आत्महत्या, प्रायोपवेशन, बलिदान, समाधी वगैरे...
पडघम - तंत्रनामा
आदित्य कोरडे
  • भय्यू महाराज आणि हिमांशू रॉय
  • Mon , 27 August 2018
  • पडघम तंत्रनामा भय्यू महाराज Bhayyu Maharaj हिमांशू रॉय Himanshu Roy

मध्यंतरी भय्यू महाराजांच्या आत्महत्येने (सोशल मीडियावर) बराच गोंधळ झाला. त्याच्या थोडेसे आधी राज्याचे माजी पोलिस महासंचालक हिमांशू राय यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. भैयुजी महाराज प्रसिद्ध, राष्ट्रसंत वगैरे. मग संत, महाराज, बाबा वगैरे लोकांनी आत्महत्या करावी का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. कसा काय कुठून, पण समाधी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या नाही काय, स्वा. सावरकरांनी प्रायोपवेशनाने प्राणार्पण केले ती आत्महत्या नव्हती काय किंवा संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, ती आत्महत्याच होती ना, असले प्रश्न विचारले जाऊ लागले.

आत्महत्या ही वैयक्तिक कारण, विशेषत: व्यक्तिगत पातळीवर आलेले अपयश, नैराश्य, विमनस्कता किंवा बऱ्याचदा मानसिक संतुलन ढळल्याने केली जाते. आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेले लोकही बऱ्याचदा त्यावेळी त्या विशिष्ट मानसिक अवस्थेत आपण तसे करायला उद्युक्त झालो असे सांगतात आणि जवळपास सगळ्या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मानसोपचारांची कमीत कमी समुपदेशनाची गरज असतेच असते. म्हणजेच ते मानसकरीत्या पूर्णपणे निरोगी नसतात. आत्महत्येची उर्मी वारंवार येणे हीदेखील एक प्रकारची मनोरुग्णावस्था असून त्या प्रकारच्या लोकांना आधीच लक्षणे ओळखून समुपदेशनाने आणि उपचाराने आत्महत्येच्या विचाराने परावृत्त करता येते.

माणसाला आत्महत्या करण्याची ही जी ऊर्मी (impulse) येते, त्यात माणूस आपला सारासार विवेक हरवून बसतो आणि आपण जे करतो आहोत, त्याचे नक्की परिणाम काय होणार आहेत, याची छाननी करण्याइतपत तो सक्षम नसतो. ही ऊर्मी किंवा प्रबळ इच्छा फार थोडा काळ (पाच-सहा तास) टिकते आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर बहुतेक जणांना आपण केलेल्या कृत्याची शरम वाटते. आत्महत्या करणाऱ्याने कितीही चिठ्ठी लिहून किंवा आधीपासून आत्महत्येचे प्लॅनिंग करून असे कृत्य केले असले तरी ऐन आत्महत्येच्या करण्याच्या वेळी त्याची ही अशी उन्मादाअवस्था झालेलीच असते. म्हणजे ही मनाच्या पूर्णपणे तळ्यावर नसण्याच्या छोट्या कालावधीत घडली / केली जाणारी अशी अनियंत्रित कृती आहे.

या कसोटीवर समाधी किंवा प्रायोपवेशनाने केलेला प्राणत्याग, सैनिकाने समोर निश्चित मृत्यू दिसत असताना कर्तव्याच्या आणि देशप्रेमाच्या भावनेने केलेले शूर प्राणार्पण हे आत्महत्या या सदरात येत नाही. अन्नपाणी त्याग करून मृत्यू यायला बराच कालावधी (काही दिवस ते एखादा महिना) जातो आणि आत्महत्या करण्याची ऊर्मी इतका वेळ टिकत नाही. आत्महत्या करायला मुख्य म्हणजे बाह्य साधनांची मदत लागते. म्हणजे झोपायला रेल्वेचे रूळ, लटकायला दोरी किंवा नस कापायला ब्लेड, पिस्तुल वगैरे.

माणसाला जिवंत ठेवायला आवश्यक अशा कृती फक्त इच्छेच्या जोरावर थांबवून प्राणार्पण करता येत नाही. श्वास घेणे थांबवले तर पाच-सात मिनिटांत माणूस मरेल खरा, पण बाहेरील कोणत्याही साधनांची मदत न घेता फक्त इच्छेच्या जोरावर श्वास घेणे थांबवून प्राण सोडता येत नाही. दोन-अडीच मिनिटांवर कुणी जाऊ शकत नाही. अगदी कसून प्रयत्न केलाच तर भोवळ, मूर्च्छा येऊन माणसाचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि श्वास परत चालू होतो.

त्याचबरोबर आत्महत्या ही बहुतेक वेळा एकांतात, कुणी पाहत नाही अशा वेळी किंवा अशा प्रकारे केली जाते. कमीत कमी पटकन कुणी सोडवायला/ वाचवायला येऊ शकणार नाही, याची खबरदारी तरी घेतली जातेच आणि त्या करताच होता होईल तो जलद आणि खात्रीलायक मृत्यू देणारा मार्गच निवडला जातो. काही वेळा उंच इमारतीच्या छतावरून सर्वांचे लक्ष वेधून घेत आत्महत्या केल्याचे आपण वाचतो, पण तो बऱ्याचदा लोकांचे लक्ष वेधून घेण्याचाच प्रकार असतो. आत्महत्या करण्याचा मुख्य उद्देश नसतो.

अनेक आजारी लोक दीर्घ यातनादायी आजारपणाला कंटाळून इच्छा-मरणाची मागणी करतात, पण बाहेरील साधनांनी स्वत:चे आयुष्य संपवणे म्हणजे आत्महत्या असल्याने कायदा त्याला मान्यता देत नाही. हा जगण्याला आवश्यक अशी औषधे किंवा उपचार ते नाकारू शकतात आणि त्याच्याअभावी त्यांचा मृत्यू होतो. त्याला आत्महत्या म्हणता येत नाही. (अर्थात हे उपचार नाकारायला त्यांनी स्वत: शुद्धीवर असावे लागते. दुसरे हा निर्णय त्यांच्यावतीने घेता येत नाही.)

थोडक्यात, १. आत्महत्या ही मनाच्या उन्मादावस्थेत/ उर्मित (impulse ) केली जाते.

२. ही अवस्था काही काळ चार-सहा तासच टिकते.

३. नैराश्य ही दीर्घकाळ टिकणारी अवस्था असली तरी नैराश्यात माणूस आत्महत्या करायला उद्युक्त होत नाही, पण हळूहळू त्याची मनोभूमिका त्याकरता तयार होते.

४. नैराश्यग्रस्त माणसे हळूहळू आत्महत्येचा विचार करू लागतात. सुरुवातीला असफल प्रयत्नही केला जातो. याची लक्षणे कधी स्पष्ट तर कधी अस्पष्टपणे दिसतात व त्याची वेळीच काळजी घेता येते.

५. आत्महत्या करताना बाह्य साधनांची मदत घ्यावीच लागते.

६. आत्महत्या करणारा माणूस आत्महत्येसाठी खात्रीशीर आणि जलद मार्ग स्वीकारायचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा आत्महत्या एकांतात किंवा लपून छापून उरकली जाते.

७. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या १०० टक्के लोकांना मानसिक समुपदेशनाची/ उपचारांची गरज असते. (अर्थात आत्महत्येचा प्रयत्न सफल झाला तर उपचार करता येत नाहीत.)

८. याच कारणाने प्राण त्यागण्याचे संजीवन समाधी, अन्न त्याग, औषधोपचार नाकारणे हे प्रकार आत्महत्या या सदरात येत नाहीत.

९. अशा प्रकारे प्राणत्याग करण्या करता बराच वेळ, इच्छाशक्ती आणि यातनांना तसेच आप्तेष्टांच्या विनवण्या वगैरेंना तोंड द्यावे लागते.

१०. त्याकरता कमालीचा मनोनिग्रह आणि दृढ निश्चय लागतो.

११. असा मनोनिग्रह आणि दृढनिश्चय मानसिक संतुलन ढासळलेल्या लोकांकडे नसतो.

वरील संक्षिप्त विवेचनावरून समाधी, प्रायोपवेशन-आत्मबलिदान आणि आत्महत्या यातला फरक समजून यायला काही अडसर नसावा. त्यामुळे हे इतर मार्गाने होणारे प्राणार्पण म्हणजे एक प्रकारे आत्महत्याच आहे, असे म्हणणे पूर्णपणे चूक व अशास्त्रीय आहे. ती एका प्रकारे - नव्हे, कुठल्याच प्रकारे - आत्महत्या नव्हे.

आता समाधी किंवा अन्नत्याग या किंवा अशा इतर मार्गाने केल्या जाणाऱ्या प्राणार्पणाबद्दल माझे वैयक्तिक मत. हे वैयक्तिक असल्याने सर्वांना मान्य व्हावे अशी अपेक्षा अजिबात नाही.

हे विश्व साधारण १३.५ ते१४ अब्ज वर्षे जुने आहे, असे म्हणतात. त्यातली आपली प्यारी पृथ्वी गेला बाजार ४-४.५ अब्ज वर्षे जुनी आहे आणि अजून पुढची कमीत कमी चारेक अब्ज वर्षे ती तशीच राहणार आहे. आपल्याला जी काही सजीवसृष्टी माहिती आहे, ती याच छोट्याश्या ग्रहावर फुलते आहे. त्यापलीकडले जीवन आपल्याला अजून तरी माहिती नाही. हा काळ इतका प्रचंड मोठा आहे की, हे आकडे नुसते कागदावर लिहून त्याचा विस्तार समजून येत नाही.

विश्वाचा पसाराही असाच अनंत आहे आणि त्या तुलनेत आपले आयुष्य फार म्हणजे फारच छोटे. गेली अब्जावधी वर्षे अप्रतिहत चालू असलेला हा विश्वाचा विलोभनीय तमाशा आणखी अनेक अब्जावधी वर्षे तरी असाच चालू राहणार असला तरी आपल्याला फक्त ७०-८०-१०० वर्षे एवढाच छोटा अवसर मिळतो... ज्यात आपण या तमाशात सक्रीय भाग घेऊ शकतो आणि हा तमाशा पाहूही शकतो.

जवळपास सगळ्या धर्मांनी शरीराचे क्षणभंगुरत्व मान्य केले आहे आणि त्याच बरोबर जीव- आत्मा, मृत्युनंतरची त्याची सफर, मृत्युनंतरचे जीवन यावर विश्वासही ठेवलेला आहे. आपल्या हिंदू धर्मासारख्या काही धर्मात पुनर्जन्म (आणि म्हणूनच पूर्वजन्म)देखील मानला जातो. पण अगदी साधे निरीक्षण आणि तर्काच्या आधारे विचार केला तर समजून येईल की, आपले शरीर नष्ट होत नसून उलट तेच अविनाशी आहे. आपण किंवा इतर कुणीही सजीव मेल्यानंतर शरीर नष्ट होत नाही, तर विघटित होते. म्हणजे त्याचे आपल्याला ज्ञात असलेले स्वरूप पार बदलून जाते. आपल्या शरीरातल्या विविध इंद्रियांत असलेली कार्बन, लोह, कॅल्शियम फोस्फोरस, निरनिराळी प्रथिने, आम्ल मूलद्रव्ये किंवा संयुगे आणि असेच इतर घटक आधीही या पृथ्वीवर असतात, नंतरही ते इथेच राहणार असतात. फक्त त्यांचे स्वरूप पार बदललेले असते.

आत्मा असतो की नसतो या वादात मला इथे जायचे नाही. मला व्यक्तिगतरीत्या तसे काही असते असे वाटत नाही. आपल्या शरीराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून निर्माण होणारी ती एक आभासी (virtual) जाणीव आहे. ज्याप्रमाणे मन नावाचे इंद्रिय दाखवता येत नाही, पण त्याचा उगम अन वसतीस्थान स्मृतीप्रमाणे मेंदूत असून तिथे चालणाऱ्या अतिशय गुंतागुंतीच्या विविध विद्युत रासायनिक क्रियातून त्याची निर्मिती होतो. त्याप्रमाणेच जीव, आत्मा हे मेंदूत उगम पावतात आणि तो विघटित झाला की, नाहीसे होतात. हे घटक दुसऱ्या कुठल्या अशाच मेंदूत / शरीरात एकत्रित झाले तर तिथे नवी जाणीव उत्पन्न करतात. आपला पुनर्जन्म होत असला तर तो असाच होतो. पुनर्जन्म शरीराचा त्यातल्या घटकांचा होतो. कदाचित किंवा बहुतेक वेळा ते सगळे पुन्हा जसेच्या तसे एकत्र येत नाहीत, पण पुनर्जन्म शरीराचाच होतो. आपल्या जाणीवेचा ज्याला आपण मी-पणा किंवा अहं म्हणून ओळखतो त्याचा नाही. त्याचा होऊ शकत नाही.

जवळपास सर्व मानवी इतिहासात अमरत्व मिळवण्याचे निरनिराळे प्रयत्न झालेले आहेत आणि त्यांची ढोबळ कल्पना हे शरीर नष्ट (म्हणजेच विघटित) होऊ न देण्याची युक्ती शोधणे हेच आहे. हे शरीर जर नष्ट/विघटित झाले तर मी म्हणून जे माझ्या जाणिवेचे अस्तित्व आहे, तेही नष्ट होणार याची कल्पना असल्याने शरीराचे नष्ट होणे म्हणजे मृत्यू टाळण्याचे अनेक प्रयत्न झालेत. होत आहेत. अजून तरी त्यात पूर्ण यश आलेले नाही. ही नष्ट होण्याची भीती कमी करण्यासाठी म्हणून मग मृत्यूनंतरचे जीवन, पुनर्जन्म या संकल्पना आलेल्या आहेत. पण त्या आहेत याचा कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा नाही. पण या पुनर्जन्म, तसेच मृत्युनंतर मिळणारे स्वर्ग किंवा नरकवास या संकल्पनादेखील काही समस्या उभ्या करतात. हे शरीर जरी नष्ट होणार असले तरी तो मी-पणाच्या जाणीवेचा अंत नाही. पुन्हा, वारंवार संधी मिळेल हा आशावाद माणसाला वस्तुस्थितीच्या जाणीवेपासून दूर घेऊन जातो. सतत झीज होणारे, दिवसागणिक वृद्ध होणारे, आजारी पडणारे, दु:ख वेदना उत्पन करणारे हे शरीर त्यागून परत नवे कोरे शरीर मिळवू शकतो, ते खराब झाले तर अजून दुसरे मिळेल अशा अर्थाची वचने सर्वच धर्मांत भरपूर आहेत.

आपल्या धर्मात पुन्हा पुन्हा नष्ट होणाऱ्या या शरीराच्या तुरुंगात आपला मी-पणा म्हणजे आत्मा अडकून पडलेला आहे आणि या सततच्या जन्म-मृत्युच्या चक्रातून सुटले की, खरी मुक्ती वा मोक्ष मिळेल असे मानले गेले आहे. मोक्ष, मुक्ती या संकल्पना मुख्यत: अशाच आहेत. फक्त ‘मी’ म्हणून जी एक युनिक जाणीव आताच्या शरीरात निर्माण झाली आहे, ती तशीच पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी शरीरात निर्माण होऊ शकते आणि मुख्य म्हणजे कोणतेही शरीर नसताना अनंतकाळपर्यंत अस्तित्वात राहू शकते, असा जो याचा अर्थ आहे तसे होते हे खात्रीलायकरीत्या सांगणारा कुठलाही वस्तुनिष्ठ पुरावा उपलब्ध नाही. तसे होत असेल तर ते कसे होऊ शकेल हे वैज्ञानिकरीत्या सांगू शकणारा conclusive algorithm कुणाकडेही नाही.

उपलब्ध पुरावे आणि शास्त्रीय ज्ञान वापरून एवढे म्हणता येते की, मुक्ती किंवा मोक्ष आहे, पण त्याचे स्वरूप म्हणजे हे शरीर विघटित झाले की, त्यात वास करून असलेली मी-पणाची जाणीव ही नष्ट होते. जीव, आत्मा जे काही असते तेही नष्ट होते, पुढे मग या विश्वात काय काय घडते याचा आणि त्या जाणीवेचा संबंध उरत नाही. कारण ती त्या शरीरात उत्पन्न झालेली युनिक जाणीवच उरत नाही. एक ना एक दिवस ही अशी मुक्ती आपल्या सगळ्यांना मिळणारच आहे, त्याची आपल्याला इच्छा असो वा नसो. मग घाई कसली आहे? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते नीट सांभाळून या विश्वाचा त्यातल्या भल्याबुऱ्या घटकांचा मिळेल तेवढा अनुभव घेत राहणे जास्त योग्य नव्हे काय?

सावरकर असो किंवा ज्ञानेश्वर किंवा त्यांच्यासारखी इतर कोणी मोठी माणसे, त्यांच्या जीवनाच्या आकलनाबद्दल मी काय बोलणार! तेवढी माझी पात्रता नाही, पण जे मिळवायचे होते ते मिळवले. आपला इथला कार्यभाग साधला आता अजून जगत राहण्यात काही मतलब नाही, आपल्या जीवनाचा उद्देश सफल झाला, असे जे विचार त्यांनी प्राणत्याग करताना मांडले आहेत, ते सर्वथैव चुकीचे आहेत असे मला प्रामाणिकपणे वाटते. जीवनाचा उद्देश काय? माझ्या अस्तित्वाचा उद्देश काय? हे प्रश्न (फक्त तत्त्वज्ञानातसुद्धा) जर विचारायचा म्हटला तर जीवनाचा मूळ उद्देश जगणे हाच आहे. शक्य असेल तितका अधिक काळ या विश्वात टिकून उरणे हा जीवनाचा मूळ (आणि एकमेव) उद्देश आहे. ‘स्व’ची जाणीव असो वा नसो शरीर कितीही थोडा काळ टिकणारे असो निरनिराळ्या प्रकारे नवीन जीव जन्माला घालत जीवन आपले अस्तित्व टिकवत असते. जगण्याची स्पर्धा आणि त्यातून टिकून उरणे यात काही प्राणी विजयी होतात जे पराभूत होतात ते नष्ट होतात, पृथ्वीवर हे गेली ४-४.५ अब्ज वर्षे अप्रतिहत चालूच आहे. त्यात कुणाचा जय होतो, कुणाचा पराभव. पण बदलणाऱ्या आणि बऱ्याचदा प्रतिकूल पद्धतीने बदलणाऱ्या परिस्थितीत जीवनाचा टिकून, पुरून, शिल्लक उरण्याचा उद्देश मात्र आजवर तरी सफल झाला आहे.

तेव्हा जेवढा तुटपुंजा अवसर आपल्याला या अनंत विश्वात मिळाला आहे, तेवढा पुरेपूर वापरणे हेच शहाणपणाचे आहे. नाही का?

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

madhav p

Tue , 28 August 2018

निरर्थक लेख आहे. सर्व गोष्टींवर आपण लेखन करायलाच हवे, असे नाही. असो. सर्व लेखन आम्ही वाचावे असेही नाही. आपण लिहिले, आम्ही वाचले. वेळ गेला. तेवढेच क्षणभंगुर आयुष्य सरले.


Prashant

Mon , 27 August 2018


Prashant

Mon , 27 August 2018

very nice explanation between suicide & samadhi, but article is too lengthy, keep it short upto some extent. thanks. Expect more articles from u on different subjects.


Mukunda Mali

Mon , 27 August 2018

नैराश्य हि दीर्घकाल टिकनारी अवस्था आहै..अस आपन कसे म्हणू शकता..काहीच्या बाबतित ति काही वेळा साठि असू शकतै..जस परिक्षेत नापास हौनारि मूल.. असौ बाकी विवेचन छान आहे.