फिडेल कॅस्ट्रोसोबतची पहिली भेट
संकीर्ण - श्रद्धांजली
पाब्लो नेरुदा, अनुवाद : विकास पालवे
  • पाब्लो नेरुदा आणि फिडेल कॅस्ट्रो
  • Tue , 29 November 2016
  • फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro क्युबा Cuba पाब्लो नेरुदा Pablo Neruda

हवानामधील विजयी प्रवेशाच्या दोन आठवड्यांनंतर फिडेल कॅस्ट्रो एका लहानशा भेटीसाठी कराकस येथे आले होते. वेनेझुएला सरकार आणि त्या देशातल्या जनतेने केलेल्या मदतीखातर त्यांचे जाहीर आभार मानण्यासाठी ते आले होते. या मदतीत सैन्यासाठी पुरवलेल्या शस्त्रांचा समावेश होता आणि साहजिकच आहे, ही शस्त्रे त्यांना बेटानकुर्ट (हल्लीच निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष) यांनी पुरवली नव्हती तर त्यांचा पूर्वाधिकारी अ‍ॅडमिरल वुल्फगँग लाराझाबल याने पुरवली होती. लाराझाबल हा वेनेझुएलामधले डावे आणि कम्युनिस्ट यांचा मित्र होता. आणि त्याने क्यूबाने केलेली ऐक्य प्रस्थापनेची मागणी कबूल केली होती.

वेनेझुएलामधील जनतेने क्युबन क्रांतीतल्या तरुण विजेत्यांचं जसं उत्साहात स्वागत केलं, तसं दुसऱ्या एखाद्या राजकीय नेत्याचं स्वागत मी फार कमी वेळा पाहिलंय. फिडेल कराकसचं हृदय असलेल्या एल सिलेन्कियो इथल्या मोठ्या सभागृहात चार तास अखंडपणे बोलला. एक शब्दही न उच्चारता उभं राहून ते लांबलचक भाषण ऐकणाऱ्या २,००,००० लोकांमध्ये मीही एक होतो. माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी, फिडेलची भाषणं म्हणजे नवी जागृतीच असायची. लोकांना संबोधित करतानाचं त्याचं भाषण ऐकताना मला जाणवलं की, लॅटिन अमेरिकेसाठी एक नवं युग सुरू झालंय. मला त्याच्या भाषेतला ताजेपणा आवडला. सर्वोत्तम कामगार नेते आणि राजकारणीही बहुतेकदा अशा फॉर्म्युलावर भर देतात ज्यातील मुद्दे कदाचित बरोबर असतील, पण शब्द वापरून वापरून झिजलेले असतात. फिडेलने या फॉर्म्युल्यांकडे लक्ष दिलं नाही. त्याची भाषा उपदेशपर असली तरी नैसर्गिक होती. तो बोलताना आणि लोकशिक्षण करत असताना स्वत:ही शिकत होता.

राष्ट्राध्यक्ष बेटानकुर्ट तिथे नव्हता. जिथे त्याच्याविषयी कोणालाच कधी प्रेम वाटलं नाही, अशा कराकस शहराला तोंड द्यायच्या कल्पनेने तो घाबरला होता. फिडेल ज्या ज्या वेळी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करायचा त्या त्या वेळी नापसंतीदर्शक शिट्ट्या, आरोळ्या यांचे आवाज यायचे. फिडेल त्यांना हातानेच शांत राहण्याची खूण करायचा. मला वाटतं त्या दिवशी बेटानकुर्ट आणि क्युबन क्रांतिकारक यांच्यात एक निश्चित प्रकारचं वैर निर्माण झालं होतं. त्यावेळी फिडेल मार्क्सिस्टही नव्हता आणि कम्युनिस्टही. त्याच्या शब्दांना या दोहोंपैकी कोणत्याही विचारसरणीशी देणंघेणं नव्हतं. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, फिडेलचं ते भाषण, त्याचं तेजस्वी आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व, त्याने सामान्य  जनसमूहात निर्माण केलेला उत्साह, कराकस शहरातल्या लोकांचं तल्लीन होऊन त्याचं भाषण ऐकणं या सगळ्यामुळे अलंकारिक भाषेत भाषण करणाऱ्या, कमिट्या आणि गुप्त बैठका यांवर मदार असणाऱ्या जुन्या राजकीय शाळेतला राजकारणी बेटानकुर्ट अडचणीत आला. त्यानंतर बेटानकुर्टने फिडेल कॅस्ट्रो किंवा क्युबन क्रांती यांविषयी कोणाचाही जरादेखील वास आला तरी त्याचा अत्यंत क्रूरपणे छळ सुरू केला.

रॅलीच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे आम्ही देशातच फिरत होतो. त्यावेळी काहीजण मोटारसायकलवरून आमच्याकडे आले आणि क्युबन दूतावासात येण्याविषयीचं निमंत्रण देऊन गेले. ते मला दिवसभर शोधत होते आणि शेवटी त्यांनी माझा शोध घेतलाच. रिसेप्शन त्याच दिवशी दुपारी होतं. मटिल्डा आणि मी थेट दूतावासात गेलो. पाहुणे इतक्या प्रचंड संख्येने आले होते की, हॉल आणि गार्डन पूर्णपणे भरून गेलं होतं. बाहेर लोकांच्या झुंडीच्या झुंडी होत्या आणि त्या गर्दीतून वाट काढत इमारतीपाशी येणं अवघड होतं.

आम्ही लोकांनी भरलेल्या खोल्या ओलांडल्या. या खोल्यांमधल्या लोकांनी कॉकटेलचे प्याले धरलेले हात उंचावले होते आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या एक प्रकारच्या खंदकातून जात असल्यासारखे वाटत होते. कोणीतरी आम्हाला कॉरिडोरमधून आणि नंतर पायऱ्यांवरून वरच्या मजल्यावर नेलं. फिडेलची मैत्रीण आणि सेक्रेटरी सेला ही खोलीतल्या एका अनपेक्षित जागी थांबून आमची वाट पाहत होती. मटिल्डा तिच्याबरोबर थांबली आणि मला दुसऱ्या खोलीत नेलं गेलं. मला एखादा नोकर, माळी किंवा वाहनचालकाच्या खोलीत आल्यासारखं वाटलं. त्या खोलीत एक बिछाना होता, जो कोणीतरी उठून गेल्यावर विस्कटतो तसा झाला होता. उशी जमिनीवर पडली होती, आणि कोपऱ्यात एक टेबल होतं; बाकी काही नाही. मला वाटलं की इथून मला कमांडंटला भेटण्यासाठी एखाद्या छानशा खोलीत नेलं जाईल. पण असं काही घडलं नाही. अचानक दरवाजा उघडला गेला आणि फिडेल कॅस्ट्रोच्या उंच प्रतिमेने अवकाश भरून गेला.

तो माझ्यापेक्षा थोडा उंच होता. तो लागलीच लांब टांगा टाकत माझ्या दिशेने आला.

“हॅलो, पाब्लो’’ तो उद्गारला आणि त्याने मला गुदमरवून टाकणारी रासवट मिठी मारली.

त्याच्या कर्कश आणि जवळजवळ लहान मुलासारख्या आवाजाने मला आश्चर्य वाटलं. त्याचं असणं हे त्याच्या आवाजाशी जुळणारंच होतं. आपण कोणीतरी मोठे आहोत असं त्याच्या वागण्यातून वाटत नव्हतं तर तो अचानकच आपला लहानपणीचा चेहरा आणि पौगंडावस्थेतली अपुरी दाढी हरवून बसलेल्या मोठ्या मुलासारखा वाटत होता.

कसलीही भीडभाड न ठेवणारा फिडेल अचानक स्वागत थांबवून जागृत झाला आणि करारीपणे खोलीच्या एका कोपऱ्याकडे वळला. दरम्यान एक वृत्तछायाचित्रकार खोलीत येऊन एका कोपऱ्यातून आमच्या दिशेने कॅमेरा रोखून उभा होता, हे मी पाहिलं नव्हतं. फिडेलने एका फटक्यात त्याला पकडलं, त्याचा गळा धरून त्याला वर उचललं आणि गदागदा हलवलं. कॅमेरा खाली पडला. तो छायाचित्रकार त्या घट्ट पकडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. ते दृश्य पाहून मी घाबरलो आणि फिडेलच्या दिशेने धावत गेलो आणि त्याच्या हाताला धरून सोडवू लागलो. पण फिडेलने त्याला दारातून बाहेर फेकलं, तो पळून गेला आणि फिडेल माझ्याकडे वळला, हसला, खाली पडलेला कॅमेरा उचलला आणि जोराने बिछान्यावर फेकला.

आम्ही त्या घटनेविषयी बोललो नाही, पण पूर्ण लॅटिन अमेरिकेसाठी एखादी प्रेस एजन्सी सुरू करण्याच्या शक्यतेविषयी बोललो. मला वाटतं ‘प्रेन्सा लॅटिना’ (स्थापना- मार्च १९५९) ही क्युबामधील न्यूज एजन्सी ही त्याच संवादात जन्माला आली. मग आम्ही पुन्हा स्वागतकक्षाकडे आलो. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या दरवाजातून.

मटिल्डासोबत एका तासाने दूतावासातून परत येत असताना त्या छायाचित्रकाराचा भेदरलेला चेहरा आणि आपल्या पाठीमागून घुसखोराचा शांतपणे होणारा प्रवेश याचा लागलीच वास आलेला गुरिल्ला नेता मला आठवला.

फिडेल कॅस्ट्रो याच्यासोबतची ही माझी पहिली भेट होती.

(नोबेल पुरस्कार विजेते कवी पाब्लो नेरुदाच्या ‘Memoirs’मधून साभार)

लेखक ग्रंथसंपादक आहेत.

vikas_palve@rediffmail.com

Post Comment

Nilesh Pashte

Tue , 29 November 2016

नेरुदा खरचं खूप सुंदर कवी होते. यांची if you forget me ही कविता : I want you to know one thing. You know how this is: if I look at the crystal moon, at the red branch of the slow autumn at my window, if I touch near the fire the impalpable ash or the wrinkled body of the log, everything carries me to you, as if everything that exists, aromas, light, metals, were little boats that sail toward those isles of yours that wait for me. Well, now, if little by little you stop loving me I shall stop loving you little by little. If suddenly you forget me do not look for me, for I shall already have forgotten you. If you think it long and mad, the wind of banners that passes through my life, and you decide to leave me at the shore of the heart where I have roots, remember that on that day, at that hour, I shall lift my arms and my roots will set off to seek another land. But if each day, each hour, you feel that you are destined for me with implacable sweetness, if each day a flower climbs up to your lips to seek me, ah my love, ah my own, in me all that fire is repeated, in me nothing is extinguished or forgotten, my love feeds on your love, beloved, and as long as you live it will be in your arms without leaving mine.