फिफा वर्ल्ड कप २०१८ : कोणता संघ ‘अंडरडॉग’ ठरेल, याबाबत अजून काहीही सांगता येत नाही!
पडघम - क्रीडानामा
अनिकेत वाणी
  • फिफा वर्ल्ड कप २०१८
  • Tue , 26 June 2018
  • पडघम क्रीडानामा फिफा वर्ल्ड कप २०१८ FIFA World Cup 2018

फिफा विश्वचषकाकडे शांततेचा महामेरू म्हणून पाहिलं जातं. युरोपीय देशांनी जगभर वसाहती केल्या, पण दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल वेड त्यांना इतरत्र तेवढ्या प्रमाणात रुजवता आलं नाही. इंग्लिश प्रभावाखाली असणाऱ्या वसाहतींमध्ये क्रिकेटच अधिक रुजलं. त्यामुळे आशिया खंडातील भारत, चीन, श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांत फुटबॉलविषयीची जनजागृती कमी झाली. ऑस्ट्रेलिया, कॅरेबियन द्विपसमूहातही फुटबॉल मागे पडला. उत्तर आफ्रिकेतील अल्जिरीया आणि नायजेरिया वगळता पश्चिम आफ्रिका इथं फ्रेंच वसाहती होत्या. त्यामुळे या देशांमध्ये फुटबॉल संस्कृतीचा एक भाग बनला.

१४ जूनपासून रशियात सुरू झालेल्या फिफा विश्वचषकात आतापर्यंतचे सामने झालेले पाहता असं दिसतं की, धक्कातंत्र या विश्वचषकातदेखील पाहायला मिळालं (निदान आतापर्यंत तरी). उदाहरणार्थ एफ गटातील २०१४च्या गतविजेत्या जर्मनीला मेक्सिको विरुद्धच्या सामन्यात २-० असा पराभवाचा सामना करावा लागला. तर ड गटातल्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला नवख्या आईसलँडसमोर १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागल्यानं बाद फेरी गाठणं अशक्य झालं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रोएशिया विरुद्ध अर्जेंटिनाचा ०-३ असा झालेला पराभव! या पराभवामुळे मेस्सीनं तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली! या घटनेमुळे अर्जेंटिनाचे चाहते खूप निराश झाल्याचं दिसतं आहे.

विश्वकरंडक कोण जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर अतिशय अवघड असतं. आतापर्यंतचा या विश्वचषकाचा प्रवास पाहता अनेक गोष्टी एका क्षणात बदललेल्या दिसतात. काही गोष्टींचे ताळेबंद मांडता येतील, पण स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, नेयमार, मेस्सी, रोनाल्डो, दिएगो कोस्टा, रोमेलू लुकाको, केविंद डे ब्रुईन आणि एडेन हॅझार्ड ही ‘गोल्डन जनरेशन’ आता चांगली परिपक्क्व झालेली असली तरी कोणता संघ ‘अंडरडॉग’ ठरेल, याबाबत काहीही सांगता येत नाही.

या विश्वचषकाचा जोश, उल्हास खरं तर आधीपासूनच सुरू झाला आहे. १२ मार्च २०१५ या दिवशी पात्रता फेरीला सुरुवात झाली. तब्बल २२० देशांच्या संघांनी या विश्वकरंडकात अंतिम ३२ संघात स्थान प्राप्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. खरं तर रशिया हा यजमान असल्याकारणानं त्याला फिफा विश्वचषकात सहभागी होता आलं आणि त्याचा फायदादेखील त्याला झाला. तसंच तो पहिले दोन सामने जिंकून बाद फेरीतही पोहचला. बाकी जर्मनी, ब्राझील यांसारख्या देशांना अपात्रतेची भीती वाटत होती. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या अमेरिकेला अंतिम फेरीपासून वंचित राहावं लागलं. तर तिकडे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीन यांसारख्या देशांना अंतिम फेरी खूपच धूसर दिसत होती. पण अवघ्या साडेतीन लाखांचा असणारा आईसलँड मात्र विश्वकरंडकासाठी पात्र ठरला. हीच खरी या फिफाची खरी गंमत!

आतापर्यंत २०० संघ हे पात्रता फेरी सामने खेळणारे मानांकन असलेले देश आहेत. त्यापैकी २० विश्वचषकात आठच जगज्जेते झालेले आहेत. मागील विश्वचषकात अर्जेंटिना विजेता ठरला असता, पण थोडक्यात राहिला.

सध्याच्या विश्वचषकातील परिस्थितीचं वर्णन केल्यास साखळी फेरीतील चुरस ही शिगेला पोहचली आहे. आठ गटांमध्ये प्रत्येकी चार संघ असून सर्व संघाचे किमान दोन-दोन सामने झाले आहेत. त्यात नवखे आणि मुरलेले अशा दोन्ही प्रकारच्या संघाच्या अटीतटीच्या खेळामुळे स्पर्धेला अधिकच रंग चढला आहे.

आता फिफा विश्वचषक २०१८च्या पात्रता फेरीच्या निकष थोडक्यात समजावून घेऊ. जर एका गटात समान गुण असणारे संघ असतील, तर त्यामध्ये कोणते दोन संघ हे बाद फेरीत जाणार हे गोल फरक (डिफरन्स), गोल संख्या, गट सामन्यांमध्ये संबधित संघाला मिळालेले गुण, सर्व ग्रुप सामन्यांत मिळवलेल्या गोलांची संख्या (अयशस्वी ठरल्यास), सर्व गट सामन्यांत पंचांनी दाखवलेल्या पिवळा आणि लाल कार्डची संख्या आणि त्यावर सुयोग्य खेळावर प्राप्त झालेले गुण आणि शेवटी फिफा आयोजन समितीचा अंतिम निर्णय यावर ठरतं.

गट अ संघात सौदी अरेबियासारखा तुलनेनं दुबळा संघ असल्यानं, तसंच चौथा संघ इजिप्तदेखील फारसं आव्हान उभं करण्यात अयशस्वी ठरल्यानं यजमान रशिया आणि उरुग्वे या दोन्ही संघांना राउंड १६ मध्ये पोहचण्यात फारशी अडचण आली नाही. तर तिकडे ब गटात स्पेन आणि पोर्तुगाल संघांमधला सामना हा रोनाल्डोच्या अखेरच्या गोलनं ३-३ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे या दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इराण आणि मोरक्कोला हरवणं गरजेचं होतं, तसं त्यांनी हरवलंही पण पोर्तुगाल आणि स्पेन हे जगज्जेते असूनही पोर्तुगालला दुबळ्या मोरक्को विरुद्धच्या लढतीत १-० अशी चुरशीची लढत द्यावी लागली. मोरक्कोला हरवलेल्या इराणनं १-० असे स्पेनला झुंजवलं.

गट क चा विचार केला असता त्यामानानं फ्रान्सला ऑस्ट्रेलिया आणि पेरूवर सहज विजय मिळवून त्यांनी बाद फेरी गाठली. डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या संघात झालेला सामना बरोबरीत सुटल्यानं थोडीफार जी स्पर्धा निर्माण झाली होती, ती पेरूविरुद्ध झालेल्या सामन्यात डेन्मार्क विजयी झाल्यानं डेन्मार्क सहज बाद फेरी गाठणार असं दिसतं.

खरी मजा तर ड गटातील संघांत निर्माण झाली आहे. आईसलँडसारखा सर्वांत कमी लोकसंख्येचा देश असूनही मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखलं, तर क्रोएशियानं ३-० असं हरवून खूप मोठा उलटफेर केला. त्यामुळे नायजेरियाला अर्जेंटिनानं कुठल्याही परिस्थितीत हरवणं आवश्यक झालं असून त्याच बरोबर नायजेरियानं आईसलँडला हरवणं किंवा तो सामना बरोबरीत सुटणं अत्यावश्यक आहे. तरच अर्जेंटिनाला बाद फेरी गाठता येईल. कारण दुसऱ्या स्थानासाठी तीनही संघांच्या आशा जिवंत आहेत.

ई गटामध्ये ब्राझील आणि स्वित्झर्लंड या दोन संघातील सामन्यात बरोबरी साधल्यानं बाद फेरी गाठण्यासाठी दुसरा सामना जिंकणं गरजेचं होतं. त्यात सर्बियानं कोस्टारिका विरुद्ध विजय मिळवला असल्यानं त्यांचं पारडं थोडं जड वाटत असताना ब्राझीलनं कोस्टारिकावर, तर स्वित्झर्लंडने सर्बियावर विजय मिळवल्यानं त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर झाल्यासारखा वाटत असला तरी भविष्य बदलण्याची ताकद कोणीही नाकारू शकत नाही.

माजी विश्वविजेत्या जर्मनीला धक्का देत फ गटात मेक्सिकोनं आपलं आव्हान तर निर्माण केलंच, पण त्याबरोबरच साउथ कोरियावर गोलांचं क्षेपणास्त्र डागत बाद फेरी गाठली. स्वीडननं साउथ कोरियाला जरी हरवलं असलं तरी जखमी वाघ झालेल्या जर्मनीनं त्यांना हरवून आपलं आव्हान कायम राखलं आहे. आता या गटातील उर्वरित साखळी सामने किती चुरशीचे होतील, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ग गटात मात्र दुबळ्या ट्युनिशिया आणि पनामा या दोन संघांना हरवत इंग्लंड, बेल्जियम अगदी अलगदपणे बाद फेरीत पोहचले. त्यामुळे ट्युनिशिया आणि पनामा संघांचं आव्हान जवळ-जवळ संपुष्टात आलं आहे.

अंतिम ह गटात जपानसारख्या आशियाई देशानं इतिहासात पहिल्यांदा दक्षिण अमेरिकेला हरवण्याचा पराक्रम केला आहे. जपाननं कोलंबियाला जरी २-१ अशी जरी मात दिली असली तरी सेनेगल विरुद्धचा सामना २-२असा बरोबरीत सुटल्यानं बाद फेरी गाठण्यासाठी आणखी एका गुणाची आवश्यकता आहे. आफ्रिकन देशानं पहिल्यांदाच कुठल्यातरी युरोपियन देशाला हरवलं आहे. सेनेगलनं पोलंडला २-१ हरवलं असलं तरी त्यांना देखील बाद फेरी गाठण्यासाठी एका गुणाची आवश्यक्यता आहे.

फुटबॉलची लोकप्रियता त्यांच्या साधेपणात आहे. एक चेंडू २२ जण एकाच वेळी कसा टोलवतात हे महत्त्वाचं नसतं, धडाचा गोलपोस्ट जरी नसला तरी चालतं. चेंडू त्या जाळ्यात गेला की, गोल एवढा साधा सोपा हा खेळ आहे. ऑफसाइडसारखा गुंतागुंतीचा एक नियम आहे; पण तो फुटबॉलच्या सामन्यांचा गोडवा चाहत्यांपासून कोणीही हिरावून घेत नाही.

वर्ल्डकप चार वर्षांनी येतो; पण तो संपूर्ण जगाला आनंद देतो. भारतासारखा मोठा देश जरी या विश्वचषकात नसला तरी भारतात फुटबॉलचे चाहते काही कमी नाही. त्यांनाही अशा आहे की, एक दिवस सुनील छेत्रीचा संघ फिफामध्ये आपलं स्थान मिळवेल. शेवटी दुनिया ही गोल आहे, हे जगभरातील विविध चाहत्यांच्या उत्साह, जल्लोष यामधून दिसतं.

.............................................................................................................................................

लेखक अनिकेत वाणी यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.

anumyself01@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................