हा गळेकाढू प्रकार अतीव स्मरणरंजनातून नि विद्वतेच्या अहंकारातून प्रकटतो…
पडघम - साहित्यिक
मंगेश नारायणराव काळे
  • ‘खेळ ३९’चं मुखपृष्ठ, अशोक शहाणे, चंद्रकांत पाटील आणि अरुण खोपकर
  • Wed , 20 June 2018
  • पडघम साहित्यिक खेळ Khel मंगेश नारायणराव काळे Mangesh Narayanrao Kale अशोक शहाणे Ashok Shahane चंद्रकांत पाटील Chandrakant Patil अरुण खोपकर Arun Khopkar

“सांप्रत काळचे पंडितांचे ज्ञान असे असते की त्याचा जीवास, शरीरास, प्रपंचास काहीच उपयोग पडत नाही. केवळ वादविवाद करण्यास व लोकांस तमाषा दाखविण्यास मात्र उपयोगी आहे. यास्तव मला हे पंडित बहुरूपी, सोंगाडी व चित्रकथी याहून बरे दिसत नाही.”

– विष्णुशास्त्री चिपळूणकर (निबंधमाला भाग १)

महाराष्ट्राची भूमी विद्वतेसाठी, विद्वानांसाठी नेहमीच परिचित राहिली आहे. मात्र खऱ्या अर्थानं विद्वान, व्यासंगी असूनही जेव्हा हेच विद्वान स्वत:च्याच विद्वतेच्या कोशात गुरफटून अहं कुरवाळण्याच्या वाईट खोडीमुळे ‘मी म्हणेल ते ब्रह्मवाक्य’ या आवि‌‌र्भावात नॉस्टॅल्जिक गळे काढू लागतात, तेव्हा प्रश्न पडतो की, हे सगळं कशासाठी चाललंय? कारण या विद्वतेचा सामान्य किंवा अभ्यासू जनांसही काहीएक फायदा होत नाही. उलटपक्षी काहीतरी राळ उडवून अल्पबुद्धीचे लोक या विद्वानांनी केलेल्या निरर्थक आकाशवाणीचे चविष्ट वर्णन करण्यात धन्यता मानतात, वादविवादाच्या फैऱ्या झाडून उबग आणत असतात. इथं आमच्या समोर मासल्यादाखल महाराष्ट्रदेशीच्या विद्वानांची गेल्या काही दिवसांतील काही अशीच बेछूट वक्तव्यं आहेत. सबब या सगळ्या शेरेबाजीतला उथळपणा, अतिस्वप्नरंजनाच्या आहारू जाऊन केलेली वक्तव्यं किंवा स्वत:ची विद्वता इतर जनांवर लादण्याचा अट्टाहास या पलीकडे या विद्वानांची वक्तव्यं जात नाहीत, हे सांगण्यासाठी हा प्रपंच!

मराठवाड्यातल्या कुठल्याशा पिटकुल्या संमेलनात मुलाखतीच्या निमित्तानं मराठीतील ज्येष्ठ कवी, अनुवादक चंद्रकांत पाटलांनी अशीच आपली समशेर हवेत चालवून ‘हल्लीचे मराठी साहित्य ऐंशी ते नव्वद टक्के किलोनं विकण्याच्या म्हणजे ‘रद्दी’च्या भावाचं आहे’, हे जाहीर करून मराठी सारस्वतांनी ‘घाम’ आणि नि प्रसंगी ‘दाम’ गाळून केलेली ग्रंथनिर्मिती पार रद्दी करून टाकली आहे. हरकत नाही. आम्हीसुद्धा या ‘रद्दी’ विधानाचं स्वागतच करतो. या ऐंशी-नव्वद टक्क्यांत अजून चार-पाच टक्क्यांची वाढ करून या ‘रद्दी’चं पर्सेंटेज वाढवण्यासही आमची हरकत नाही. प्रश्न हा आहे की, ही ‘रद्दी’ आताच्या काळातच निर्माण होत आहे का? म्हणजे पाटलांच्या काळात झालेली ग्रंथनिर्मिती केवळ थोर होती नि तेव्हा ‘रद्दी’ निर्माण झालीच नाही, असं काही म्हणता येईल का? मागे वळून पाहिलं तर पाहता येतं की, त्या रद्दीचं प्रमाण साठोत्तर काळातही आताच्या तुलनेत बरंच होतं. (माध्यमक्रांतीमुळे वेगानं बदललेल्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमुळे ग्रंथनिर्मिती पूर्वीपेक्षा सुकर नि सहज होऊन ग्रंथनिर्मितीचा वेग वाढला, हे गृहित धरलं तरी या नव्या तंत्रज्ञानामुळे शंभर-दोनशेच्या आवृत्त्या निघू लागल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उलट पूर्वी मुद्रणकला प्रगत नसल्यानं प्रत्येक ग्रंथाची हजार अकराशेची आवृत्ती निघत असल्यानं ही रद्दी खपायला तीस ते चाळीस वर्षं लागत होती.) साठोत्तर म्हणवल्या गेलेल्या पिढीची व तत्कालिन, समकालीन कवी-लेखकांची एकूण संख्या पाहिली तरी लक्षात येतं की, त्या काळीही वाईट लिहिणाऱ्यांची संख्या आजच्या तुलनेत पर्सेंटेजवाइज लक्षणीय होती. स्वत: चंद्रकांत पाटलांची कविताही ते म्हणतात तशी त्यांच्या समकालिनांच्या म्हणजे कोलटकर, चित्रे, परब, ओक, ढसाळ यांच्या तुलनेत रद्दीच होती, किंवा हिंदी-मराठी ‘सेतु’ प्रकल्पातून त्यांनी केलेली असंख्य संपादनंही. तत्कालीन साठोत्तर ‘रद्दी’ कवी-लेखकांची चर्चा यापूर्वीही आम्ही ‘खेळ’मधून सातत्यानं केलेली असल्यानं इथं त्याची पुनरावृत्ती न करता एवढंच म्हणायचं आहे की, जवळजवळ प्रत्येक भाषेतील साहित्यात प्रत्येक काळात कमी-अधिक प्रमाणात ‘रद्दी’मय निर्मिती होत असते. पण, ‘आमच्या काळी फार थोर होतं नि आता सगळं सपक आहे’, हा जो काही गळेकाढू प्रकार अतीव स्मरणरंजनातून नि विद्वतेच्या अहंकारातून प्रकटतो, तोच अशी शेरेबाजी करायला प्रवृत्त करत असतो.

चंद्रकांत पाटलांच्या ‘आजच्या कवितेविषयी’च्या शेरेबाजीबद्दलही असंच काहीसं म्हणता येईल. तुलनेनं आताच्या काळी बऱ्या लिहिणाऱ्या कवींची संख्यासुद्धा पूर्वीपेक्षा निश्चितच जास्त भरेल. प्रश्न एवढाचंय की, हे सगळं वाचायला या विद्वानांकडे वेळ आहे का? कोणत्याही काळाचं, पिढीचं मूल्यमापन तो काळ ओलांडून गेल्यावर होत असतं. साठोत्तरी महत्त्वाच्या कवींचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन झालं ते थेट नव्वदोत्तर काळातच, पण अधीर मनानं नि टोकाचं स्मरणरंजन यातून ही गफलत होत असावी.

इथं ‘रद्दी’वरून एक किस्सा आठवला. ज्याचा खरं तर वरील वक्तव्याशी थेट संबंध नाही. तरी ‘रद्दी’ या प्रकरणाशी काही एक संबंध येत असल्यानं सांगण्याचा मोह होतोय. पाटील सर अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असल्यानं त्यांनी कधी काळी प्रकाशक होण्याची ‘तुला’ही करून पाहिली आहे. प्रकाशित केलेली पुस्तकं अर्थातच शासकीय ग्रंथयोजनेत वर्णी लावणं व्यवसाय म्हणून क्रमप्राप्त असल्यानं त्यांनी या पुस्तकांची वर्णीही लावून घेतली. एकदा वर्णी लागल्यावर ग्रंथ पुरवणं क्रमप्राप्त असतं. मात्र त्यासाठी हलक्या प्रतीचा कागद, कव्हर वापरून ग्रंथपुरवठा करावा यास कागदटंचाई म्हणावं की, दोन पैसे वाचवण्याची धंदेवाईक बुद्धी? खरं तर हे कोणत्याही नैतिकतेत बसणारं नाही. झाल्या प्रकारावर आमचा विश्वासच बसला नाही. पण एका प्रकाशकानं दोन प्रकारची पुस्तकं समोर ठेवल्यावर काय बोलणार? चलता है ‘रद्दी’ जो है.

होतं काय की, आपल्या महाराष्ट्रदेशी भाबडू लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं या विद्वानांच्या लवकर ध्यानी आल्यानं जिथं कुठं बारकुलं व्यासपीठ मिळालं तिथं रद्दी, कंपू वगैरेच्या स्टोऱ्या हाणायच्या नि आपली पाठ थोपटून घ्यायची, ही रीत मराठी वाङ्मयीन पर्यावरणात नेमाड्यांपासून पाटलांपर्यंत चांगलीच स्थिरावली आहे.

दुसरे एक विद्वान अशोक शहाणे यांच्याविषयी तर आमच्या मनात विशेष आदर आहे. चंद्रकांत पाटलांसारखे आंतरभारतीय साहित्यसेवा प्रकल्पात हे कधीच नव्हते किंवा अशी ‘सेवाभावी’ वृत्तीही त्यांच्याकडे नसल्यानं महाराष्ट्रदेशी त्यांच्याकडे लोक अतीव आदरानं नि कुतूहलानं पाहात असतात. परवा ठाण्यात झालेल्या मुलाखतीदरम्यान शहाण्यांनी अशीच समशेर चालवून आपली विद्वता प्रकट केली. एकतर शहाणे गेल्या पन्नास वर्षांपासून बंगालीच्या अतीव प्रेमातून बाहेर पडायला तयार नाहीत. अनेक वर्षांपासून ते तेच ते बोलतायत. ‘मी म्हणतो म्हणून हे थोर’ यापुढे त्यांचा युक्तिवाद जात नाही. शिवाय त्यांच्या अंगी बाणलेला टोकाचा तुच्छतावाद पाहता गेल्या दहा-बारा वर्षांतलं त्यांनी काय वाचलं असणार हा प्रश्नच पडतो. त्यामुळे आपल्या भाषेतलं काहीही न वाचता कवी-लेखक-अभ्यासक यांना बाद करणारे शहाणे बहुदा भारतीय भाषेतले एकमेव विद्वान असावेत.

इथंही स्मरणरंजन नि विद्वतेचा अहंकार पाठ सोडत नाही असंच म्हणता येईल. त्यामुळेच त्यांना रवींद्रनाथ टागोर नि तुकाराम सारखेच वाटतात. ही तुलना खरं तर अतिशय बालिश स्वरूपाची म्हणता येईल. म्हणजे टागोरांच्या हयातीतच ते सामान्य कवी होते, असे म्हणणारे अनेक विद्वान होतेच, आताही असतील. मात्र तुकारामाच्या पासंगालाही न पुरणाऱ्या टागोरांना ज्या पद्धतीत शहाणे मोठं म्हणून आपल्या बंगाली प्रेमाचं भरतं आणतात नि तुकारामाला पाश्चात्य वळणाच्या कृतक रोमँटिकतेच्या शेजारी नेऊन बसवतात, हे खरं तर अतिशय कीव आणणारं आहे. त्यामुळे ही फेकाफेक म्हणजे, ‘अति झालं नि हसू आलं’ असंच म्हणावं लागेल.

शिवाय नेमाडेंच्या ‘कोसला’ची भाषाशैलीची चिकित्सा करण्यासाठी सांप्रत काळी एकही अभ्यासक नसल्याचा शहाण्यांचा शोधही असाच बाष्कळ स्वरूपाचा म्हणता येईल. अशोक केळकर, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद मालशे, कल्याण काळे, दिलीप धोंडगे, अश्विनी धोंडगे यांच्यापासून थेट विश्राम गुप्ते, महेंद्र कदम, रणधीर शिंदे, गजानन अपिने, चिन्मय धारूरकर अशी जुन्या-नव्यांची ही सहज सुचलेली नावं. अशी किमान डझनभर गंभीरपणे साहित्यव्यवहाराकडे पाहणारी नावं समोर असताना मराठीत अभ्यासच नसल्याचा जावईशोध शहाण्यांनाच लागू शकतो.

थोडक्यात काय शहाण्यांची सुई बंगाली ते नेमाडे या परिघावरच वर्षानुवर्षं अडकून पडली आहे. त्यामुळे त्यांच्यालेखी एक तर बंगाली थोर किंवा नेमाडे.

याच प्रकारच्या स्मरणरंजनाचा नि अतिव विद्वतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अरुण खोपकरांच्या अलीकडेच आलेल्या एका लेखाकडे पाहता येईल. मराठी भाषेतल्या ‘संकरानं’ व्यथित झालेल्या खोपकरांनी मराठीच्या भवितव्यासंदर्भात जो गळा काढला, तोही याच प्रकारातला. एकतर खोपकर कोणत्याही अर्थानं तसे महत्त्वाचे लेखक नाहीत. थोडेफार किस्से नि मराठीचं जुजबी ज्ञान असणारा कुणीही सहृदयी गृहस्थ असे छान-छान लेखन करत असतोच. मात्र आपल्याकडे साहित्य अकादेमी पुरस्काराचं गाजर अपघातानं तोंडी लागून जो काही साक्षात्कार काही लेखकांना होतो, त्यातून हे घडत असावं. म्हणजे मराठी भाषेचा इतिहास खोपकरांनी थोडा जरी चाळून पाहिला असता तर लक्षात आलं असतं की, मराठी भाषेनं नेहमीच इतर भाषेतली आक्रमणं सोसूनही ती पुन्हा नव्यानं उभी राहिली आहे.

खरं तर काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मागचं जुनं होतं नि नवं येत असतं. काही वेळा एखादं वळण फसवं असतं. निर्मितीचा प्रदेशही सपाट असतो. मात्र पुढच्या वळणावर तो प्रदेश पुन्हा समृद्ध होत असतो. हे कोणत्याही भाषेतील साहित्यनिर्मितीच्या संदर्भात म्हणता येतं. ज्येष्ठांनी आपला काळ जगून झाला आहे नि त्याचं जे काही ‘संचित’ पदरी पडलं आहे ते सांभाळावं. काही उणं असेल तर बोट ठेवावं, पण हवेत समशेरी उपसून नुसतीच फेकाफेकी करावी हे काही पटणारं नाही.

अर्थात सध्याचा माहोलच तसा आहे. जिथं देशाचा प्रधानसेवकच रोज ढिगानं खोटं बोलतो नि या ‘फेकाफेकी’ला राष्ट्रीय पातळीवर अधिष्ठान प्राप्त करून देऊ पाहतो, तिथं महाराष्ट्रदेशीच्या विद्वानांचा हा हवेतला गोळीबार एक सामान्य घटना म्हणता येईल.

असो.

‘खेळ ३९’ बराच रखडला. असं व्हायला नकोय. प्रयत्नय की, पुढला ‘खेळ’ वेळेत होवो.

(‘खेळ’ या अनियतकालिकातील संपादकीय लेख संपादक-प्रकाशकाच्या पूर्वपरवानगीनं पुनर्मुद्रित)

.............................................................................................................................................

लेखक मंगेश नारायणराव काळे ‘खेळ’चे संपादक आणि नव्वदोत्तर कवी आहेत.

mangeshnarayanrao@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dust Golden

Fri , 22 June 2018

*


ramesh singh

Wed , 20 June 2018

मंगेश नारायणराव काळे हे स्वतः अशाच पद्धतीने शेरेबाजी करत असतात. त्यांच्यात आणि लेखात उल्लेख आलेल्या ज्येष्ठ मंडळींच्यात एकच फरक आहे- या मंडळींमध्ये थोडीफार विद्वत्ता होती, परंतु काळे यांच्यात विद्वत्तेचाही अभाव आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार आणखीच दयनीय वाटतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......