इराच्या ‘लॉजिकल’ बोलण्याचं क्रेडिट तिच्या ‘आई’ला द्यायला हवं!  
पडघम - बालदिन विशेष
किशोर रक्ताटे
  • किशोर रक्ताटे पत्नी व लेकीसह
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November किशाेर रक्ताटे Kishor Raktate

इराचा जन्म जून २०१४मधला. तिला वाढवण्यात अन्‍ थोडंफार घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुढाकाराबाबत लिहितो आहे. खरं तर तिला काहीतरी शिकवण्याच्या नादात मीच रोज काहीतरी नवीन शिकतो. त्यामुळे तिच्या निमित्तानं काहीतरी लिहिताना खूप छान वाटतंय. कुठल्याही आई-बापाला पहिल्या अपत्याचं जरा जास्तच कौतुक असतं! आमचंही तसंच असावं!! मुलं घडवणं, ही प्रत्येक पिढीची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे मी जे काही सांगणार आहे, ते काही फार विशेष किंवा वेगळं आहे, म्हणून मी सांगत नाहीये. मी सर्वसाधारणपणे पार पाडत असलेली जबाबदारी, या निमित्तानं विशद करतो आहे.  

मला नॉर्मली एकदम लहान, म्हणजे साधारण जन्मल्यापासून सहा महिन्यांपर्यंतची मुलं जवळ घ्यायला भीती वाटायची. एकदम लहान मुलांना कसं हाताळावं, हाच प्रश्न माझ्या मनात इराच्या जन्मापर्यंत होता. अर्थात, इरा त्याला अपवाद ठरली. त्यातच विशेष आनंदाची बाजू म्हणजे, पोरगी दिसण्याच्या बाबतीत माझ्यावर गेलीये. मुलीचं अन् बापाचं नात वेगळं असतं असं म्हणतात, त्याचाही हा परिणाम असावा! त्यामुळे ती अगदी लहान असल्यापासून माझी तिच्याबद्दलची आपुलकी अधिकच वाढत गेली. मात्र असं असलं, तरी लहान मूल हाताळण्याची अजिबात सवय अन्‍ आवड नसल्यानं ती थोडी कळती होईपर्यंत तिला सांभाळणं मला कठीण गेलं.

इराची आई तेजस्वी पोलिस खात्यात अधिकारी (IPS) पदावर आहे. त्यामुळे इराच्या जन्माच्या वेळी तिला मर्यादित काळासाठी सुट्टी होती. त्यामुळे इराच्या काही गोष्टींची सवय मला करून घेणं आवश्यक होतं. ही सवय हळूहळू होत गेली; पण त्या वेळी माझी नोकरी पुणे विद्यापीठात होती अन् तेजस्वी तेव्हा नोकरीनिमित्त जालन्याला होती. तसं पाहता, दोघांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा होता. त्याच वेळी इराला सांभाळण्यासाठी काय करावं, असा प्रश्न एकीकडे असताना; दुसरीकडे सामाजिक काम करण्याची ओढ मनात आकार घेत होती. करिअर अन्‍ कुटुंब एकाच वेळी निर्णायक वळणावर होतं. मग नोकरी सोडून इराला (कुटुंबाला) वेळ देता येईल अन् मनासारखं सामाजिक कामही करता येईल, या भूमिकेतून मी नोकरी सोडली आणि नगरला एक संस्था सुरू केली. ती संस्था स्थिरस्थावर झाल्यावर जास्तीत जास्त वेळ इराला, म्हणजे पर्यायानं कुटुंबाला देण्याचं मनाशी ठरवलं.

इरा सहा महिन्यांची व्हायच्या अगोदरच तेजस्वीची सुट्टी संपली होती. त्यामुळे तेजस्वीच्या कामाच्या काळात इराला कोण सांभाळणार, असा प्रश्न होता. त्यात पोलीस खात्यातल्या नोकरीत कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून दोन महिने तेजस्वीची आई, साधारण तेवढाच काळ तेजस्वीची मावशी अन् सीएच्या परीक्षेचा अभ्यास सोडून काही महिने तेजस्वीची बहीण यशस्वी, तर काही काळ माझी बहीण अशा सगळ्यांनी मिळून इराला काही महिने सांभाळलं. काही काळ तेजस्वीनं एकटीनं इराला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण नेमक्या त्याच काळात तिच्याकडे अतिरिक्त चार्ज आला. त्यासाठी तिला मोठा प्रवास करावा लागायचा. त्यातच मी संस्थेच्या कामात जास्तच अडकत गेलो अन् इराकडे दुर्लक्ष होत गेलं. पुढे तेजस्वीचं फेज टूचं ट्रेनिंग आलं. त्यामुळे इरा एक वर्षाची व्हायच्या आधीच तिला तेजस्वीच्या आईकडे शेवगावला ठेवावं लागलं. मात्र या काळात आम्ही दोघंही तिच्या जवळ नसल्याचं आमच्या दोघांच्याही मनाला चांगलंच लागलं होतं. 

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

‘आपण जन्माला घातलेलं लेकरू आपण नीट वाढवू शकलो नाही, तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही’, असंच आम्हा दोघा उभयतांना त्या वेळी वाटत होतं. इराला आज्जीकडे ठेवलं, तेव्हा खरं तर ती अतिशय योग्य अन्‍ अनुभवी व्यक्तीकडे होती, पण तरी आमचं मन आम्हाला खात होतं; भावनिक स्तरावर कोलाहाल होत होता. त्यामुळे त्या वेळी आम्ही करिअरशी तडजोड करायचं पक्कं केलं अन् पुण्यात आलो. तेजस्वीनं पुण्यात बदलीसाठी अर्ज केला. ‘मिळेल त्या पदावर काम करू या, पण इराला न्याय देऊ या’, असं ठरवलं. होती त्या परिस्थितीत मी नगरची संस्था एका मित्राला विनाअट हस्तांतरित केली. आर्थिक नुकसान दिसत असतानाही आणि ते सहजासहजी पेलण्याच्या पलीकडचं असतानाही आम्ही हा निर्णय घेतला होता. अखेर आम्ही पुण्यात आलो आणि खर्‍या अर्थानं कुटुंब म्हणून जगणं अनुभवत इराला घडवत गेलो. इरानं आमच्या आयुष्यात इतका आनंद आणला की, संध्याकाळ झाली की, सगळी कामं मागे ठेवून पाय घराकडे निघत असत. आम्ही तिच्यासाठी वेळ कसा द्यायला लागलो, हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. लहान मुलांसोबत लहान होऊन मोठं होण्याचा संस्कार करणं काय असतं, हे आम्ही शिकत गेलो अन् शिकवत गेलो.  

पुण्यात आल्यावर मी नवा व्यवसाय सुरू केला. तेजस्वी त्या वेळी सीआयडीमध्ये कार्यरत होती. आम्ही दोघंही इराला शक्य तेवढा वेळ देत गेलो. तेजस्वीच्या ऑफिसला गेल्यावर मी इराला डे-केअर सेंटरला सोडायचो. संध्याकाळी आमच्यापैकी जो अगोदर मोकळा होई, तो तिला घेऊन घरी घेऊन जाई. इराचं कोणतं काम कोणी करायचं, असं आम्ही आजवर ठरवलेलं नाही. ज्याच्यासमोर जे येईल, त्यानं ते काम बिनदिक्कत करायचं. इराची सगळी कामं मी आनंदानं केली अन्‍ करतो. तेजस्वी अर्थात बहुतांश गोष्टी करत होतीच; पण तिला कार्यालयीन वेळा पाळाव्या लागायच्या. लहान मुलांचं कुठल्या वेळी काय करावं लागेल, ते सांगता येत नाही. त्यामुळे इराच्या मूडप्रमाणे येणारी सगळी कामं मला करावी लागत होती. त्याची मला सवय नव्हती. त्यातलं एक काम म्हणजे, मला तिला अंघोळ घालणं काही दिवस जमत नव्हतं. त्यामुळे मी तेजस्वीला म्हणायचो की, ‘‘मला तू इराचं बाकी कुठलंही काम सांग, पण हे अंघोळ घालणं मात्र मला जमत नाही. ते तूच करत जा’’. पण तेजस्वी म्हणाली की, ‘‘आपत्कालीन परिस्थितीत हे तुला जमलं पाहिजे. त्यामुळे मी असताना तू ही कामं करायला सुरुवात कर आणि शिकून घे’’.  मग तिनं मला हेही काम शिकवलं.

अर्थात अंघोळ घालणं काही अवघड काम नाहीच, पण जे काम आधीच्या पिढीनं केलं नाही, ते पुढच्या पिढीला शिकायला अन्‍ अंगवळणी पडायला वेळ लागणारच! तसा तो मलाही  लागला. इराची इतर शुश्रुषा करायला किंवा इतर कुठलीही कामं करायला मला कधीच संकोच वाटला नाही. अगदी सुरुवातीला ही कामं करताना मला अडखळल्यासारखं निश्चितच वाटलं. मात्र काही दिवसांमध्येच ते सवयीचं झालं. माझ्या कुटुंबातल्या पुरुषांपैकी लहान मुलांची शुश्रूषा करणारा मी बहुदा पहिलाच असल्यानं कधी आई आली की, ती पटकन म्हणायची, ‘‘अरे, तू कशाला करतोस?’’ एरवी कामाचा वयानुरूप कंटाळा करणारी आई मुलगा असं काहीतरी कसं करतो म्हणून आश्चर्यचकित होऊन मध्ये यायची. थोडंसं समजवल्यावर तिनं मध्ये येणं थांबवलं.

इराचं कुठलंही काम करायला संकोच न केल्यानं आमच्या नात्यात अधिक घट्टपणा आला असावा. त्यामुळे जर इराला अंघोळ घालण्यात माझ्यावतीनं मोठा ब्रेक झाला, तर इरा माझ्या हातानं अंघोळ करण्यासाठी हट्ट धरते. तिचा हट्ट पुरवायला मलाही तेवढंच आवडतं. त्यात एक वेगळी मज्जा वाटते. कारण लहान मुलांचा हट्ट किंवा आग्रह धरणं फारच निराळं असतं; ती आपल्याला एकदम भावनिक करून टाकतात. कधी कधी तर इरा माझं आवरून झाल्यावर मी बाहेर पडत असताना पाय पकडून म्हणते, ‘‘आज तुमच्याच हातानं अंघोळ...’’ ‘‘थोडंसं अवघड आहे’’, असं म्हटलं, तर म्हणते, ‘‘स्वतःच्या मुलीला कोणी असं म्हणतं का!’’  मग काय! फिरावं लागतं मागे!

इराला वाढवताना येणारे अनुभव फार मजेशीर आहेत. तिनं काही नवीन केलं किंवा काही बोलली की, आम्ही तिचे आज्जी-आबा, मामा–मावशी, काका–काकू, आत्त्या–मामा यांना त्या गमती सांगतो. तिला काही गोष्टींचं कौतुक सांगितलेलं आवडतं, तर काही गोष्टींचं कौतुक सांगितलेलं अजिबातच आवडत नाही. जे तिला आवडत नाही, ते ती नोंदवते.

इरा खूप लवकर बोलायला लागली. वास्तविक, ‘लहान मुलं सुरुवातीला थोडंसं बोबडं बोलतात’, असा आमचा समज होता. तो तिनं खोटा ठरवला. ती बोबडं बोललेली आम्हाला आठवत नाही. अगदी सुरुवातीपासून ती पूर्ण वाक्य बोलायची अन् अतिशय स्पष्ट बोलायची. अर्थात, त्यामुळे अनेकदा आम्ही अडचणीतही सापडलो आहोत.

इरा अगदी दोन वर्षांची असेल. त्या वेळी आमच्याकडे नवीन पायपुसणं आणलं होतं. तिनं तिच्या उत्सुकतेपोटी विचारलं ‘‘हे काय आहे?’’ तिला सांगितलं की, ‘बाहेरून आल्यावर याच्यावर पाय पुसून आत यायचं असतं’. त्यानंतर काही वेळानं एक मित्र आला. तो नेहमी येणारा असल्यानं थेट हॉलमध्ये आला. मी दुसरीकडे काहीतरी करत होतो. तर माझ्या मित्राला इरानं ‘‘तुम्ही पाय पुसून आत आलात का?’’ असं विचारताच तोही दचकला. त्यानं ‘‘घाईत नाही पुसले’’ असं सांगितल्यावर इरानं त्याला हाताला धरून पाय पुसायला नेलं. दोन वर्षांची मुलगी आपल्याला असं कामाला लावते, हे त्याच्यासाठी लाजवण्याच्या पलीकडे होतं. त्यानंतर आम्हीदेखील इराला ‘‘आम्ही पाय पुसून आलोय’’ असं सांगायचो.   

वास्तविक, येणार्‍या प्रत्येक पाहुण्याला तिनं असं विचारणं बरं वाटे ना. म्हणून ‘कुणी आलं की त्यांना ‘तुम्ही जेवले का? जेवणार का?’ असं विचारावं’’, असं आम्ही तिला सहज सांगितलं. मग जो येईल त्याला ती विचारायची, ‘‘तुम्ही जेवले?’’. मात्र हा प्रश्न ती कुठल्याही वेळी येणार्‍या माणसाला विचारायची. त्यामुळे तिची ही सवयदेखील कालांतरानं अडचणीची ठरायला लागली. अर्थात, ‘आपण काय बोलतो’, हे काळाच्या ओघात तिला कळायला लागलं होतं; पण एकंदर संस्कार करणं अन् ते नेमकेपणानं पोहचवणं हे किती कठीण काम आहे, हे आम्हाला इराच्या निमित्तानं वेळोवेळी अधोरेखित होत राहतं. ज्या कोणत्या गोष्टीला आपण ‘चांगले संस्कार’ म्हणतो, ते करायला आपल्यामध्ये प्रचंड एकवाक्यता अन्‍ सातत्य लागतं, ही आमच्यासाठी मोठी शिकवण होती\आहे.

इराच्या जडणघडणीत तेजस्वीच्या आईचा मोठा वाटा आहे. त्या प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यातच त्यांनी आवड म्हणून बराच काळ पहिलीच्या मुलांना शिकवलं असल्यानं त्यांना लहान मुलांशी पॉजिटिव्हली डिल कसं करायचं असतं, ते नेमकेपणाने कळतं. त्यांच्याकडूनच शिकत शिकत आम्ही इराला घडवत आहोत.

इराच्या बोलण्यात इतकी स्पष्टता असते की, तिचे काही संवाद चार वर्षाच्या मुलीचे वाटत नाहीत. बरं, कुणाचं तरी बोलणं ती केवळ कॉपी-पेस्ट करत नाही. त्यामध्ये स्वतःचं लॉजिक ॲड करते. त्यातल एक उदाहरण म्हणजे, कधीतरी मी मोबाईलवर फेसबुक बघत असताना सध्याच्या काळातल्या एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याचा फोटो समोर आल्यावर ती म्हणाली, ‘‘पप्पा, हे कोण आहेत, मला माहीत आहे. हे सारखे टीव्हीवर येत असतात’’. मी म्हटलं, ‘‘पण मला नाही आवडत हे!’’ पुन्हा काही दिवसांनी प्रसंग तसाच. त्याच नेत्याचा फोटो समोर दिसल्यावर ती म्हणाली, ‘‘अरे, तुम्हांला आवडत नाही तरी का बघताय त्यांना?’’ आणि असं म्हणून पुन्हा खेळायला गेली. पुन्हा बर्‍याच वेळानं आली अन् म्हणाली, ‘‘जर तुम्हांला ते आवडत नाहीत, तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता.’’ मला प्रचंड हायसं वाटत होतं. मी तिला जवळ घेतलं अन्‍ म्हटलं, ‘‘बेटा, मी दुर्लक्ष केलं आहे हं! फेसबुकवर काही किमान गोष्टी पाहणं टाळता येत नाहीत.’’ पण मी तिला नीट समजावण्याच्या आतच ती पुन्हा खेळायला निघून गेली. थोड्या वेळानं पुन्हा आली अन् विचारायला लागली, ‘‘हे जे नेते तुम्हाला आवडत नाहीत, त्यांना तुम्ही कधी भेटलायत का?’’ मी ‘‘अर्थात नाही’’ म्हटल्यावर तर तिनं मला वेड्यात काढलं. तिच्या मते, ‘एखादी व्यक्ती आवडत नसल्याचं त्या व्यक्तीला न भेटताच आपण कसंकाय ठरवू शकतो!’ तिच्या या लॉजिकचं मला अपार कौतुक वाटलं. (सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व्यक्तींसंदर्भातली आवड-नावड ठरवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटण्याचा निकष आवश्यक नाही, पण तिच्या निरागस दृष्टीकोनातून आलेलं लॉजिक मला आवडून गेलं!). आता कधी त्या नेत्याचा फोटो किंवा काही दिसलं तर म्हणते, ‘‘अरे, नका बघू हा फोटो!’’ कारण विचारलं तर म्हणते, ‘‘खूप खोटं बोलतो हा माणूस!’’ लहान मुलांचं निरागसपण जपणं, ही आपली मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण समाज म्हणून दुर्दैवानं विसरत चाललो आहोत. तिथंच गडबड होत असावी!

लहान मुलांना आपण ज्या दिशेनं घेऊन जाऊ, त्या दिशेनं ती जातात; आपण जसं बोलू तसं ती बोलतात. इरा तिच्या आईच्या कार्यालयात गेल्यावर ‘फाईल क्लिअर झाली?’, असा प्रश्न नेहमी ऐकायची. मग घरी आल्यावर घरातला कागद खेळायला घेताना विचारायची, ‘‘आई, ही फाईल क्लिअर झालेली आहे ना?’’ आईपण गमतीनं ‘हो’ म्हणाली की, तो कागद ती खेळायला घेऊन जायची. तिच्या आईच्या स्टाफमधल्या लोकांना ती आधी आईप्रमाणेच हाक मारायची. मग आम्हीच त्यांना ‘मामा–काका’ म्हणायला सुरुवात केली. मुलांच्या संस्कारासाठी किमान घरच्या वातावरणात तरी प्रोटोकॉल मोडावे लागतात. आम्ही तसेही काही महान आई-बाप नाही; फार ठरवून संस्कार वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. जमेल तसं, झेपेल तेवढं सांगत राहतो. इरानं आमच्यासारखंच असावं, असा आमचा अट्ट्टाहास नाही. तिनं तिला आवडेल त्या दिशेनं जावं. ‘जास्तीत जास्त प्रवाह अन्‍ दिशा दाखवणं हे आपलं काम आहे’, या जाणिवेनं आम्ही प्रयत्न करत राहतो. अर्थात, जग खूप मोठं आहे. त्यामुळे आम्हाला तिला एकदम सगळंच सांगता किंवा दाखवता येणार नाही, या मर्यादेचीदेखील आम्हाला जाणीव आहे.

वास्तविक, अपत्य जन्माला घालण्यापासून आई अन् बाप यांच्या सारख्याच जबाबदार्‍या असायला हव्यात, पण निसर्गाला ते कदाचित मान्य नाही!  बाळ जन्माला घालण्यात सर्वाधिक कष्ट आईला पडतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तरी बापानं जास्त जबाबदार्‍या पार पाडायला हव्यात, असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात, असं वाटत असूनही मला फार मोठा न्याय देता आला, असंही नाही. फक्त स्वतः व्यावसायिक असल्यानं माझ्याकडे वेळेची लवचीकता असते. त्यामुळे इराला तिच्या मूडप्रमाणे वेळ देता येतो; तिचे छंद पुरवता येतात. तरीही इराचा दिवसभरातला बराचसा वेळ आमच्याशिवायच जातो. तिला सांभाळायला ठेवलेल्या मुलींशी ती पटकन ॲटॅच होते. अर्थात, ‘परिस्थिती माणसाला विशिष्ट समज देते’, असं जे म्हणतात, ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लागू होत असावं, असं आम्हाला इराच्या कोणाही बरोबर सहजपणे ॲडजेस्ट होण्याच्या सवयीवरून पुरेपूर पटतं. इरा जसजशी मोठी होतेय, तसतशा आम्हांला तिच्यासाठी आम्ही करू न शकलेल्या गोष्टी आठवत राहतात.        

मूल वाढवताना पती-पत्नी दोघंही वर्किंग असतील, तर मोठा संघर्ष होतो. खासकरून हा संघर्ष वेळेचा अन् जबाबदारी पार पाडण्याचा तर असतोच; पण त्याशिवाय हा अधिक मानसिक असतो. आम्हाला हा अनुभव अनेकदा येतो. जेव्हा रविवारी मला अन्‍ तेजस्वीला दोघांनाही काम असतं, तेव्हा ‘इराला आज कोणाकडे सोडायचं?’, असा प्रश्न आला की, इरा ज्या पद्धतीनं रिअॅक्ट होते, ती रिअॅक्शन मानसिक अस्वस्थता वाढवणारी असते. कारण अशा वेळी ती केवळ हट्टाच्या पलीकडे जाऊन बोलते. तिच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘‘स्वतःच्या मुलीसाठी संडेलापण तुम्ही वेळ देत नाही. मला कुणाकडेही सोडता अन्‍ संध्याकाळपर्यंत आणायला येत नाही. जाते मी आज, पण मला आजच घेऊन या घरी. दुसर्‍यांच्या घरी मुक्काम नाही करू शकत मी!’’ पोलीस खात्यात असल्यानं तेजस्वीला जेव्हा अचानक काम येतं, तेव्हा ती घाईत असते. ती घाई इरा नेहमी समजून घेते, पण मी थोडा निवांत असल्याचं पाहून म्हणते ‘‘अरे, तुम्ही तर थांबा! मला असं रोजरोज दुसर्‍याकडे सोडायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? (तिची रोजरोज ही कल्पना वारंवार या अर्थानं आहे) स्वतःच्या मुलीला असं कोणी रोजरोज सोडतं का?’’ ती रागानं बोलत नसते, ती वयानुरूप हट्टी भावनेतून बोलते, पण माझ्या मनाची एकदम घालमेल होते. कित्येकदा पुन्हा घरात येऊन, तिच्याशी खेळून, काहीतरी नवीन आश्वासन देऊन मी बाहेर पडतो. ती खेळण्यात रमते, पण मी मात्र अतिशय जड अंतःकरणानं बाहेर पडतो; मला पडावं लागतं.

हा लेख संपवत असताना टीव्हीवर वाघिणीच्या हत्येची बातमी सुरू होती. त्या बातमीचा धागा पकडून इरानं ‘‘वाघ कोणकोणते प्राणी खातो?’’ असं विचारलं. तिला आम्ही जेव्हा प्राण्यांची यादी सांगितली, तेव्हा तिचा पुढचा प्रश्न आला, ‘‘वाघ माणसांनापण खातो का?’’ अर्थात आम्ही ‘‘हो’’ म्हणालो. मग तिला वाघाचा इतका राग आला की, ती म्हणाली ‘‘आता आपण फक्त वाघच खायला पाहिजे’’. आम्ही कारण विचारलं, तर म्हणाली, ‘‘जर वाघ सगळ्या प्राण्यांना खात असेल अन्‍ जर आपण वाघ खाल्ला, तर बाकीच्या प्राण्यांची सुटका होईल’’. वाघ वगळून तिचं इतर प्राण्यांवरचं निरागस प्रेम आम्हाला काहीसं भावलं, पण तरी आम्ही तिला वाघदेखील प्राणीच असल्याचं समजवल्यावर तिनं ‘वाघपण नको खायला’, असं आवर्जून नोंदवलं.  

प्रत्येक नव्या पिढीनं मागच्या पिढीला काहीतरी नवीन शिकवलं आहे. आधीची पिढी तर शिकवत असतेच. नव्या पिढीचं हे शिकवणं एकूण समाजात फार मोठ्या प्रमाणात दिसत नसलं, तरी सुप्त रूपात ते असतंच. ते जसं समाजात असतं, तसंच घरातदेखील असतं. तसंच ते आमच्या घरातदेखील आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

सध्या तर इरा अवघी चार-सव्वा चार वर्षांची आहे. आत्ताच ती अगदी सहजपणे काहीतरी खूप नेमकेपणानं सांगून जाते. त्यामुळे ‘आपण तिच्या अगोदर जन्माला आलो असल्यानं आपल्या माहितीतल्या काही गोष्टी तिला सांगणं, एवढंच आपलं कर्तव्य असल्याचं आम्हाला नेहमी वाटतं. बाकी काय शिकायचं अन्‍ काय शिकायचं नाही, हे ती नेमकेपणानं ठरवू शकते. तिनं काय करावं, हा तिचा प्रश्न आहे, पण आम्ही तिला काय काय अन् कसं उपलब्ध करून देतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

इराला घडवण्यासाठी आम्ही आजवर खूप कमी वेळ दिला आहे. त्यामुळे तिच्यासाठी अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्याची खंत वाटत राहते, पण तिनं मात्र आमच्या आयुष्यात चैतन्य आणलं आहे. तिला आमची संगत हवी असणं स्वाभाविक आहे; पण खरी गंमत वेगळी आहे. तीच आम्हाला हवी असते, कारण ती बाहेरून आल्यावर थकवा, ताण काही क्षणांत घालवून टाकते. घरात आल्यावर तिची कधी तक्रार नसते. आम्ही आलो असल्याचा अंदाज घेऊन ती मुद्दामहून दाराच्या मागे लपते. आम्ही घरात आल्याचा आनंद साजरा करते. नवीन काही शिकली असेल, तर मस्त कथानक सुरू करते; खूप गोष्टी लक्षात ठेवते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीही अतिशय नेमकेपणानं सांगते; खूप गोष्टी नेमकेपणानं रिलेट करते. एखादी गोष्ट करू नको म्हटलं, तर त्याचं कारण समजवल्याशिवाय मागे हटत नाही. तिच्या लॉजिकल बोलण्याचं क्रेडिट तिच्या आईला द्यायला हवं. कारण तिची आई प्रचंड लॉजिकल बोलते-वागते.

इरामध्ये वयानुरूप भावनिकपणही आहेच. त्याशिवाय जशी माणसं असतील, तशी ती स्वतःला ॲडजेस्ट करून घेते. आईच्या उपस्थितीत ती कुणाचीच नसते. आईच्या खालोखाल मला पसंती आहे. बाकी परिस्थितीनुसार जुळवून घेते. थोडंसं राजकारणही करते. एखादी चूक केली, तर ‘‘आईला सांगू नका, मी तुमचं ऐकेल’’, असं आश्वासन देते अन् तसं प्रॉमिस घेते. उपस्थित असणार्‍या कोणाही समोर चूक झाली, तर हीच पद्धत वापरते.

अशी आमची इरा! सांगावं तेवढं थोडंच! ती आमची नावं रोज बदलते. ‘तू गोड आहेस’ असं आम्ही तिला म्हटलं की, ‘‘माझे पप्पा लाडूसारखे गोड’’ असं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आईविषयी हेच विचारलं, तर म्हणते, ‘‘ती तर गुलाब जांबूनसारखी गोड...’’  

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................         

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......