क्लेमेंट फावाले : मुंबई विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अॅम्बेसेडर’!
पडघम - सांस्कृतिक
ऋषिकेश पाटील
  • क्लेमेंट फावाले
  • Wed , 21 November 2018
  • पडघम सांस्कृतिक क्लेमेंट फावाले मुंबई विद्यापीठ

दररोजच्या वर्णभेदाला आणि तिरस्काराला सामोऱ्या जाणाऱ्या क्लेमेंट फावाले या नायजेरीयन विद्यार्थ्यानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती की, तो पुढे जाऊन मुंबई विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अॅम्बेसेडर’ होईल! या अनोख्या प्रवासाबद्दल त्याच्याकडून जाणून घेण्यासाठी मी त्याची मुंबई विद्यापीठात जाऊन मुलाखत घेतली.   

क्लेमेंट फावाले हा नायजेरीयन विद्यार्थी २०१३ मध्ये मुंबईत बी.ए. इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी आला. त्यानं आर.डी. नॅशनल कॉलेज (वांद्रे) येथे प्रवेश घेतला आणि त्याच्या मुंबईतल्या प्रवासाला सुरुवात झाली. मुंबईत सगळ्यांना सतावणारी समस्या क्लेमेंटलाही भेडसावत होती आणि ती म्हणजे जागेची. घरांचं अवास्तव भाडं, त्यात विद्यार्थ्यांना घर मिळताना होणारा त्रास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आफ्रिकन लोकांबाबत आपल्या समाजाच्या मनात असलेला पूर्वग्रह. या सर्व कारणांमुळे क्लेमेंटला घर मिळताना प्रचंड त्रास झाला. त्यानं मुंबई उपनगर अक्षरशः पिंजून काढलं. घरमालकांचे टोमणे, आक्षेपार्ह हातवारे, हे सर्व सहन करत शेवटी दीड महिन्यांनी त्याला वसईत घर मिळालं.

एक अडथळा दूर झाला खरा, पण त्याहून भयानक सामाजिक स्तरावरच्या समस्यांना पुढे तोंड द्यायचं होतं. त्याला लोकलमधून प्रवास करायचा होता; बस, रिक्षा, टॅक्सीतून फिरायचं होतं, सार्वजनिक ठिकाणी जायचं होतं. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अतिशय साध्या आणि सामान्य असल्या तरी एका आफ्रिकन विद्यार्थ्यासाठी मानसिक त्रास होण्याची माध्यमं होती. आणि मुख्य म्हणजे याची क्लेमेंटला त्या कोवळ्या वयात जराही कल्पना नव्हती.

विरार ते वांद्रे या प्रवासातले लोकलमधले किस्से तो मला सांगत होता... कशा प्रकारे लोक त्याच्याकडे संशयित नजरेनं सारखे बघत राहायचे. तो लोकलमध्ये घुसल्यावर आई-बहिणी आपल्या मुला-बाळांना जवळ घ्यायच्या, लोक तो जवळ आल्यावर उठून बाजूला सरकून बसायचे. त्याला अक्षरशः एखाद्या अस्पृश्य माणसाप्रमाणे वागणूक मिळायची. शेअर-रिक्षामध्ये तर तो चढल्यावर लोक उतरून जायचे. बसमध्येही लोक जागा बदलून घ्यायचे किंवा जागा नसलीच तर चक्क पूर्ण प्रवास उभे राहून करायचे. हे सगळे अनुभव एका १८ वर्षांच्या परदेशी मुलासाठी किती तरी भयानक होते!

क्लेमेंटला कॉलेजमध्येही सुरुवातीला लोकांनी ‘हाडतहुडुत’ केलं. त्याला ‘कालिया’, ‘काळू’, ‘माकड’ आणि बरीच विकृत वर्णभेदी टोपणनावंही देण्यात आली. नंतर–नंतर तर या टोपणनावांचा त्रास एवढा वाढला की, त्यानंही प्रतिकार करायला सुरुवात केली. पण थोड्याच दिवसांत त्याला कळून चुकलं की, या प्रतिकाराला काहीच अर्थ नव्हता. कारण लोक त्याला चिडलेलं पाहून अजून त्रास देऊ लागले. तो सांगतो की, तो काळ त्याच्यासाठी सगळ्यात खडतर होता. रात्र-रात्रभर त्याला झोप लागायची नाही आणि अभ्यासातही त्याचं मन लागायचं नाही.

या काळात त्याच्या भावानं त्याची खूप मदत केली. त्याला मानसिक आधार दिला आणि या अवघड प्रसंगातून त्याला मार्ग दाखवला. क्लेमेंटनं परिस्थिती शांततेनं हाताळायला सुरुवात केली. त्यानं  लोकांना प्रतिकार करणं थांबवलं नाही, पण त्यांच्यावर न चिडता त्यांना रोखण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या.

लोकलमध्ये बसल्यावर उठून जाणाऱ्या प्रवाशांना तो उपहासात्मक ‘थँक यू’ म्हणू लागला आणि त्यांचा जागेवर जाऊन आरामात बसू लागला. रिक्षात क्लेमेंट बसल्यावर ज्या लोकांना त्रास व्हायचा आणि जे उठून जायचे, त्यांना तो स्वतः पैसे देऊन सांगायचा की, दुसऱ्या रिक्षात जाऊन बसा. कॉलेजमधल्या त्रासदायक विद्यार्थ्यांकडे तो दुर्लक्ष, प्रसंगी त्यांना शांतपणे समजावू लागला. याचे परिणामही त्याला लगेच दिसू लागले. त्याच्या नैराश्येचं रूपांतर आत्मविश्वासामध्ये झालं… आणि त्याच आत्मविश्वासामुळे त्याची अभ्यासातही प्रगती होऊ लागली. तो चांगल्या मार्कांनी पदवीधर झाला.

त्याचं म्हणणं होतं की, कॉलेज आणि एकूणच समाजात लोकांना संभाषण सुरू करण्यात समस्या जाणवते. संभाषण सुरू करण्यासाठी बरेच जण उपहास, टिंगल-टवाळी, मस्करी हे मार्ग अवलंबतात आणि तिथेच भेदभाव सुरू होतो. क्लेमेंट म्हणतो की, परदेशी विद्यार्थ्यांसोबत संभाषणातली सगळ्यात मोठी अडचण हीच आहे.

क्लेमेंटसाठी मुंबई विद्यापीठातून एम.ए. राजकारण आणि समाजकारणाचं शिक्षण घेणं हा एक सुखद अनुभव होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे विद्यापीठात बाकी शहराच्या तुलनेत फारच कमी भेदभाव करण्यात आला. सगळ्यांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं. त्याची प्रश्न विचारण्याची व सतत जाणून घ्यायची वृत्ती शिक्षकांना आवडली आणि तो अल्पावधीतच त्या विभागात सगळ्यांचा आवडता झाला.

सहन करण्याची तसंच अन्यायाला विरोध करण्याची शक्ती, अतोनात मेहनत घेण्याची तयारी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर आज तो मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अॅम्बेसेडर आहे. तो या उपलब्धीत सगळ्यांना सामील करू इच्छितो. “माझ्या भावाबरोबरच माझ्या भारतीय मित्रांचा, तसंच प्राध्यापकांचाही माझ्या गेल्या चार-पाच वर्षांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे,” हे सांगायलाही तो विसरत नाही.

“जगाविरुद्ध चिडून, आक्रमक संघर्ष करून काहीच फायदा नाही. त्यांना उलट तुम्ही कारणच द्याल, तुमचा तिरस्कार करायला. त्यापेक्षा शांततेनं, चलाखीनं या प्रवृत्तींचा विरोध करणंच जास्त परिणामकारक आहे,” हे शब्द होते क्लेमेंटचे… अशा एका २३ वर्षीय मुलाचे ज्याने भारतात येऊन खूप त्रास सहन केला, कारणाविना मार खाल्ला...

आजच्या असहिष्णू युगात क्लेमेंटसारख्यांचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या बोलण्यातली, वागण्यातली आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टीतली परिपक्वता खरंच अनुकरणीय आहे.

“दुसऱ्याच्या रंगाचा, त्यांच्या संस्कृतीचा, धर्माचा आदर करण्याची भावना प्रत्येकात जोपासली गेली तरच अशा सामाजिक विकृतींपासून आपली खरोखरच सुटका होईल,” असं म्हणताना तो थोडासा भावूकही झाला, पण लगेचच त्यानं चेहऱ्यावर स्मितहास्य आणलं आणि वर्गात जाण्यासाठी त्यानं माझी रजा घेतली…

महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी वागणूक मिळाली. त्याविरुद्ध त्यांनी शांततेनं लढा दिला आणि तिथल्या सामान्य जनतेसमोर एक आदर्श ठेवला. त्याच महात्मा गांधींच्या देशात आज एक परदेशी नागरिक वर्णद्वेषाविरुद्ध लढा देत आहे याहून लाजीरवाणी गोष्ट ती कुठली असावी?  एक-दोघांच्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण समाजालाच वाळीत टाकण्याची प्रथा आपल्या देशात कधी संपणार?

या दोन तासांच्या मुलाखतीतून शिकण्यासारखं बरंच काही मिळालं आणि आपलं बाह्य रूप किती क्षुल्लक आहे, याचीही प्रचीती आली.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 26 November 2018

ऋषिकेश पाटील, तुम्हाला आपलं बाह्य रूप किती क्षुल्लक आहे, याचीही प्रचीती आली.....? म्हणजे नेमकं काय? माझं बाह्य रूप आजिबात क्षुल्लक नाही. मी स्वत:ला या सरसकटीकरणातून वगळंत आहे. बाकी, क्लेमंटला आलेले अनुभव अनुचित होते याच्याशी सहमत आहे. पण हे अनुभव का आले त्याच्यामागील कारण वेगळंच आहे. क्लेमंटसारख्या दिसणाऱ्या नायजेरियन लोकांनी ड्रगचा धंदा करून उच्छाद मांडला आहे. त्याची शिक्षा बिचाऱ्या क्लेमंटास भोगावी लागली, याचा खेद आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


vijaya patil

Fri , 23 November 2018

changala lekh aavadala.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......