नष्ट होत चाललेली सूर्या नदीकाठची संस्कृती
पडघम - सांस्कृतिक
प्रमोद गोवारी
  • सूर्या नदी आधीची आणि धरणानंतरची
  • Wed , 20 June 2018
  • पडघम सांस्कृतिक सूर्या नदी Surya River जव्हार Jawhar

सूर्या नदीचा उगम जव्हार येथून झाला आहे. डोंगरावरून ही नदी खाली येते आणि मोठी होत जाते. पुढे ती वेगवेगळ्या गावाच्या कडेकडेने प्रवास करते. नदीच्या पश्चिम बाजूला गुदले, चीचारे, खुताडपाडा, सागावे, कोकणेर, चहाडे, वसरे-खडकोली अशी गावं आहेत. तर पूर्वेकडे ब्रह्मपूर, रावते–अकोली, नागझरी, निहे, लोवरे, काटले, वादिवली, मासवण, धुकटण, बायाचापाडा या गावाच्या बाजूने ही नदी वाहत जाते. या नदीचं पाणी उन्हाळ्यात पूर्वी काही ठरावीक ठिकाणी खड्यांमध्ये बाराही महिने राहत असे, हे मी मासवण भागात पाहिलं आहे. त्या खड्यांना ‘दाहाड’ म्हणायचे. ‘दाहाड’ म्हणजे छोटे आड. या खड्यांना नावं होती - उणेरी, गोधला, करजाचा  दाहाड, लुगडधवन आणि गायतारा. या ठराविक दाहाडांत सतत पाणी राहत असे.

पूर्वी नदीचं पात्र कमी रूंदीचं होतं. ते मोठं होत गेलं. पूर्वी लोक रेती उकरून काढत होते. पण नंतर रेती काढण्याच्या मशीन आल्या. त्यामुळे नदीची रूंदी, खोली वाढली, पण पाण्याखाली असणारी वनस्पती ‘सोल’ आणि आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती ‘परेल’ यांचं प्रमाण कमी झालं. नष्टच झालं असं म्हणायला हरकत नाही.

नदीचा किनारा पूर्वी मातीचा तसंच सपाट होता. म्हणजे लगेच खोल पाणी नव्हतं. नदीत उतरताना प्रथम पावलाइतकं पाणी, पुढे कमरेइतकं, छातीइतकं, मग पुरुषभर, असे टप्पे होते. आता मात्र असे टप्पे न राहता उतरल्यावर थेट खोल पाणी लागतं. किनारा मातीचा न राहता रेतीचा झाला आहे.

मातीचा किनारा होता तोपर्यंत नदीकाठी लोक भाजीपाला लावत होते. त्यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, मका, दुधी यांसारख्या भाज्या घेतल्या जायच्या.  घरच्या खपासाठी थोडीफार भाजी ठेवून बाकीची विकण्यासाठी नेली जायची. या भाजीच्या वाड्यांना ‘काशा’ किंवा ‘विरा’ हा शब्द वापरत होते. वाडीतली माणसं डोकीवर हंडा किंवा मटका घेऊन सतत पाण्याच्या दहाडांतून पाणी वाहून नेत होते. मुख्य म्हणजे या सर्व भाज्या गुराच्या शेणापासून बनवलेल्या सेंद्रीय खताचा वापर करून उत्पन्न घेत असत. औषधाची फवारणी नाही की, कोणतेही  रासायनिक खत नाही. ठरावीक ठिकाणी नदी कोरडी होत असल्यामुळे अशा रेतीच्या भागात कलिंगडाची लागवड केली जायची. एकेकाळी ट्रक भरून कलिंगडं जात होती. पण आता नदीचं पात्र मोठं झालं. हा सारा पट्टा पाण्याखाली गेला. त्यासोबत कलिंगडांचं पीकही गेलं.   

मासेमारी होत होती, पण गरजेपुरती. त्यासाठी वापरलं जाणारं साहित्य माशाच्या जातीनुसार बदलत असे. उदा. पागेर, भुसा, घोळवा, वेडी, गाधा, मलई, ही त्यातील काही साहित्यांची नावं. मासे पकडायचे प्रकार होते. कपड्याची झोळी करून ती खोल पाण्यात सोडायची. काही वेळानंतर ती काढायची. झोळीत हमखास मासे भेटत. अजून एक पद्धत होती. पाण्यात खड्डा करून त्यात काही आमिष ठेवायचं. तांदळाचे दाणे वगैरे. मासे आत येण्यासाठी वाट ठेवायची. काही वेळानंतर खड्ड्याची वाट बुजवून टाकायची. आत आलेल्या माशांना बाहेर जायला वाव राहायचा नाही आणि ते मासे मिळायचे.

अनेक प्रकारच्या माशाच्या जाती इथे मिळत होत्या. कोलंबी. गोड्या पाण्यातही कोलंबी असायची. खरबी, शेगाड्या, टोसेरा, वाव, डाकू, टीका, डाबरी, मुरी, मल्या, दडावणी, वावल्या, मर्ल, काळोसा, अर्ल, शिगटा,  वालझी आणि इतर अनेक प्रकारचे मासे. आता अनेक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. मासे पकडायच्या पूर्वीच्या पद्धतीही राहिल्या नाहीत. आदिवासी समाज आता खोल नदीत जाळं वापरून मासेमारी करतो. काळोसा, अर्ल, मर्ल, मूरी हे मासे पूर्वी मिळायचे, पण आता दिसत नाही.

नदीच्या काठी काही वनस्पती होती, तिथे जास्त प्रमाणात करंज, परेल, दाब गवत, लोहा, खराटा उन्हेरी, रामबाण, जाळीचे ताने, अशा वनस्पती दिसत होत्या, पण आता त्या दुर्मीळ झाल्या आहेत. नदीचं पात्र वाढलं आणि वनस्पतींचं रान नष्ट झालं. करंजाची झाडे थोडीफार दिसतात. नदीचं पाणी पिण्यासाठी वापरत होते. पिण्याचं पाणी शुद्ध करण्याचीही पारंपरिक पद्धत होती. एखाद्या खड्यात १२ महिने पाणी राहत असेल तर त्याचा बाजूला तीन-चार फूट खड्डा खोदायचे व त्यांत साठलेले पाणी पिण्यासाठी वापरायचे. त्याला ‘विऱ्हा’ असे म्हणतात. जास्त रेतीच्या भागात हा विऱ्हा खोदायचे. त्यामुळे पाणी शुद्ध मिळायचं असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. विऱ्हा दर दोन-तीन दिवसांनी साफ केला जायचा. खराब पाण्याला ‘खदुल’ आणि चांगल्या पाण्याला ‘नितळ’ असे शब्द होते.

नदीच्या पाण्याबरोबर वाहून आलेली रेती काढून विकली जायची. छोटी-मोठी बांधकामं करणारे गवंडी ही रेती आठवडे बाजारातून आदिवासींकडून विकत घेत. बोईसरला १९७० मध्ये एमआयडीसी सुरू झाली, तेव्हा रेतीला खूप मागणी आली.तोपर्यंत घरगुती कामासाठीच रेती वापरत होते. त्यावेळेस १ ट्रक भरण्यासाठी १० रुपये मिळायचे. इथं लहान मोठ्या रेतीदादांचा शिरकाव झाला होता. आता रेती राहिली नाही. त्यामुळे दादाही गेले. बांधकामं वाढत गेली होती. पण गेल्या काही वर्षांपासून त्याला खीळ बसली आहे.

या साऱ्या रिवाजांप्रमाणे नदीकाठाला पण इतिहास आहे. नदीकाठच्या कोकणेर गावाच्या हद्दीत शंकराचं मोठं मंदिर खूप जुनं आहे. मकर संक्रातीला इथे मोठी यात्रा भरते. गरम पाण्याच्या झऱ्याचे कुंड आहेत. थंडीच्या दिवसात शेजारच्या चार-पाच गावामधून लोक आंघोळीसाठी येत होते. कुंडाच्या बाजूला उकळत्या गरम पाण्याचा झरा होता. त्यामध्ये तांदूळ पण शिजायचे असं काही जुनी माणसं सांगतात. त्याच्या बाजुला पांढऱ्या रंगाची माती होती. महिला आणि पुरुष ती केसांना व अंगाला लावून स्वच्छ करत होते. धरण झाल्यामुळे हा सर्व परिसर पाण्याखाली गेला. पावसाळ्यात या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी तराप्याचा वापर करत होते. भरतीचं खारं पाणी पूर्वी नदीच्या गोड्या पाण्यात मिसळायचं, तेव्हा गोड्या पाण्यातील मासे मरायचे. पण कोलंबी मरत नसे. धरण झाल्यापासून खारं पाणी गोड्या पाण्यात मिसळत नाही.

पूर्वी पावसाळ्यात नदीला आता पेक्षा खूप मोठे पूर यायचे व त्याची तीव्रता खूप असायची. नदी तुंडूब भरून वाहत असे. गावातही पाणी यायचं. कारण तेव्हा नदीवर धरण नसल्याने पाण्याचा वेग जास्त असायचा. आता धरण झाल्याने पाण्याच्या वेगाची तीव्रता कमी झाली.

माशाच्या बाबतीतली एक खास गोष्ट. कोणताही मासा खोल पाण्यात पिल्लू घालत नाही. त्यासाठी ते उथळ पाण्यात येतात. पावसाळ्यात खोल पाण्यातून बाहेर येऊन उथळ पाण्यात जिथे गवत असते त्या भागात सर्व मासे पिल्लू घालण्यासाठी येतात. त्यालाच ‘गाभोळी सोडणे’ असा शब्द प्रचलित होता. कोलंबी मात्र गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात जाऊन पिल्लू घालते.

आता जसे रासायनिक द्रव वापरून मासेमारी करतात त्याप्रमाणे पूर्वी जंगली वनस्पती वापरुन मासेमारी केली जायची. त्याची तीव्रता काही वेळापर्यंत असायची. या वनस्पतीची नावं - गाळ, धोतऱ्याची फळं, रान, तेडली आणि जांभूळचा पाला. या वनस्पती माशाच्या डोळ्यांना झोंबत असत. अशा काही वनस्पती पूर्वी जंगलात मिळायच्या. आदिवासींना त्याचं ज्ञान होतं. काळानुसार या वनस्पती नष्ट होत आहेत.  

काही औषधी वनस्पती या सूर्या नदीतच मिळत होत्या. मूतखड्यासाठी लिलेचा कंद, रान कारेला, परेल, सोल, खराटा, लग्नकार्य असेल तर त्यांची पानं शो पीस म्हणून ठेवत असत. हे आता नाहीसं झालं आहे. पण जुन्या पिढीला सारे रिवाज आणि वनस्पती मासे आणि इतर विविध प्रकारांच्या चालीरीतींचं चांगलं ज्ञान आहे. पण ही पिढी अस्तंगत झाली की ते ज्ञानही जाईल असं वाटतं.

सूर्या नदीवर जुना पूल होता. तो १९४० साली बांधला गेला. त्यावरून लोक चालत जात असत. पण पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जायचा. त्याची उंची फार नव्हती. पावसाळ्यात गैरसोय व्हायची. नवीन पूल २०१५ साली बांधून झाला तरी जुना पुल शाबूत आहे आणि आजही लोक त्यावरून चालत जातात.

.............................................................................................................................................

लेखक प्रमोद गोवारी पालघर जिल्ह्यातील मासवणस्थित ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेत काम करतात.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......