अनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली!
संकीर्ण - पुनर्वाचन
अश्विनी काळे
  • अश्विनी काळे लेकीसह
  • Tue , 25 December 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November अश्विनी काळे Ashwini Kale

पाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसं या वर्षांत खूप काय काय घडलं. खूप विषय चर्चेत आले, खूप विषयांवर वाद झाले. काही विषय चर्चेयोग्य असूनही चर्चेत आले नाहीत आणि काही वादग्रस्त विषय असूनही ते पुरेसे पुढे आले नाहीत. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख...

............................................................................................................................................

एक आई म्हणून स्वतःची कल्पना करणं आणि त्या कल्पनेला सत्यात उतरवण्याचा निर्णय घेणं, हे एका अपंग स्त्रीसाठी एखाद्या साहसकृत्यापेक्षा कमी नाही.

होय, मी एक अपंग स्त्री आहे. वयाच्या दुसऱ्याच वर्षी पोलिओ नावाच्या भयंकर आजारानं मला ग्रासलं. तशी व्यक्तीपरत्वे या आजाराची तीव्रता कमी-जास्त असते, पण माझ्या बाबतीत ही तीव्रता खूप जास्त होती. त्याचे परिणाम माझ्या किशोरवयात जाणवायला लागले. ज्या दिवसापासून मला पोलिओ झाला, त्या दिवसापासून माझ्या आईनं माझ्यावर सर्व प्रकारचे उपचार केले, पण कशातच यश आलं नाही. मला वाढवताना माझ्या आईला झालेला त्रास शब्दांत सांगता येण्यासारखा नाही, पण तरीही ती करायची; हसतमुखानं करायची आणि तेही तिच्या क्रोनिक अस्थमासह. पण नंतर हळूहळू तिच्यामधली शक्ती कमी होत गेली आणि माझ्यावरच्या उपचारांचं प्रमाणदेखील कमी होत गेलं. मग मात्र माझं लक्ष माझ्या शिक्षणावर केंद्रित झालं, पण पोलिओमुळे बाहेर जाण्यासाठी पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे जेमतेम १०वीपर्यंत रेग्युलर शाळा झाली. त्यानंतर एम. ए.पर्यंतचं शिक्षण मी पूर्णपणे घरातूनच घेतलं.

कॉलेजमध्ये असताना माझ्या आयुष्यात श्री आला. तसं त्याचं येणंदेखील खूप मजेशीर आहे. दै. ‘लोकमत’च्या कुठल्याश्या स्पर्धेत माझं नाव आलं होतं आणि याला वाटलं की, मी म्हणजे त्याची शाळेतली कुणी मैत्रीण आहे. म्हणून त्यानं मला पत्र लिहिलं. ते पत्र पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मग मीही त्याला पत्र लिहिलं. असा पत्रसंवाद करत-करत आमची पत्र-मैत्री झाली. मग एका पत्रात मी माझ्या शारीरिक व्याधीबद्दल त्याला सांगितलं. त्यानंतरच्या त्याच्या पत्रांमध्ये मला जास्त आपुलकी जाणवायला लागली. मग एकदा तो मला भेटायला माझ्या गावी, माझ्या घरी आला. मला पाहिल्या क्षणापासून ते जाईपर्यंत त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या. त्यानंतरच्या पत्रात त्यानं मला लग्नासाठी विचारलं. माझं उत्तर ‘नाही’ होतं, पण तरीही त्यानं तो विचार सोडला नाही. पुढल्या वर्षी तो त्याचं गाव सोडून माझ्या गावी आला. माझ्या कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला. मग त्याचं घरी रोजचं येणं-जाणं वाढलं. तो मला पाहत होता. मला समजून घेत होता. माझ्या भावनांना, माझ्या शारीरिक मर्यादांना आणि क्षमतांना समजून घेत होता आणि मुख्य म्हणजे, तब्बल दोन-तीन वर्षं मी लग्नासाठी नकारघंटा वाजवूनही स्वतःच्या मतावर ठाम होता. मग काय, शेवटी हो-नाही करत करत २००५साली पुण्यामध्ये नोंदणी पद्धतीनं आमचं लग्न झालं.

लग्नाच्या सुरुवातीच्या काळातच आम्हाला समजलं की, दिवस जाण्यात मला काही अडचण नाही. अगदी काही महिन्यांमध्येच माझ्या मनात उठलेली पहिल्या गरोदरपणाची कळ जरी आनंदाची असली, तरी इतर सगळ्या गोष्टींचा विचार करता, ते आम्हा दोघांनाही झेपण्यासारखं नव्हतं, कारण आमची मानसिक तयारीच नव्हती. म्हणून आम्हाला नाइलाजानं अॅबॉर्शनचा कठीण निर्णय घ्यावा लागला, पण त्यानंतर माझ्या मनात मातृत्वाची भावना निर्माण झाली, ती त्याच प्रसंगामुळे. पण नंतरही मूल होऊ द्यायचं की नाही, हे ठरवणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. कारण प्रत्येक स्तरावर आत्मनिर्भर असणं खूप गरजेचं असतं. शिवाय त्यासाठी मानसिक तयारी लागते आणि आमची नेमकी तीच होत नव्हती. कारण लग्नानंतर आम्ही माझ्या भावाच्या घरी राहत होतो आणि मी पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून होते. त्यामुळे त्याच्यावर आणखी एक जबाबदारी टाकायला नको वाटत होतं. एकंदरीत काय, तर माझ्या आयुष्यात कधी मातृत्व येईल का नाही, अशी परिस्थिती होती.

त्यानंतर २०११मध्ये छोटंसं का होईना, पण स्वतःचं घर झालं. माझ्या आई-वडलांनी हे घर घेऊन दिलं. त्या घरात सर्व कामं स्वतःला व्यवस्थित करता यावीत, यासाठी आम्ही इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा पर्याय निवडला आणि बराच ऑनलाईन सर्च करून बेंगळुरूवरून व्हीलचेअर मागवली. लग्नापर्यंत आई-वडलांवर आणि लग्नानंतर भावावर व वहिनीवर अवलंबून असणाऱ्या मला स्वतःच्या घरात एकटीनं सगळं मॅनेज करण्याच्या कल्पनेनंच खूप थ्रिलिंग वाटत होतं. नवीन घरात जाण्याआधी मी श्रीला म्हणाले होते, ‘‘आता तर आपलं स्वतःचं घरपण झालं आहे. आता आपण बाळाचा विचार करू या का?’’ त्यावर त्यानं ‘‘बघू’’ असं एका शब्दांत उत्तर दिलं. ते ऐकून माझा चेहरा पडला, पण त्याचं म्हणणंही योग्य होतं. मात्र हे बुद्धीला पटत होतं; मनाला नाही.

२०११च्या ऑगस्टमध्ये आम्ही आमच्या नवीन घरी राहायला आलो. सगळचं अगदी वेगळं वेगळं वाटत होतं. जबाबदारी पडल्यामुळे अचानक मोठं झाल्यासारखं वाटत होतं, आणि जेमतेम सेट होतो-न होतो, तोच नशिबानं आमची फिरकी घेतली. सप्टेंबरच्या अखेरीस मी गरोदर असल्याचं समजलं. मग दोघांच्याही मनात प्रचंड उलथापालथ सुरू झाली. काय करावं! बराच वेळ आम्ही शांत होतो. शेवटी श्रीनेच मला विचारलं, ‘‘तुला हवंय का?’’ मी काहीच बोलले नाही. त्यानं पुन्हा मला विचारलं, ‘‘तुला झेपेल का?’’ खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, पण त्याला माझ्या नजरेतून त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं तो म्हणाला, ‘‘आपण हा चान्स घेऊ या’’. त्या क्षणी माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. मग त्याच्या मांडीवर डोकं ठेवून किती वेळ मी शांत पडून आनंदाचा परमोच्च क्षण अनुभवत राहिले, पण श्रीच्या डोळ्यात मात्र ते भाव दिसत नव्हते. श्रीला या निर्णयाचा आनंद झाला नव्हता, असं नाही, पण ‘सगळं काही नीट पार पडेल की नाही?’, याची काळजी त्याच्या मनात होती. शिवाय त्याच्यावरची जबाबदारी अनेक पटींनी वाढणार असल्याचीही त्याला पूर्ण जाणीव होती आणि त्यासाठीच त्याची मानसिक तयारी चालली होती.

त्या दिवशी आम्ही जवळच्याच एका स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेलो, कारण तो परिसर आमच्यासाठी नवीन असल्यामुळे या भागातल्या कोण्या डॉक्टरबद्दल आम्हाला जास्त माहिती नव्हती. त्यांनी बेसिक टेस्ट्स केल्या आणि सहा आठवड्यांची प्रेग्नंन्सी असल्याचं कन्फर्म केलं. त्या दिवशी श्रीनं ऑफिसला सुट्टी घेतली होती. हा क्षण साजरा करायला म्हणून आम्ही ‘कल्याण भेळ’ला गेलो. सगळ्यांना आमची गुड न्यूज सांगितली. एकंदरीतच त्या दिवशी खूप स्पेशल वाटत होतं. पण दुसरा दिवस उजाडला आणि मनात अनामिक भीती निर्माण झाली. कारण स्वतःच्या अपंगत्वासोबत मोठं होत असताना स्वतःच्या तब्येतीला सांभाळणं तसं सरावाचं होतं, पण अपंगत्वासोबत गरोदरपण आणि तब्येत सांभाळणं शक्य होणार होतं का, हे उमगत नव्हतं.

त्यानंतर हळूहळू गरोदरपणीचे त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मनावरचा ताण आणखीनच वाढायला लागला. सततचा थकवा जाणवायचा. त्याचं मुख्य कारण होतं, माझी कमकुवत फुप्फुसं. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक तेवढा होत नव्हता आणि कंबरदुखीचा त्रास तर कैक पटींनी वाढतच चालला होता. मी डॉक्टरांना माझ्या या तक्रारी सांगितल्या आणि पुढे चालून माझी केस खूप आव्हानात्मक होणार असल्याचं त्यांना जाणवलं. म्हणून १० आठवड्यांनंतर लगेचच इनामदार हॉस्पिटलच्या डॉ. शुभदा देओस्कर यांच्याकडे पाठवलं. त्यांना भेटल्यावर जाणवलं की, डॉक्टर म्हणजे देवाचं रूप असतं. माझ्या गरोदरपणाच्या संपूर्ण काळात प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला योग्य ती ट्रीटमेंट तर दिलीच, पण सोबतच माझा आत्मविश्वासही वाढवला. त्यात श्रीची साथ होतीच. विशेष करून माझ्या आहारावर त्याचं पूर्ण लक्ष असायचं. वेळेवर दूध देणं, फळं देणं यामुळे अगदी सातव्या महिन्यापर्यंत मी सगळं एकटीनेच मॅनेज केलं, पण त्यानंतर मात्र मला शक्य नव्हतं. म्हणून माझी आई बाळंतपणासाठी माझ्याकडे आली. कारण सातव्या महिन्यापासून वजन वाढण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढतं आणि मी सतत बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते आणखीनच वाढण्याची शक्यता खूप जास्त होती, पण मला ते निर्देशित प्रमाणात ठेवायचं होतं. कारण वाढत्या वजनामुळे माझ्या हालचालीवर खूप मर्यादा येत होत्या. व्हीलचेअरवरून बेडवर आणि बेडवरून व्हीलचेअरवर होण्यासाठीसुद्धा कसरत करावी लागत होती. ३४ आठवड्यांनंतर तर माझी अस्वस्थता इतकी वाढली की, एक-एक दिवस जाणं कठीण, पण मला माझ्या बाळासाठी, तिच्या वाढीसाठी हा त्रास सहन करणं भाग होतं.

बघता बघता माझ्या बाळंतपणाची तारीख जवळ आली. शेवटच्या महिन्यात तर दर आठवड्याला चेकअपसाठी जावं लागायचं आणि प्रत्येक वेळी वाढलेल्या वजनाची नोंद घ्यावी लागायची, पण मी अजिबात उभी राहू शकत नसल्यामुळे वजन करण्यासाठी प्रत्येक वेळी आधी श्रीचं वजन करायचं आणि मग तो मला घेऊन वजन करायचा. माझा नवरा माझी किती काळजी करतो आणि किती प्रेमानं सगळ्या गोष्टी करतो, या गोष्टीचं माझ्या डॉक्टरांनासुद्धा खूप कौतुक वाटायचं.

माझ्या अशा अवस्थेमुळे नॉर्मल डिलिव्हरीचा विचारसुद्धा नव्हता, पण सिझेरियनसुद्धा प्लेन्ड असावं, असं डॉक्टरांनी सुचवलं, कारण कुठल्याही प्रकारची इर्मजन्सी रिस्क माझ्यासाठी खूप महागात पडणारी होती. मग १ मे ही तारीख ठरली. आदल्या दिवशी अनेस्थिटिस्टची अपॉइटमेन्ट होती. स्पायनल डिफॉर्मिटीमुळे लोकल अनस्थेशिया शक्य नसल्याचं अनेस्थिटिस्टनी तपासल्यावर सांगितलं. त्यामुळे जनरलचा एकच पर्याय होता, पण तो माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप धोकादायक हेाता. आता पर्यायच नसल्यानं माझ्या डॉक्टरांनी ते चॅलेंज स्वीकारलं. ठरलेल्या तारखेप्रमाणे १ मेला सकाळी हॉस्पिटमध्ये अॅडमिट झाले. ‘आता काही तासांचा अवकाश आणि माझ्या हातात माझं बाळ असणार’, याचा आनंद, ‘सगळं व्यवस्थित पार पडेल का?’, याची काळजी आणि ‘माझ्या अपंगत्वाचा माझ्या बाळावर काही परिणाम होणार नाही ना’, याची भीती अशा संमिश्र भावना मनात होत्या.

साधारण दुपारी ११.४५च्या सुमारास मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. मला जनरल अनस्थेशिया दिला जाणार असल्याची तिथं डॉक्टरांनी मला कल्पना दिली. इंजेक्शन दिल्यावर काही क्षणातच माझे डोळे मिटले. बाहेर सगळ्यांच्या मनात चिंता, काळजी आणि भीती होती. १.३० वाजता नर्सनं बाहेर येऊन मुलगी झाली असल्याचं आणि दोघीही सुखरूप असल्याचं सांगितलं. मी मात्र अनस्थेशियामुळे बेशुद्ध अवस्थेत होते. साधारण ४.३०च्या सुमारास मला थोडी शुद्ध यायला लागली. पण मला नीट बोलता येत नव्हतं की साधं बोटही हलवता येत नव्हतं. पण तशाही अवस्थेत ‘मला माझं बाळ दाखवा’, हे वाक्य मी कसंबसं बोलले आणि पुन्हा डोळे मिटले. त्यानंतर पूर्णपणे शुद्धीवर यायला मला एक-दीड तास लागला. तोवर नर्सनं पिंक-रॅप केलेलं गोड बाळ मला दाखवलं. तिला पहिल्यांदा पाहताना माझ्या डोळ्यात अलगद तरळणारा तो अश्रू ‘मी किती भाग्यवान आहे!’, याची जाणीव मला करून देत होता.

ऑपरेशन थिएटरमधून रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर बाळाला माझ्याजवळ झोपवलं. तो एवढासा जीव मला लुकलुकत्या नजरेनं पाहत होता; तिला मी बोट दिलं, तर तिनं घट्ट पकडलं. इतक्यात डॉक्टर रूममध्ये आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा खूप आनंद दिसत होता. कारण माझ्यासारखी अत्यंत आव्हानात्मक आणि दुर्मीळ केस त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. मग त्यांनी मला तपासलं आणि जाताना नर्सला सांगितलं की, ‘‘दूध पाजायला हिला मदत कर’’. त्यानंतर थोड्या वेळानं नर्स आली. तिनं बाळाला पाजण्यासाठी मला उठून बसायला सांगितलं, पण टाक्यांमुळे मला उठून बसायला असह्य वेदना होत होत्या. कारण काही कारणानं मला जास्त टाके पडले होते, पण आईच्या आणि नर्सच्या मदतीनं कशीबशी उठून बसले आणि एक मोठी कामगिरी फत्ते झाल्याचं जाणवलं, पण खरं आव्हान तर पुढे होतं. कारण बाळाला घेऊन पाजता येण्याइतकी मी वाकू शकत नव्हते. नर्सनं बाळाला जवळ आणल्यावर बाळ भुकेनं रडत होतं, पण माझी अगतिकता की, मी पाजू शकत नव्हते. काय करावं, काही सुचत नव्हतं. शेवटी नर्सनं डॉक्टरला फोन करून सांगितलं. तर त्यांनी अगदी सहज उपाय सुचवला. तिला वाकायला जमणारच नाही. त्यापेक्षा तिच्या पायांवर एक उशी ठेव आणि त्यावर बाळाला दे. मग काय सांगू, जमलं ना मला! त्या इवल्याशा बाळाच्या मानेला अलगद आधार देऊन पहिल्यांदा दूध पाजताना मी जी अनुभूती घेतली, ती मला क्षणात आई करून गेली आणि त्याच क्षणी माझ्यातल्या आईनं स्वतःला वचन दिलं की, ‘बाळासाठी काहीही करावं लागलं, तरी मी मागे हटणार नाहीच’.

बाळंतपणानंतर मला इतर काहीच त्रास नव्हता. त्यामुळे मला चौथ्या दिवशीच डिस्चार्ज मिळाला. माझ्या आईनं आणि सासूबाईंनी माझं आणि माझ्या बाळाचं छान स्वागत केलं! सुरुवातीचे ते दिवस नाजूक आणि विशेष काळजी घेण्याचे होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बाळाचंही आरोग्य, त्याची झोप, त्याचा मसाज इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीनं होण्याकडे माझ्या आईचं विशेष लक्ष असायचं. या सर्व गोष्टी ती अतिशय निष्ठेनं आणि प्रेमानं करायची. माझ्या आहारातलं पथ्यपाणी, औषण सगळं पद्धतशीरपणे चालू होतं, पण तरीही कधीकधी बाळाला सर्दी व्हायची, कधी पोट दुखायचं. तरी प्रत्येक वेळी अॅलोपॅथी औषधांचा मारा बाळावर न करता घरगुती उपचारांवर आमचा भर असायचा, पण हे घरगुती उपचारही आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेत असल्यानं बाळाची एकूणच प्रकृती उत्तम होती आणि ते कधी जरा जास्तच रडतंय, असंही होत नव्हतं. त्यामुळे खरं सांगायचं तर मी माझं मातृत्व एन्जॉय करत होते.

एके दिवशी मी आणि श्री बाळाच्या नावाबद्दल विचार करत होतो. त्याला त्याच्या नावाशी जुळतं नाव हवं होतं आणि मला माझ्या आद्याक्षरावरून नाव हवं होतं, पण दोघांचं एका गोष्टीवर एकमत होतं - अगदीच फॅन्सी किंवा मॉर्डन नाव नको. त्यापेक्षा ट्रॅडिशनल आणि अनकॉमन नाव ठेवायचं, पण नावावरून एकमत होत नव्हतं. मग आम्ही दोघांनी निवडलेल्या एकेक नावानं आम्ही बाळाला हाक मारायला सुरुवात केली, पण बाळ विशेष प्रतिसाद देत नव्हतं. नावावर बरेच दिवस चर्चा झाली. शेवटी एका नावावर दोघांनी शिक्कामोर्तब केलं – अनुश्री. ही हाक मारल्यावर तीही लगेच टकमका बघायला लागली. तिलादेखील ते नाव आवडलं होतं. माझं आद्याक्षर आणि श्री या दोन्हीही गोष्टी नावात असल्यामुळे आम्हा दोघांनाही हे नाव खूप आवडलं होतं. पण तिला आणखी एका नावानं मी कधी-कधी हाक मारते. ते म्हणजे, ‘अमिरंथा’. याचा अर्थ होतो, कधीही न कोमेजणारं फूल. अगदी सुरुवातीपासून ती या दोन्हीही नावांना प्रतिसाद देत होती.

बघता बघता दिवस जात होते आणि अनुश्री मोठी होत होती. एक-दीड महिन्यातच तिची मान बसली आणि चक्क तिसऱ्या महिन्यात ती पालथी पडायला लागली. एखादं गाणं लावलं की, त्या तालावर ती हात-पाय हलवायची. तिला तिच्याशी बोललेलं खूप आवडायचं. दूध पाजताना, तिला आवरताना, झोपवताना मी सतत तिच्याशी बोलायचे आणि तीही तिला खूप समजल्यासारखे हावभाव करायची. खास करून तिला बाळगुटी देताना मी गुणगुणायचे आणि ते तिला इतकं आवडायचं की, तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसायचा.

हळूहळू ती पायाला रेटा देऊन पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होती. मग रेटा देतादेता आपोआप गुडघे फोल्ड करून रांगायच्या पोश्चरमध्ये आली. पाचव्या महिन्यापर्यंत ती स्वतःहून बसायला आणि व्यवस्थित रांगायला लागली. त्यादरम्यान मी माझ्या माहेरी, उस्मानाबादला गेले होते. कारण बाळाला रांगताना जास्त जागेची गरज असते. माझ्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरमुळेही तिला रांगायला जास्त जागा मिळत नव्हती आणि ती खाली असताना मला तिला घेता येत नव्हतं. एकंदरच तिची वाढ व्यवस्थित होत असल्याचं दिसत होतं, पण तरीही ती व्यवस्थित चालू शकेल का नाही, याची भीती माझ्या मनात होतीच; पण लवकरच ती भीती निघून गेली. कारण सातव्या महिन्यापासून ती आधारानं उभी राहण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या दरम्यानच ती ‘मम्म मा’ बोलायला लागली. तिच्या या बोलण्यापुढे आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटायचं.

अनुश्री चालायला शिकताना बऱ्याच वेळा तोल जाऊन पडायची. मी तिला पडताना पाहायचे, पण पटकन जाऊन उचलून घेऊ शकत नव्हते. या गोष्टीचा माझ्या मनाला खूप त्रास व्हायचा, पण त्यामुळे एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की, तिच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील, जेव्हा ती धडपडेल आणि प्रत्येक वेळी मी सोबत असेनच असं नाही. त्यामुळे माझी लेक स्ट्राँग झालीच पाहिजे; फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्यासुद्धा. म्हणून मी तिला कधीच, कसलीच भीती दाखवली नाही. म्हणजे, भूत आलं, बाबा आला, अंधार झाला किंवा अगदी पाल किंवा झुरळ यांचीही भीती दाखवली नाही. भीतीमुळे बौद्धिक शक्ती आणि मानसिक आकलन शक्ती यांच्यावर परिणाम होतो.

साधारण १०व्या महिन्यापर्यंत अनुश्री पूर्णपणे चालायला लागली. इतक्या लवकर चालायला शिकलेलं बाळ माझ्या पाहण्या-ऐकण्यात तर नव्हतं. ती नुसतेच शब्द नाही, तर अर्थबोध होईल, अशी छोटी छोटी वाक्यंपण बोलत होती. ती चालायला लागल्यावर आम्ही पुण्याला आलो. तेव्हा पुन्हा माझ्या व्हीलचेअरचं टेन्शन होतं. चुकून ती मागे थांबली, तर तिला लागण्याचे चान्सेस होते. त्यामुळे श्रीला आणि माझ्या आईला नेहमी दक्ष राहावं लागायचं. तसं श्रीचं ऑफिसचं टायमिंग दुपारी ४ ते १२.३० होतं. त्यामुळे तो सकाळचा पूर्ण वेळ अनुश्रीसोबत घालवायचा. अनुश्रीनंसुद्धा तिच्या झोपेची वेळ श्रीच्या वेळेनुसार करून घेतली होती. श्री रात्री १ वाजता आला की, त्या वेळी ती उठायचीच. त्या वेळी तिला फक्त तिचा पप्पा लागायचा. मग श्री तिला घेऊन अलगद तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवून जोजवायचा. १५-२० मिनिटांनंतर तिला झोप लागायची. मग ती डायरेक्ट सकाळी ९च्या दरम्यान उठायची. मग तिचा मसाज, अंघोळ, दूध, खाणं-पिणं झालं की, दोन ते अडीचच्या दरम्यान झोपायची. तेव्हापण पप्पा सोबतच असल्यामुळे बाप-लेकीचंही खूप छान बाँडिंग तयार झालं.

बघता बघता दिवस असे भूर्कन उडून जात होते आणि अनुश्रीला हळूहळू मोठं होताना पाहणं प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकवून जात होतं. कारण प्रत्येक वेळी येणारा प्रॉब्लेम वेगळाच असायचा आणि त्यासाठी नवनवीन जुगाड करावे लागत. असं करत करत ती दीड वर्षाची झाली. सगळे जण म्हणायला लागले, ‘आता तिला दूध पाजणं थांबव’. अगदी माझी डॉक्टरसुद्धा म्हणायला लागली, पण मी तिला दूध पाजणं थांबवलं, तर तिचा माझ्यासाठीचा जिव्हाळा, माझ्यासाठीची माया कमी तर होणार नाही ना, अशी मला भीती वाटायची. मग पुन्हा विचार आला की, ‘असं किती दिवस पाजीन? कधी ना कधीतरी प्रोसेसमधून जावं लागणारच आहे’. मग एक-दोन दिवस प्रयत्न केला, पण तिच्याआधी मीच हळवी होत होते आणि मीच तिला पाजायला घ्यायचे. असे माझे दोन वेळा प्रयत्न फसले. त्यानंतर १०-१५ दिवसांनी अचानक माझी तब्येत खूप बिघडली. त्यामुळे मला हॉस्पिटलाइज्ड केलं. त्या दरम्यान अनुश्री माझ्या मोठ्या भावाकडे होती. त्यांनी तिला बॉटलमधून दूध पाजायची सवय लावली. चार दिवसांनी जेव्हा मी घरी आले, त्यानंतर तिनं एकदाही प्यायला मागितलं नाही आणि मीही माझं काळीज घट्ट करून तिला पाजवणं थांबवलं; पण माझी भीती खोटी ठरली. उलट अनुश्री आधीपेक्षा माझ्या जास्त जवळ आली.

अनुश्रीच्या जन्मापासून ते ती दीड-दोन वर्षाची होईपर्यंत माझी आई माझ्यासोबत होती. कधी ती पुण्यात, तर कधी मी उस्मानाबादमध्ये, पण त्यांनतर तिला इथं राहणं जमणार नव्हतं. कारण माझ्या वडलांची तब्येत सारखी बिघडायची आणि मी तरी किती दिवस उस्मानाबादमध्ये राहणार! पूर्वीही सहा महिने मी तिथं राहिले होते. आईशिवाय अनुश्रीला एकटीनं सांभाळणं खूप अवघड होतं. म्हणजे तसं तिचं सगळं मी करू शकत होते, पण सतत तिच्या मागे फिरणं जमण्यासारखं नव्हतंच. मग आई म्हणाली, ‘‘मी तिला थोडे दिवस घेऊन जाते (म्हणजे एखादं वर्ष). ती थोडी मोठी झाली, तुम्ही तिला शाळेत घालायचा विचार केलात की, घेऊन या इथं’’. खूप कठीण प्रसंग होता तो. काय निर्णय घ्यावा, काही सुचत नव्हतं. एकतर श्रीच्या ऑफिसचं टायमिंग, माझी ही अशी अवस्था आणि घरात लहान मूल… म्हणून मग २०१४च्या मेमध्ये आई अनुश्रीला उस्मानाबादला घेऊन गेली. तशी जन्मापासून तिला माझ्या आईची सवय होती. त्यामुळे तिला काही अडचण नव्हती. अडचण होती, ती फक्त मला… एका आईला आपल्या बाळापासून दूर राहावं लागणार असल्याची, पण परिस्थितीच अशी आली की, दुसरा काही पर्याय नव्हता. मात्र माझ्यातली आई पार कोलमडून गेली होती. तसं आई तिचं सगळं अगदी वेळच्या वेळी आणि शिस्तीत करत होती, रोज दोन-तीन वेळा फोन करून सगळं सांगायची. मी मात्र कल्पनेतच तिला पाहत होते; स्वतःच्या अपंगत्वाला कोसत होते. पण तरीही एका गोष्टीचं समाधान होतं. अनुश्री आईकडे योग्य पद्धतीनं वाढत होती.

पण पुन्हा एका मोठ्या संकटानं तोंड काढलं. माझ्या वडलांना बऱ्याच वर्षांपासून हर्नियाचा त्रास होता, पण जुलै २०१४मध्ये तो इतका वाढला की, तातडीनं ऑपरेशन करावं लागणार होतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ऑपरेशन ठरलं. त्यामुळे आई-वडील पुन्हा पुण्याला आले. त्यात आणखी एक अडचण म्हणजे, अनुश्री नसल्यानं सकाळचा वेळ मोकळा असल्यानं श्रीनं एम.ए.ला प्रवेश घेतला होता. त्यामुळे जूनपासून आईपण नसणार होती आणि श्रीही नसणार होता. मग तिला घेऊन घरचं सगळं काम मी कसं उरकणार होते? यावर समोर एकच पर्याय होता - अनुश्रीला शाळेत घालणं. कमीत कमी ती शाळेतून येईपर्यंत मी घरातलं सगळं तर आवरून घेतलं असतं. म्हणजे त्यानंतर पूर्ण दिवस तिला घेऊन मला बसता आलं असतं, पण तिचं वय शाळेत घालायचंही नव्हतं. ती फक्त सव्वा दोन वर्षांची होती आणि ऑगस्ट महिना असल्यामुळे तिला कोणत्याच शाळेत (प्री प्रायमरी स्कूलमध्ये) प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरी मी श्रीला म्हटलं, ‘‘जवळच्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन चौकशी कर’’. तो जाऊन सगळीकडे अॅडमिशनची चौकशी करून आला, पण कुठेच काही झालं नाही. मग मनात विचार आला, ‘आता आपल्यालाच चौकशी करावी लागणार’. मग एक दिवस मीच माझ्या व्हीलचेअरच्या आधारे जवळच्या एका शाळेत गेले. तिथं दोन पायऱ्या असल्यानं मला आत जाता येत नव्हतं. मग तिथल्या शिपायाला विनंती करून मॅडमला बोलावयाला सांगितलं. अर्धा-पाऊण तास थांबल्यावर मॅडम बाहेर आल्या. आधी तर तिरप्या नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं, ‘‘अॅडमिशनसाठी आली आहे’’, म्हटल्यावर ‘‘होणार नाही’’, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, पण तरी मी त्यांना विनंती करतच होते. इतक्याच शाळेचे ट्रस्टी तिथून जात होते. त्यांनी मॅडमला आत बोलावलं आणि अनुश्रीला अॅडमिशन द्यायला सांगितलं. मॅडमनी मला बाहेर येऊन अॅडमिशनची सगळी प्रक्रिया सांगितली. एक अशक्य वाटणारी गोष्ट पार पडल्यानं माझ्या आनंदाला पारावार नव्हता.

काहीतरी करून एकदाची अॅडमिशन झाली होती, पण त्यासोबत पुढच्या अनेक अडचणी समोर ठाकलेल्या होत्या. त्यातलं पहिलं, सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे, शाळेला जायचं-यायचं कसं? अनुश्री इतकी लहान होती की, कोणत्याही प्रायव्हेट व्हेईकलनं तिला शाळेत पाठवण्याची आमच्या दोघांचीही इच्छा नव्हती, पण श्रीचं कॉलेज असल्यामुळे त्याचं टायमिंगही जमणारं नव्हतं. मग मीच एक पर्याय ठेवला. कॉलेजला जाताना तू सोडून जात जा आणि मी माझ्या व्हीलचेअरवरवर तिला आणायला जाईन. तो साफ नाही म्हणाला, कारण अनुश्रीच्या शाळेत दोन मोठ्ठे रोड्स क्रॉस करून जावं लागत होतं आणि अनुश्रीला मांडीवर घेऊन रोड क्रॉस करणं! नो वे!

‘‘अरे, पण माझ्याकडे तेवढेच दोन तास आहेत घरचं सगळं काम आवरायला. तिला घेऊन मी कसं करणार सांग बरं सगळं? गॅसकडे तिला काही लागलं, भाजलं तर काय करणार!’’, मी म्हणाले.

शेवटी हो-नाही, हो-नाही म्हणत म्हणत तोही तयार झाला.

मग सकाळी उठून मी अनुश्रीचा डबा करायचे. तोपर्यंत श्रीपण अंघोळ करायचा आणि अनुश्रीलापण अंघोळ घालायचा. मग मी तिचं आवरून द्यायचे. कॉलेजला जाता जाता तो तिला स्कूलला सोडायचा. तिची स्कूल सुटायची वेळ ११ची होती. त्याआधी मला सगळं उरकून-आवरून १०.३०ला घराबाहेर पडावं लागायचं. कारण गाडीवरून गेलं, तर तिच्या शाळेत पोचायला जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटं लागायची, पण माझ्या व्हीलचेअरवरून जायला मात्र २५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागायला. पहिले तीन-चार दिवस तर श्रीनेच ने-आण केली. कारण सुरुवातीला तिलाही शाळेच्या वातावरणात अॅडजेस्ट व्हायला वेळ लागेल, असं आम्हाला वाटलं. पण एक-दोन दिवसांतच तिला शाळेला जायला आवडायला लागलं. ती लहान मुलांमध्ये रमायला लागली. आता तिला शाळेमधून आणण्याची जबाबदारी माझी होती. पहिल्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच घराबाहेर पडले. मनात एकीकडे विचित्र खळबळ होती, ताण होता, तर दुसरीकडे एक्साइटमेंट होती. बरोबर ११ वाजता शाळेमध्ये पोचले. या शाळेचा एक प्लस पॉइंट म्हणजे, माझी व्हीलचेअर मला अनुश्रीच्या वर्गापर्यंत नेता येत होती. मी आलेली पाहून ती खूप खुश झाली. वर्गातून पळत आली आणि माझ्या मांडीवर बसली. मग मी तिची बॅग मागे लावली आणि तिला व्यवस्थित बसवून सीटबेल्ट लावला. मी थोडी भीत होते, पण ती एकदम रिलॅक्स होती. मी शाळेच्या बाहेर पडले. हळूहळू रोड क्रॉस करत आम्ही घरी आलो. घरी आल्याबरोबर पहिला प्रश्न – ‘‘मम्मा, पप्पांची गाडी घेऊन यायची ना! तुझी चेअर किती वेळ लावते! मला सू सू आली ना!’’ मी लॉक उघडताच ती पळत पळत बाथरूममध्येच गेली.

पहिल्या दिवशीच माझ्यातला आत्मविश्वास जागा झाला आणि मला वाटलं की, ‘Yes I Can do it!’ त्या वर्षात अनुश्रीमध्ये बरेच लक्षणीय बदल झाले. ती बाहेरच्या जगात जास्त मिसळायला लागली, पण तरीही माझ्यातली आई मात्र नेहमी जागृत असायची. त्यामुळे तिच्यामध्ये सकारात्मक बदल होत होते. तिच्यात दिसणारा आणखी एक बदल म्हणजे, तिचं केअरिंग नेचर, आणि ते फक्त माझ्यापुरतंच सीमित नव्हतं. तिच्याभोवतीच्या प्रत्येकासाठी होतं. एकदा आम्ही पालक सभेसाठी शाळेत गेलो होतो, तेव्हा तिच्या टीचरनं सांगितलं की, तिच्या वर्गातल्या एका मुलीच्या पायाला प्लॅस्टर केलं होतं, तर अनुश्री तिला प्रत्येक गोष्टीत मदत करत होती. तिला चालायला फक्त अनुश्रीच हात धरून मदत करत असे. हे सगळं ऐकून ऊर भरून आला. तिची ही मदत करण्याची सवय आजही कायम आहे. आम्ही तिचा एक फस्ट एड बॉक्स बनवला आहे. खेळताना कुणीही पडलं, थोडंसं खरचटलं की, ती लगेच त्याला घरी घेऊन येते. कॉटननं अँटिसेप्टिक लावते आणि त्यावर सोफ्रामायसीन लावते.

अनुश्रीला घरातली छोटी छोटी कामं करण्याची सवय मी खूप आधीपासून लावली आहे. कधी कधी माझी आई मला रागावते – ‘‘अगं किती लहान आहे ती! तिला इतकं सगळं काम करायला लावतेस!’’ पण मला वाटतं की, तिनं स्वावलंबी असावं. तिच्या आयुष्यात माझी साथ कधीपर्यंत असेल माहीत नाही, पण तिचं कधीच कुठे अडू नये. आता ती सहा वर्षांची झाली आहे. स्वत:चं दूध स्वत: गॅसवर गरम करून अगदी व्यवस्थित घेऊ शकते. स्वत: ऑम्लेट बनवते. तशी ती निडर आहे, पण बेपर्वा नाही. स्वत:ला जपून ती सगळ्या गोष्टी करते.

 

पूर्व प्राथमिकमध्येही ती तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली. पहिल्या शाळेत गरज होती म्हणून गेली, पण तिथं एका वर्गात १२० विद्यार्थी आणि दोन शिक्षक होते. त्यामुळे आम्ही ती शाळा बदलली. दुसऱ्या शाळेत २५ विद्यार्थी आणि एक शिक्षिका होत्या, पण लिखाणाचं प्रमाण अतिरिक्त होतं. तीन वर्षाच्या मुलांना रोज सात-आठ पानांचा होमवर्क असायचा. म्हणून ती शाळा बदलली. तिसरी शाळा मात्र पूर्णपणे अॅक्टिव्हिटीप्रधान होती. तिथं तिची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं झाली. गोष्टी कशा पद्धतीनं समजून घ्यायच्या असतात, हे तिला समजायला लागलं. एकंदरच तिचं शालेय जीवन मी एन्जॉय करते आहे.

आता ती केंद्रीय विद्यालयामध्ये पहिलीच्या वर्गात आहे. मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमात शिकतात, तेव्हा त्यांना मराठी वा हिंदी या भाषा कठीण वाटतात, पण अनुश्री या भाषा व्यवस्थित बोलते आणि वाचतेसुद्धा. तशी देवनागरी लिपीची ओळख तिला काही महिन्यांपूर्वीच झाली आहे, पण तिने ती अगदी सहज अवगत केली आहे.

एका बाळाच्या मनात एक गोष्ट कायम असते की, ‘आपल्याला जे काही हवं आहे, ते आपल्या आईला कळतं आणि आपली आई ती प्रत्येक गोष्ट पुरवते’. पण जसंजसं ते बाळ मोठं होतं, तसं आईनं अगदी हळुवारपणे हा आभास कमी कमी करायला हवा. तेव्हाच त्या बाळाचा विकास होतो. त्या बाळाकडे ‘माझं मूल’ यापलीकडे जाऊन ‘एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ म्हणून आईनं पाहायला हवं.

खरं तर अनुश्रीचा जन्म ही माझ्या आयुष्यातली अशी घटना आहे, ज्यानंतर माझे आयुष्याबद्दलचे विचारच बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका अश्विनी काळे या अपंग असल्या तरी एक खंबीर व्यक्ती, तितक्याच खंबीर आई आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या लेखातून आलाच असेल. या लेखाहून त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही!

ashwini.kale05@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................