केदारनाथ सिंह : ‘ठण्ड से नहीं मरते शब्द, वे मर जाते है साहस की कमी से’
संकीर्ण - श्रद्धांजली
आसाराम लोमटे
  • प्रख्यात हिंदी कवी केदारनाथ सिंह (७ जुलै १९३४ - १९ मार्च २०१८) यांच्यासोबत कथाकार आसाराम लोमटे
  • Wed , 21 March 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली केदारनाथ सिंह Kedarnath Singh आसाराम लोमटे Aasaram Lomte

हिंदीतील आघाडीचे कवी केदारनाथ सिंह यांचं परवा दीर्घ आजारानं दिल्लीत निधन झालं. त्यांना २०१३ साली ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच इतर अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या या कवीच्या कवित्वाचा दुसऱ्या एका सर्जनशील, कवीमनाच्या कथाकाराने घेतलेला मर्मज्ञ शोध...

.............................................................................................................................................

जो सच है वह सच नहीं है

जो जानता है उस तक खबर अभी पहुँचीही नहीं

जो हुक्म देता है वह डरा हुआ है

जो फैसला देता है

उसे पता नहीं की वह गिरफ्तार है

ही कविता खुद्द केदारनाथ सिंह यांच्याच तोंडून ऐकली, तेव्हा त्यांच्या कवितेत असलेल्या तिव्र संवेदनेचा प्रत्यय आला. २०१० साली गोव्यात पणजीतल्या कला अकादमीत साहित्य अकादमीच्यावतीने ‘अभिव्यक्ती’ या कार्यक्रमात प्रत्यक्ष केदारनाथांना ऐकण्याचा योग आला. त्याआधी फक्त गावाकडची प्रतिमासृष्टी कवितेतून समर्थपणे साकारणारे कवी म्हणून त्यांचा कवितेतूनच परिचय होता. गोव्यात एका कवी संमेलनाच्या सत्रात त्यांनी त्यांच्या चार कविता ऐकवल्या होत्या. त्या सगळ्याच आजही आठवतात. कविता वाचतानाचा त्यांचा ठाम, आश्वासक असा स्वर ऐकणाऱ्यालाही नवी अनुभूती देऊन जाणारा होता. याच कवी संमेलनात त्यांनी ‘विद्रोह’ ही कविता सादर केली होती. घरात प्रवेश केल्यानंतर अजब दृश्य दिसू लागते. घरातल्या निर्जीव वस्तु एक एक करत पुन्हा आपल्या मूळ नैसर्गिक रूपात जाण्यासाठी संघर्ष पुकारतात. आम्हा सर्व कैद्यांना माणसाच्या तुरुंगातून मुक्त व्हायचे आहे असे म्हणतात. यात ‘बिस्तर’पासून ते नळातून टपकणाऱ्या पाण्यापर्यंत सर्वांनाच मुक्ती हवी आहे. एक कविता होती ‘पोस्टकार्ड’.

यह खुला है

इसलिए खतरनाक है

खतरनाक है इसलिए सुंदर

इसे कोई भी पढ़ सकता है

वह भी जिसे पढ़ना नहीं

सिर्फ छूना आता है

इतके सहज सोपे लिहिणाऱ्या या कवीचे वागणेही नितांत सुंदर आणि सहज. या साधेपणाचाही प्रभाव पडतोच. ही सहजता हेच केदारनाथांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. सामान्य घटना प्रसंगांमधून अनुभवांना बहाल केले जाणारे असामान्यत्व ही त्यांच्या कवितेची खरी ओळख.

कोणताही सशक्त कवी हा एका अर्थाने आपले जग उराशी बाळगतच वावरत असतो. कवीची कविता वाचल्यानंतर त्याची मुळेही शोधता येतात. कवी आपल्यासोबत कोणते जग घेऊन येतो आणि कोणत्या शब्दांतून व्यक्त होतो यातूनच त्याचे वेगळेपण निश्चित होते. केदारनाथांनी आपले बालपण खेड्यात घालवले. हे सारे संचित घेऊनच ते शहरात दाखल झाले. ग्रामीण संवेदना आणि शहरी संवेदना असे एक द्वंद्व त्यांच्या कवितेत पाहायला मिळते. एकदा शहरात दाखल झाल्यानंतर हळूहळू आपल्या ग्रामीण संवेदनांवर एक धुळीचा थर चढू लागतो. दीर्घकाळ शहरात वास्तव्य केल्यानंतर खेड्यातून आलेल्या माणसालाही आपले आता परतीचे दोर कापले आहेत अशी भावना निर्माण होते. केदारनाथांच्या कवितेत मात्र तसे जाणवत नाही. शहर विरुद्ध ग्रामीण अशी दोन जगांची व्यस्त मांडणी ते करत नाहीत. ग्रामीण संचित घेऊन ते शहरात वावरतात आणि शहरी आधुनिकतेचा परिवेश धारण करून त्यांच्यातला कवी पुन्हा आपल्या गावी जातो. त्यांच्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे.

अब आ तो गया हुँ

पर क्या करूँ मैं

एक बुढे पक्षी की तरह लौट लौट कर

मैं क्यों यहाँ चला आता हुँ बार बार

असा प्रश्न ते स्वतःला विचारतात. शेवटी हा प्रश्न केवळ अनुषंगिक किंवा प्रासंगिक राहत नाही तर तो अंतर्मुखतेकडे जातो.

कौन है ये लोग

जो कि मेरे है?

इनके चेहरोंको देखकर

मुझे अपनी घडी की सुई

ठिक क्यों करनी पडती है बार बार

आपल्या स्वतःला पुन्हा पुन्हा तपासावे लागण्याची गरज या कवीतली सजगता स्पष्ट करते. याच कवितेत ते शेवटी म्हणतात की, काय करू म्हणजे या लोकांना मी त्यांच्यातलाच एक वाटेल? हीच आहेत माझी माणसे की ज्यांना मी कवितेत उतरवतो आणि हे तेच आहेत की जे मला कधी वाचणारही नाहीत. शहरातून खेड्यात गेल्यानंतरची कवीची ही भावावस्था.

केदारनाथांना खेड्यातल्या माणसांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी कमालीची आस्था आहे. पण त्याचवेळी ते आधुनिकतेकडेही तेवढ्याच तिव्रतेने पाहतात. जी आधुनिकता टाळता येत नाही त्या आधुनिकतेबाबत या कवीची वृत्ती ही शहामृगी नाही. विशेष म्हणजे या कवितेत खेड्यांच्या मागासलेपणाचा सूर नाही आणि शहराविषयीच्या तक्रारींचा जाबही नाही. अत्यंत निरागसतेने हा कवी आपल्या समोर मानवी जीवनासंबंधी अर्थपूर्ण असे चिंतन मांडू लागतो.

केदारनाथांच्या संपूर्ण कवितेतून गाव वगळता येत नाही. किंबहुना त्यांच्या कवितेचीच मुळे ही गावात रुतलेली आहेत. मात्र गावाशी त्यांचे नाते केवळ स्मरणरमणीयतेपुरते मर्यादित नाही. या कवितेत पारंपरिक ‘नॉस्टेल्जिया’आढळत नाही. ही कविता गावाच्या मातीतली असंख्य प्रतीके, प्रतिमांच्या रूपाने व्यक्त होते आणि शहरी जाणिवेतून येणाऱ्या विसंगतीकडेही अंगूलीनिर्देश करते. यात गावाचे उदात्तीकरण आणि गौरवीकरण कुठेच नाही. मात्र या कवितेत सशक्त असा धागा आहे जो माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या आदिम नात्याशी जोडलेला आहे. त्यांच्या कवितेला हीच बाब सामर्थ्यवान करते.

माणसाचे माणूसपण टिकविण्यासंबंधी आणि एका चांगल्या दुनियेची आस बाळगण्यासंबंधी या कवितेचा स्वर हा कमालीचा कोमल आणि हळूवार आहे. एखाद्या आजीच्या रखरखीत हाताच्या स्पर्शात असलेली ऊब किंवा घट्ट सायीसारखी स्निग्धता याचा जो अनुभव येतो तसा अनुभव ही कविता देते. अनुभव व्यक्त होताना कुठेही अनावश्यक अशी शब्दांची उतरंड नाही. फापटपसारा नाही. विनाकारण ताणलेला विस्तार नाही. उत्स्फुर्तता आणि सहजते बरोबरच या कवितेत दिसून येते, ते केदारनाथांनी परिश्रमपूर्वक रचलेले कवितेचे शिल्प. कवितेतील शब्दांच्या वापराबद्दल ते किती जागरूक आहेत हे त्यांची प्रत्येक कविता वाचतानाच लक्षात येते. म्हणूनच या कवितेचा परिणाम वाचकाच्या मनावर दीर्घकाळ राहतो. छोट्या छोट्या वाक्यांमधून व्यक्त होत ही कविता आपल्याला अनोख्या वातावरणात घेऊन जाते.

लोकपरंपरा, धारणा, श्रद्धा, संकेत, लोकसमजुती या सर्व घटकांशी केदारनाथांच्या कवितेचे एक अतूट असे नाते आहे. अनेक लोककथा त्यांच्या कवितेतूनही सूक्ष्म असे रूप धारण करून प्रकटतात. ‘कुछ सूत्र जो किसान बाप ने बेटे को दिए’ या त्यांच्या कवितेत अशा काही लोकधारणा येतात. या कवितेत शेतकरी आपल्या मुलाला काही गोष्टी सांगतो. झाडाचे हिरवे पान कधी तोडू नकोस आणि तोडायचेच असेल तर असे तोड की झाडाला जराही दुःख होणार  नाही. रात्री जेव्हा तुकडा मोडशील तेव्हा शेतातल्या गव्हाच्या रोपांची आठवण येवू दे किंवा अंधाऱ्या रात्री जर वाट चुकलास तर ध्रुवताऱ्यापेक्षा दुरून ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजावर विश्वास ठेव. अशा कितीतरी बाबी या कवितेत येतात.

केदारनाथांची मुळे ही अशी लोकजीवनात घट्ट रुतलेली आहेत. त्यांच्या कवितेतला अनुभव व्यक्त होतांनाही कैकदा लोककथेच्या कथनाच्या अंगाने व्यक्त होतो. ज्यात एखादी गोष्ट सांगण्याची शैली आहे, सहजता आहे. एखाद्या बुजूर्ग माणसाने संथ लयीत जगण्याचे सार सांगावे तशी ही कविता वाचतांना जाणवते. असंख्य म्हणी, वाक्प्रचार या कवितेत गद्यशीलता टाळून येतात. ‘क्या करूँ मैं? क्या करूँ, क्या करूँ कि लगे कि मैं इन्ही में से हूँ’ अशा पद्धतीने जेव्हा एखादी कविता व्यक्त होते, तेव्हा ती लोकभाषेला किती सहज आपल्यात पचवते!

ही फक्त अभिव्यक्तीच्याच अंगाने अशा कथन शैलीतून व्यक्त होणारी कविता नाही, तर लोकसाहित्य, पुराण आदींच्या माध्यमातून असंख्य प्रतिमा या कवितेतून सतत येत राहतात. एके ठिकाणी केदारनाथ म्हणाले आहेत की, ‘आधुनिक जीवनातील जटिलता आणि अंतर्विरोधांना व्यक्त करण्यासाठी लोकसाहित्य, धर्म, पुराण आणि इतिहासात इतकी विपुल अशी अपरिचित प्रतिके आणि प्रतिमा आहेत की, त्यामुळे नव्या कवितेच्या शक्यतांचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकतो.’ त्यांच्या ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही है’, ‘यहाँ से देखो’,‘अकाल में सारस’ आदी कविता संग्रहांमधील कवितांमध्ये केदारनाथांची अशी लोकजीवनाशी संबंधीत प्रतिमासृष्टी मोठ्या प्रमाणावर दिसते.

याचा अर्थ त्यांच्या कवितेला अज्ञात अशा मिथकांचेच आकर्षण आहे असे नाही. तसे असते तर ती कविता कदाचित इतकी सोपी आणि सामान्यांच्या इतकी जवळची वाटली नसती. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधीत इतके विपुल असे संदर्भ ही कविता आपल्यासमोर ठेवते, तरीही ती सामान्य वाटत नाही. सामान्य माणसाच्या जगण्यातील आशा, आकांक्षा, हर्ष-खेद, त्यांच्या दैनंदिन जीवनातील चढ, उतार आणि वरवर भणंग वाटणाऱ्या माणसाच्या आकांक्षांना केदारनाथांच्या जादुई शब्दकळेचा स्पर्श होतो. त्यामुळेच या कवितेतील प्रतिमा आणि प्रतीकांना एक अर्थवत्ता प्राप्त होते.

‘तम्बाखु के खेतों से उठनेवाली खुंखार चमक’, ‘पत्तीयों से सिप सिप सिप सिप गिरनेवाली धिमी गुनगुनाहट’, ‘टमाटरों कि रोशनी में लहकता हुआ चेहरा’, ‘एक विशाल फुल कि तरह खिलता हुआ शहर’, ‘जाते हुए आदमी कि धुपमें चमकती हुई पीठ’ या त्यांच्या कवितेतील प्रतिमा पाहिल्या म्हणजे कवितेतले त्यांचे अस्तित्व किती प्रभावी आहे याच साक्ष पटते. तिव्र अशी संवेदनशीलता ज्या कवीकडे आहे, तोच कवी अशी तल्लख प्रतिमासृष्टी आपल्या कवितेतून उभारू शकतो. त्यांच्या कवितेत धुळीचे अस्तित्व वारंवार जाणवते आणि सूर्यबिंबाचेही. धुळीविषयी तर त्यांची कविता सतत बोलत राहते. ‘मैं जानता हूँ/ क्योंकि यह धुल इस कसबे की/ और मेरे पुरे देस की/ सबसे जिंदा और खुबसुरत चिज है/ सबसे बेचैन/ सबसे सक्रिय/ पृथ्वीकी सबसे ताजा और प्राचीनतम धुल/ जो यहाँ दिनभर आदमी के साथ साथ...’ मग सामान्य माणसाच्या जगण्यात जिथे जिथे धूळ दिसते, ते तपशील केदारनाथ आपल्यासमोर उकलत राहतात.

केदारनाथांची कविता कमालीची मितव्ययी आहे. ती कुठेही अनावश्यक शब्द धारण करताना दिसत नाही. कधी कधी ही सहजता अंगभूत आहे की, त्यासाठी ते परिश्रमपूर्वक कारागिरी करतात हे लक्षातही येत नाही. त्यांच्या कवितेतील शब्दांची निवड मात्र आपल्याला मोहवते. या कवितेचे गारूड आपल्या मनावर स्वार होते. ही कविता सहजासहजी निसटून जात नाही. एखाद्या नादासारखी आतल्याआत झंकारत राहते. लोकतत्त्वांमधून आशयद्रव्य घेणारी ही कविता आधुनिकतेलाही तितक्याच समर्थपणे सामोरी जाते. सृष्टीचक्रातले असंख्य घटक कवितेत येऊनही ही कविता म्हणजे निसर्गकवी किंवा रानकवीची होत नाही. ती होते अवघ्या समष्टीचीच.

हिंदीत अनेक महत्त्वाचे कवी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहेत. केदारनाथांची भूमिका काय किंवा कोणती प्रणाली त्यांना जवळची वाटते, याचा शोध त्यांच्या कवितेतून तेवढा स्पष्टपणे दिसणार नाही. एखाद्या साच्यात या कवितेला बसवता येत नाही. समाजबदलासंबंधी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती बाळगणारा एक सूर हिंदी कवितेत आढळतो, तोही या कवितेत सापडत नाही. पण ही कविता समाजाच्या तळाच्या वर्गाविषयी कमालीचा आस्थाभाव बाळगणारी आहे. त्यांच्या कवितेतून सामान्य माणूस बाजूला काढता येत नाही. ‘अकाल में सारस’ या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केले, त्यातून त्यांची लेखनविषयक दिशा सुचित होते. ‘हिंदी कविता आणि एकूणच भारतीय कविता आज आपल्या सामाजिक, सांस्कृतीक वातावरणात स्वतःला आणि आपल्या काळातल्या माणसाला जिवंत ठेवण्यासाठी संघर्षरत आहेत. माझे लेखन हा सुद्धा या संघर्षाचा अल्पसा घटक आहे. हीच बाब मला लिहिण्यासाठी ऊर्जा देते. जीच्या आधारे एक लेखक आपल्या भूमीवर उभा असतो.’

तर केदारनाथ हे सुरुवातीपासून आपल्या भूमीवर भक्कम पाय रोवून उभे होते. त्यांच्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘मैं उनकी तरफसे बोल रहा हूँ, जो चले गये है काम पर... और देखिए न मेरी मुस्तैदी कि मैं सबकी ओर से बोलता हूँ। ओर बोलता हूँ अपनी पुरी सच्चाई के साथ’. केदारनाथ यांची कविता ही एका अर्थाने समूहाचीच भाषा बोलते. अभिव्यक्ती ही काळाची गरजच आहे याचे भान त्यांच्या कवितेत निरंतर जाणवते. ‘वे चुप क्यों है, जिनको आती है भाषा’ हा सवाल त्यांना अस्वस्थ करतो.

समकालीन हिंदी कवितेचा परिवेष बदलला. अनेक मोठे कवी बदलत्या काळानुरूप आपल्या अभिव्यक्तीत बदल करतांना दिसले पण केदारनाथांच्या कवितेची भाषा बदलली  नाही. ज्या ‘तिसरा सप्तक’च्या माध्यमातून त्यांची कविता पुढे आली. त्यावेळी केदारनाथ म्हणाले होते, ‘समाजातील प्रगतीशील तत्त्वे आणि उच्च मानवी मूल्यांचा आढळ माझ्या कवितेत आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण त्यांच्याविषयी माझ्या मनात एक दृढ विश्वास आणि आकर्षण जरूर आहे.’ खरे तर केदारनाथांचा उदय एक गीतकार म्हणूनच झाला. त्यांच्या गीतातला जिवंत ताजेपणा, रंग, रूप, गंधासह येणारे शब्द आणि त्यांच्या मुक्तछंदातल्या कवितांची सहजता. दोन्हीही तितकेच अर्थपूर्ण आहे. भाषेचा प्रश्न हा कवीसाठी जीवन-मरणाचाच प्रश्न आहे आणि मी लोकांच्या जीभेवरील भाषा कवितेत आणण्याचा प्रयत्न करतो असे सांगणाऱ्या या कवीचे आता आपल्यात नसणे हे विलक्षण पोकळी जाणवून देणारे आहे. एका कवितेत केदारनाथ म्हणतात, ‘ठण्ड से नहीं मरते शब्द, वे मर जाते है साहस की कमी से’ आजच्या काळात सर्जनशील लेखकांसाठी हे फार महत्त्वाचे आहे.

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे हे मराठीतील मान्यवर आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.