विनी मंडेला – एक शमू न शकलेली आग
संकीर्ण - पुनर्वाचन
भानू काळे
  • नेल्सन आणि विनी मंडेला (२६ सप्टेंबर १९३६ - २ एप्रिल २०१८)
  • Thu , 05 April 2018
  • संकीर्ण पुनर्वाचन नेल्सन मंडेला Nelson Mandela विनी मंडेला Winnie Mandela

नेल्सन मंडेला यांच्या माजी पत्नी आणि त्यांच्या चळवळीतील बिनीच्या नेत्या विनी मंडेला यांचं २ एप्रिल रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. ‘मदर ऑफ दि नेशन’ ते 'mugger’ असा प्रवास करणाऱ्या विनी मंडेलांविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख...

.............................................................................................................................................

इतिहास घडवण्यात जिचा महत्त्वाचा वाटा होता, पण इतिहासात जिची नोंद झालीच तर फक्त एक खलनायिका म्हणून व्हायची शक्यता आहे, अशा एका दक्षिण आफ्रिकी महिलेविषयी आज लिहावेसे वाटते. तिचे नाव आहे विन्फ्रिडा ऊर्फ विनी मंडेला.

नेल्सन मंडेला हे एक महान व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचा चेहरा हा आज जगासाठी केवळ दक्षिण आफ्रिकेचीच नव्हे तर संपूर्ण आफ्रिका खंडाचीच ओळख बनला आहे यात काहीच शंका नाही. पण त्यांना या उच्च स्थानी पोचवण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा होता, त्या त्यांच्या पत्नी विनी या मात्र बदनाम ठरल्या आहेत, हे मला कुठेतरी खूप अन्यायकारक वाटते. एरवी स्त्री-हक्कांबद्दल खूप जागरूक असणाऱ्या अनेक संस्था व माध्यमेदेखील विनी मंडेलांची कधीच दखलही घेताना दिसत नाहीत. म्हणूनच त्यांच्याविषयी हे संपादकीय.

आफ्रिकेचा उल्लेख खूपदा ‘डार्क काँटिनेट’ (‘काळोखातले खंड’) म्हणून केला जातो. सर्वसामान्य भारतीयांच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे. युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते; पण आफ्रिकेचे अस्तित्वही आपण विचारात घेत नाही. अपवाद फक्त क्रिकेटच्या मोसमात होणारा दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख. पण दक्षिण आफ्रिकेतील वंशवाद व तिथे घडलेले सत्तांतर, हे गेल्या शतकातील एक रोमहर्षक प्रकरण आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या अनेक तरुणांमध्ये एक होते नेल्सन मंडेला. व्यवसायाने ते वकील होते, पण आपल्या सार्वजनिक कामामुळे त्यांना व्यवसायाकडे किंवा आपल्या प्रपंचाकडेही फारसे कधी लक्ष देता येत नव्हते. इव्हलिन या आपल्या पत्नीबरोबर अकरा वर्षं संसार केल्यानंतर शेवटी त्यांनी तिला घटस्फोट दिला. एकीकडे क्रांतीची धग वाढत होती, पण त्याचबरोबर दुसरीकडे एकटेपणाही जाणवत होता. अशा परिस्थितीत कृष्णवर्णीय पण उच्चकुलीन घराण्यातल्या, समाजकार्याच्या पदवीधर, विलक्षण सुंदर आणि त्यांच्यापेक्षा वयाने १७ वर्षांनी लहान अशा विनी त्यांच्या जीवनात उतरल्या. बघता बघता दोघांचे प्रेम जडले. १९५८ साली दोघांनी लग्न केले आणि लगेचच पुढल्या दोन वर्षांत दोघांना दोन मुलीही झाल्या. विनी त्यावेळी फक्त २४ वर्षांच्या होत्या.

दुर्दैवाने त्यानंतर लगेचच नेल्सनना अटक झाली. बरेच दिवस खटल्याचे नाटक चालले आणि शेवटी नेल्सनना कडक शिक्षा फर्मावली गेली. लांब रॉबिन आयलंड इथल्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. ही घटना ऑगस्ट १९६३मधली. पुढली सलग २७ वर्षे ते तिथेच बंदिवासात होते.

या प्रदीर्घ कालावधीत वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात विनी आघाडीवर राहिल्या. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या (एएनसीच्या) महिला आघाडीच्या त्या अध्यक्षा बनल्या. एनएनसीचे बाकीचे बहुतेक सगळे नेते बंदिवासात असल्यामुळे लढ्याची जवळजवळ सगळीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. एकीकडे आपल्या दोन लहान मुलांना वाढवत दुसरीकडे ही सार्वजनिक जबाबदारीही त्यांनी सर्वस्व पणाला लावून पार पाडली. खूपदा भूमिगत राहावे लागे, सतत घर बदलावे लागे. त्यांचे वक्तृत्व ओजस्वी होते, जहालही होते. बघता बघता त्यांची लोकप्रियता कळसास पोचली. तरुणांच्या तर त्या गळ्यातल्या ताईत बनल्या. ‘मदर ऑफ दि नेशन’ असाच त्यांचा उल्लेख केला जाई. इकडे सरकारी दडपशाही वाढत गेली. आपल्या राज्यातून त्यांना हद्दपार केले गेले. अनेकदा अटक झाली. प्रिटोरिया सेंट्रल प्रिझनमधल्या एका कोठडीत दीड वर्ष डांबले गेले. पोलिसांकडून खूप शारीरिक छळही केला गेला. पण विनी जराही बधल्या नाहीत, सतत आग ओकतच राहिल्या. आपल्या सर्व भाषणांमध्ये, लेखांमध्ये, पत्रकांमध्ये त्या पतीचा सतत गौरवपूर्ण उल्लेख करत. पतीचे नाव त्यांनी सतत प्रकाशझोतात ठेवले, त्याच्या बंदिवासाचा दक्षिण आफ्रिकन जनतेला आणि अन्य जगालाही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही.

माध्यमांना – आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला – नेहमी सेलेब्रिटिज हव्या असतात आणि एखादा संघ (टीम) वा समूह कधीच सेलेब्रिटी बनू शकत नाही. त्यासाठी समूहाचे प्रतिनिधित्व करू शकेल असा एक चेहरा लागतो, एखादी व्यक्ती लागते. ती व्यक्ती मग त्या व्यापक समुदायाच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक बनते. माध्यमांच्या या स्वरूपामुळे त्या व्यक्तीची अतिरंजित (लार्जर दॅन लाइफ) अशा प्रतिमा आपोआपच जनमानसात स्थिरावते. अथक परिश्रम घेऊन आणि माध्यमांच्या सतत संपर्कात राहून विनींनी हेच करून दाखवले; लांब बंदिवासात असलेल्या आपल्या पतीला वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक बनवले. (खूप नंतर, ऑक्टोबर २००८मध्ये, प्रकाशित झालेल्या काही गुप्त कागदपत्रांनुसार नेल्सन मंडेलांची छबी स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनवणे, हा एएनसीने घेतलेला एक धोरणात्मक निर्णय होता.)

जागतिक लोकमताच्या दडपणामुळे शेवटी गोऱ्या सरकारला फेब्रुवारी १९९०मध्ये नेल्सन मंडेलांची सुटका करावी लागली. तुरुंगाच्या दारात हातात हात घालून उभ्या असलेल्या नेल्सन-विनींचा फोटो माध्यमांनी जगभरच्या घराघरांत पोचवला. तुरुंगातून बाहेर आल्या आल्या आपोआपच लढ्याची सर्व सूत्रे नेल्सन यांच्या हाती एकवटली. विनींनी मखर तयारच ठेवले होते, आता मूर्तीची प्रतिष्ठापनाही झाली.

पण नेल्सन यांनी लढ्याची सगळी दिशाच बदलून टाकली. पत्नीची आग त्यांच्यात नव्हती. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संघर्षापेक्षा समझौत्यावर भर द्यायचे धोरण जाहीर केले. ‘तुमची सगळी शस्त्रे समुद्रात फेकून द्या’, असे त्यांनी जनतेला आवाहन केले. गांधींचा अहिंसेचा मार्गच त्यांना स्वीकृत होता. विनी आणि त्यांच्या इतर जहाल सहकाऱ्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. पण जाहीरपणे नेल्सनना विरोध करणे कोणालाच शक्य नव्हते. १९९३मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार नेल्सनना व एफ. डब्ल्यू. डी. क्लार्क या गोऱ्या सरकारच्या शेवटच्या प्रमुखांना विभागून मिळाला व तो एकत्रितरीत्या स्वीकारून शांततामय सहजीवन कसे असते, हे नेल्सननी जगाला दाखवून दिले.

नेल्सन यांची मे १९९४मध्ये दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी गोऱ्यांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. दक्षिण आफ्रिकेत प्रचंड वांशिक युद्ध होईल, रक्ताच्या नद्या वाहतील, ही खूप जणांनी व्यक्त केलेली भीती पूर्णत: निराधार ठरली. गोऱ्यांनाही सत्तेत स्थान मिळाले. क्षमाशीलतेचा एक उच्च आदर्शच नेल्सननी प्रस्थापित केला.

१९९९मध्ये अध्यक्षपदाची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाली. पुनर्नियुक्ती सहजशक्य असूनही नेल्सननी सत्तेचा मोह टाळला व सार्वजनिक जीवनातूनच निवृत्ती जाहीर केली. हाही एक अभूतपूर्व असाच त्याग होता. आपल्या शेवटच्या भाषणात नेल्सन म्हणाले, “माझी सदसदविवेकबुद्धी अगदी स्वच्छ आहे. देशाप्रती असलेले माझे योगदान देऊन झाले आहे. आता यापुढेही कुठल्या ना कुठल्या गंभीर समस्या सोडवत बसत शंभरी उलटेस्तोवर काम करत राहण्यात मला स्वारस्य वाटणार नाही. माझे उर्वरित आयुष्य माझ्या छोट्याशा खेड्यात जाऊन मी घालवू इच्छितो, तिथल्या डोंगर-दऱ्यांच्या भटकंतीत घालवू इच्छितो. मला आता प्रसिद्धीपासून दूर, काहीशा अज्ञातवासातच, निवांतपणे उर्वरित आयुष्य काढायचे आहे.” नेल्सननी राजधानी सोडली, तेव्हा जगभरातील त्यांच्याविषयीचा आदर अगदी परमोच्च बिंदूला जाऊन पोचला होता.

पण हे सगळे होत असताना विनी मंडेलांचे स्खलन मात्र झपाट्याने होत गेले. फेब्रुवारी १९९०मध्ये तुरुंगाच्या दारात काढलेले पती-पत्नींचे छायाचित्र जगभर झळकले खरे, पण का कोण जाणे, त्या दिवसापासूनच दोघांचे संबंध बिघडले, ते नंतर कधीच जुळले नाहीत. विनींवर हिंसेचे-भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले होते. त्यांना व्यभिचारीही ठरवले गेले. राजकीय पटावरही नेल्सन यांनी अवलंबिलेला अहिंसा-शांतता-सामंजस्य यांचा नवा मार्ग सर्व माध्यमांनी एकमुखाने उचलून धरला खरा; पण त्याचमुळे विनी यांचा संघर्षपूर्ण लढा गौण ठरला. १९९४च्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना अगदी दुय्यम स्थान दिले गेले – कला, संस्कृती आणि विज्ञान खात्याच्या मंत्री म्हणून. तेही अगदी अल्पकाळासाठी. अकरा महिन्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले गेले. एकेक करत त्यांचे सगळेच अधिकार काढून घेतले गेले. वेगवेगळ्या पोलीस चौकश्यांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला गेला. सगळ्या जुन्या केसेस पुन्हा बाहेर काढल्या गेल्या. एकूण ६८ प्रकरणांत त्यांना दोषी ठरवले गेले. यांतली दोन प्रकरणे अतिशय गंभीर होती.

एक प्रकरण होते ‘नेकलेस’ नावाचे. एखादा माणूस पोलिसांना फितूर आहे असा संशय आला, तर त्याला शिक्षा देण्याचा, व इतरांनाही भविष्यात तसे करण्यापासून दूर ठेवण्याचा, एक अघोरी प्रकार एएनसीच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केला होता – ‘नेकलेस’ नावाचा. एका रबरी टायरमध्ये पेट्रोल भरून, तो टायर सर्वांसमोर एखाद्या नेकलेसप्रमाणे संशयिताच्या गळ्यात घालायचा, आणि मग तो टायर पेटवून द्यायचा; तो संशयित काही सेकंदातच जळून जायचा. या नेकलेसिंगला विनींची चिथवणूक होती, असा आरोप होता. १३ एप्रिल १९८६ रोजी केलेल्या एका जाहीर भाषणात त्यांनी या क्रौर्याचे समर्थन केले होते. त्यांचे ध्वनिमुद्रित शब्द होते – “With our boxes of matches and our necklaces we shall liberate this country.” (“आमच्या काडीपेट्या आणि आमचे नेकलेसेस यांच्या जोरावर आम्ही हा देश स्वतंत्र करू.”) त्यांच्या विरुद्धचा हा पुरावा ग्राह्य धरला गेला.

दुसरे गंभीर प्रकरण होते २९ डिसेंबर १९८८ रोजी घडलेले. एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या घरी राहणाऱ्या चार मुलांना विनींनी त्या घरातून जबरदस्तीने पळवले, स्वत:च्या घरी आणले, त्यांचा अनन्वित छळ केला व त्यांतल्या एका मुलाची हत्या केली असा आरोप होता. हत्या केली तो जेम्स सायपाय हा मुलगा फक्त चौदा वर्षांचा होता. सुरीने गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचे प्रेत एका शेतात ६ जानेवारी १९८९ रोजी सापडले. एका फुटबॉल क्लबशी विनींचा निकटचा संबंध होता व त्या क्लबमधले खेळाडू विनींसाठी अनेक अवैध कामे करत असत. क्लबचा कोच जेरी रिचर्डसन हा विनींचा व्यक्तिगत सुरक्षारक्षक म्हणूनही काम करत असे. जे काही घडले ते विनींच्या हुकुमावरूनच घडले आणि त्यांच्या उपस्थितीतच घडले, अशी साक्ष या रिचर्डसनने कोर्टात दिली. या सगळ्याचे विनींनी दिलेले स्पष्टीकरण होते – “तो धर्मगुरू या मुलांचे लैंगिक शोषण करत होता व तशी कबुली या मुलांनी द्यावी म्हणून आम्ही त्यांचा छळ केला.” (समलिंगी संभोग आणि तदजन्य एडस ही दक्षिण आफ्रिकेतली खूप मोठी समस्या आहे.) त्यांच्यातला तो जेम्स हा पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करत होता, अशी विनींचा माहिती होती.

नेल्सन मंडेला यांच्या बंदिवासात घडलेली ही दोन्ही प्रकरणे विनींच्या चांगल्याच अंगलटीस आली. नेल्सननी नेमलेल्या ‘Truth and Reconciliation Commission’ने विनींना या प्रकरणी दोषी ठरवले. विनी मंडेला आता जगभर एक विकृत क्रूरकर्मा म्हणून मानल्या गेल्या. त्यांची सगळीच प्रतिष्ठा धुळीस मिळाली.

खूप नंतर, मार्च २०१०मध्ये, नोबेलविजेते लेखक व्ही. एस. नायपॉल आणि त्यांच्या तत्कालीन पत्नी नादिरा यांनी विनींची विनींच्या सोवेतोमधल्या प्रासादतुल्य घरात भेट घेतली होती व त्यावर आधारित एक लेखही नादिरा यांनी प्रसिद्ध केला होता ८ मार्च २०१० रोजी. (म्हणजे योगायाने जागतिक महिला दिनीच!) लेखात विनी यांनी आपली बाजू मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या –

“जेव्हा एएनसीवर बंदी होती आणि सगळे नेते तुरुंगात होते, तेव्हा मी हा लढा जिवंत ठेवला. मी लोकांना त्यांच्या पारतंत्र्याची, त्यांच्यावर गोरे करत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. मी नसते तर हा लढा केव्हाच नामशेष झाला असता. मी वणवा पेटवला आणि २७ वर्षं तो धगधगत ठेवला. केवळ त्यामुळेच नेल्सन यांची सुटका झाली. पण २७ वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडलेले नेल्सन पार बदललेले होते. त्यांनी आम्हाला फसवलं. सगळ्या कृष्णवर्णीयांना फसवलं. गोऱ्यांचा फायदा होईल अशीच सगळी व्यवस्था केली… ज्यांनी त्यांना तुरुंगात डांबलं त्या क्लार्कबरोबरच त्यांनी नोबेल पुरस्कार स्वीकारला. मी त्याबद्दल नेल्सनना कधीही क्षमा करू शकणार नाही. क्लार्कनी काही सुखासुखी, अंतरीच्या चांगुलपणापोटी नेल्सन यांची सुटका केली नव्हती. त्यांच्यापुढे दुसरा मार्गच उरला नव्हता. हे सगळं संघर्षाशिवाय झालं नव्हतं. आम्ही रक्ताच्या नद्या वाहवल्या, त्यामुळेच हे झालं. आणि हा लढा जिवंत ठेवण्यासाठी जे जे करणं मला शक्य होतं, ते ते सगळं मी केलं… त्याग करणारे नेल्सन मंडेला एकटेच नव्हते. त्याग इतरही हजारोंनी केला. लोकांनी गोळ्या झेलल्या, रक्त ओकलं. शेकडो क्रांतिकारक तुरुंगात सडत मेले… मी दिलगीर नाही. मी कधीही दिलगीर असणार नाही. मी जे जे केलं, ते सगळं गरज पडली तर मी पुन्हा करीन. सगळं पुन्हा करीन…”

नेल्सन-विनींच्या वाटा राजकारणाप्रमाणे कौटुंबिक जीवनातही एकाएकी वेगळ्या झाल्या. आपल्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या, आपली मुलगी शोभेल अशा वयाच्या, ग्रेसा माचेल या विधवेच्या प्रेमात नेल्सन पडले. त्यांचा रोमान्स अगदी उघडपणे सुरू होता. विनींबरोबर एका घरात राहणे त्यांनी केव्हाच सोडून दिले होते; १९९६मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. याच विनींनी आपण घटस्फोटीत असूनही एकेकाळी आपल्या प्रेमात स्वत:ला झोकून दिले होते, आपण तुरुंगात असताना २७ वर्षे आपली आठवण जिवंत ठेवली होती, हे सारे विस्मृतीत गेले. दुर्दैव म्हणजे या सगळ्यामध्ये विनींवर काही अन्याय होतो आहे, अशी भूमिका कोणीच घेतली नाही. नेल्सन मंडेला हे नावच एवढे मोठे होते, की त्यांच्या विरोधात कोणी काही उघडपणे बोलणे शक्यच नव्हते. कागदोपत्री ते लग्न ३८ वर्षे टिकले, पण लग्नानंतरची दोन वर्षे सोडली, तर विनींच्या वाट्याला संसारसुख असे कधीच आले नाही. “I am the most unmarried of the married women,” असे त्यांनी एकदा स्वत:बद्दल म्हटले होते. (“सर्व विवाहित स्त्रियांमध्ये मी सर्वाधिक अविवाहित होते.”)

हिंसेचे समर्थन मला अजिबात करायचे नाही, आणि कोणी करूही नये. पण दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन परिस्थिती विचारात घेता विनी मंडेलांसमोर अन्य कुठले पर्याय होते, हे सांगणेही कठीण आहे. महाभारतात हिंसा झाली नव्हती का? फ्रेंच राज्यक्रांतीत हिंसा झाली नव्हती का? १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात हिंसा झाली नव्हती का? किंबहुना जगातली अशी कुठली क्रांती आहे, की ज्या क्रांतीत निरपराधांचे रक्त वाहिले नव्हते?

पण क्रांतिकारकांपेक्षा शांतीची कबुतरेच इतिहासाला अधिक प्रिय असावीत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातही गांधी-नेहरूंच्या अहिंसामार्गाला सर्वाधिक स्थान मिळाले; क्रांतिकारक हे ‘वाट चुकलेले देशभक्त’ ठरले.

नेल्सन मंडेलांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंकाच नाही; आणि ते योग्यच ठरेल. पण विनी मंडेलांच्या नावाने एखादी तळटीप तरी यावी.

अर्थात तेही होईल याची खात्री नाही. कारण जे प्रत्यक्षात घडले, तो केवळ भूतकाळ असतो; आणि जे लिहिले गेले, त्यालाच फक्त ‘इतिहास’ म्हणतात. आणखी शंभर वर्षांनी लिहिल्या जाणाऱ्या इतिहासात काय लिहिलेले असेल, कोणी सांगावे! दैवगती मोठी विचित्र असते!

(‘अंतर्नाद’च्या एप्रिल २०१२च्या अंकाचे संपादकीय अंशत: संपादित स्वरूपात) 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

लेखक भानू काळे ‘अंतर्नाद’चे संपादक आहेत.

antarnaad1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.