त्वं अल्लाह | त्वं विष्णु: | अर्थात् हिंदु-मुस्लिम-एकात्मता
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 24 July 2018
  • पडघम सांस्कृतिक हिंदू धर्म Hindu religion मुस्लिम धर्मMuslim religion श्रीविष्णू Sree Vishnu अल्लाह Allah गीता Geeta ज्ञानेश्वरी Dnyaneshwari कुराण Kuran

‘हिंदु, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध हे सारे गटव्यापी धर्म आहेत… आणि जीवरूपी ‘स्व’ने देवरूपी ‘स्व’ची सो.हंभावयुक्त ध्यानधारणा करणे हा स्वधर्मच खरा विश्वव्यापी मानवधर्म आहे’, हा ब्र. ग. ना. हंबीर यांचा उपदेश आणि ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी, या निबंधाची प्रेरणास्थाने आहेत.

या उपाधिमाजी गुप्त | चैतन्य असे सर्वगत |

ते तत्त्वज्ञ संत | स्वीकारिती || (२.२६)

जॉन कार्टेल्यू हे शिकागोच्या डी. पॉल विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ. उभयचर प्राण्यांच्या अंत:स्त्रावी ग्रंथींविषयी त्यांनी संशोधन केले. असा प्रसिद्ध माणूस आपल्या कॅथॉलिक पंथीयांच्या संघटनेचा पदाधिकारी असावा, असे पंथाभिमानी मंडळींना वाटले. त्यांनी कार्टेल्यूंना तशी विनंती केली. प्रबोधनात्मक सविनय नकार देताना ते म्हणाले, “संशोधन करताना, हे बेडूक कॅथॉलिक व हे बेडूक प्रॉटेस्टंट आहेत, असे मला कुठेही आढळून आले नाही.”

बेडूक व इतर पशुपक्ष्यांप्रमाणे पृथ्वीवरील सर्व मानव एकाच जातीचे आहेत. शरीररचना, मूलभूत प्रेरणा किंवा जीवनाशय समान असलेल्या सर्व मानवांसाठीच्या ‘देवदत्त’ धर्माची पायाभूत तत्त्वेही समान\तीच आहेत, असे इस्लाम व हिंदू धर्मग्रंथांचा तौलनिक व साक्षेप अभ्यास करताना पदोपदी जाणवते. हे दोन्ही धर्म ईश्वरकेंद्री (गॉड-सेंटर्ड) आहेत, अल्लाह व श्रीविष्णू हे एकरूपच असल्याने हे दोनही धर्म एकात्म आहेत, हे अंतिम सत्य साधार सूचित\स्पष्ट करणे, हा या निबंधाचा विषय आहे.

या निबंधाचे तीन भाग केले आहेत. पहिल्यात अल्लाह व विष्णू यांच्या सर्वव्यापकत्वाच्या अनुभूतीविषयक उदगारांच्या आधारे, तर दुसऱ्यात त्यांच्या नामांच्या परम अर्थातील साम्यांच्या आधारे त्यांचे अद्वैत अनुमानिले आहे. तिसऱ्या भागात हिंदूंच्या व मुसलमानांच्या वैयक्तिक धर्माचरणातील आशय समान असल्याचे दाखवून हे दोन्ही धर्म एकात्म आहेत असे सूचित केले आहे.

१.

ईश्वराची तीन प्रमुख लक्षणे (अॅट्रिब्युटस्) सांगितली जातात. सर्वज्ञता, सर्व शक्तिमत्व आणि सर्वव्यापकत्व. यापैकी पहिली दोन लक्षणे लोक मान्य करतात. परंतु ईश्वराचे (देवाचे) सर्वव्यापकत्व सर्वांनाच अनाकलनीय वाटते. अल्लाह व श्रीविष्णू सर्व वस्तूत आहे (अंतर्यामी), सर्वांना व्यापून (सर्वव्यापी) उरलेला (सर्वातीत) आहे, हे मान्य केले की इस्लाम व हिंदू हे दोन धर्म आपापले वेगळेपण राखून ठेवण्याचा आग्रह धरूच शकत नाहीत. ते अपरिहार्यपणे एकात्म (वन) होतात. परिणामी हिंदू, मुसलमान यासारख्या समूहवाचक धर्मनामांना व्यावहारिक सोयीपलीकडे काहीच अर्थ व महत्त्व उरत नाही आणि हजारो वर्षे जपलेले ‘स्वत्व’ मुळातच निराधार आहे, अशी जाणीव स्पष्ट होत जाते. आपल्या धर्मश्रद्धांना धक्का बसतो की काय, अशी भीती वाटू लागते. त्यामुळे आपल्या जन्मापासून आपल्यावर संस्कारित केलेले ‘मी हिंदू’, ‘मी मुसलमान’ यासारखे समज (खरे तर गैरसमज) विचारातही तपासण्याची तयारी होत नाही. ही तयारी व्हावी व आपण सारे एकाच देवाची भक्ती करीत असतो, अशी स्वामी विवेकानंदांप्रमाणे मनोमन खात्री व्हावी म्हणून एकमेकांशी तंतोतंत जुळणारे अल्लाहच्या व श्रीविष्णूच्या सर्वव्यापकत्वाच्या अनुभूतीविषयक\साक्षात्कारी उदगार उदधृत करतो –

१) ‘गॉड हॅज सर्व्हंटस, हू इट थ्रु हिम, अँड ड्रिंक थ्रु हिम, अँड सिट थ्रु हिम, अँड लिव्ह थ्रु हिम, अँड अबाईड इन काँटेम्प्लेशन ऑफ हिम’ असे एका इस्लामी-सुफीने म्हटले आहे. हिंदुधर्मीय संत जनाबाईदेखील असेच म्हणतात.

देव खाते देव पिते | देवावरी मी निजते ||१||

देव देते देव घेते | देवासवे व्यवहारिते ||२||

देव येते देव तेथे | देवाविण नाही रिते ||३||

जनी म्हणे विठाबाई | भरुनि उरले अंतरबाही ||४||

२) मुसलमानांना प्रमाणभूत असलेल्या कुराणात प्रेषित मुहम्मद यांनी अल्लाह सर्वत्र असल्याचे म्हटले आहे. ‘अन्टू अल्लाह बिलाँग दि ईस्ट अँड वेस्ट, अँड विदरसोएव्हर यी टर्न, देअर इज अल्लाहज काउंटेनन्स. लो! अल्लाह इज ऑल एंब्रेसिंग, ऑल नोईंग’ (२.११५) हिंदूंना शिरोधार्य असलेल्या गीतेतही भक्तराज अर्जुन श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाबाबत असेच म्हणतो, ‘हे महात्मन्, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधले आकाश तसेच सर्व दिशा एकट्या आपल्यानेच भरून राहिल्या आहेत.’ (११.२०) ‘हिज् नूर (लाईट) कव्हर्स एव्हरीथिंग बिटविन दि अर्थ अँड दि स्काय’ अशीही एक हदीथ आहे.

३) इस्लामधर्मीय सुफी शेख मौलाना अब्दुल रहीम रायपुरी यांच्या एका शिष्यास अल्लाहचा प्रकाश (अभंड प्रकाश) चोहीकडे भरून राहिला असल्याचा सदोदित अनुभव येऊ लागला. त्यामुळे कुठेही लघवीला जाणे त्याला प्रशस्त वाटेनासे झाले होते. ईश्वराप्रमाणेच गुप्त असलेल्या अनेक गोष्टींचे साक्षात्कारी ज्ञान देणारे शेकडो-हजारो प्रसंग दिव्यदृष्टी लाभलेल्या भक्तांबाबत घडलेले आहेत, असे ‘दि टिचिंग्ज ऑफ इस्लाम’ या पुस्तकातील ‘दि व्हर्च्युज ऑफ जिक्र’ या प्रकरणात म्हटले आहे. हिंदुधर्मीय संत श्री एकनाथ यांनाही अनंतप्रकाशरूप परमात्मा सर्वत्र असल्याचा प्रत्यय आला होता. त्यांनीही ‘चिन्मात्र पूर्ण कोंदले’ असे वर्णिले आहे. विश्वरूपदर्शनाने अर्जुनाची स्थितीही उपरोक्त सुफी-शिष्याप्रमाणे झाली होती, असे म्हणता येते.

४) अर्जुनाला श्रीकृष्ण-परमात्म्याचे विश्वरूपदर्शन झाले, तेव्हा ‘चराचराचे जन्मस्थान’ (ज्ञानेश्वरी ११.५६१) असलेल्या ‘देवास सर्व देव-देवता, मनुष्य, सिद्ध, किन्नर किंबहुना हे स्थावरजंगमात्मक विश्व हर्षयुक्त होऊन नमस्कार करीत आहे, असे स्पष्ट झाले’ (ज्ञानेश्वरी ११.५०६) हरिपाठातही ज्ञानेश्वरांनी ‘अव्यक्त निराकार नाही ज्या आकार | जेथोनी चराचर हरिसी भजे ||’ असा स्वानुभवसिद्ध अभंग लिहिला आहे (अभंग क्र. ३). प्रेषित मुहम्मद यांनीही अगदी असेच वर्णन अनेकदा केले आहे. उदा. ‘देअर इज् नन अमंग दि क्रिएशन दॅट इज नॉट हिम्न ग्लोरिफिकेशन ऑफ अल्लाह, बट यू डू नॉट अंडरस्टँड देअर स्पिच’ (पान २२३, व्हर्च्युज् ऑफ जिक्र).

यासारखी शेकडो समानार्थी वचने दोन्ही धर्मांच्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातून एकच तत्त्व निश्चित होते- सुफींचा अल्लाह वा संतांचा श्रीविष्णू हे दोन नाहीत. सर्वव्यापक असलेल्या दोन गोष्टी मूलत: दोन म्हणजे विभिन्न असूच शकत नाहीत. अर्थात् जो अल्लाह तोच श्रीविष्ण होय.

२.

परमेश्वर मनुष्यादी प्राण्यासारखा सगुण, साकार वगैरे आहे असे समजणे हे जसे इस्लामला अमान्य आहे, तसेच हिंदू-धर्माला आधारभूत असलेल्या गीता-ज्ञानेश्वरीतही परमात्म्याला मानवसदृश मानणे हे अज्ञानापोटी घडते, असे सुस्पष्टपणे बजावले आहे. तथापि भक्तांनी शुद्धांत:करणाने परमेश्वराच्या ज्या गुणांची, शक्तीची उपासना करावी अशी स्वत: परमेश्वराची तसेच त्याच्या प्रेषितांची, विभूतींची आणि भक्तांची इच्छा असते, त्या गुणांची पूर्णावस्था (परफेक्शन) फक्त परमेश्वरच असल्याने त्याच्या नामांचा जप दोन्ही धर्मांतील श्रद्धावान करीत असतात. कुराणात व ‘हदीथ’मध्ये अल्लाहची शेकडो\हजारो नावे असली तरी त्यातील ९९ नावे प्रमुख मानली जातात. ‘जो ही सुन्दर नामे पाठ करील आणि स्मृतीत ठेवील त्यास स्वर्ग लाभेल’, तसेच ‘अल्लाहचे गुणवर्णन केले तर त्याची समीपता (निअरनेस) प्राप्त होते, त्याचा साक्षात्कार होतो,’ असे प्रेषित मुहम्मद यांनी म्हटले आहे. ‘श्रीविष्णूसहस्त्रनामांचा भक्तिभावपूर्वक जप केल्याने व्यक्ती सर्व दु:खातीत होते’ असे महाभारतकारांनी व शंकराचार्यांनी सांगितले आहे.

अल्लाहची बहुतेक नामे श्रीविष्णूच्या नामांशी तंतोतंत जुळतात. उर्वरित नावेदेखील परम अर्थदृष्ट्या समान आहेत. नमुन्यादाखल काही ठळक नामे पाच गटात वर्गीकृत केली आहेत. प्रथम अल्लाहचे नाम, नंतर श्रीविष्णूचे नाम व नंतर या दोन्हींचा समान अर्थ इंग्रजीत दिला आहे.

१) विश्वशास्त्रीय गुणनामे

अल्लाह – सर्वेश्वर – गॉड, हक्क – सत् – ट्रुथ

मालिक – सुराध्यक्ष – मास्टर, मुसव्विर – विधाता – फॅशनर

कबीर – बृहत् – ग्रेट, मुबदि – सर्वादि – बिगिनर

समद – सनातन – एटर्नल, अव्वल – आदिदेव – फर्स्ट

आखिर – परायणम् – लास्ट

२) सत्ताशास्त्रीय गुणनामे

बसीर – सर्वदर्शी – ऑलसीईंग, अलीम – सर्वज्ञ – ऑलनोईंग

मतीन – स्थिर – फर्म, कादिर – महाशक्ति – ऑलमायटी

शहीद – साक्षी – बिटनेस, रकीब – प्रजागर – वॉचफूल

जामी – संग्रह – गॅदरर

३) नैतिक गुणनामे

बर्र – शिव – गुड, सलाम – शान्ति – पीस

हमीद – स्तव्य – प्रेजवर्दी, वलीय – लोकबंधु – फ्रेंड

वहाब – वरद – बिस्टोवर, वदूद – मधु: - लव्हिंग

मुकसीत – समात्मा – इक्विटेबल

४) समाजशास्त्रीय गुणनामे

कहार – प्रभु – ऑलकंपेलिंग, हादि – मार्ग - गाईड 

रहमान – हरि: – मर्सिफूल, रहीम – सुंद – कंपॅशनेट

हाकम – उर्जितशासन – जज्ज, तव्वाब – अक्रूर – रिलेंटिंग

मुहैमिन – रक्षण: - हेल्प – इन – पेरिल, गफूर – सदामर्षी, फरगिव्हर

५) साक्षात्कारशास्त्रीय नावे

नूर – प्रकाशात्मा\देव – लाईट, बातिन – गुप्त – हिडन

जाहीर – परमस्पष्ट – मॅनिफेस्ट, मजीद – श्रीमान – ग्लोरिअस

कय्यूम – स्वयंभू – सेल्फसबसिस्टिंग, रफी – राम – एक्झाल्टर

लतीफ – महामन – ग्रेसिअस, वाहिद – एक: - वन

ऋषिमुनींनी आत्मरूप श्रीमहागणपतिस ‘त्वं ब्रह्मा:, त्वं विष्णु:, त्वं रुद्र:, त्वं अग्नि:…’ असे स्वानुभूतिपूर्वक संबोधिले आहे. त्यांचे अनुकरण करीत म्हणजे ईशनामाचा परमार्थ लक्षात घेऊन सर्वव्यापक देवाबद्दल आपणही ‘त्वं अल्लाह, त्वं विष्णू:’ असे ज्ञानभक्तिभावयुक्त म्हणत आचरण केले तर व तरच धार्मिक एकात्मता साधली जाईल.

३.

‘विल्यम जेम्स यांनी संस्थारूप धर्म व वैयक्तिक धर्म असे दोन प्रकार पाडले आहेत. यज्ञ वा पूजा म्हणजे कर्मकांड, सण, उत्सव, पुरोहितसंघटना इत्यादी गोष्टी संस्थारूप धर्मात मुख्यत: अंतर्भूत होतात. वैयक्तिक धर्म हा व्यक्तीच्या हृदयाचा धर्म असतो…वस्तुत: हा वैयक्तिक धर्मच सर्व धर्मांचा मूलभूत भाग आहे, ऋषि, सिद्ध, बुद्ध, मोझेस, ख्रिस्त, लाओत्से, मुहम्मद किंवा पंथप्रवर्तक साधुसंत यांचा हा वैयक्तिक धर्म होय.’

आत्मज्ञानपूर्वक ईश्वरानुभूति हे धर्माचरणाचे साध्य आहे. वैयक्तिक धर्म हे त्याचे साधन आहे. हिंदू व इस्लाम या दोन्ही धर्माच्या साहित्यात आढळणाऱ्या वैयक्तिक धर्मविषयक वर्णनाचा आशय एकच आहे. किंबहुना दोन्ही धर्मात सांगितलेला सर्वोच्च भक्ति प्रकार (‘थोर भक्ति’) एकच आहे, हे सूचित करण्यासाठी १) प्रार्थना, २) जिहाद, ३) उपवास, ४) तीर्थयात्रा या चार बाबींतील एकता स्पष्ट करतो.

१) प्रार्थना – बाह्यविश्वात देव आहे असे नुसते मानण्याने किंवा फक्त म्हणण्याने नव्हे तर देव आपल्यातही आहे असा अनुभव आला तरच ‘देव आहे’ अशी पक्की खात्री पटते. ‘एकांतात अल्लाशी एकरूप होणे म्हणजे प्रार्थना’ असे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी अनेकदा म्हटले आहे. आणि ‘ठायीच बैसोनि करा एकचित | आवडी अनंत आळवावा ||’ असे तुकारामांनी हरिपाठात म्हटले आहे. शुद्ध अंत:करण हा प्रार्थनेचा आत्मा आहे, त्यावाचून प्रार्थना म्हणजे केवळ शारीरिक हालचाली किंवा ढोंग मानले गेले आहे.

२) जिहाद – ‘जिहाद’ हा शब्द इस्लाम धर्माशी निगडीत आहे. परंतु खरे धर्माचरण म्हणजे ‘जिहाद’च असते. ‘स्वत:च्या कामक्रोधादी विकारांवर संयम करून परमेश्वराशी समीपता सांधण्यासाठीची अविरत धडपड म्हणजे जिहाद’ होय. संत होणे हे जसे इस्लाम धर्मीयांचे परमोच्च ध्येय आहे, तसेच ते हिंदूंचेही आहे. हे ध्येय गाठले जावे म्हणूनच संत तुकारामांनी अखंड जिहाद पुकारला होता. ते म्हणतात, ‘रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन ||’

३) उपवास – देवाच्या जवळ (उप) राहणे (वास) म्हणजे खरा उपवास होय. ‘सदा सर्वदा देव सन्निध आहे’ ही अखंड श्रद्धा बाळगून कायावाचामनसा ईश्वरनिष्ठ\आत्मनिष्ठ राहणे म्हणजे उपवास होय. काही वेळ स्वत:ला अन्नपाण्यावाचून दूर ठेवणे हा उपवासाचा अगदी संकुचित अर्थ आहे. मुहम्मद पैगंबर यांनी उपवासाचे खरे लक्षण सांगितले आहे, ‘उपवास ही केवळ एक शारीरिक अनुभूती होऊ नये. उपवास करताना संतोषपूर्वक देवाचे अखंड स्मरण केले पाहिजे. दैवी आनंदप्राप्ती हे उपवासाचे खरे उद्दिष्ट आहे.’ हाच विचार पुढील समर्थोक्तीत अंतर्भूत आहे –

देवाच्या सख्यत्वाकारणे | आपुले सौख्य सोडून देणे |

अनन्यभावें जीवें प्राणें:शरीर तेही वेचावे | | (दासबोध ४.८.६)

४) तीर्थयात्रा – मुसलमान मक्केची यात्रा इच्छितात, हिंदू लोक तीर्थांना भेटी देतात. आत्मज्ञानाव्यतिरिक्त किंवा ईश्वरानुभूतिशिवाय तीर्थयात्रा सफल होत नाही, असे दोन्ही धर्मसाहित्यात स्पष्ट केले गेले आहे. उदा. ‘एनिवन हू इज अॅबसेंट फ्रॉम गॉड अॅट मक्का इज इन द सेम पोझिशन अॅज इफ ही वेअर अॅबसेंट फ्रॉम गॉड इन हिज ओव हाऊस, अँड एनीवन हु इज प्रेझेंट विथ गॉड इन हिज ओन हाऊस, अॅज इन दि सेम पोझिशन अॅज इफ ही वेअर प्रेझेंट विथ गॉड अॅट मक्का… द ट्रु ऑब्जेक्ट ऑफ पिलग्रिमेज इज नॉट टू विझिट दि काबा बट टू ओन्टेन कत्टेम्प्लेशन ऑफ गॉड’, असे एका सुफीने मक्का यात्रेचे मूल्यमापन केले आहे. महाराष्ट्रीय संतांनी आत्मज्ञानविरहीत तीर्थयात्रेतील व्यर्थता सांगितली आहे. उदा. संत तुकाराम म्हणतात –

देहीं असुनिया देव | व्यर्थ हिंडतोस निदैव ||१||

देव आहे आहे अंतर्यामी | व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी ||२||

तुका सांगे मूढ जना | देही देव का पहाना ||५||

संत ज्ञानेश्वरांनी तर आत्मज्ञानरहित तीर्थयात्रेला ‘परधर्म’ असे संबोधिले आहे.

जवळी देवो आणि दाही दिशा हिंडती |

स्वधर्म सांडुनी परधर्मी रती ||

थोडक्यात, आत्मज्ञानविरहित किंवा शुद्धभावरहित तसेच इच्छापूर्तीसाठीचे धर्माचरण म्हणजे धर्म नव्हे. आत्मज्ञानपूर्वक धर्माचरण करणारा हिंदू व मुसलमान एकाच देवाची भक्ती करीत असतात. हे सत्य प्रामाणिकपणे व निरपेक्षपणे समजून घेतले की, धर्मनिरपेक्षता व्यवहारात उतरते आणि दोन्ही धर्माच्या एकात्मेचा संस्कार दृढ होतो.

(‘परामर्श’ या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी १९९४च्या अंकातून साभार.)

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 24 July 2018

सुंदर लेख आहे. फक्त हे सगळं वाहाब्यांना समजावून सांगणार कोण, इतकाच प्रश्न आहे. -गामा पैलवान