‘मर्दानगी’ची आजची समस्या आपल्याला वाटते तशी नाही
पडघम - सांस्कृतिक
बेंजामीन स्लेज
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 April 2018
  • पडघम सांस्कृतिक मर्दानगी Masculinity

“Men are so quick to blame the gods: they say

that we devise their misery. But they

themselves — in their depravity — design

grief greater than the griefs that fate assigns.”

― Homer, The Odyssey

(पुरुष किती चटकन देवांना दोष देतात ना? :

ते म्हणतात की आम्ही त्यांचं दुःख निर्माण करतो.

परंतु त्यांची नियती जेवढं दुःख त्यांच्या पदरात टाकते,

त्यापेक्षाही अधिक दुःख ते

स्वतःच्या दुराचरणामुळेच स्वतःवर ओढवून घेतात.’’

- होमर, द ओडीसी)

ओक्लाहामा विद्यापीठाच्या वसतीगृहात माझे बाबा भेटायला आले होते, तेव्हाचा ग्रुप फोटो माझ्याकडे नाही. परंतु असता तरी त्यानंतर काही महिन्यांनी आम्ही ‘मदर्स डे’चा फोटो काढला त्या तुलनेनं तो फोटो नक्कीच अवघडल्यासारखा वाटला असता. आता बाबांसोबत फोटो काढण्यात तसं अवघडण्यासारखं काय होतं? आम्ही सगळे छान हसतही होतो. पण तरी आमच्या कॉलेजातील दोस्तमंडळींच्या टेबलावर मैत्रिणींसोबत पार्ट्यांचे फोटो लावलेले असतात. त्यात मध्येच हा फोटो म्हणजे अवघडल्यासारखं वाटणारच की!

दर वर्षी आमचं विद्यापीठ मुलांसोबत एक दिवस घालवण्यासाठी पालकांना आमंत्रित करत असतं. पालक आले की आम्ही बहुदा एस्किमो जोच्या हॉटेलात जेवतो, कधीकधी गाडीतच सोबत आणलेलं जेवण जेवतो आणि मग फुटबॉल खेळायला जातो. त्यानंतर आमचा वेळ बारमध्ये जातो किंवा पालकांच्या अंगात ताकद राहिली असेल तर अन्य कुठल्या तरी रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमास जातो. मुलामुलींच्या वसतीगृहाबाहेर आईवडिलांसोबत काढलेले ग्रुप फोटो लावलेले दिसतात. एक मात्र आहे की आईबरोबर काढलेले फोटो नेहमीच मस्त निघतात. आम्ही त्या फोटोंत आईला मिठी मारलेली असते किंवा तिच्या गालांवर ओठ टेकलेले असतात. सगळेजण हसत असतात आणि आनंदात दिसतात.

माझी आई आली होती तशी तुमचीही आई बारमध्ये ड्रिंकसाठी आली, तर तुम्हाला आवडणाऱ्या मुलीशी तुम्ही तिची ओळख करून देता, त्या वेळेस तुम्ही अगदी जंटलमनचा आव आणलेला असतो. मग तुम्ही त्या मुलीच्या आईलाही भेटता. मग तुम्हा दोघांचं जोडपं किती गोड दिसेल यावर तुम्हा दोघांच्या आया बोलू लागतात. पण बाप मंडळींचं तसं नसतं हं. म्हणजे शनी आणि पृथ्वी कसे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत ना, तसे असतात ते!

त्यांच्यासोबतचा ग्रुप फोटो नेहमीच थंड, अलिप्त वाटतो. तेव्हाही काही जण मिठी वगैरे मारतात, परंतु ख्रिश्चन लोकांना जशी एकमेकांना अवघडल्यासारखी मिठी मारायची सवय असते, तशी ती विचित्र मिठी असते. म्हणजे ‘पवित्र आत्म्यासाठीही मध्ये जागा ठेवा रे,’ असं सांगितल्यासारखं वाटतं त्यात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्विकार तत्त्ववेत्त्याचे भाव असतात. चेहऱ्यावरचं हसू बळेबळे आणलेलं वाटतं. बापमंडळी बारजवळ येतात, तेव्हा एक तर ते स्वतःच भरपूर दारू पितात किंवा मग त्या दारूच्या बाटल्यांकडे एखाद्या विनाशकर्त्याच्या थाटात पाहतात. बहुतेक मुलगे आपल्या आवडत्या मुलीची ओळख बाबांशी करून देत नाहीत. मीही बाबांसोबत असलो की आम्ही पटकन जेवतो आणि त्यांची निघायची वेळ होईतो उगाचच इकडचं-तिकडचं बोलतो. त्यांनाही दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं.

हे दोन्ही प्रकारचे फोटो परस्परांच्या एवढे विरुद्ध का दिसतात असा प्रश्न मला बऱ्याच काळापासून पडत आला आहे. म्हणजे आम्ही स्वतःला मोठे ‘पुरुष’ म्हणून दाखवायचा वारंवार प्रयत्न करत असलो तरी आई सोबत असली की कसे एकदम ‘ममाज बॉय’ बनून जातो? आईशी जेवढी जवळीक वाटते, तेवढी वडीलांशी  (आणि अगदी मित्रांशीही) का वाटत नाही?

आपण ‘पुरुष’ आहोत? पण हे आपण कुठे शिकतो?

‘फादर्स डे’च्या फोटोची आठवण माझ्या मनाला त्रस्त करत होती, म्हणून मी अन्य पुरुषांना आणि मित्रांना प्रश्न विचारू लागलो. सुरुवातीला माझा प्रश्न खूप गुंतागुंतीचा होता: “भावनिक जवळीक तुम्ही कुणाकडून शिकलात का? मित्रांसोबत तुम्हाला भावनिक जवळीक वाटते का?” काही लोक या प्रश्नांवर हसले. काही लोक माझ्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, “काय बडबडतो आहेस तू यार?’’ म्हणून मग मी माझा प्रश्न बदलला आणि विचारलं, “तुमच्या वडिलांनी ‘पुरुष’ कसं बनायचं? हे तुम्हाला शिकवलं का?’’

त्यावर मिळालेले प्रतिसाद असे होते की, बाबांनी मला मोटारीचा टायर बदलायला, त्यात तेल घालायला शिकवलं, टाय बांधायला शिकवलं इत्यादी इत्यादी. त्यामुळे मी विचार करू लागलो की, पुरुषपणा शिकणं म्हणजे हेच असेल तर आपण फार मोठ्या दलदलीत अडकलो आहोत. मग मी आणखी खोल खणलं.

“आपण आयुष्यात काय चुका केल्या त्याबद्दल तुमचे बाबा तुमच्याशी कधी बोलले का? त्यांना कधी आपण असहाय्य आहोत असं वाटलं होतं का? एखाद्या मुलीला डेटिंगला कसं न्यावं, तिचं प्रणयाराधन कसं करावं, हे त्यांनी तुम्हाला शिकवलं का? सर्वार्थानं निरोगी मित्र कसे निवडावेत याबद्दल किंवा सेक्स, पोर्न आणि हस्तमैथून याबद्दल ते तुमच्याशी बोलले का?’’

आश्चर्य म्हणजे यहुदी-ख्रिश्चन साहित्यात तर ‘बायबल’चा एक संपूर्ण खंडच आहे. त्याचं नाव आहे ‘द बुक ऑफ प्रोवर्ब्स’. त्यात अर्थव्यवहार, मित्र, लैंगिक संबंध, व्यभिचार, सुज्ञपणाचे निर्णय घेणं, विवाह, उद्योगव्यवसाय याविषयी मुलाला काय शिकवावं या विषयांवर लिहिलेलं आहे.  परंतु या इथं अमेरिकेत मात्र मला पुरुषांकडून एकच उत्तर वारंवार मिळालं. ते म्हणजे, “छे, माझे बाबा अशा कुठल्याच विषयावर माझ्याशी बोलले नाहीत.’’ एखादे वडील अशा मुद्द्यांविषयी थोडंफार बोललेच तर ते अगदीच गुडीगुडी किंवा थातूरमातूर असायचं. याचं कारण मला वाटतं की, ‘बाप नसलेल्या’ पिढीत आम्ही जगतो आहोत. म्हणजे मुळात कुटुंबाच्या त्या चित्रात बाप बऱ्याचदा नसतोच.  मग हे पुरुष व्हायचं म्हणजे काय करायचं ते आम्ही शिकतो तरी कुठून?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

मर्दानी पुरुषपणाचा प्रभाव

‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज्’ हे पुस्तक बहुतेकांनी वाचलेलं असतं. त्यांना आठवत असतं की, त्यातला मुलांचा गट क्रूरपणावर कसा उतरतो? पिगीच्या मस्तकावर फटका मारून त्याच्या मेंदूवर घाव घातला जातो तो क्षणही बऱ्याच जणांना आठवतो. आजकालचे बहुतेक मुलगे एकसारख्या परिस्थितीच लहानाचं मोठं होतात. तरुण मुलांना सद्गुण, चारित्र्य किंवा जबाबदारी शिकवायला कुणीच नसल्यामुळे त्यातल्याच एका मुलामध्ये हा ‘अल्फा मेल’ अवतरतो. मग त्याला भास होतो की, हे जग कसं काम करतं ते आपल्याला माहिती आहे. मग बाकीची मुलंही त्याचं अनुकरण करू लागतात. कधीकधी या म्होरक्याकडे ते नेतृत्व येतं कारण  त्याच्या घरच्या ‘बाप’ माणसाचं निंदनीय, अनेक समस्या निर्माण करणारं वर्तन त्यानं लहानपणापासून अनुभवलेलं असतं, त्याचं तो अनुकरणही करू लागलेला असतो. मग त्याचं ते वर्तन त्याच्या मित्रांना ‘कुल’ वाटू लागतं, कारण आसपास सकारात्मक पुरुषत्वाचं प्रतिनिधित्व करणारा दुसरा कुणी त्यांना आढळत नसतो. त्याचा बाप त्याला पोर्न दाखवतो, म्हणून तोही मित्रांना पोर्न दाखवतो. त्यामुळे ते खूपच लहान वयात स्त्रीचं ‘वस्तुकरण’ करायला शिकतात. त्याचा बाप सदैव खेळांबद्दल बोलत असतो, अमुक तमुक संघातील प्रत्येक खेळाडूची माहिती त्याला तोंडपाठ असते, म्हणून त्याचा हा म्होरक्या पुत्र आपल्या मित्रांनाही खेळात आणतो. त्यांच्याकडे खेळासंबंधी ज्ञानकोशात शोभेल असं ज्ञान नाही म्हणून त्यांची टिंगलही करतो. त्याचा बाप स्त्रियांबद्दल त्याला पूर्वग्रहदूषित गोष्टी सांगतो, म्हणून हा आणि त्याचे मित्रही बापाचं अनुकरण करून अकलेचे तारे तोडू लागतात. बाप मुलाला आठवण करून देत राहतो की, खरा मर्द कधीच रडत नाही. खरा मर्द नेहमीच कठोरपणे वागतो. अपमान झाला तर खरा मर्द लगेच संतापतो. खरा मर्द आपल्या भावनांचं कधीच प्रदर्शन करत नाय. अर्थात् फक्त एकाच म्होरक्याच्या प्रभावामुळे तसं घडत नसतं. माध्यमं आणि इंटरनेट यावर हे मुलगे जे ऐकतात आणि बघतात त्यातूनही या असल्या वर्तनाला आणि विचारांना प्रोत्साहन मिळतं. लांडगे आपल्या मुलांना लांडगा कसं बनायचं ते शिकवतात. पण आताच्या जगात आपण कळपात राहात नाही. अशावेळेस आपल्याला ‘लोन वुल्फ’ बनणं अधिक आवडतं किंवा मग कळपात सामील झालो तरी आपण हेही शिकतो की, आपले दोष किंवा भीती कधीही दाखवायची नसते. कारण मग कळपातले लांडगे आपल्यावरच हल्ला करून आपल्याला फस्त करतील.

ज्यांच्याजवळ मन मोकळं करावं असे मित्रच नसतील तर हे जग म्हणजे सुनसान, एकाकी जागा आहे. तसे नावापुरते भरपूर मित्र असतातही पण आपण त्यांना आपला मनस्ताप, आपलं दुःख सांगितलं तर ते आपल्याला नेभळट म्हणतील म्हणून त्यांच्याशी काहीच न बोलता येत नाही, अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी दिसते. तिथं मुळी सहप्रवासाची स्नेहभावना नसतेच. दिवसभराचं काम झाल्यावर त्यांच्यासोबत दारू प्यायला किंवा सामना बघायला गेलो तरी ते नातं कृत्रिमच राहातं.

मुळात आपल्या भावना कशा हाताळायच्या हेच कळत नसेल तर मग नकाराचा कसा सामना करायचा, डेटिंग, भीती, एकाकीपणा, दुःख हे सगळं कसं सोसायचं, हे कसं कळणार? चारित्र्य, निष्ठा, प्रेम, माणुसकी, धाडस आणि शरण्यभाव या गुणांची जागा मग क्रोध, मत्सर, पोकळ दिखावा आणि अहंकार हे दुर्गुण घेऊ लागतात. खरं तर एक पुरुष दुसऱ्या पुरुषाची भावनिक जवळीक मिळावी म्हणून तळमळत असतानाही त्यांच्यातील काही जण एवढी निर्मम, कोरडी वृत्ती बाणवतात की, दुसऱ्याशी भावनिक जवळीक साधण्याची कल्पनाच त्यांना बायलेपणाची वाटते. मग खऱ्या मानवी नात्याला झिडकारून तो आभासमय पातळीवरील डिजिटल जवळिकीला आपलं म्हणू लागतो.

ऑस्टिनमध्ये मागच्या महिन्यात झालेला बॉम्बहल्ला आणि पोर्न पॅच

Every man can tell how many goats or sheep he possesses, but not how many friends. — Marcus Tullius Cicero

(आपल्याकडे किती शेळ्या, मेंढ्या आहेत हे एक वेळ माणूस सांगू शकेल परंतु  आपल्याला किती मित्र आहेत ते सांगू शकणार नाही. - मार्कस टुलियस सिसेरो)

ऑस्टिन, टेक्सास इथं याच मार्चमध्ये झालेल्या पॅकेज बॉम्बिंगच्या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असताना माझी काळजी वाटून मित्रांनी मला फोन केले होते. मी सुरक्षित आहे असं कळल्यावर, मला लढाईचा पूर्वानुभव असल्यामुळे त्यांनी मला विचारलं की, या बॉम्बहल्ला करणाऱ्यांपाशी लष्करी ज्ञान होतं का? संपूर्ण ऑस्टिनभर अफवांचा सुकाळ झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती दाटून आली होती. शेजाऱ्यांनी तर मला सांगितलंसुद्धा की, आपल्याच भागात पुढला हल्ला होणार आहे. त्यांचा भित्रेपणा अज्ञानातून निर्माण झाला होता. आपल्याला जे ऐकायला हवं असतं, त्यावर विश्वास ठेवायला आपल्याला आवडतं. मात्र आपण जे गृहित धरलेलं असतं, त्याच्याशी ते जुळणारं हवं. या अज्ञानी भित्रेपणाला मी हसलो. मी त्यांना समजावून सांगितलं की, ऑस्टिनचा बॉम्बहल्ला हे एका नवशिक्याचं काम आहे. तो बहुदा यूट्यूब, डार्क वेब किंवा जिहादी वेबसाईटवरून ते शिकला असावा. मी असं म्हटल्यावर लोकांनी विचारलं की, मग त्यामागचा हेतू काय असावा? अजूनही सगळेजण त्या हेतूच्या शोधात असलेले दिसतात. कारण बॉम्बहल्ला करणाऱ्या मार्क ऍन्थनी कॉण्डिटच्या व्हिडिओतून त्याचं निश्चित स्पष्टीकरण सापडलेलं नाही. पण मला वाटतं की, ते उत्तर आपल्या नजरेसमोर आहे. ऑस्टिनचे पोलीस प्रमुख- ब्रायन मॅन्ले यांनी कॉण्डिटच्या कबुलीजबाबाच्या व्हिडिओबद्दल केलेल्या भाष्यात म्हटलं आहे की, ‘या माणसाला वैयक्तिक जीवनात ज्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे तो या टप्यापर्यंत येऊन पोचला. त्याच्या मनातून बाहेर पडलेला हा आक्रोश आहे.’ मॅन्ले यांच्या भाष्यानंतर लोक शब्दच्छल करण्यात गुंतले. हा बॉम्बहल्ला करणारा दहशतवादी होता की, वांशिक वर्चस्ववादी होता हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. कारण त्यात बळी पडलेल्या दोन व्यक्ती या ऑस्टिनच्या आफ्रिकन समाजातील मोठ्या व्यक्ती होत्या. मला त्यामागील सर्वांत सरळ साधं सत्य हेच वाटतं की, आमच्या पिढीतल्या अन्य पुरुषांप्रमाणे कॉण्डिट हा एकटा होता, एकाकी होता. ‘पुरुषानं आपला संताप आणि दुःख हिंसा करूनच व्यक्त करायचं असतं’ या कल्पनेचा पगडा त्याच्या मनावर बसला होता. मी आणखी एका लेखात म्हटलं आहे की, आपण अशा पिढीला हाताळत आहोत ज्यांच्यापाशी संकटांना आणि कष्टांना झेलण्याची कौशल्यंच उरलेली नाहीत. लोक पूर्वी कधीही नव्हते एवढे आज एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसं असूनही आज एकाकीपणा त्यांची अखंड साथ करतो आहे. कॉन्डिटच्या मित्रांच्या किंवा माजी मैत्रिणींच्या मुलाखती तर मला एकाही मीडिया रिपोर्टमध्ये आढळल्या नाहीत. ज्या काही आढळल्या त्यात त्याचे शाळेतले किंवा चर्चमधले जुने परिचित होते. त्याशिवाय त्याच्या वडिलांनी त्याला ‘धार्मिक’ घरात वाढवलं. त्यामुळे त्यांनी त्याची पुरेशी काळजी घेतली असणारच. त्यामुळे त्याबद्दल काही बोलू नका असंही सांगितलं गेलं. पण बरेचदा ‘धार्मिक’ घर ही किशोरवयीन मुलांसाठी भावनिकदृष्ट्या ओसाड घर ठरतं. त्याचं काय?

ऑस्टिनचा हा ‘बॉम्बर’ नियमितपणे पोर्न बघत असावा असा माझा अंदाज आहे. एक गोष्ट कळली तर माझा हा संशय खरा ठरेल. ती गोष्ट अशी की : त्याला मित्र होते का? आजी/माजी गर्लफ्रेंड्स होत्या का? या विषयीची काहीच माहिती  नाही. त्यामुळे बरेचदा एकटे पुरुष जे करतात, ते म्हणजेच पोर्न तोही पाहात असावा. ‘4 चॅन’ किंवा तत्सम एखाद्या साईटवर जाऊन पाहा, आपल्याला पालकांच्या घराच्या बेसमेंटमध्ये राहावं लागतंय म्हणून स्वतःचीच टिंगल तिथं चाललेली असते. त्याच चर्चेत अधूनमधून पोर्नचाही विषय असतो. त्या मुलांना खऱ्याखुऱ्या माणसांकडून भावनिक जवळीक हवी आहे, ते त्यातून सहज जाणवतं.

डेटिंगला जाण्यासाठी मुलगी मिळत नाही? हरकत नाही, पोर्न आहे ना.

मुलींशी कसं बोलायचं ते कळत नाही? हरकत नाही, पोर्न आहे ना.

मुलीला डेटवर बोलावल्यावर तिनं नकार दिला ? हरकत नाही, पोर्न आहे ना.

माझ्या कामाचा भाग म्हणून मी बऱ्याच तरुणांना पोर्नच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी समुपदेशन करतो. ते माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना वाटतं की, पोर्न हीच आपली समस्या आहे. परंतु समस्या वेगळीच असते आणि पोर्न हे तिचं लक्षण म्हणून निर्माण झालेलं असतं. मी ज्या ज्या माणसांचं समुपदेशन केलं, त्या प्रत्येकाची वाढीच्या वयात आपल्या पित्यासोबत भावनिक जवळीक नव्हती. हे कदाचित हास्यास्पद वाटेल परंतु डॉ. जोशुआ स्ट्रॉब यांच्या ‘सेफ हाऊस’ या पुस्तकातील उतारा पहा.

“मनोविकार, उच्च रक्तदाब, कर्करोगजन्य गाठी, रक्तवाहिन्यांसबंधित हृदयविकार आणि आत्महत्या या पाच प्रमुख समस्यांशी संबंधित एकच कारण आहे का, हे शोधण्याचा जॉन हॉपकीन्स स्कुल ऑफ मेडिसिन येथील संशोधकांच्या गटाने ३० वर्षं अभ्यास केला. तीस वर्षांत त्यांनी एकुण १३७७ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला असता, त्यांना त्यामागील सार्वत्रिक कारण जे आढळून आले, ते अपेक्षेपेक्षा वेगळंच निघालं. या सर्व शोकांतिकांमागील सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या पालकांसोबतच्या विशेषतः बापासोबतच्या जवळीकीचा अभाव हे होतं.”

योद्धा कवी

एकदा संध्याकाळी उशीरा मी एका कळकट इमारतीबाहेर बाहेर पडलो, तेव्हा दारुड्या समुद्री चाच्याला जमिनीवर चालता येऊ नये तशी माझी अवस्था झाली होती. ऐकलेल्या बातमीनं माझं डोकं गरगरू लागलं होतं. एकाच वेळेस मला उलटी करावीशी वाटत होती आणि किंचाळावंसंही वाटत होतं. तेव्हा मी इराकमधील रामादी या लष्करी तळावर सैनिक म्हणून लढायला गेलो होतो. बाकी सर्व शांत होतं. फक्त जनरेटर्सचे आवाज येत होता. माझ्या पाय फरफटवत चालण्याच्या आवाजाची त्यात भर पडत होती. आणखी एक पाऊल उचलून मी चिखलातच उन्मळून पडलो आणि एवढा रडलो की माझ्या अश्रूंचाच चिखल माझ्या हाताला आणि चेहऱ्याला लागला. माझा मित्र ग्रेग यानं मला चिखलात पडलेल्या, अश्रूंनी चेहरा ओला झालेल्या अवस्थेत पाहिलं.

“ती मला सोडून चाललीये.... देवा रे, ती खरंच जाते आहे मला सोडून..’’ माझं शरीर हुंदक्यांनी गदगद हलत असताना मी तेवढंच फक्त बोलू शकलो.

अर्ध्याच तासापूर्वी मला ती उद्ध्वस्त करणारी बातमी कळली होती. मी ज्या मुलीच्या प्रेमात होतो, तिनं आमच्यातील नातं तोडून टाकलं होतं. मुळात इराक हीच जागाच सहन करण्यासाठी अत्यंत वाईट जागा होती. आता तर मी जिच्यावर प्रेम करत होतो, तिनंही मला सोडलं होतं. मग ग्रेगनं मला कुशीत घेतलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवून मी रडत राहिलो. खरोखर त्या रात्री तो जे बोलला, त्यामुळेच तर सगळा फरक पडला.

“तू एकटा नाहीस.. आपण यातून एकत्र बाहेर पडणार आहोत.’’ तो म्हणाला होता.

बऱ्याच लोकांना वाटतं की सैन्य म्हणजे मर्दानगीचा अर्क, सैन्य म्हणजे मर्दानगीचा ढाला\बुरुज. इंग्रज लेखक सॅम्युएल जॉन्सननी एकदा म्हटलं होतं, “आपण सैनिक झालो नाही किंवा दर्यावर्दी झालो नाही म्हणून प्रत्येक पुरुष स्वतःला कमी लेखतोच.’’

जेव्हा जेव्हा अन्य पुरुषांना कळतं की, मी लष्करात होतो, प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला होता, तेव्हा अशाच अर्थाच्या भावना त्यांच्याकडून मला ऐकायला मिळतात. “मलाही लष्करात जायचं होतं, परंतु माझी तब्येत चांगली नव्हती/ माझ्या पालकांना मला कॉलेजात घालायचं होतं’’ इत्यादी इत्यादी ते मला सांगत बसतात. बऱ्याच लोकांना सैन्य म्हणजे मर्दानगीचं प्रतीक वाटत असतं, परंतु सैनिकांमध्ये परस्परांविषयी जे खोल, भावनिक स्नेहबंध निर्माण होतात, त्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते. ते आमचं चित्र फक्त लढवय्ये म्हणून रंगवतात, परंतु भावनाप्रधान कवी म्हणून कधीच रंगवत नाहीत.

ज्या माणसांसोबत मी सैन्यात होतो, त्यांच्या जीवनकहाण्या मला माहिती आहेत. त्या मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांना वाटणारी भीती, त्यांनी मिळवलेले विजय, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांनी केलेली धडपड सगळं सगळं मला माहिती आहे. कितीतरी प्रसंगी आम्ही रडलो, एकमेकांना मिठ्या मारल्या, हसलो. आमची  गुपितंही एकमेकांना सांगितली.

संकट प्रसंगाला तोंड दिल्यावर माणसांचं मनस्वास्थ्य बिघडतं त्यास पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर म्हणतात. या मनोविकारात माणसाचं मन सतत बॉम्बगोळ्यासारखं उडत असतं. युद्धावरून परत आलेल्या सैनिकांना ही मानसिक व्याधी झाली तर त्यांच्यात स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करून घेण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे, असं दिसून आलं. त्यामागील कारण अगदी सरळ आहे. लढाईवरून परत आल्यावर त्यांना एकाकी वाटू लागतं. त्यांच्या सैनिकबांधवांसोबत जी भावनिक जवळीक ते अनुभवतात, ती नंतरच्या जीवनात मिळेनाशी होते.

काही लोक अशा जहरी दृष्टिकोनाचा प्रसार करतात की, पुरुषांनी आपल्या भावना दाबून टाकल्या पाहिजेत. कारण नात्यात भावना आल्या की त्यात बायलेपणा येतो. परंतु एखादा सैनिक खूप भावनाप्रधान असू शकतो, याची त्यांना तीळमात्र कल्पना नसते.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि ‘अक्षरनामा’वरील लेखांबाबत अपडेट रहा.

 क्लिक करा - https://play.google.com/store/apps

.............................................................................................................................................

अरे बापांनो, तुम्ही आहात तरी कुठे?

“The price good men pay for indifference to public affairs is to be ruled by evil men.” — Plato, The Republic

(सार्वजनिक जीवनात बेपर्वाई दाखवल्याची किंमत दुष्टदुर्जनांच्या हाती सत्ता देऊन  चांगली माणसांना भरावी लागते.’ - प्लेटो. द रिपब्लिक)

लहान असताना मी घराच्या कौलारावरून सुपरमॅनची नक्कल करत खाली उडी मारायचो. प्रत्येक काठी ही माझ्या दृष्टीनं तलवार होती. सफरचंदे म्हणजे हातबॉम्ब होते.  क्रॅकर बिस्किटांना आम्ही गनचा आकार द्यायचो आणि मग आम्ही भाऊ भाऊ आमच्या खाऊच्या पदार्थांनी ती क्रॅकर्सची अदृश्य लढाई खेळायचो. पण मी चित्रंही काढायचो. मला कलेबद्दल प्रेम होतं. चर्चमध्ये कोरसमध्ये गायचो. बार्बी बाहुल्यांशी खेळायचो. कविता, गोष्टीसुद्धा लिहायचो.

सध्या लहान मुलग्यांवर दुहेरी थपडा बसत आहेत.

धसमुसळेपणा, लुटुपुटीच्या तलवारीनं खेळणं आणि खोट्या खोट्या लढाया करणं हे असे खेळ आहेत, ज्यायोगे आपली मुलं मनोरुग्ण बनतील, समाजात वावरताना हिंसक बनतील. हल्लीच घडलेल्या काही घटना पाहून तसंच वाटतं आहे.

संवेदनशीलता आणि भावनांचं उघड प्रदर्शन ही दुर्बळतेची चिन्हं आहेत, असा पुरुषांचा गैरसमज झाला आहे.

त्यामुळे किशोरवयीन मुलांचा खूप गोंधळ उडू लागला आहे. आपण मोठी माणसं निरोगी प्रकारच्या खेळात त्यांना गुंतवत नाही. त्यांना कुणाशी तरी नातं जोडायचं असतं, त्यांना पित्याकडून आणि अन्य पुरुषांकडून भावनिक जवळीक हवी असते. पण ते काही आपण त्यांना देत नाही. त्यामुळे मग हे भावी पुरुष हळूहळू उदासीन आणि बेपर्वा बनतात. खरं तर त्यांना दोन्ही बनायचं नसतं. मग ते कंटाळ्याच्या, आळसाच्या डिजिटल दुनियेत शिरतात.

आज काय होतंय की बरेच चांगले पुरुष काठावर बसून आहेत, परंतु दुष्टबुद्धीचे पुरुष  मात्र मोठ्या उत्साहानं अन्य पुरुषी आत्म्यांना कर्करोगग्रस्त करत आहेत. आम्ही किशोरवयीन मुलांना सदगुण किंवा चारित्र्य शिकवत नाही, तर दुर्गुण शिकवत आहोत. आम्ही त्यांना सांगतो की, भावनांना दाबून ठेवा, परंतु फारच पुरुषी होऊ नका कारण तेही वाईट आहे. त्यामुळे मग आतला योद्धा दबला जातो आणि कवीवर तर बायलेपणाचा शिक्का बसतो.

या सगळ्याचं उत्तर काय आहे ते मला माहिती नाही, परंतु एवढं मला माहिती आहे की, याची सुरुवात होते ती अन्य पुरुषांचे ‘बाप’ कसे ‘मर्द’ आहेत त्यावरून. आपली संस्कृती आतून बदलायची असेल तर तशीच कळकळ असणारे पुरुष लागणार आहेत. समाजमाध्यमांवरून आरडाओरडा करणारे उथळ पुरुष काय कामाचे? जो काही बदल होणार आहे तो समोरासमोर स्वरूपातील मार्गदर्शनामुळे होणार आहे. हा संवाद चारित्र्यवान पुरुषांत आणि संस्कृती हरवलेल्या, प्रवाहपतित अशा आजच्या शिष्यांत घडणार आहे.

त्यासाठी तशाच चारित्र्याचे, प्रतिष्ठेचे पुरुष हवेत.

दुर्गुणांचा पुरस्कार करणाऱ्या जगात त्याविरुद्ध उभं राहाण्यासाठी धाडस लागेल.

ते धाडस असेल, तेव्हाच आपण ‘योद्धे कवी’ निर्माण करू शकू.

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख medium.com या पोर्टलवर ५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -

https://medium.com/s/story/todays-problem-with-masculinity-isn-t-what-you-think-b43e80edcf60

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmai.com

.............................................................................................................................................

लेखक बेंजामीन स्लेज हे कथाकार आणि डिझायनर आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alka Gadgil

Sat , 21 April 2018

Thanks, muli ani striyansathi anek programmes ahet, mullanbarobar kam karnyachi atyant zaroori ahe