प्रत्येक लेखकास स्वतःचा सतत शोध घ्यावयाचा असतो. स्वतःला सोलून काढावे लागते.
पडघम - साहित्यिक
डॉ. सूर्यनारायण रणसुभे
  • पहिलं शिवार साहित्य संमेलन
  • Tue , 18 December 2018
  • पडघम साहित्यिक पहिलं शिवार साहित्य संमेलन

२ डिसेंबर २०१८ रोजी मौजे चिकलठाणा (जि. लातूर) इथं मराठवाडा साहित्य परिषद (शाखा लातूर) पहिलं शिवार साहित्य संमेलन झालं. या संमेलनाचं अध्यक्षपद समीक्षक व अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी भूषवलं. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

माझ्या तमाम मित्र व मैत्रिणींनो, एका अशा राजकीय वातावरणात आपण आज जगत आहोत, जेथे शब्दांच्या उपयोगावरच अंकुश ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचाच प्रयत्न येथे सुरू झालेला आहे. शब्दांचे हे विश्व मोठे विचित्र व विरोधाभासांनी भरलेले असते. शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न शब्दांच्याच माध्यमातून होत असते व या नियंत्रणाचा विरोधदेखील शब्दांच्याच माध्यमातून होत असतो.

मित्रहो, जेथे स्त्री-पुरुषांचा समूह जगत असतो, जगण्यासाठी संघर्ष करीत असतो, तेथे अभिव्यक्ती ही होणारच! प्रत्येक समाजात काही मूठभर स्त्री-पुरुष हे जन्मतःच संवेदनशील मनाची असतात. या संवेदनशील मनाचा संबंध जात, वंश, लिंग, धर्म याच्याशी कधीच नसतो. या संवेदनशील मनास नियतीचा एक शाप असतो की, ते इतरांच्या सुखदुःखाशी चटकन समस होतात. इतरांचे हे दुःख त्यांना आपलेच दुःख वाटू लागते. ‘ते’ आणि ‘मी’ यातील अंतर मिटून जाते. आता या संवेदनशील मनास जर निसर्गाने प्रतिभेची देणगी दिली असेल, तर मग तो किंवा ती त्या सुखदुःखास, त्या अनुभूतीस शब्द देण्याची, त्या सुखदुःखास इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी धडपडू लागतात. जे काही त्यांना जाणवते, ते व्यक्त केल्याशिवाय त्यांना जगणेच अवघड होऊन बसते. या अशा अस्वस्थतेतूनच कवितेचा, लघुकथेचा, कादंबरीचा, नाटकाचा जन्म होत असतो. या संवेदनशील मनाच्या आत हे जे काही चाललेले असते, ते बाहेर त्याच वेळी येऊ शकते, ज्या वेळी बाहेरचे वातावरण त्यासाठी अनुकूल असते किंवा बाहेर पडण्यासाठी म्हणून त्यास अनुकूल अशी संवेदनशील मनाची मित्रमंडळी, वृत्तपत्रे, नियतकालिके, शाळा, कॉलेजातील व्यासपीठे उपलब्ध असावी लागतात. असे अनुकूल वातावरण नसेल, त्याच्या अभिव्यक्तीच्या भाषेचे पर्यावरण जर नसेल, तर त्याचे ते सृजन गर्भावस्थेतच मृत्यू पावते.

एकूणच मराठवाड्याचे १९६० पूर्वीचे भाषिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरण हे या अशा अभिव्यक्तीस प्रेरणास्पद, प्रोत्साहनपरक नव्हतेच. एक तर बहुजन हा शिक्षणापासून दूर ठेवला गेला होता व अभिजनास देखील असे भाषिक पर्यावरण व प्रोत्साहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे केवळ लातूर जिल्हाच नव्हे, तर एकूणच तत्कालीन हैद्राबाद संस्थानात मराठी, तेलुगू व कन्नड साहित्यलेखनाची परंपरा ही १९६० पर्यंत तर आढळून येत नाही. काही अपवाद जरूर आहेत. बी. रघुनाथ सारखे.

१९४८ ते १९६० हा मराठवाड्यासाठी भाषिक संक्रमणाचा काळ होता. न्यायालय, प्रशासन व पत्रकारितेत उर्दूचे जे स्थान होते, ते सुरुवातीच्या काळात इंग्रजीला मिळाले. त्यानंतर म्हणजे १९६० पासून मराठीला. १९६० ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आले आणि मराठवाड्याचे एक जुने स्वप्न- महाराष्ट्रात विलीन होण्याचे पूर्ण झाले. संयुक्त महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी झाली. त्यामुळे भाषिक पर्यावरणच बदलून गेले. १९५८ ला उमरगा येथे शिवाजी महाविद्यालयाची स्थापना व १९६१ मध्ये लातूर येथे दयानंद महाविद्यालयाची सुरुवात झाली. उच्च शिक्षणाची जशी सोय लातूर जिल्ह्यात झाली, त्याचप्रमाणे सुरुवातीला मंदगतीने व १९७० नंतर वेगाने जागोजागी विद्यालये व महाविद्यालये उघडू लागली. १९६३ मध्ये उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयाची सुरुवात झाली. लातूर व उदगीर येथील या दोन महाविद्यालयांमुळे जिल्ह्यात एक सांस्कृतिक उलथापालथीची जणू सुरुवातच झाली.

लातूर येथे १९६५ ते १९७० दरम्यान नाट्यमंडळे सक्रिय झाली. शास्त्रीय संगीताच्या मैफली सुरू झाल्या. १९७० नंतर लातूर व उदगीर येथे दोन नवी महाविद्यालये सुरू झाली. याच दरम्यान लातूर येथून एक दोन दैनिक पत्रेदेखील प्रकाशित होऊ लागली. महाविद्यालये, वृत्तपत्रे व नाट्यमंडळे यांमुळे जिल्ह्यातील प्रतिभावंतांना अभिव्यक्तीसाठी पहिल्यांदा व्यासपीठे मिळू लागली. प्रत्येक महाविद्यालयतून वार्षिकांचे प्रकाशन सुरू झाले. यामुळे लिहिणाऱ्यांना बळ मिळू लागले. ज्यांच्यात प्रतिभा होती, त्यांना मार्गदर्शन मिळू लागले आणि त्यातून या जिल्ह्यात हळूहळू लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, वाचन करणाऱ्यांचा एक नवीन वर्ग निर्माण झाला.

आज या जिल्ह्यात साहित्यिकांच्या तीन पिढ्या लेखनक्षेत्रात सक्रिय आहेत. पहिल्या पिढीतील लेखकांनी आपली स्वतःची स्वतंत्र अशी ओळख आपल्या लेखनातील कसदारपणातून निर्माण केलेली आहे. या लेखकांत देखील दोन वर्ग आहेत. एक ते ज्यांचा जन्म या जिल्ह्यातील कोणा एका गावात झाला; पण नंतर नोकरीनिमित्त ते कायम जिल्ह्याबाहेरच राहिले. रा. रं. बोराडे व स्मृतिशेष प्र. ई. सोनकांबळे हे ते दोन लेखक. रा. रं. बोराडे हे ग्रामीण साहित्यप्रवाहातील एक मोठे नाव. प्र. ई. सोनकांबळे यांनी आपल्या आत्मकथेतून ग्रामीण भागात जगत असलेल्या दलित समाजाचे दुःख मांडले. ज्या दलित आत्मकथनामुळे इतर भारतीय भाषांतील साहित्यात दलित साहित्याचा नवा प्रवाह सुरू होतो, त्याची सुरुवात या जिल्ह्यातील प्र. ई. सोनकांबळेंच्या ‘आठवणीच्या पक्षी’मुळे होते, ही या जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींना अभिमान वाटावा अशी घटना आहे.

मराठीतील वैचारिक साहित्याला एक नवी दृष्टी देण्याचे काम याच जिल्ह्यातील डॉ. जे. एम. वाघमारे यांनी केलेले आहे. पहिल्या पिढीतील या तीन महत्त्वाच्या लेखकांशिवाय डॉ. शेषराव मोहिते, फ. म. शहाजिंदे, स्मृतिशेष डॉ. श्रीराम गुंदेकर, श्री. विनय अपसिंगेकर, सौ. ललिता गादगे, इंदुमती सावंत देखील या पहिल्या पिढीतील लेखकांतच येतात. या पिढीतील लेखकांचे लेखन हे अधिक वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व वास्तववादी आहे. या पिढीतील लेखकांनी महाराष्ट्रपातळीवरील आपली ओळख निर्माण केलेली आहे.

दुसऱ्या पिढीतील लेखकांत या जिल्ह्याचे सर्वश्री लक्ष्मण गायकवाड, राजा होळकुंदे, रमेश चिल्ले, हरिदास आडसूळ, रामराजे अत्राम, सुनीता अरळीकर, तु. लिं. कांबळे, नंदकुमार बालुरे, संजय घाडगे, शंकर झुल्फे, संजय जमदाडे येतात. ही मंडळी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. अध्यापनाशी संबंधित व्यवसायात यापैकी फारसे कोणी दिसत नाही. यापैकी काहींचे एकच पुस्तक प्रकाशित झालेले आहे. हे सतत लिहिणाऱ्यांपैकी नाहीत. यांच्या लेखनात वैविध्यता आहे. एक-दोन लेखक यासाठी अपवाददेखील आहेत.

तिसऱ्या पिढीतील लेखकांत कवींची फार मोठी संख्या आहे. नयन राजमाने, विवेक कुलकर्णी, स्मृतिशेष प्रकाश काळे, नानासाहेब सूर्यवंशी, जयद्रथ जाधव, लहू वाघमारे, दुष्यंत कटारे, विद्या बायस, शैलजा कारंडे, सुनंदा सिनगार, विलास सिंदगीकर व आज येथे उपस्थित सर्व कवी इत्यादी येतात. पहिल्या पिढीत डॉ. जे. एम. वाघमारे हे एकमेव समीक्षक होते. दुसर्‍या पिढीत समीक्षक जवळपास नाहीत; पण तिसऱ्या पिढीत समीक्षकांची संख्या बऱ्यापैकी आहे. याला कारण म्हणजे १९९५ नंतर या जिल्ह्यात मोठ्या संख्येने कॉलेजेस उघडली. एम.फिल. आणि पीएच.डी.ची पदवी प्राध्यापक होण्यासाठी म्हणून जवळपास सक्तीची करण्यात आली. या पदव्यांसाठी अभ्यास करीत असताना काही प्रमाणात साहित्याकडे पाहण्याची एक दृष्टी तयार होते. ती दृष्टी समीक्षक होण्यासाठी आवश्यक असते. या पिढीतील लेखकांनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळलेले आहेत. विविध वाङ्मयप्रकारांचा थोडक्यात आढावा घेताना या पिढीतील लेखकांच्या लेखनाबद्दल माझ्या प्रतिक्रिया येतीलच.

आत्मकथा - या जिल्ह्यातील लेखकांनी आत्मकथा हा वाङ्मयप्रकार खूप ताकदीने हाताळलेला आहे. कारण हा जिल्हा कायमपणे दुष्काळाच्या पट्टीत. पाण्याचा येथे अभाव. शिवाय, येथे सरंजामी वृत्ती अधिक. त्यामुळे खेड्यापाड्यातून दलितांचे जगणे विषण्ण करणारे. खेड्यातील अभिजनदेखील फार समृद्ध स्थितीत नाहीत; पण जातीचा अहंकार मात्र जबरदस्त. त्यामुळे या जिल्ह्यातील दलित, भटके-विमुक्त यांचे जीवन कमालीचे दारिद्रयाचे व अभिजनांच्या अरेरावी वृत्तीपुढे केविलवाणे असे. भटक्या-विमुक्तांच्या जीवनाची सांगोपांग रूपाने पहिली अभिव्यक्ती ही लक्ष्मण गायकवाड यांच्या ‘उचल्या’ या आत्मकथनातून होते. ही आत्मकथा केवळ मराठीतच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर गाजली. साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार या जिल्ह्यातल्या लक्ष्मण गायकवाड यांच्या ‘उचल्या’ला मिळाला. याच परंपरेत रामराजे अत्राम यांचा ‘उघडा दरवाजा’ ही आत्मकथा येते आणि २०१८ मध्ये प्रकाशित झालेली विलास मानेची ‘कत्ती’ आत्मकथादेखील याच परंपरेत येते. डॉ. जनार्दन वाघमारे यांची आत्मकथा ‘मूठभर माती’ प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या; पण नंतर शिक्षणक्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणलेल्या एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञाची आत्मकथा म्हणून गौरवलेली आहे. दलित समाजात जन्म घेतल्यानंतर, जन्मानंतरच्या एका आठवड्यातच जिला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला; पण आजोबांच्या सावधगिरीमुळे जिचा पुनर्जन्म झाला, अशा एका राजकीय कार्यकर्तीची आत्मकथा म्हणून सौ. सुनीता आरळीकर यांच्या ‘हिरकणीचे बिऱ्हाड’चा उल्लेख करावा लागेल. यावर बरीच चर्चा मराठीत झालेली आहे. विशेष म्हणजे लक्ष्मण गायकवाड, सुनीता आरळीकर, विलास माने यांचे शिक्षण हे अगदीच जेमतेम झालेले; पण या तिघांनी जे दुःख भोगलेले आहे, त्यास तेवढ्याच ताकदीने व्यक्त करण्याचे शब्दसामर्थ्य या तिघांजवळ आहे. याच परंपरे हरिदास आडसूळ यांची आत्मकथा ‘आलिया भोगाशी’ येते. ग्रंथपाल पांडुरंग आडसूळ यांचे हे धाकटे बंधू. या आत्मकथेत आडसूळ कुटुंबाने जीवनाशी जो संघर्ष केलेला आहे, तो तेवढ्याच समर्थ शब्दांतून व्यक्त झालेला आहे. अहमदपूरचा तरुण मोईन कादरी याचे जे एक पुस्तक साधना प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झालेले आहे, तेही आत्मकथनाच्या जवळ जाते. या प्रतिभासंपन्न तरुणाकडून लेखनाच्या खूप अपेक्षा आहेत. अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांची आत्मकथा ‘सत्त्वपरीक्षा’ ही एका वकिलाची आत्मकथा नसून तत्त्वनिष्ठ राजकारण करणार्‍या, समाजाची बांधिलकी पत्करलेल्या एका संवेदनशील माणसाची आत्मकथा आहे. विशेषतः ते ज्या कौटुंबिक ताणातून गेलेले आहेत, ते सर्व विषण्ण करणारे आहे.  

लघुकथा - उपरोक्त तिन्ही पिढ्यांतील लेखकांनी हा वाङ्मयप्रकार हाताळलेला आहे. श्री. रा. रं. बोराडे या क्षेत्रात शीर्षस्थानी आहेत. स्मृतिशेष डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या लघुकथेतून खेडेगावातील रंजलेल्या-गांजलेल्या शेतकर्‍यांचे व शेतमजुरांचे अस्वस्थ करणारे चित्रण झालेले आहे. या क्षेत्रात दोन लेखिकांनी दमदार असे लेखन केलेले आहे. सौ. ललिता गादगे व मेनका धुमाळे. याच परंपरेत नयन राजमानेची लघुकथादेखील येते. नंदकुमार बालुरे, अंकुश सिंदगीकर, वृषाली पाटील, आत्माराम गोडबोले, अंबादास केदार यांच्या लघुकथांतून समसामयिक प्रश्‍नांना स्पर्श करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

कादंबरी - येथेदेखील श्री. रा. रं. बोराडे हे शीर्षस्थानी आहेत. त्यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीने लिहिणारे व संपूर्ण महाराष्ट्रातील सुजाण वाचकांचे लक्ष आपल्या कादंबऱ्यांकडे वेधून घेणारे डॉ. शेषराव मोहिते आहेत. ‘असे जगणे तोलाचे’ व ‘धूळपेरणी’ या दोन कादंबऱ्यांतून त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव मांडलेले आहे. रामराजे अत्राम यांच्या कादंबऱ्यांतून भटक्या-विमुक्तांच्या जीवनाला वाचा फोडण्यात आलेली आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. एम. वाघमारे यांनीदेखील हा वाङ्मयप्रकार हाताळलेला आहे. त्यांची एकच कादंबरी प्रकाशित झालेली आहे. उदगीरचे श्री. माधव कदम याचीं एक कादंबरी सीमाप्रश्‍नाशी संबंधित आहे. मागील ५०-६० वर्षांपासून सीमाभागात राहणाऱ्या कर्नाटकातील मराठी भाषिकांची कथा-व्यथा यातून व्यक्त झालेली आहे.

तिसऱ्या पिढीतील लेखक श्री. विवेक कुलकर्णी यांची ‘लातूर पॅटर्न’ ही छोटीशी कादंबरी. मध्यमवर्गीय घरात मेडिकल-इंजिनिअरच्या हव्यासापोटी तरुणांवर जे अनेक दबाव पालकांकडून आणले जातात आणि त्यामुळे तरुणमनाची जी अवस्था होते, त्याचे अत्यंत प्रभावपूर्ण चित्रण या कादंबरीतून झालेली आहे. या लेखकाची ही पहिलीच कादंबरी; पण दर्जेदार अशी. या कादंबरीची जशी चर्चा व्हावयास हवी तशी झालेली नाही. ‘लातूर पॅटर्न’च्या नावाखाली कोणकोणते प्रकार चालतात, किशोरावस्थेतील मुला-मुलींवर मानसिक अत्याचार कसे होतात, हे सर्व अत्यंत सूत्ररूपात येथे मांडण्यात आलेले आहे. ही एकमेव अशी कादंबरी आहे, ज्यात लातूर शहर जिवंत झालेले आहेत. येथील गल्ल्या-बोळ्या, नवीन कॉलनीज, दुकाने, व्यवसाय, ट्यूशन्स, कॉलेज सर्व काही यात आहे. या जिल्ह्यात बहुतेक लेखकांच्या कथात्मक साहित्यातून येथील खेडी, तेथील भूगोल, समाज, वगैरे जिवंत झालेल्या आहेत. लघुकथेतून देखील खेड्यांचेच दर्शन घडते. लातूर शहराचे व या शहरात जगणाऱ्या, नोकरी करणार्‍या मध्यमवर्गीयांचे चित्रण करणारी ही एकमेव अशी कादंबरी. या कादंबरीवर नव्याने चर्चा होण्याची गरज आहे. या लेखकाकडून खूप अपेक्षा आहेत; पण एका कादंबरीलेखनानंतर हा लेखक थांबलेला दिसतो.

कविता - इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा हा वाङ्मयप्रकार खूपच गंभीर असा व कवींच्या प्रतिभेसाठी आव्हानात्मक असतो. पहिल्या पिढीतील दोन-चार कवी जर सोडले, तर या क्षेत्रात दमदार अशी कामगिरी फारशी कोणाची दिसून येत नाही. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील विलास पाटील (भंगलेले अभंग) हे ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूरला असतात. राजा होळकुंदे संपूर्ण कविता भूकंपावर आहेत. यांच्या कवितादेखील समर्थपणे आजच्या आर्थिक उदारीकरणात जगणाऱ्या माणसांच्या व्यथांना समर्थपणे भिडतात. तर रमेश चिल्लेंच्या कवितेत निसर्ग, शेतकरी, शेतकऱ्यांची दुःख डोकावतात. या पिढीतील संजय घाडगे हे प्रतिभासंपन्न कवी आहेत. यांचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. दलित कवितेत त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. उदगीरचे चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर एका प्रदीर्घ कवितेची निर्मिती केलेली आहे. या चार-पाच कवींचा अपवाद सोडला तर या क्षेत्रात आनंदीआनंद आहे. यात अगदीच तरुण पिढीतला अशफाक शेख (अस्वस्थ दिशांचे कोलाज) आहे, ज्याच्या कवितेतून आर्थिक उदारीकरणात पिसलेल्या माणसाचे एकटेपण व्यक्त झालेले आहे. या जिल्ह्यातील कवींची संख्या कदाचित शंभराच्या वर भरेल; पण या कवींच्या कवितांच्या दर्जाबद्दल न बोललेलेच बरे.

२५-३० वर्षांपूर्वी कुठलाही कवी आपला काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी घाई करीत नव्हता. तो कविता करायचा, मित्रांना वाचून दाखवावयाचा, नियतकालिकांतून प्रकाशित करायचा. रसिकांत कवी म्हणून त्याची ओळख निर्माण झाल्यानंतरच तो काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा विचार करीत असे. त्या काळी प्रकाशक फक्त पुणे, मुंबई व नागपूर येथेच होते. मुद्रणव्यवस्थेत १९९० नंतर क्रांतिकारी बदल झाले. आधीच्या कवींच्या तुलनेत आताच्या कवींची आर्थिक स्थितीदेखील उत्तम आहे. अर्थात त्यांचीच जे एकतर सरकारी कर्मचारी आहेत किंवा शिक्षक-शिक्षिका. आता गल्लोगल्ली तथाकथित प्रकाशक (प्रकाशक कसले? हे तर मुद्रकच!) पुस्तक छापून देण्याचा धंदा करीत आहेत. १०-१२ हजार दिले की पुस्तक तयार. त्यानंतर त्याचा शानदार प्रकाशन समारंभ. काही तथाकथित समीक्षक या कवितांची वारेमाप स्तुती करणार आणि आपले लेखन सार्थक झाले या अहंकारात कवी जगणार. असे डझनावारी कवी आज महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या जिल्ह्या-जिल्ह्यातून दिसत आहेत. शब्दाला शब्द जोडणे म्हणजे कविता नसते याचे भानच या मंडळींना नसते. मी हे सर्व अत्यंत जबाबदारीतून मांडत आहे. कारण माझ्याकडे दरवर्षी किमान ३०-४० काव्यसंग्रह येतात. कवी खूप भक्तिभावाने हे काव्यसंग्रह मला देत असतात. हे काव्यसंग्रह मी खूप गांभीर्याने वाचत असतो. हिंदीतदेखील अशीच अवस्था आहे. स्मृतिशेष गो. पु. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे या कवींचे हे संग्रह पर्यावरणाचा विनाश करीत आहेत. कारण एक काव्यसंग्रह छापण्यासाठी जो कागद लागतो, त्यातून पृथ्वीतलावरचे एक झाड नष्ट होत असते. त्यामुळे नवोदित कवींना माझी कळकळीची विनंती की, त्यांनी आधी कवी म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. दर्जेदार नियतकालिकातून प्रकाशित व्हावे. रसिकांचा व प्रकाशकांचा आग्रह झाल्यावरच संग्रह प्रकाशित करावा; पण पर्यावरणाचा विनाश मात्र करू नये.

वैचारिक लेखन - या क्षेत्रातील सर्वांत मोठे नाव डॉ. जे. एम. वाघमारे यांचेच आहे. शिक्षण, साहित्य, संवैधानिक मूल्ये- स्वातंत्र्य, समता, गुलामी या विषयावर अत्यंत मूलगामी लेखन करणारे वाघमारे हे या जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात आदरणीय आहेत.

या क्षेत्रातील दुसरे नाव अतुल देऊळगावकरचे आहे. पर्यावरण व दुष्काळ या विषयावर त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके प्रकाशित आहेत. त्याशिवाय प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन व गांधीवादी आर्किटेक्ट लॉरी बेकर यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके महत्त्वाची आहेत. डॉ. नागोराव कुंभारांच्या लेखनाची सुरुवातच भ्रष्टाचार या दुष्प्रवृत्तीच्या सांगोपांग विवेचनाने होते. वैचारिक लेखनासंबंधात त्यांनी बांधिलकीच पत्करलेली आहे.

समीक्षा - समीक्षा व वैचारिक लेखनाच्या सीमारेक्षा अंधुक अशा आहेत. याही क्षेत्रात डॉ. जे. एम. वाघमारे हे शीर्षस्थानी आहेत. फ. म. शहाजिंदे यांनी मुस्लिम मराठी साहित्याच्या स्वरूपाबद्दल महत्त्वाचे लेखन केलेले आहे. तरुण पिढीतील दोन समीक्षकांबद्दल माझ्यासारख्यांच्या खूप अपेक्षा आहेत. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी व डॉ. जयद्रथ जाधव.

सत्यशोधकी साहित्य उजेडात आणणारे, त्या साहित्याची समीक्षा करणारे डॉ. श्रीराम गुंदेकर आज आपल्यात नाहीत; पण जे काम लाखो रुपये खर्चून एखादी संस्था किंवा पाच-सहा जणांचा समूहदेखील इतक्या कमी वेळेत करू शकत नाहीत, ते काम एकट्या गुंदेकरांनी दोन वर्षांत पूर्ण केलेले आहे. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास त्यांनी चार खंडांतून (प्रत्येकी खंड आठशे-नऊशे पानांचा) सिद्ध केलेला आहे. या कार्यातून त्यांनी लातूरचे नाव मराठी साहित्यात अमर केले आहे.

नियतकालिके - प्रत्येक अंक एका विशिष्ट विषयाला वाहिलेले ‘विचारशलाका’ हे त्रैमासिक मागील २५ वर्षांपासून नियमाने प्रकाशित होत आहे. डॉ. नागोराव कुंभारांचे हे एक स्वप्न होते आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलेदेखील. ‘विचारशलाका’त छापून येणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. इतके दर्जेदार लेख मिळवण्यासाठी डॉ. कुंभार जे परिश्रम घेता, जो मागोवा घेतात ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही. अभ्यासू माणसे त्यांनी हेरली. त्यांना लिहितं केलं. आपल्या जिद्दीतून, कर्तृत्त्वातून, दृढनिश्चयातून काय साध्य होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. असे अंक काढणे हे आर्थिकदृष्ट्या कधीच फायद्याचे नसते. डॉ. कुंभार यांनी कित्येक वर्षे पदरमोड करून हे त्रैमासिक टिकवून ठेवलेले आहे.

निरीक्षणे

लातूर जिल्ह्यातील साहित्यलेखन व येथील साहित्यकारांसंबंधी माझी काही निरीक्षणे येथे नोंदवत आहे.

१. लातूर जिल्ह्यातील पहिल्या दोन पिढ्यांतील लेखक/लेखिका हे परिवर्तनवादी चळवळीशी घट्टपणे जोडली गेलेली होती. त्यांच्या जीवनाची सुरुवातच मूळी कार्यकर्ता म्हणून झालेली होती. डॉ. श्रीराम गुंदेकर ‘युक्रांद’च्या चळवळीत होते. डॉ. शेषराव मोहिते व रमेश चिल्ले शेतकरी संघटनेशी संबंधित होते. लक्ष्मण गायकवाड डाव्या चळवळीचे मजूर कार्यकर्ता होते. सुनिता आरळीकर ‘युक्रांद’मध्ये सक्रिय होत्या. संजय घाडगे दलित चळवळीशी संबंधित होते. फ. म. शहाजिंदे आधी सत्यशोधक मुस्लिम चळवळीशी जोडले गेले होते. डॉ. जनार्दन वाघमारे तर महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीच्या शीर्षस्थानी होते व आहेत. राजा होळकुंदे परिवर्तनवादी विचारांशी बांधिलकी पत्करून लिहीत आहेत. चळवळीशी संबंधित असल्यामुळेच यांच्या लेखनात ‘नाही रे’ वर्गाचे चित्रण अधिक प्रमाणात दिसून येते; पण तिसऱ्या पिढीतील लेखक/लेखिकांचा संबंध चळवळीशी, परिवर्तनवादी विचारांशी फारसा दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्या लेखनाला भरभक्कम असा वैचारिक बांधिलकीचा पाया दिसून येत नाही. त्यांचे वाचनदेखील खूप मर्यादित असे वाटते.

२. १९९२ मध्ये लातूर परिसरात जो महाभयंकर भूकंप झाला, तयातून हजारो स्त्री-पुरुषांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले. यावर वृत्तपत्रीय लेखन बरेच झाले; पण या विषयावर येथील लेखकांनी फारसे लेखन केले नसल्याचे जाणवते. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्यांच्या जीवनास येथील लेखक/कवी सर्जनात्मक पातळीवर घेऊन जाऊ शकले नाहीत, ही माझ्यासारख्याची व्यथा आहे.

३. या जिल्ह्यातील साहित्यात ग्रामीण जीवनाचे उत्कट असे चित्रण झालेले आहे; पण मागील काही वर्षांत निमशहरी गावातून (लातूर, निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर) जो मध्यमवर्ग आकार घेत आहे, त्या मध्यमवर्गाच्या भावविश्‍वावर, त्यांच्या जीनवशैलीवर, त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या अगतिकतेवर फारसे लेखन झालेले नाही. अपवाद ललिता गादगे व मेनका धुमाळे यांच्या लघुकथा आहेत.

४. मुख्य म्हणजे ज्या लातूर जिल्ह्यात आज हे संमेलन भरत आहे, त्या लातूर शहराचे दर्शन येथील लेखक-कवींच्या लेखनातून फारसे होत नाही. अपवाद आत्मकथांचा आहे. डॉ जे. एम. वाघमारे, डॉ. मनोहरराव गोमारे, सुनिता आरळीकर, लक्ष्मण गायकवाड यांच्या आत्मकथांतून त्यांच्या काळातील लातूर शहराचे दर्शन होते.

५. ‘प्रयोगशीलतेचा अभाव’ हे या साहित्याचे वैशिष्ट्य किंवा दोष म्हणा; पण ही वस्तुस्थिती आहे. भाषिक प्रयोगशीलता नाही, शैली किंवा निवेदनात प्रयोगशीलता नाही. मंदगतीने का होईना, आर्थिक उदारीकरणानंतर येथील स्त्री-पुरुषांच्या जीवनशैलीत, भावविश्वात सूक्ष्म बदल होत चाललेले आहेत. हे बदल ताकदीने व्यक्त करण्यात तिसऱ्या पिढीतील लेखक-कवी कमी पडत गेल्याचे जाणवते. अनुभूती-अभिव्यक्तीच्या पातळीवर विद्रोहाचे स्वर नाहीत.

सावधगिरी

तिसऱ्या पिढीतील लेखक-कवी हे आधुनिक माध्यमांचा (फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट) उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहेत, ही स्वागताची बाब आहे; पण यामुळे त्यांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची कक्षा अवरूद्ध होण्याची भीतीदेखील आहे. विशेषतः, अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपचे अनेक गट तयार झालेले आहेत. हे गट आपापसात आपल्या लेखनाची माहिती देत असतात. आपले प्रकाशित झालेले लेख व कविता आपल्या ग्रुपसमोर नेतात. मग त्याची प्रशंसा होते. या अशा प्रशंसेतून त्यांचा अहंकार सुखावतो. मग ते स्वतःला विशेष समजत जातात. आत्मपरीक्षणाची प्रक्रियाच संपुष्टात येते. माझ्यासारखा कोणी त्या लेखनाच्या मर्यादा दाखवू लागला तर त्याला ‘वेडा’ जाहीर करण्यात येते. हिंदीतील एक थोर कवी मुक्तिबोध यांनी लिहून ठेवले आहे की, प्रत्येक लेखकास स्वतःचा सतत शोध घ्यावयाचा असतो. स्वतःला सोलून काढावे लागते. (खुद को तलाशना और तराशना पड़ता है।) पण अलीकडचे लेखक हे स्वतःच्या लेखनाकडे तटस्थतेने पाहत नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखन हे एका समूहापर्यंत, जातीपर्यंतच मर्यादित राहते.

समारोप

उपरोक्त संपूर्ण मांड मांडणीच्या मर्यादा मला माहीत आहेत. कदाचित काही महत्त्वाच्या लेखकांच्या/कवींची नावे राहून गेल्याची शक्यता आहे. त्याला माझे ‘अज्ञान’ कारणीभूत आहे. या संपूर्ण मांडणीत या जिल्ह्यातील केवळ मराठीतील लेखकांचाच विचार करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातून इंग्रजी, उर्दू व हिंदीतून देखील बरेच लेखन झालेले आहे; पण त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी जाणूनबुजून केलेला नाही. कारण ऐकणाऱ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाऊ नये, म्हणून मी ते टाळलेले आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................