कर्नाटक नगरपरिषदांचा निकाल आणि खोटी, ठार खोटी आकडेवारी
पडघम - देशकारण
ऋग्वेद शेणई
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 05 September 2018
  • पडघम देशकारण भाजप काँग्रेस कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था

 

‘The closer to the truth, the better the lie, and the truth itself, when it can be used, is the best lie.’ (‘सत्याच्या जितके जवळ तितके असत्य प्रभावी, नीट वापरलेले १०० टक्के सत्यच सर्वोत्कृष्ट असत्य असते.’) - आयसाक असिमोव्ह

सध्या पेट्रोलच्या किमती, जीडीपी, विकास दर, बँकांची कर्जे यापासून डॉलरच्या आणि राफेलच्या दरापर्यंत सर्वच आकडेवारीचा बराच काथ्याकूट चालला आहे. दोन्ही बाजूंनी बरेच आकडे दिले जात आहेत. राजकीय चर्चा या खऱ्याखोट्या आकडेवारीची रणधुमाळी बनून गेल्या आहेत. अर्थशास्त्रज्ञ-गणितज्ञ यांच्यासाठी ही आनंदाची बाब असली तरी सर्वसामान्यांसाठी मात्र या आकड्यांचा अर्थ लावणे कठीण होऊन बसते. या आकड्यांचा वापर प्रचाराचे मुद्दे म्हणून सर्रास केला जातो आणि म्हणूनच त्यांची सत्यता पडताळणे प्रत्येक समजूतदार मतदाराची जबाबदारी आहे.

विशेषतः वेगवेगळी आकडेवारी दाखवून या सरकारची कामगिरी कशी चांगली आहे, हे २०१४पासूनच भाजपच्या प्रचारतंत्राचा फार महत्त्वाचा भाग बनले आहे. भाजपच्या सोशल मीडिया पेजवर जाऊन बघितल्यास निदान ३० ते ४० टक्के पोस्ट्स या वेगवेगळ्या आकडेवारीबद्दल असतात. भाजपच्या शहरी व सुशिक्षित वर्गीयांना आकर्षित करण्याच्या नीतीचा तो परिपाक आहे.  त्यातूनच काँग्रेसने किती हजार कोटींचे घोटाळे केले, नोटबंदीतून किती पैसे मिळाले, मोदीजी किती तास काम करतात यापासून ते पेट्रोलचा दर पूर्वी कसा जास्त वेगाने पडायचा किंवा ९८ टक्के लोकांचा नोटबंदीला पाठिंबा आहे, अशा प्रकारच्या पोस्ट दिसतात. यांचा कळस तर ४ वर्षांत ३ टक्के ग्रामीण विद्द्युतीकरण करून उरलेल्या ९७ टक्क्यांचे श्रेय घेण्यात केला गेला. हा सगळाच चांगल्या प्रचारतंत्राचा भाग आहे आणि त्यासाठी भाजप कौतुकास पात्रही आहे. विरोधी पक्ष या दाव्यांचे खंडन करण्यात किंवा स्वतःचे वेगळे दावे करण्यात कमी पडताहेत, हे त्यांच्या प्रचाराचे अपयश आहे.

पण आकडेवारीच्या पुढचा टप्पा असतो, तिचे चित्रीकरण आणि विश्लेषण आणि त्यात तर लबाडीला सर्वाधिक वाव असतो. ‘हाऊ टू लाय विथ स्टॅटिस्टिक्स’ नावाचे डॅरील हफ या लेखकाचे १९५४ साली प्रसिद्ध झालेले एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. नुकताच कर्नाटकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच लागलेल्या निकालानंतर या तंत्रांचा सर्वोत्तम वस्तुपाठ भाजपच्या अधिकृत फेसबुक पेजवर पाहायला मिळाला.

ही आहे ती पोस्ट.

या पोस्टला १० तासांत ३२०० लाईक मिळाले आणि ती ३६० वेळा  शेअर केली गेली. या एका पोस्टमध्ये अनेक गोष्टींचा विपर्यास केला गेला आहे.

या पोस्टमध्ये दिलेली माहिती टेबल स्वरूपात अशा प्रकारे आहे.

यामधील करामती आपण एकेक करून बघू. प्रत्येक मुद्द्याबरोबरच तो योग्य रीतीने वापरल्यास हे चित्र कसे दिसेल हेही बघू

१) तंत्र १ - आपण कमी पडल्यास पूर्वीपेक्षा कसे चांगले निर्णय आले हे दाखवावे.

या पोस्टमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या याचा उल्लेख नाही.

भाजपला ९५३ तर काँग्रेसला १०१० जागा मिळाल्या आहेत, पण या गोष्टीचा उल्लेख टाळला आहे. हे लपवण्यासाठी २०१३चे आकडे पुढे आणले आहेत. काँग्रेसच्या विजयापेक्षा भाजपच्या जागा वाढल्यात याकडे जास्त लक्ष वेधले जाते. यातही गोम अशी आहे की, एकूणच जागा २४०७ वरून २६६३ वर गेल्याने नवीन जागा भाजपने ओढल्यात हे दाखवण्याऐवजी दुसरेच चित्र दाखवले जाते.

याच तंत्राचा वापर काँग्रेसने गुजरातमधला पराभव विजयासारखा दाखवण्यासाठी केला होता. याचाच प्रत्यास म्हणजे आपली कामगिरी सध्या जराशी चांगली असली तर पूर्वी आपली किंवा दुसऱ्यांची कामगिरी त्यापेक्षाही चांगली होती हे पूर्णपणे विसरून जाणे आणि तो टप्पा जणू काही प्रथमच गाठल्याचे दाखवणे. कर भरणाऱ्यांच्या संख्येतील वाढ, ऑनलाईन व्यवहारात वाढ याबद्दलचे दावे याचाच भाग आहे.

२) तंत्र २ –एकुणात कमी पडल्यास विभाग पाडून आकडे चांगले बनवणे.

भाजपची बेरीज काँग्रेसपेक्षा कमी भरतेय? काही हरकत नाही, नगरपालिका, नगर पंचायत यामध्ये विभागून आपली स्थिती चांगली दाखवता येईल तर बघा. या तंत्राचा अतिरेक झाला की, एखाद्या छोट्याशा क्षेत्रात मिळालेल्या यशाचा (अधिक करदात्यांनी रिटर्न भरणे) उदोउदो करून इतर ठिकाणच्या अपयशावरून (एकूण कर उत्पन्नाची वाढ खुंटणे) लक्ष हटवले जाते.

जर फक्त २०१८चे आकडे बघितले तर हे आलेख असे दिसतात. अर्थातच या आलेखात भाजप काँग्रेसपेक्षा कमी पडला आहे हे सरळ दिसते.

३) तंत्र ३ - वेगवेगळ्या आलेखामध्ये वेगवेगळी प्रमाणे (scales) वापरणे.

या आलेखामध्ये प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक गटानुसार वेगवेगळी प्रमाणे वापरली आहेत. त्यामुळेच कॉर्पोरेशनच्या आलेखात काँग्रेसचे २०१८ सालचे ३४ उमेदवार जदसेच्या ३१ उमेदवारांच्या ५ पट दिसताहेत. एवढेच काय सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आलेखात भाजपच्या २०१८ मधल्या ३७२ जागा काँग्रेसच्या ३०७ जागांच्या साधारणपणे तिप्पट दिसताहेत. याहून मजा म्हणजे भाजपचे टाऊन कॉर्पोरेशनमधले ३९० उमेदवार काँग्रेसच्या ५२९ पेक्षाही जास्त दिसतात.  प्रत्येकच आलेखात अशीच चलाखी दिसून येते.

४) तंत्र ४ - y अक्ष शून्यऐवजी ५० वरून सुरू करणे

हे डेटासह खोटे बोलण्याचे सर्वांत घृणास्पद उदाहरण असते. दहावीतल्या विद्यार्थ्यांना यासाठी पूर्वी मार मिळायचा, आता पक्षांना लाईक मिळतात. समजा मागच्या वर्षी तुमचे उत्पन्न सव्वा लाख होते आणि आता १.६० लाख आहे. जर ग्राफ काढताना y अक्ष १०० पासून सुरू केला तर मागच्या वर्षीचा स्तंभ २५ एकक उंचीचा येईल आणि या वर्षीचा ६० एकक उंचीचा. प्रथमदर्शनी तुमचे उत्पन्न दुप्पटीहून अधिक वाढल्यासारखे वाटेल.

या चारही ग्राफमध्ये सर्वच पक्षासाठी कुठल्याही वाटेल त्या ठिकाणी y अक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे २९चा आलेख २८च्या चौपट दिसणे, १३७ हे ७४च्या तिप्पट दिसणे यासारखे प्रकार घडतात.

यातही गंमत म्हणजे या आलेखाच्या मागे ज्या आडव्या रेषा आहेत, त्या तुम्हाला तुलना करायला लावण्यासाठीच आहेत. त्या रेषांचा उद्देशच हा आहे की, तुम्ही दोन आलेखातले स्तंभ एकमेकांपेक्षा छोटे की मोठे ते पहावे. कुठलाही वाचक आकड्यापेक्षाही चित्रावर जास्त भरवसा ठेवतो. म्हणजेच ही चुकून नव्हे तर जाणूनबुजून केलेली आलेखाची पुनर्जुळणी आहे, जेणेकरून भाजपचे कमी उमेदवार तुम्हाला जास्त वाटावेत.

५) रंगांची करामत

वेगवेगळ्या पक्षांची माहिती दाखवताना शक्यतो सर्वांना एकच रंग दिला जातो किंवा प्रत्येकाला वेगवेगळा रंग दिला जातो. एकच स्तंभ वेगळ्या रंगात दाखवणे अतिशय अस्वाभाविक आहे.

पोस्टमध्ये जदसे आणि काँग्रेसच्या जोडीला ‘unholy alliance’ (‘सैतानी जोडगोळी’ अर्थात ‘अहिंदू’) म्हटले आहे आणि त्यानुसार भाजपला भगवा तर इतरांना हिरवा रंग देऊन सर्वच इतर पक्षांना मुस्लिम रंगात रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपच्या किंवा रिपब्लिक टीव्ही/झी न्यूजच्या (द्विरुक्तीबद्दल क्षमस्व) कुठल्याही नकाशात किंवा आलेखात काँग्रेसचे आकडे कायम हिरव्या रंगातच दिसून येतात. ‘द हिंदू’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ इत्यादींच्या बातम्यात मात्र काँग्रेस फिकट निळ्या रंगछटेत दिसेल. रंगाची ही भाषा उघड नसली तरी सहजपणे सर्व पक्षांचे धोरण दाखवून देते.

जर कुठलीही मखलाशी किंवा खोटेपणा केला नस्ता तर हे आलेख असे दिसले असते.

या पंचतंत्राव्यतिरिक्तही आकड्यांमध्ये खोटे बोलायचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत. एक सुजाण नागरिक आणि वाचक म्हणून कुठल्याही माहितीचा विचार करताना तिची पडताळणी करण्यासाठी या ५ तंत्रांपैकी एखादे वापरले तर नाही ना याची खातरजमा करून घ्या आणि जर कोणी यातली एखादी मखलाशी करताना आढळले तर ते फसवताहेत आणि त्यांचा हेतू शुद्ध नाही हे त्वरित ओळखा. भाजप, काँग्रेसच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, संस्था असलेच फसवे आलेख छापून वाचकांची दिशाभूल सर्रास करतात. याला इंग्रजीमध्ये ‘shine your shit and call it gold’ असा वाक्प्रचार आहे. अधिकाधिक संगणकाचा वापर आणि आकड्यांवर आधारित निर्णय करण्यावर भर देताना असल्या फसवेगिरीला बळी पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पण त्याव्यतिरिक्तही एक विशेष शंका मनात डोकावून जाते. जोवर भाजप लोकांना किंवा आपल्या समर्थकांना दाखवण्यासाठी अशी मखलाशी करतो, तोवर ठीक आहे. पण २० राज्यांत सरकार असलेला पक्ष लोकांचे अब्जावधी रुपये खर्च करण्याचे निर्णयही असेच फसवे आकडे आणि आलेख बघून घेत असेल तर देशाचे कठीण आहे. अर्थक्रांतीवाल्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनचे भीषण परिणाम आपल्याला दिसतच आहेत, इतरांनी दिलेल्या प्रेझेंटेशनमध्येही असलीच फसवेगिरी असेल तर पर्यावरण मंत्रालयापासून संरक्षण मंत्रालयापर्यंत सर्वच ठिकाणच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. एखाद्या विद्यापीठाला दिलेला दर्जा किंवा नवीन कंपनीला दिलेले हजारो कोटींचे कंत्राट, तिथेही आकड्यांची छाननी गरजेचीच आहे आणि त्याबद्दल दुर्लक्ष देशाला मोठ्या संकटात लोटू शकते.

राजकीय पक्षांनी खोटे बोलणे काही नवीन नाही, पण प्रथमदर्शनी पूर्णपणे खरी माहिती वापरून आलेख आणि सांख्यिकीच्या जोरावर खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे हे तंत्र भारतात नवीन आणि म्हणून हानिकारक आहे. मात्र खोटे बोलणे, रेटून खोटे बोलणे फार काळ दाबून राहत नाही, पण सत्याचा विपर्यास मात्र अतिशय परिणामकारक असत्य ठरू शकते. पोस्ट-ट्रुथ आणि फेक न्यूजच्या या युगात आपण जागरूक राहणे हेच आपल्या हातात आहे.

.............................................................................................................................................

लेखक ऋग्वेद शेणई हे ‘ProNeta Constultants’चे संचालक आहेत. www.proneta.in

rigved.shenai@proneta.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......