टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मनमोहन सिंग, उर्जित पटेल, पतंजली, दारूबंदी आणि उज्ज्वल निकम
  • Fri , 16 December 2016
  • विनोदनामा टपल्या मनमोहन सिंग Manmohan Singh उर्जित पटेल Urjit Patel उज्ज्वल निकम Ujjwal Nikam पतंजली Patanjali

१. नोटाबंदीवरून केंद्र सरकारला संसदेत धारेवर धरणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची शाळा घेणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामागील कारणे आणि या निर्णयामागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिंग यांचा समावेश असलेल्या या समितीसमोर उपस्थित राहण्याच्या सूचना पटेल यांना देण्यात आल्या आहेत.

'आसं कसं? मी एवढं काम करणार? पगार एवढाच. मग निदान माझी सही तरी नको का नव्या नोटांवर? काहीतरी मोठं काम पाहिजे की नाही नावावर? मोदीसाहेबांची कारकीर्द काही ना काही कारणाने पुढच्या सात पिढ्यांच्या लक्षात राहायला नको का?' असं लिहिलेल्या कागदाचा एक बोळा रिझर्व्ह बँकेखालच्या खिडकीखाली सापडला आहे. पाठांतर करून फेकला गेला असावा, असा कयास आहे.

……………………………..

२. राष्ट्रीय आणि राज्य द्रुतगती मार्गांवरील मद्यविक्री करणारी सर्व दुकाने रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी या पार्श्वभूमीवर हा निकाल घेतला गेला आहे.

केंद्रातल्या सरकारप्रमाणे सर्वोच्च न्यायालयालाही भव्यदिव्य आणि तद्दन निरुपयोगी टोकनबाजी करण्याचा मोह आवरत नाही की काय? राष्ट्रीय महामार्गालगतची दुकानं बंद केली, तर लोक दारू प्यायचे थांबतील, ही अपेक्षा 'रामायण' मालिका बघून लोक रामाचे अवतार बनतील, याइतकीच फोल नाही का? लोक आता गाडीतच 'व्यवस्था' करतील, महामार्गांवरच्या 'व्यवस्था' महागतील, पोलिसांचे हप्ते वाढतील. कोणत्याही ठिकाणची दारूबंदी ही दारू महाग करणे, दारूत भेसळ होणे आणि बेकायदा दारूविक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून शासनयंत्रणा आणि राजकारणी पोसले जाणे, यापलीकडे काही साधत नाही. दारूबद्दलचा मद्दड आकस काढून टाकून जबाबदारीने मद्यपान करायला शिकवण्यापलीकडे आणि त्यावर कसोशीने लक्ष ठेवण्यापलीकडे कोणताही उपाय फजूल आहे.

……………………………..

३. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासीन भटकळ चौकशीच्या काळात तपास यंत्रणांना भयंकर मनस्ताप द्यायचा. त्यांना माहिती देण्यासाठी तो कधीही मसाला डोसा आणि खरबूज यांची मागणी करायचा, असं चौकशी करणाऱ्या पथकातल्या एका अधिकाऱ्याने एका न्यूज पोर्टलला सांगितलं.

अरे देवा, मग ती उज्ज्वल निकमांची बिर्याणी निवून जात असेल ना? रोजच्या रोज इतकं अन्न फुकट घालवायचं म्हणजे केवढा अपव्यय जनतेच्या पैशाचा. पण, चौकशी अधिकारी आणि पोलिस काही वाया जाऊ देत असतील, असं वाटत नाही.

……………………………..

४. फसव्या जाहिराती करणं आणि दुसऱ्यांच्या उत्पादनांवर आपलं लेबल लावून ग्राहकांची फसवणूक करणं, या कलमांखाली पतंजली आयुर्वेद लिमिटेडला न्यायालयाने पतंजली दंड ठोठावला आहे. त्यांचं मध, मीठ, मोहरीचे तेल, जॅम आणि बेसन ही उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचंही चाचणीमध्ये स्पष्ट झालं आहे.

अहो, एका भगव्या संन्याशाने गुरूच्या आश्रमात राहून स्वदेशी उद्योगाची उलाढाल पाच हजार कोटींवर नेली, याचं काही कौतुकच नाही न्यायालयाला! ती या वर्षात दुप्पट करून दहा हजार कोटींवर न्यायची आहे त्यांना. हे उद्योगवृद्धीचे 'स्वदेशी' मार्ग आहेत. त्यांचं कौतुकच करायचं असतं, असा एक ठरावच पास करायला पाहिजे संसदेत, म्हणजे न्यायालयांची टिवटिव थांबेल.

……………………………..

५. आर्मेनियामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या चीजला खूप मागणी आहे, अशा सर्वेक्षणावर विश्वास ठेवून एका डेअरी कंपनीनं मोठं कर्ज काढून मोठ्या प्रमाणात ब्लू चीजचं उत्पादन घेतलं आणि शेवटी दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकेही पैसे न उरल्याने त्यांनी पगाराच्या किंमतीएवढं चीजच कर्मचाऱ्यांच्या हातावर टेकवलं.

सगळ्या जगात या एकाच कंपनीचे कर्मचारी ताठ मानेनं सांगू शकतात की, त्यांच्या कष्टांचं चीज झालं… पण, त्यांच्यावर हेही अतिशय दु:खानं म्हणण्याची वेळ आली आहे.

editor@aksharnama.com 

Post Comment

Nilesh Sindamkar

Sat , 17 December 2016

वाह क्या बात... !!!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......