असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास
संकीर्ण - श्रद्धांजली
वरदा खळदकर
  • प्रा. मधुकर केशव ढवळीकर ( १६ मे १९३० - २७ मार्च २०१८) आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Tue , 03 April 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली मधुकर केशव ढवळीकर M K Dhavalikar पुरातत्व Archaeology पुरातत्वशास्त्रज्ञ Archaeologist

प्राध्यापक मधुकर केशव ढवळीकर यांच्या निधनाने भारतीय पुरातत्वशास्त्रातील एका युगाची अखेर झाली. अतिशय समृद्ध आणि कर्तृत्ववान आयुष्य जगून, विद्यार्थी-शिक्षकांसाठी संशोधनपरंपरेचा, मुक्त ज्ञानदानाचा एक भक्कम वारसा मागे ठेवून ढवळीकर सरांनी अखेरचा निरोप घेतला. पुरातत्वशास्त्रातील त्यांच्या दोन-तीन पिढ्यांनंतरची संशोधक आणि शिष्या या नात्याने सरांच्या अष्टपैलू संशोधक व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

उत्तम संशोधक, उत्तम शिक्षक, उत्तम लेखक, उत्तम वक्ता, उत्तम वाचक आणि स्पष्टवक्ता, व्यवहारी कुशल प्रशासक असे थोडक्यात त्यांचे वर्णन करता येईल. 

प्रा. ढवळीकरांचे पुरातत्वाच्या क्षेत्रातील पदार्पण निव्वळ योगायोगाने झाले. अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते गोखले इन्स्टिट्यूटच्या वाचनालयातील नोकरी ते आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पुणे आणि नंतर दिल्ली येथील वाचनालयातील नोकरी असा प्रवास करून ते अखेर प्रकाशे या उत्खननस्थळी नवा अनुभव घेण्यासाठी आले आणि संशोधनातील वाटचालीचा त्यांनी ओनामा केला. या प्रवासात व्ही. डी. कृष्णस्वामी आणि बी. के. थापर या ज्येष्ठ आणि नामवंत पुरातत्वशास्त्रज्ञांचा पारखी स्वभाव, मार्गदर्शन आणि सततचा पाठिंबा याचा सिंहाचा वाटा होता.  ज्या दख्खनच्या इतिहासपूर्व (protohistoric) कालातील संशोधनासाठी प्रा. ढवळीकरांना जगभर ओळखले जाते, त्याच संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननापासून कारकीर्दीची सुरुवात हा ही एक योगायोगच! 

एकदा या संशोधनक्षेत्रात रस घेतल्यानंतर त्यांनी रीतसर डेक्कन कॉलेजमधून बाह्य विद्यार्थी म्हणून एम. ए. आर्किऑलॉजी ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मिळवली. डेक्कन कॉलेजमध्ये त्या काळी भारतीय पुरातत्वमहर्षी म्हणून ज्यांना सार्थपणे ओळखले जाते, त्या प्रा. ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्व विभागाची जोमाने बांधणी चालू होती. तिथे प्रा. सांकलियांच्या हाताखाली ढवळीकरांनी ‘Life in Deccan as Depicted in the Ajanta Paintings’ या विषयावर आपला पीएच.डी. प्रबंध सादर केला. त्या काळी ते नोकरीनिमित्त अजंठा येथेच मुक्कामी होते. त्याचा पुरेपूर वापर करून त्यांनी प्रत्येक शिल्पाचा व चित्राचा बारकाईने अभ्यास करून आधी माहीत नसलेले चित्रांमध्येच रंगाने लिहिलेले पुराभिलेख वाचले. हा प्रबंध त्याच्या दर्जामुळे पुणे विद्यापीठाने लगोलग प्रसिद्धही केला. 

कालांतराने सरकारी नोकरी सोडून त्यांनी प्राध्यापकीय जीवनाला नागपूर विद्यापीठातून सुरुवात केली. पवनार या ऐतिहासिक स्थळाचे उत्खननही केले. त्यानंतर मात्र ते डेक्कन कॉलेज, पुणे या त्यांच्या 'मातृसंस्थेत' दाखल झाले. बढतीच्या एकेक पायऱ्या चढून संचालक, डेक्कन कॉलेज या अतिशय मानाच्या हुद्यावरून ते निवृत्त झाले.

त्यांच्या स्वतंत्र संशोधनाचा प्रारंभ जरी कलेतिहास या उपशाखेतून सुरू झाला, तरी त्यांनी पुढील कारकीर्दीत पुरातत्वाच्या विविध उपशाखा कमालीच्या प्राविण्याने व सहजतेने हाताळल्या.  कलेतिहास, बौद्ध स्थापत्य, ऐतिहासिक व मध्ययुगीन कालखंडातील वसाहतींची उत्खनने, इतिहासपूर्व काल, सिंधुसंस्कृती, आर्यप्रश्न, नाणकशास्त्र, दैवतशास्त्र अशा विविध विषयांमधील त्यांचे संशोधन व लेखन मूलगामी ठरले आहे. आजच्या एकेका उपशाखेच्या तज्ज्ञतेच्या काळात ते अतिशय दुर्मीळ असे 'मास्टर ऑफ ऑल' होते. कुठल्याही उपशाखेतील उपलब्ध ज्ञानामधील माहीत नसलेले दुवे, अडचणी व असल्यास सैद्धांतिक ठिसूळपणा याचे अचूक निदान, नव्याने पुरावे शोधून काढण्याच्या किंवा जुने पुरावे नव्याने चिकित्सा करण्याच्या कार्यपद्धतीवरील ठाम पकड, विविध प्रकारच्या पुराव्यांचे उत्तम आकलन, त्यांची सर्वंकष छाननी व तर्कसुसंगत विश्लेषण व पुढील संभाव्य संशोधनवाटांकडे केलेला निर्देश, ही त्यांच्या संशोधनाची व्यवच्छेदक लक्षणे होती. 

जरी त्यांचे बहुतेक सर्वच संशोधन दर्जेदार असले तरी सर्वांत लक्षणीय ठरले ते इनामगावचे उत्खनन. शिरूर तालुक्यातील घोडनदीच्या काठावरील ही एक छोटी पांढर दख्खनच्या आद्य शेतकऱ्यांच्या अनेक ज्ञात वसाहतींपैकी एक होती. भारतातील सिंधुसंस्कृतीबाहेरील ताम्रपाषाण युगाचा शोध हा दख्खनच्या ताम्रपाषाणयुगामुळेच लागला. प्रा. सांकलिया व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जोर्वे, नेवासा, सोनगाव, आपेगाव इत्यादी ठिकाणी उत्खनने करून त्यांच्या सांस्कृतिक कालानुक्रमाविषयी (इ. स. पू. २२०० ते १०००), त्यांना अवगत असलेल्या तांब्याच्या तंत्रज्ञानाविषयी, त्यांच्या खापरांविषयी व इतर पुरावशेषांविषयी माहिती गोळा केली होती. या वसाहती सुमारे इ.स.पू. १००० च्या सुमारास उजाड झाल्या हेही ज्ञात होते. परंतु नागरीकरणाच्याही आधीच्या काळातील अशा लोकसमूहांचे दैनंदिन जीवन कसे होते, त्या वसाहतींची सामाजिक-आर्थिक-राजकीय संरचना कशी होती, या वस्त्या का उजाड झाल्या याचे तपशीलवार ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने प्रा. सांकलिया यांच्या प्रोत्साहनाने हे उत्खनन सुरू झाले. तोपर्यंत पवनार, कायथा (मध्यप्रदेश), आपेगाव, पंढरपूर, अंबारी (गुवाहाटी, आसाम) इत्यादी स्थळांचे उत्खनन करून ढवळीकरांनी उत्खननतंत्रात प्रावीण्य मिळवले होते. सांकलियांनी त्यांच्या आत्मचरित्रातही ढवळीकर व त्यांचे सहकारी डॉ. झैनुद्दिन अन्सारी यांचे भारतातील सर्वोत्कृष्ट उत्खनक म्हणून कौतुक केले आहे. तसेच तोपर्यंत डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्राशी निगडित विविध शास्त्रीय शाखांच्या प्रयोगशाळा स्थापन करून त्या त्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना तिथे नेमले गेले होते. या पार्श्वभूमीवर इनामगाव उत्खननाचा महत्त्वाकांक्षी आणि बृहद्प्रकल्प ढवळीकर, अन्सारी आणि सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन कॉलेजने हाती घेतला.  

हे उत्खनन एकूण तेरा वर्षे चालले आणि त्यात ताम्रपाषाणयुगातील तीन उप-कालखंड, त्यातील एकूण १३७ घरे व इमारती, अनेक दफने व इतर सर्व प्रकारचे पुरावशेष यांची अत्यंत बारकाईने व संदर्भासकट नोंद करण्यात आली. या उत्खननाने भारतातील उत्खनन तंत्रात अनेक नवे पायंडे पाडले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे उत्खननातून मिळणारी हाडे, जळलेली धान्ये ही प्रयोगशाळेत नंतर विश्लेषणाला जात. इथे मात्र फक्त वनस्पतिशास्त्र किंवा प्राणीशास्त्रच नव्हे तर रसायनशास्त्र, भूशास्त्र, सांख्यिकी अशा विषयातील तज्ज्ञांचाही उत्खननप्रक्रियेत प्रथमपासून सहभाग होता. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक पुरावे गोळा करण्यास हातभार लागला, तसेच उत्खनन तंत्रातही हे पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले.

त्याच बरोबर एक मूलभूत बदल म्हणजे उत्खननातून मिळणाऱ्या माहितीच्या नोंदणीच्या चौकटीचा केंद्रबिंदू बदलला. इतकी दशके मिळालेले पुरावशेष हे सांस्कृतिक कालखंड, स्तरशास्त्र आणि उत्खननाचा खड्डा व त्यामधे ठेवलेल्या भिंती (baulks) याच्या संदर्भात नोंदले जात. इथे मात्र पहिल्यापासून सर्व पुरावशेष घरे व इमारती यांच्या प्राथमिक संदर्भाबरोबर नोंदले गेले. त्यामुळे खड्ड्यांच्या भिंती ठेवण्याची पद्धत इथे बाद झाली. कालखंड, स्तर व उत्खननाचा खड्डा हे संदर्भ अर्थातच नोंदले जात होते, पण प्रत्येक घरानुसार अवशेषांची विभागणी केल्यामुळे खूप मोठा माहितीचा साठा उपलब्ध झाला. 

उत्खनन हे समूहकार्य असते, पण असे असले तरीही त्याची संपूर्ण आखणी करणे, धोरणे ठरवणे आणि संशोधनाच्या गरजेप्रमाणे कार्यपद्धतीत बदल करून शक्य तेवढे उत्तमपणे पुरावे नोंदवणे, यासाठी कुशल दूरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज असते. ते नेतृत्व इनामगाव प्रकल्पात नि:संशयरीत्या ढवळीकरांकडे होते.

या सर्व उत्खनित पुराव्याचे विश्लेषण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करून घेऊन इनामगावचा उत्खनन अहवाल दोन खंड आणि तीन भागांत १९८८ला प्रसिद्ध झाला. तो त्यानंतरही बरीच वर्षे भारतातील सार्वकालिक सर्वोत्तम उत्खनन अहवाल म्हणून गणला गेला. या अहवालात फक्त उत्खनित पुराव्याची खानेसुमारी, वर्णन व प्राथमिक पातळीवरचे विश्लेषण नाही तर त्या पलिकडे जाऊन विविध पुराव्यांची आणि शास्त्रीय परीक्षणांची हातमिळवणी करत दीडेक हजार वर्षे नांदत्या-गाजत्या असलेल्या आद्य दख्खनी खेडेगावाचा एक संपूर्ण लेखाजोखा आहे. 

यामध्ये लोकांचे दैनंदिन जीवन, खाणेपिणे, घरांची रचना, शेती-पशुपालन-शिकार-मासेमारी अशा विविध उपजीविकांची साधने व त्यांचे तपशील, तत्कालीन पर्यावरण, शेतीचक्र, पाऊसमान, गुजरात-राजस्थान-कर्नाटक येथील समकालीन ताम्रपाषाणयुगीन समाजांशी असलेला संपर्क व देवाणघेवाण अशा विविध पैलूंचा समावेश आहे. दैनंदिन जीवन जाणून घेताना घरांचे आराखडे, धान्य साठवणीच्या विविध सोयी, अंगणांची रचना, त्यामधील गुरे ठेवायच्या जागा, अंगणात मिळालेली दफने, मधले गल्ल्याबोळ यांसारखा पुरावा तर बारकाईने टिपला गेलाच, पण इतर घरांपेक्षा मोठे असलेले आणि गावच्या धान्य कोठाराच्या मोक्याच्या जागेशेजारचे गावप्रमुखाचे घर - तिथल्या दफनांमधून दिसणारे त्याचे इतरांपेक्षा वेगळे असलेले सामाजिक स्थान, गव्हाच्या शेतीसाठी पाणी साठवून ठेवायला काढलेला कालवा व त्यालगतचा धक्का, कुंभाराचे आवे, लोणारी, मणिकार, तांबट यांची घरे, इत्यादि पुराव्यांचीही नोंद विशेषत्वाने झाली. तसेच धार्मिक श्रद्धा समजुतींशी निगडित मातीच्या मूर्ती, अर्धमानव-अर्ध बिबळ्या चितारलेला रांजण वगैरे अवशेषही या सर्व संदर्भचौकटीत नोंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर इनामगावपासून ३२ किमी दूर असलेली, पण इनामगावचीच हंगामी शेतीपुरती वस्तीही वाळकी येथे उत्खनन करून नोंदवण्यात आली. त्याचा इनामगावशी असलेला संबंध खापरांच्या शास्त्रीय चिकित्सेने सिद्ध करण्यात आला.

परंतु या सर्वांपेक्षाही लक्षवेधक ठरले ते या वसाहतीच्या अंतकाळाचे पुरावे. आधी नमूद केल्याप्रमाणे एका विशिष्ट कालखंडानंतर तापी आणि गोदावरी खोऱ्यातील या वसाहती उजाड झाल्या हे सर्वांना ज्ञात होते. इथे मात्र वसाहतीचा आधी फारसा माहीत नसलेला अंतकाळ (इ.स. पू.१००० ते ७०० पर्यंतचा) इथे पहिल्यांदाच विस्ताराने अभ्यासला गेला. या उत्तर जोर्वे कालखंडात आधीची चौकोनी कुडाची घरे सोडून लोक  गोल झोपड्यांत राहू लागले होते, दफनेसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचे पीक आता कोणी घेइेनासे झाले. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणाऱ्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचे प्रमाण खूप वाढले. जास्त पाणी, चारा लागणाऱ्या गाईगुरांची खिल्लारे कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचे प्रमाण वाढले. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचे मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी, कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा उत्खनकांना मिळाला. 

या सर्व प्रकारच्या पुराव्यांचे सैद्धांतिक पुरातत्वशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण हे या अहवालाचे खरे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. तोपर्यंतचे बहुतेक अहवाल हे फक्त अवशेषांचे वर्णन, प्राथमिक विश्लेषण आणि त्या पुरातत्वीय स्थळाचे सांस्कृतिक कालानुक्रमानुसार उभे केलेले ढोबळ इतिहासचित्र याच स्वरूपात असत. इथे मात्र पहिल्यांदा नवपुरातत्व किंवा प्रोसेश्युअल आर्किऑलॉजीच्या सैद्धांतिक चौकटीमधून हे संपूर्ण संशोधन झाल्याचे दिसून येते. भारतातील हे अशा स्वरूपाचे पहिलेच काम होते. १९६० च्या दशकात अमेरिका आणि ग्रेट बिटनमध्ये उदयाला आलेली ही सैद्धांतिक विचारधारा पुरातत्वाला शास्त्रीय स्वरूप देणारी होती. त्याचबरोबर पर्यावरण हे सर्वप्रकारच्या सांस्कृतिक बदलांचे मूळ असते हे या विचारधारेचे मुख्य तत्त्व. या सैद्धांतिक चौकटीतून पुराव्यांची छाननी करून ढवळीकरांनी राजस्थानमधून उपलब्ध झालेल्या पुरापर्यावरणीय पुराव्याचा आधार घेत घटलेले पाऊसमान आणि वारंवार पडणारे दुष्काळ या पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे 'संस्कृतीचे चक्र' उलटे फिरले आणि इनामगाव येथील लोक शेती सोडून भटके पशुपालक जीवन जगू लागले असे गृहितक उत्खननाच्या निष्कर्षांमध्ये मांडले. हे भारतीय पुरातत्वशास्त्रात आणि इतिहासचर्चेत अभूतपूर्व असे विश्लेषण होते. साहजिकच या संशोधनाला आणि ढवळीकरांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली.

ढवळीकरांच्या या विश्लेषणपद्धतीवर नवपुरातत्वाचा उद्गाता लुई बिनफर्ड आणि त्याच परंपरेतील केन्ट फ्लॅनरी या दोन पुरातत्वशास्त्रज्ञांचा पगडा स्पष्ट दिसून येतो, मात्र कुठेही त्यांच्या कामाची नक्कल न करता त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन इनामगावचे संशोधन स्वतंत्र प्रज्ञेने उभे राहिले हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

इनामगावच्या घवघवीत यशानंतरही सरांचे काम थांबले नाही. त्यांनी गुजरातेत मोरवीजवळ कुंतासी नामक सिंधूसंस्कृतीच्या स्थळाचे उत्खनन केले आणि डेक्कन कॉलेजमध्ये सिंधुसंस्कृतीच्या संशोधनाचा पाया घातला. 

हे सर्व संशोधन चालू असतानाही त्यांनी त्यांचे शिक्षकाचे काम तेवढ्याच समरसतेने चालू ठेवले. अतिशय क्लिष्ट विषयही सर्वांना सहजी कळेल अशा सोप्या भाषेत गप्पा मारल्यासारखे, परंतु कुठलेही महत्त्वाचे तपशील न गाळता खाचाखोचांसकट समजावून सांगणे ही त्यांची खासीयत होती. त्या शिकवण्याला कायमच एक प्रसन्नतेची आणि नर्म बौद्धिक विनोदाची किनार असे. पण त्याचबरोबर समोरचे विद्यार्थी किती मेहनत करतात, काय वाचतात, त्यांना विषयात खरेच किती रस आहे यावर त्यांची बारीक नजर असे. त्यामुळे त्यांचा धाकही वाटत असे. 

ढवळीकरांनी डेक्कन कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी घडवले. समोरच्या विद्यार्थ्याचा वकुब लक्षात घेऊन त्याला सतत प्रोत्साहन देऊन पण भरपूर कष्ट करायला लावून त्याला/ तिला तयार करणे हा त्यांचा शिरस्ता होता. तो व्यावसायिक पेशाचा एक अनिवार्य भागही होता. पण ढवळीकर आणि त्यांच्या डेक्कन कॉलेजमधील सहकाऱ्यांनी शिक्षक म्हणून सर्वांत मोठे काम काय केले असेल तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंडॉलॉजी किंवा भारतीय विद्या या विषयाचे अभ्यासक्रम सर्वसामान्य लोकांसाठी सुरू केले. ज्यांना या विषयात रस आहे, पण पेशा म्हणून स्वीकारणे शक्य नाही अशांसाठी आणि विषयाचा प्रसार होण्यासाठी हे अभ्यासक्रम सुरू झाले. अतिशय नगण्य अशा मानधनावर केवळ विषयावर प्रेम म्हणून ही मंडळी दर रविवारी टिमवित येऊन नोकरीत असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही शिकवत असत. त्यांचे व्यावसायिक मोठेपण, मानसन्मान हे त्या शिकवण्यात कधी दृग्गोचरही होत नसत. त्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी पुढे पुरातत्वाचे रीतसर शिक्षण घेऊन संशोधनात कार्यरत झाले तसेच योग्य इतिहास सर्वसामान्य समाजापर्यंत पोचवायचा एक भक्कम पूल अस्तित्वात आला. आजही हे अभ्यासक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. त्याचे मूळ श्रेय निर्विवादपणे सरांच्या पुढाकाराचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याही निष्ठेने शिकवण्याचे! 

त्याचबरोबर ढवळीकर सर एक फार उत्तम मार्गदर्शक होते. ते सर्वांशीच एक अंतर राखून वागत बोलत असत पण तरीही कुठल्याही ओळखीच्या किंवा अनोळखी विद्यार्थ्याने त्यांचा सल्ला मागितला आहे, मदत मागितली आहे आणि त्यांनी यथाशक्ती दिली नाही असे सहसा होत नसे. फील्डवर्क करून कुणी खापरे घेऊन त्यांच्याकडे आले की, ते एकदम खूष होत असत. नव्या नव्या ठिकाणांहून आणलेली खापरे बघताना त्यांच्या चेहऱ्यावर जी उत्फुल्लता, आनंद दिसायचा तो वेगळाच असायचा. 

या पेक्षाही त्यांचा शिक्षक/ मार्गदर्शक म्हणून सर्वात मोठा गुण म्हणजे विद्यार्थ्यांना सतत प्रश्न पडायला आणि विचारायला उद्युक्त करण्याचा. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मतभेदांना खुल्या दिलाने सामोरे जाण्याचा. भारतीय शिक्षणपरंपरेत 'गुरुवाक्यं प्रमाणम्' या तत्त्वाचाच पगडा जास्त. त्याला ते लखलखीत अपवाद होते. मात्र समोरच्या विद्यार्थ्याचीही तेवढीच तयारी असणे त्यांना अपेक्षित असे. त्यांच्या विरोधी मत मांडले की, ते त्यांच्या मताच्या समर्थनार्थ भरपूर पुरावे देऊन त्यांचे म्हणणे कसे सार्थ आहे हे ठामपणे सांगायचे. पण समोरच्या विद्यार्थ्यानेही जर ठामपणे त्याला नव्या पुराव्याने किंवा वेगळ्या तर्कशास्त्राने प्रत्युत्तर दिले तर ते मनापासून ऐकून घ्यायचेच, शिवाय आणखी पुढे संशोधन करून त्यांच्या मतविरोधी व्यावसायिक लिखाण करून ते प्रकाशित करा असेही मनापासून प्रोत्साहन देत असत.

मी दख्खनच्या ताम्रपाषाणयुगात संशोधन सुरू केले ते सरांशी इनामगाव विश्लेषणातून मांडलेल्या गृहितकाबद्दल मतभेद होते म्हणून. त्यांचे म्हणणे सरळ होते, तुम्हाला वेगळे मत मांडायचे असेल तर मैदानात उतरा, नव्याने पुरावे गोळा करा आणि पुराव्याने शाबित करा. मात्र त्याच वेळी त्यांना शक्य असेल ती सर्व मदत करायला ते कायम तयार असत. एवढेच नव्हे तर काम उत्तम केले तर तोंडावर आणि पाठीमागेही ते त्या त्या विद्यार्थ्याचे मनापासून कौतुक करत असत. कधीही फोन केला की 'मग, काय नवं सापडलंय? कधी येताय दाखवायला?' अशीच विचारणा असायची. त्या उत्साहाची लागण इतकी जबरदस्त असायची की, एकदा तर मी आणि माझी मैत्रिण दिवसभर फील्डवर्क करून शेवटी पुण्याच्याच एका उपनगरी भागातून उत्तर जोर्वे काळातील ताम्रपाषाणयुगीन खापर मिळाले म्हणून फील्डवरून थेट सरांच्या घरी धडकलो होतो. कारण तो आनंद, थरार केवळ त्यांनाच कळणार होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आश्चर्य बघितले आणि आम्हा दोघींच्या दिवसभराच्या कामाचे सार्थक झाले असेच त्याक्षणी वाटले होते. 

याचबरोबर सर शेवटपर्यंत प्रचंड प्रमाणात व्यावसायिक वाचन करत असत. सर्व अद्ययावत संदर्भ त्यांना नुसते माहीतच नसत तर ते बारकाईने वाचून त्यावर त्यांची बरी-वाईट मते असत. मग ते सैद्धांतिक पुरातत्वातील लेखन असो वा इतर कुठल्याही उपशाखेतील आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील लेख असोत वा अगदी मराठीत प्रकाशित झालेले स्थानिक संशोधने असोत वा भारतीय इतिहास आणि पुरातत्वातील संशोधने, उत्खनने असोत. त्यांनी वाचले नाही असे काही क्वचितच असे.

या सगळ्या ज्ञानाचे, अनुभवाचे, वाचनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते. बरेचदा कितीही उत्तम संशोधक असला तरी व्यावसायिक लिखाण फार करत नाही असे भारतीय पुरातत्वात वारंवार आढळून येते. ढवळीकर त्याला अपवाद होते. त्यांनी केलेल्या प्रत्येक संशोधनावर त्यांनी लेख, पुस्तके लिहून प्रकाशित केली तसेच सर्व उत्खननांचे तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केले.  

व्यावसायिक लिखाणाबरोबरच त्यांनी आणखी दोन फार महत्त्वाचे लेखनप्रकार हाताळले. ते म्हणजे पदव्युत्तर वर्गांसाठी पाठ्यपुस्तके आणि सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेली इतिहास-पुरातत्वविषयक पुस्तके. १९७०-८० च्या दशकात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने विविध विषयातील तज्ज्ञांना आमंत्रित करून पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी निगडित विषयांवर मराठीत पाठ्यपुस्तके लिहून घेण्याचा एक फार महत्त्वाचा उपक्रम हातात घेतला होता. त्या प्रकल्पांतर्गत ढवळीकरांनी 'प्राचीन भारतीय नाणकशास्त्र' आणि 'पुरातत्वशास्त्र' अशी दोन पुस्तके लिहिली. अतिशय उत्तम दर्जाची ही पाठ्यपुस्तके आजही विद्यार्थी वापरतात. या पुस्तकांचे वैशिष्ट्य असे की या विषयांशी निगडित तांत्रिक परिभाषा प्रथम मराठीत मांडली गेली. तोपर्यंत व्यावसायिक लिखाणातील परिभाषा ही केवळ इंग्लिशपुरती मर्यादित होती. प्रा. शां. भा. देव आणि ढवळीकर यांच्या पुरातत्वशास्त्रावरील पुस्तकांनी प्रथमच या विषयावरील मराठी परिभाषा जरूर तिथे योग्य विवेचन करून निर्माण केली. 

मात्र ही मराठी पुस्तके सोडूनही सरांनी इंग्लिशमध्ये 'प्रोटोहिस्टॉरिक आर्किऑलॉजी' आणि 'हिस्टॉरिकल आर्किऑलॉजी' अशी दोन पुस्तके लिहिली. ही पुस्तके त्या त्या काळातील संपूर्ण भारतीय पुरातत्वीय पुराव्याचा सहज सोप्या भाषेत आढावा घेणारी असल्याने पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकांसारखीच वापरली जातात. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन काळावर लिहिलेले 'फर्स्ट फार्मर्स ऑफ द डेक्कन' हे छोटेखानी पुस्तक एखादा क्लिष्ट व तांत्रिक विषय किती सोप्या भाषेत समजावता येतो याचा वस्तुपाठ आहे.

याशिवाय मराठीत ढवळीकरांनी सहजसोप्या भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पुरातत्वीय संशोधन नेलं. 'आशियाचे आराध्य दैवत गणेश', 'कोणे एके काळी सिंधुसंस्कृती', 'महाराष्ट्राची कुळकथा', 'भारताची कुळकथा', 'पर्यावरण आणि संस्कृती' ही त्यांची पुस्तके त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. अगदी शेवटपर्यंत सर नव्या नव्या पुस्तकांच्या आराखड्यांवर आणि खर्ड्यांवर काम करत होते.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण लेखन म्हणजे पुरातत्वीय आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर भारतीय इतिहासाची साकल्याने पर्यावरणीय दृष्टीकोनातून पुनर्मांडणी. जेव्हा पर्यावरण हा विषयही फारसा कुणाच्या चर्चेत नव्हता तेव्हापासून, १९८० च्या दशकापासून, भारतीय इतिहासात त्याचे काय आणि कसे दूरगामी परिणाम झाले आहेत याचा मागोवा ढवळीकरांनी घेण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक वेळेस पुरापर्यावरणीय पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांनी ही माहिती जाणून घेण्यासाठी एक फारसा कुणी लक्षातही न घेतलेला माहितीस्रोत वापरला. तो म्हणजे नाईल नदीच्या पुराची तपशीलवार नोंदणी. हा पूरही मान्सून पावसाच्या चक्रावर अवलंबून असल्याने त्याचे थेट प्रमाण भारतीय पाऊसमानाशी संबंधित आहे. अनेक शतकांची पुराची तपशीलवार नोंद इजिप्तमधे असल्याने त्या आधारावर भारतीय इतिहास व पुरातत्वीय पुराव्याची चिकित्सा ढवळीकरांनी करून जेव्हा जेव्हा पाऊसमान उत्तम होते, तेव्हाच भारतीय इतिहासाचा साम्राज्यांचा आणि भरभराटीचा काळ होता, असे आग्रही प्रतिपादन 'पर्यावरण आणि संस्कृती' या पुस्तकात केले. अर्थातच या निष्कर्षांवर रास्त प्रमाणात टीकाही झाली. असे असले तरी पुरातत्वीय पुराव्यांच्या मांडणीवर पाचहजार वर्षाच्या भारतीय इतिहासाची साकल्याने सैद्धांतिक मांडणी करणारे ते एकमेव पुरातत्वशास्त्रज्ञ ठरले. 

निवृत्तीनंतरही सरांनी शेवटपर्यंत नवेनवे प्रकल्प हातात घेतले. गेली दीडदोन दशके ते आर्यप्रश्नाविषयी संशोधन करत होते. त्यांचे सिंधुसंस्कृती आणि आर्यांचे संबंध दाखवणारे निष्कर्ष वादग्रस्त ठरले असले तरी त्यासाठी त्यांनी अथक कष्ट करून पुराव्यांचे डोंगर उपसले होते.  रवींद्रनाथ टागोर फेलोशिपसारख्या मानाच्या फेलोशिपसाठी हाती घेतलेला मुंबईच्या पुरातत्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण करून, अहवाल देऊन त्याचे पुस्तकरूपात प्रकाशन करणारे ते एकमेव फेलो ठरले. त्याचवर्षी, म्हणजे २०११ साली, त्यांना एशियाटिक सोसायटीचे सुवर्णपदक आणि पद्मश्री सन्मान मिळाला. याशिवाय त्यांना मध्य प्रदेश सरकारचा जीवनगौरव सन्मानही मिळाला होता. 

हा सर्व संशोधकजीवनाचा भाग वजा जाताही सर एक रसिक वाचक होते. त्यांचे अवांतर वाचन केवळ अफाट होते. मराठी व इंग्लिश साहित्य, कविता अशा विषयांवरही ते भरभरून बोलायचे. स्मरणरंजनात सर फारसे रमत नसले तरी इनामगाव उत्खननाच्या, त्यातील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या, देशपांडे किंवा अन्सारींसारख्या जिवलग मित्रांच्या, त्यांच्या गुरुंच्या - सांकलियांच्या - आठवणी मात्र अधूनमधून गप्पांच्या ओघात सांगत असत. शिकवताना जाणवत असलेली  मिश्कील नर्म विनोदाची, सहृदयतेची किनार अशा वेळी अगदी उठून दिसायची. एरवी थोडे अंतर राखून वागणारे सर अशा वेळेस अगदी जवळचे वाटायचे. 

आता हे सगळेच संपले. मागे उरली आहे ती त्यांची विस्तृत ग्रंथसंपदा, शोधनिबंध, आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना दिलेली संशोधनाची प्रेरणा! त्यांचे मित्र रा. चिं. ढेरे यांच्याच प्रमाणे दख्खनच्या इतिहासावर जे कुणी काम करेल, त्यांना ढवळीकरांच्या संशोधनाची दखल घेणे अनिवार्य असेल.

.............................................................................................................................................

ढवळीकर यांच्या ‘महाराष्ट्राची कुळकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/2234

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

लेखिका वरदा खळदकर पुरातत्व संशोधक आहेत.

varada.kh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......