डॉ. अनिकेत जावरे : कोणत्याही कळपात न रमलेला आणि स्वतःचाही कळप न काढलेला उत्तर-संरचनावादी अभ्यासक
संकीर्ण - श्रद्धांजली
बालाजी घारूळे
  • डॉ. अनिकेत जावरे त्यांच्या एकमेव मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठासह
  • Thu , 21 February 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली अनिकेत जावरे Aniket Jaaware सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University

पाश्चात्य विचारविश्वाची गुंतागुंत समजून घेत, भारतीय विचारांचा धांडोळा घेणारे अनिकेत जावरे यांचं नुकतंच (३० नोव्हेंबर २०१८) निधन झालं. त्यांचं अनाकलनीय जाणं, चटका लावून जाणारं आहे. कारण त्यांचं निधन वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी झालं. म्हणजे आणखी बरीच कामं त्यांच्या हातून झाली असती. त्यांच्या सहवासात मला दहाएक वर्षं राहता आलं. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या अजेंड्यावर असणाऱ्या विषयाची माहिती होती. त्यांना अनेक विषयांवर काम करायचं होतं. सरांची पाश्चात्य अभ्यासकांवर चांगली पकड होती. त्यामुळे त्यांना विविध विषयांवर लेखन करता आलं. त्यांनी आपलं वाचन प्राणपणानं जपलं. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. त्यामुळे विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. त्यात त्यांचा मोकळेपणानं गप्पा मारण्याचा स्वभाव नव्हता, असं अनेक जण म्हणत. पण हे काही खरं नाही.  

त्यांचा इंग्रजी विभागात ‘फिल्म क्लब’ व ‘इटरडिसीप्लिनरी ग्रुप’ या दोन्ही ग्रुपच्या निमित्तानं अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क येत होता. या विभागाव्यतिरिक्त विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांचा गराडा त्यांच्याभोवती असे. हे सर्व विद्यार्थी प्रत्येक आठवड्यातील बुधवारी व शनिवारी एकत्र येऊन चित्रपट व एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या लेखावर चर्चा करत. या दोन्ही ग्रुपच्या चर्चांना जावरे सर उपस्थित राहत. त्यांचा विद्यार्थ्यांसोबतचा संवाद मार्गदर्शक ठरत असे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात या दोन्ही ग्रुपनं आपला नाव लौकिक प्राप्त केला होता. यामुळे विद्यापीठातील काही विभागातील प्राध्यापक या ग्रुपमध्ये सहभागी होऊ लागले. यामुळे विद्यापीठात पुरोगामी वैचारिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.

विद्यापीठातील पहिल्या पिढीत संगणक वापरणारे जावरे सर होते. त्यांनी संगणकाचं सखोल ज्ञान आत्मसात केलं होतं. ते ‘लँग्वेज प्रोगॅमिंग’ बनवण्यासाठी एक वर्षांची बिनपगारी रजा घेऊन बंगलोरला गेले होते. त्यांनी कोणताही विषय वर्ज्य मानला नाही. प्रत्येक विषय ते आवडीनं शिकण्यावर भर देत असत. त्यांनी संस्कृतमध्ये एम. ए. केलं होतं. यावर काही विचारलं की, ते मिश्कीलपणे हसत. याचबरोबर त्यांनी साहित्यसमीक्षा, अनुवाद, भाषाविज्ञान, कल्पित विज्ञानकथा, पाश्चात्य व भारतीय विचारवंतांचं विचारविश्व इत्यादी विषयावर लेखन केलं. प्रत्येक विद्याशाखेत आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्यात जावरे सरांचा हातखंडा होता. तसंच त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात सतत प्रयोग केले. त्यांच्या प्रयत्नानं विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासक्रमात प्रथमतः ‘चित्रपट अभ्यासा’चा समावेश करण्यात आला. त्यांनी चित्रपट माध्यमांची व्याप्ती, त्यांची शक्तीस्थळं धुंडाळली. विद्यार्थ्यांना या माध्यमांचं ज्ञान होण्यासाठी विभागातील विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं एक लघुपट बनवला होता. त्यांच्या अशा अनेक उपक्रमांमुळे इंग्रजी विभागाला एक स्वतंत्र ओळख प्राप्त झाली.

जावरे सरांची ओळख उत्तर-संरचनावादी अभ्यासक म्हणून राहिली. हाच विचार त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. या विचारांच्या अनुषंगानं त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं. या विचारविश्वातून त्यांनी दलित साहित्य, भाषाविज्ञान, पाश्चात्य विचारवंत, चित्रपट समीक्षा इत्यादी विषयांकडे पाहिलं. उदा. गोडसे भटजी यांच्या ‘माझा प्रवास’चा अनुवाद करत असताना, बाबुराव बागूल यांच्या कथेचा अनुवाद केला; तर दुसरीकडे शेक्सपिअरवरही लेखन केलं. त्याचेवळी चर्चासत्रांसाठी लेख लिहिण्यातही खंड पडत नसे.

विविध विषय ते सहजपणे हाताळत. ते प्रत्येक विषयाचं वेगळेपण लक्षात घेत. कुठलंही नवीन पुस्तक वाचताना त्याच्या पद्धतीशीरपणे संदर्भ/नोट्स काढून ठेवत. त्यांची ही संशोधनाची शिस्त पाहण्यासारखी होती. ‘सिम्प्लिफिकेशन्स’ या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी त्यांनी सस्युर, लाकाँ, आलथुसे, फुको, बार्थ, देरीदा, विट्गेन्श्टाईन, देल्युज इत्यादी विचारवंतांवर स्वतंत्र संदर्भ काढून ठेवले होते. हे संदर्भ त्यांनी पुढील लेखनासाठी उपयोगात आणले. एखाद्या विषयाकडे किती माध्यमांतून पाहता येते, एखाद्या विषयांच्या संदर्भात इतर अभ्यासाची मदत कशी घेता येते, त्या विषयांची व्याप्ती कशी वाढवता येईल, याचा विचार त्यांच्या मनात कायम असे. यासाठी त्यांनी उत्तर-संरचनावादी संकल्पनेचा पुरेपूर उपयोग केला.

पाश्चात्य विचारवंतांच्या विचाराचं सूत्र फुले-आंबेडकर यांच्या विचारातून पाहणारे अभ्यासक म्हणून जावरे सरांकडे पाहिलं जातं. मराठी दलित साहित्याचा अभ्यास करताना, त्यांनी फुले-आंबेडकर यांचं विचारविश्व नव्या परिभाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. फुले-आंबेडकरांची त्यांनी पाश्चात्य विचारवंतांच्या विचारांची नाळ जोडली. ते आंबेडकरांच्या लेखनाविषयी म्हणत, ‘‘आंबेडकर यांचं सामाजिक पर्यावरण लक्षात घ्यावे लागेल. आंबेडकर यांनी आपला बराच काळ पाश्चात्य विचारविश्वात घालवला होता. त्यामुळे त्यांनी अभ्यासासाठी जे संदर्भ ग्रंथ वापरले, त्यांचं नीटपणे वाचन केलं, तर आंबेडकर समजण्यास मदत होईल.” हे त्यांनी आपल्या ‘प्रॅक्टिसिंग कास्ट - ऑन टचिंग अ‍ॅण्ड नॉट टचिंग’ या पुस्तकातून दाखवून दिलं. या पुस्तकात त्यांनी अस्पृश्यतेचा विचार केला आहे.

त्यांच्या या स्वतंत्र पुस्तकाबरोबर त्यांना आंबेडकरांच्या पुस्तकांचे अनुवाद करायचे होते. आंबेडकरांच्या लेखनाचा मूलगामी विचार करावा लागेल. त्यांचे समकालीन पाश्चात्य विचारविश्व समजून घ्यावे लागेल, तरच त्यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र समजण्यास मदत होईल. पुढे अभ्यासकांना भारतीय जातीव्यवस्थेचा अन्वयार्थ लावण्यास सहज सुलभ जाईल, याचे अनेक दाखले त्यांनी आपल्या व्याख्यानांद्धारे दिले होते. कोणत्याही विचारविश्वातील सैद्धांतिक मांडणीवर अनेक विचारांचं प्राबल्य असतं. म्हणून त्या-त्या विचारविश्वात येणाऱ्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करणं त्यांना गरजेचं वाटत असे. त्यातूनच त्यांनी ‘फुको आणि आंबेडकर’ यांच्या विचारविश्वावर लेख लिहिला होता. भविष्यात याच कामाची व्याप्ती वाढविण्याचा विचार ते करत असत.

जावरे सर नेहमीच्या चर्चेत काही ज्वलंत विषयावर आपली मतं नोंदवत. एकदा दलित साहित्य कोणत्या टप्प्यावर थांबलं आहे, असं विचारलं तेव्हा त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले, ‘‘दलित साहित्यिकांनी आत्मकथन प्रकारातून बाहेर पडावं. जसं बाबुराव बागूल यांच्या कथेनं दलित कथेला स्वतःची ओळख प्राप्त करून दिली, तसं दलित लेखकांना कादंबरीत स्वतःची ओळख प्राप्त करता आली नाही. वेळीच या क्षेत्राकडे दलित लेखक वळले नाहीत, तर त्यांना बदलत्या सामाजिक स्थित्यंतराची विस्तृतपणे मांडणी करता येणार नाही.”

जावरे सर कादंबरी वाङ्मयप्रकाराची शक्तीस्थळं जाणून होते. त्यासाठी ते भालचंद्र नेमाडे यांचं उदाहरण देत. नेमाडे यांच्या ‘टीकास्वयंवर’ या पुस्तकावर ‘टीकास्वयंवर अर्थात् कोणी कोणास वरले?’ हा लेख लिहिला होता. नेमाडे यांची त्यांनी प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. नेमाड्यांचा देशीवाद त्यांना कधीही पटला नाही; पण कादंबरीकार म्हणून नेमाडे यांना कधीही नाकारलं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीची संरचना बदलली आणि त्यांना कादंबऱ्यांतून बदलती सामाजिक जाणीव भाषेच्या तिरकसपणातून मांडता आली. यामुळे मराठी कादंबरीत आपला दबदबा प्रस्थापित करता आला, असं ते जावरे सर म्हणता. त्यांना नेमाड्यांचे समकालीन नामदेव ढसाळ, बाबुराव बागूल, भाऊ पाध्ये, गौरी देशपांडे, अरुण कोल्हटकर हे लेखकही महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात या लेखकांची पुस्तकं होती. या लेखकांच्या अनुषंगानं साठोत्तरी मराठी पर्यावरण समजून घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांनी या लेखकांला अग्रक्रम द्यावा, असा आग्रह ते करत. कोणतंही विचारविश्व समजून घेण्यासाठी साहित्याचा आधार घ्यावा लागतो. यावर ते म्हणत, ‘काय म्हटलं गेलंय ते पहा, कोणी म्हटलंय ते पाहू नका.’ वाचकांचं लेखकांवर निरपेक्ष प्रेम असावं, हा त्यांचा निरपेक्ष विचार त्यांच्या अभ्यासातून आला होता.

जावरे सर विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होते. त्यांनी अध्यापनचा प्रदीर्घ काळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागात घालवला. त्यांचं अध्यापन नेहमीच प्रयोगशील राहिलं. विद्यार्थ्यांना पाश्चात्य विचारवंतांची ओळख करून देताना त्यांना जर्मनीतील प्रतिष्ठित विद्यापीठात राहता यावं, म्हणून त्यांनी जर्मनी विद्यापीठाबरोबर ‘आंतरराष्ट्रीय करार’ केला होता. इंग्रजी विभागातील तीन विद्यार्थी जर्मनीत जाऊन आपलं संशोधन करत असत. तसंच जर्मन विद्यापीठातून तीन विद्यार्थी इंग्रजी विभागात येत असत. याबरोबर त्यांनी देश-विदेशातील तज्ज्ञ प्राध्यापक उदयकुमार, अमलान दासगुप्ता, सनिल, जयंत दासगुप्ता, अनुपमा राव यांची व्याख्यानं इंग्रजी विभागात घडवून आणली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तत्त्ववेत्त्या गायत्री स्पीवॅक (Spivak) विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात व्याख्यानासाठी दोन वेळा येऊन गेल्या. यासाठी जावरे सरांनी घेतलेले परिश्रम सर्व विद्यार्थ्यांना पाहिले होते. स्पीवॅक यांचं विचारविश्व विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी त्यांनी दोन महिने व्याख्यानं दिली होती.

जावरे सरांनी १९९८ मध्ये ‘द सायलन्स ऑफ द सबऑल्टर्न स्टुडंट’ या निबंधातून शहरी आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मतभिन्नता मांडली. तसंच त्यांनी त्यांच्यातील साहित्य अभ्यासाचं वास्तववादी विश्लेषण केलं. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करायचा असेल, तर त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्रस्थापित करता आलं पाहिजे. तरच त्यांच्यातून वर्ग संरचनेची जाणीव दूर होईल, असा विश्वास त्यांनी आपल्या निबंधातून व्यक्त केला होता. जावरे सरांनी कधीही परकीय व स्वकीय लेखकांत भेद केला नाही. प्राचीन व अर्वाचीन साहित्याचे गोडवे गायले नाहीत. त्यांनी प्रत्येक कालखंडातील विचारविश्व समजून घेण्यावर भर दिला. या सर्व विचारविश्वाला नेहमी सैद्धांतिक मांडणीतून समजून देण्यात धन्यता मानली.

विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी ‘शोधार्थी अभ्यास गट’ तयार केला होता. या अभ्यासगटानं प्रा. राम बापट सरांची व्याख्यानं ठेवली होती. ही व्याख्यानं अनेक वर्षं चालली. या व्याख्यानाद्धारे बापट सरांनी पाश्चात्य विचारवंतांची ओळख करून दिली. जावरे सर म्हणत, ‘‘बापट सर महाराष्ट्रातील एकमेव विचारवंत आहेत, ज्यांनी भारतीय व पाश्चात्य विचारवंत अभ्यासले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्याख्यानात सातत्य ठेवावं. ही व्याख्यानं पुस्तकरूपानं प्रकाशित केली तर, त्याचा उपयोग पुढील पिढीला होईल.”

जावरे सरांनी बहुतेक लेखन इंग्रजीतून केलं आहे. मराठीत त्यांचं लेखन फार कमी आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की, ‘‘मी फग्युर्सन महाविद्यालयात असताना ‘जवानी दिवानी अर्थात उद्धव दीक्षितचा प्रेमभंग’ ही मराठी कादंबरी लिहिली होती. माझी ही पहिली कादंबरी होती. पण प्रकाशकांनी या कादंबरीकडे विशेष लक्ष दिलं नाही. त्यात त्यांची काही वितरण व्यवस्था नव्हती. त्यामुळे ही कादंबरी कोणत्याही स्टॉलवर दिसून आली नाही. प्रकाशकांनी कादंबरी आपल्या घरातील माळ्यावर टाकून दिली, तसंच त्यांनी प्रकाशन व्यवसाय बंद केल्याचं समजलं. येथून पुढे मराठीत लेखन करायचं थांबलं. जे काही लेखन केलं ते मराठी नियतकालिकासाठी.”

शोधार्थी अभ्यास गटामार्फत त्यांच्या प्रकाशित नियतकालिकांतील लेखांचं एकत्रित ‘झेरॉक्स पुस्तक’ संग्रह काढला. पुढे याच संग्रहाचं हर्मिस प्रकाशनाकडून ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ या शीर्षकानं पुस्तक काढलं. या पुस्तकानंतर त्यांना पुन्हा मराठीत लेखन करावंसं वाटू लागलं. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील कल्पना सांगितल्या होत्या. त्यांनी ग्राम्चीचा मराठी अनुवाद करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांना ग्राम्चीचा इंग्रजीतून अनुवाद करायचा होता; पण ग्राम्चीचे मूळ इटालियन भाषेतील संदर्भही अनुवादीत करायचे होते. या कामी ते कलकत्ता येथील त्यांच्या इटालियन भाषिक मित्राला मदतीला घेणार होते.

ग्राम्ची मराठीत फार कमी अभ्यासकांना माहिती आहे. तत्कालिन समाजव्यवस्थेतील भांडवलशाही समजून घेण्यासाठी ग्राम्चीचा नव-मार्क्सवाद लक्षात घ्यावा लागेल. ग्राम्चीच्या विचारांचा धागा उत्तर-आधुनिक विचारापर्यंत येतो. हा विचार येथील ‘पुरोगामी’ व ‘दलित चळवळी’च्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल, असं जावरे सर म्हणत. त्यामुळे ते या चळवळीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी बाबुराव बागूल यांच्या कथेवर ‘व्यजनांचे महत्त्व - बाबुराव बागूलांच्या काही कथा’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. बागूल यांच्या कथेकडे अन्वेषण दृष्टीनं पाहिलं. बागूल यांच्या अनेक कथा इंग्रजीत अनुवादीत केल्या. ‘दलित कविता’ हा त्यांचा नेहमीच आवडीचा विषय राहिला. यावर त्यांनी इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिण्याचा मानस व्यक्त केला. ते कामही त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकलं नाही. नामदेव ढसाळ यांच्याविषयी फार आस्थेनं बोलत असत. त्यांच्या कविता आफ्रिका खंडातील निग्रो कवितेपेक्षा सरस आहेत, असं त्यांना वाटत होतं.

जावरे सर कोणत्याही विचाराच्या कळपात रमले नाहीत आणि त्यांना कधी स्वतःचाही कळप काढला नाही. अशा गोष्टींना त्यांनी कधीच फार महत्त्व दिलं नाही. अशा प्रवृत्तीच्या मंडळीत ते कधी रमले नाहीत. त्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र पद्धतीनं अभ्यास करणं पसंत केलं. या अभ्यासाच्या चिंतनातून त्यांना अनेक विषयांकडे पाहता आलं. त्यामुळे साहित्यिक सिद्धान्ताच्या वादानुवादांची समीक्षा करता आली.

जावरे सरांनी आपल्या बहुआयामी वाचनातून स्वतःला समर्थ बनवलं होतं. त्यांनी २०१६ मध्ये ‘पेडागॉजी ऑफ डिसेंट’ या चर्चासत्रातील लेख ‘अकॅडमिक फ्रीड्म अ‍ॅन्ड द ह्युमॅनिटीज’ ऑनलाईन प्रकाशित केला. या लेखात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासकांना कोणत्या कार्यासाठी स्वातंत्र्य हवं आणि ते कोणापासून दिलं जावं, याचं विश्लेषण केलं आहे. प्रत्येक व्यक्तींला आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वाचन व लेखन करावं लागेल, यावर त्यांचा भर राहिला.

फ्रान्सिस बेकनच्या विचाराचं सूत्र जावरे सरांच्या विचारात सापडतं. बेकन म्हणतो, “प्रतिवाद करण्यासाठी म्हणून किंवा खंडन करण्यासाठी म्हणून वाचन करू नका. किंवा विश्वास ठेवण्यासाठी म्हणून किंवा गृहीत धरण्यासाठी म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी किंवा विवेचनासाठी म्हणून देखील वाचन करू नका. तर वाचन करा समर्थ होण्यासाठी, स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी.”

अशा विचाराच्या प्रभावातून जावरे सरांना आपली वेगळी ओळख निर्माण करता आली. त्यांचं लेखन निरपेक्ष विचाराला विवक्षित करत राहिलं. त्यांची हीच दृष्टी अभ्यासकाला प्रेरणादायी ठरणारी आहे.

............................................................................................................................................................

लेखक डॉ. बालाजी घारूळे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे प्राध्यापक आहेत.

balajigharule@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ameya Tupate

Fri , 22 February 2019

हा लेख परिवर्तनाचा वाटसरू या नियतकालिकात पूर्वप्रकाशित झालेला आहे. आपल्याला संपादकिय नैतिकतेची कदर असल्यास तसा उल्लेख करावा.