तिला तिच्या आयुष्यात काही तरी नवीन हवं असतं, तर दुसरी महिला चंगळवादी आणि नवीन जगाचं प्रतिनिधित्व करणारी, जिला खर्च करणं आवडत असतं. मात्र दोघींच्या मानसिक पातळीवर एक छुपं युद्ध सुरू असतं. अशा परस्परविरोधी स्वभावाच्या दोन महिला आयुष्याच्या एका वळणावर एकत्र येतात. आणि मग एकमेकीच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावणं सुरू होतं. त्यातून आपापले शोध सुरू होतात. प्रश्न आणि उत्तरं यांची जुगलबंदी  बघायला मिळते. एकंदर गोष्ट आहे, दोन भिन्न प्रवाहाची, स्वतःच्या शोधाची, मानसिक स्वास्थ्याची आणि भोवतालच्या परिसराची. थोडक्यात मुक्त होण्याची इच्छा आणि मुक्तता यांच्यात चाललेलं द्वंद जगण्याविषयीचे अनेक प्रश्न मांडण्याचं काम करतं. मात्र त्याचे परिणाम काय होतात, याभोवती ‘नयनतारा नेकलेस’ची कथा फिरते.

‘नेकेड’ ही शॉर्टफिल्म एक जळजळीत समाजवास्तव आहे. कपड्याच्या आड झाकल्या गेलेल्या स्त्रीच्या शरीराला पाहण्याची मानसिकता समाजात किती खोलवर रुजलेली आहे, हे वास्तव या शॉर्टफिल्ममध्ये अत्यंत मार्मिकरीत्या दाखवलं आहे. सिनेमात ‘नेकेड’ सीन देणाऱ्या बाईला रांड, वेश्या, धंदेवाली ठरवणाऱ्या तथाकथित सभ्य समाजाला नग्न करणारी ही गोष्ट आहे, एका सिनेमात काम करणाऱ्या महिलेची. सिनेमाचा भाग म्हणून तिने दिलेला ‘नेकेड’ सीनमुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा प्रसंगीदेखील ती ठाम उभी राहते. ‘अश्लीलता ही कुठल्याही चित्रात नसते, तर ती बघणाऱ्याच्या मेंदूत असते’ हा या शॉर्टफिल्मचा गाभा आहे.

२१व्या शतकातदेखील सिनेमात काम करणाऱ्या स्त्रीला नवनवीन समस्यांना तोंड द्यावं लागतं. एका स्त्रीला फक्त स्वतःची वाट निर्माण करून थांबता येत नाही, तर त्याच्या पलीकडे स्वतःचं चारित्र्य सांभाळण्याची जीवघेणी कसरत करावी लागते. जणू काही तिचं चारित्र्य कपड्याआड लपलेलं आहे. स्त्रीचं नग्न शरीर पाहून लाळ गाळणाऱ्या प्रवृत्तीच्या कानाखाली ही शॉर्टफिल्म फटकारा लगावते.

थोडक्यात या शॉर्टफिल्मचा केंद्रबिंदू महिला असल्या तरी, दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या धाडसी आणि कणखर अशा त्या दोन प्रवृत्ती आहेत. ‘नेकेड’ ही शॉर्टफिल्म समाजाच्या मानसिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. मात्र त्याच वेळेस प्रेक्षकांना काही प्रश्नाची उत्तरंदेखील देते.

या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................