बंम्बोलीचा डंम्बो व १८४ रुपये
पडघम - देशकारण
रवींद्र कुलकर्णी
  • निरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँक
  • Mon , 05 March 2018
  • पडघम देशकारण निरव मोदी Nirav Modi पंजाब नॅशनल बँकPunjab National Bank

डंम्बो संभ्रमात होता. ऑफिसात फिरणाऱ्या १८४ रुपये महामहीम राष्ट्रपतींकडे परत मागायच्या पत्रावर सही करावी का नाही? ऑफिसातल्या एसीच्या निरव शांततेत त्याला सारखा आकडा ऐकू येत होता. वर्तमानपत्रात येणारा आकडा व टीव्हीवर सांगण्यात येणारा आकडा त्यानं वारंवार पाहिला होता. त्याला भारताच्या लोकसंख्येनं त्यानं दोन-दोनदा भागून पाहिलं होतं. शिवाय दोन वेगवेगळ्या कॅलक्यूलेटरवर भागून पाहिलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ब्रँचमधल्या कॅलक्युलेटरवरचा त्याचा विश्वास कमीच होत चालला होता. आजकाल तो रोज स्वत:चा कॅलक्युलेटर घेऊन येई. त्यानं वेळ मागून घेतला, तेव्हा सही मागणाऱ्यालाही आश्चर्य वाटलं. त्याला वाटले होतं डंम्बो आपल्याला धुडकावून लावणार. श्रद्धेपासून संभ्रमात यायलाच डंम्बोला वयाची चाळीशी गाठावी लागली होती.

संभ्रमात असतानाच डंम्बोला लोकलमधल्या गर्दीनं सांस्कृतिक नगरीच्या फलाटावर केव्हा उतरवलं, हे त्याला कळलं नाही. तो घामानं डबडबला होता, पण अगदी गीतेतल्या अर्जुनासारखी काही त्याची स्थिती नव्हती. धर्मपत्नीनं करून दिलेला चहा प्यायल्यावर त्याला तरतरी आली. तोंडाला कोरड पडल्यावर गीता ऐकणं हाच एक उपाय नाही, आपलं चहानंही भागतं, हे त्याच्या आज प्रकर्षानं लक्षात आलं.

तशा आजकाल त्याच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येत होत्या. एके काळी त्याच्या बालसुलभ तरुण मनाला अनेक प्रश्न पडत. त्यातले बहुतेक सरळ देशापुढचेच असत. त्या साऱ्याला ‘पटेल असते तर (?)’, हे एकमेव उत्तर त्याला बालपणापासून मिळे. आजदेखील पटेल नसल्यानं त्याला आपल्या गल्लीतल्या देशप्रेमाची जबाबदारी घ्यावी लागली होती. गेल्या काही दिवसांत त्याच्या लक्षात आलं होतं की, आजकाल पटेल जिथून आले होते, तिथूनच सारे प्रश्न निर्माण होत आहेत. तेव्हा ‘पटेल असते तर?’ या प्रश्नरूपी मिळालेल्या उत्तरावरचा विश्वास कापरासारखा उडून गेला नसला तरी तेलाच्या दिव्यासारखा मंदावला मात्र होता.

१४ सालचे लोकसभेचे निकाल, नंतर विधानसभा, महानगरपालिका असे आसिंधूसिंधूपर्यंत हिंदूच हिंदू झाल्यानं पटेलांची गरज आता नाही, असं वाटत असतानाच परवा लोकसभेत परत त्यांचं नाव आलं. खरं त्यानं आता राष्ट्राच्या राजकारणावरील लक्ष कमीच केलं होतं. राजकारण तात्कालिक असतं, संस्कृती चिरंतन असते, हे त्याला माहीतच होतं. पण आता सतत येणाऱ्या निवडणुकांमुळे राजकारण हीच संस्कृती आहे, असं त्याला वाटू लागलं. या गावाची स्वत:ची अशी ओळख होती. महाराष्ट्राची लोप पावणारी संस्कृती या गावानं थोपवली होती. आजकाल वेगवेगळ्या लग्न-कार्यालयात चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना त्याची हजेरी असे. एकदा तो आर. डी. बर्मनच्या गाण्यांना गेला. नंतर दुसऱ्या कार्यालयात किशोरदांच्या गाण्याला गेला, तर एकदा राजेश खन्नाच्या गाण्यांना. सगळीकडे गाणी तीच होती. हे कोडं काही त्याला सुटलं नाही.

गाणी ऐकताना धनशी अंबर्डेकर तरळून गेली. त्याला वाटलं, गेली ती लग्न करून गेलीच अखेर. ती जाऊन पंधरा वर्षं झाली, तरी ती खारला का पार्ल्याला असते, हे त्याला अजून नक्की माहीत नव्हतं. तशी ती सांस्कृतिक नगरीत फिट नव्हतीच. सांस्कृतिक नगरीच्या रस्त्यात ती दिसली तर पिठाच्या गिरणीच्या कट्ट्यावर मोर आल्याचा भास होई. तशा त्यानं तिच्यावर प्रयत्नानं केलेल्या कविता गावाच्या नावाच्या गुळगुळीत मासिकात छापून आल्या होत्या. कविता तिला दाखवायचंही त्याच्या मनात आलं होतं, पण ते सारं तात्कालिक होतं. त्याला ओढ चिरंतनाची होती. शिवाय त्या सश्रद्ध काळातही हे ‘पटेल न पटेल’ डोकावले होते!

सत्काराच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं हाही डंम्बोच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर व नासामध्ये या शहराचं योगदान मोठं आहे. डंम्बो या सत्कार समारंभांना हजेरी लावत असल्यानं त्याला त्या स्तरावर आपलंही काही योगदान असल्याचा भास होई. आपले विजय गोखले परदेश सचिव झाले, तशी गावात एक सुप्त खुशीची लहर पसरली. बरीच शोधाशोध केल्यावर गोखल्यांचा पुण्यातल्या जुन्या शेजाऱ्याचा चुलत भाऊ या नगरीत राहात असल्याची बातमी लागली. त्याचा सत्कार करण्याच्या समितीत डंम्बोचा समावेश झाल्यानं गोखल्यांच्या शेजाऱ्याच्या चुलत भावाबरोबर डोकलाम प्रश्नाची चर्चा करण्याची संधी मिळाली. ‘पटेल असते तर?’ हा प्रश्न आला नसता यावर दोघांचंही एकमत झालं.

बोलताना जुन्या सत्कार समारंभाच्या आठवणी निघाल्या. आयसी ८१४ या हायजॅक केलेल्या विमानतल्या पॅसेंजरचा सत्कार करताना, तो थरार सगळ्यांनी परत अनुभवला होता. फार पूर्वी गाव सोडून जाताना सत्कार होत. आता राहणाऱ्यांचा करतात व सत्कार करणाऱ्यांना आता एकमेकांचे सत्कार करण्याशिवाय दुसरं काम मिळणं अवघडच होतं. खरं तर ‘संस्कृती म्हणजे शेवटी मानवतेचा सत्कारच!’ असं मत डंम्बोनं मिटिंगमध्ये हलक्या व गंभीर आवाजात सांगितल्यावर म्हणजे नक्की काय, हे इतरांना न समजल्यामुळे डंम्बोचा सत्कार समितीत समावेश झाला होता.

खरं तर या गावालाच ‘पद्मश्री’ मिळायला हवी असं त्याचं म्हणणं होतं. पण ती सोय नव्हती. एका वेळीच एका पुस्तकापेक्षा जास्त पुस्तकं, तीही एकाच लेखकाची प्रकाशित होणं हा खरं तर विश्वविक्रम होता. जयपूर फेस्टिवलमध्ये नाही, पण बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनातही याची वाच्यता नाही, हे त्याला मनाला लागलं. कुठे तरी चुकत होतं. ‘पटेल असते तर?’ पत्र टाकून काय ते नक्की विचारता आलं असतं. शाळेत असताना गांधी वा गुरुजी यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं होती, आता हे पटेलांचं आलं.

गोहत्या बंदी झाली आणि डंम्बोचं बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं. गावातल्या बैलांपेक्षा जास्त आनंद त्याला झाला. नववर्ष स्वागतयात्रेत हा विषय आला पहिजे, हे मत त्यानं मांडून पाहिलं. गोमूत्र हे एडसपासून डांग्या खोकल्यापर्यंत सर्वांवर प्रभावी औषध आहे, असं जर्मनीत केलेल्या संशोधनानं सिद्धच झालं होतं. गोमूत्राचा असा प्रभावी डंगोरा पिटल्यानं गावातल्या गाई हादरल्या आहेत, असं एका बैलानं त्याच्या स्वप्नात येऊन सांगितल्यानं त्यानं गोमूत्र गोळा करायची स्पर्धा घ्यायचं रहित केलं. विद्वानांशी गायींबद्दल बोलताना तो हरला नसता, पण बैलांशी टक्कर घेणं सोपे नव्हतं. ते सीबीआयच्या कक्षेतही नव्हतं. पण आता पुढच्या ५० वर्षांत लौकरच सांस्कृतिक शहराचं स्मार्ट सिटीत रूपांतर होणार होतं. तिथं एक लाख गायींची भव्य गोशाळा असावी, त्यासाठी निवृत्तीनंतरचं जीवन वेचायचं त्याच्या मनात होतं. त्याच्या बंम्बेालित बहुतेक सारं सरळ जगण्याऐवजी कुठल्या ना कुठल्या कामात जीवन शोधून शोधून वेचत असत.

हे गाव स्मार्ट शहर होणार असं ऐकल्यापासून डंम्बो बेचैन झाला. त्याच्या आजच्या संभ्रमावस्थेची सुरुवात त्या ठिकाणी झाली. संस्कृती जपावी का स्मार्ट व्हावं? त्याची घालमेल सुरू झाली. त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की, स्मार्ट होण्याचं त्याचं वय तर गेलेलं आहे. केवळ त्याचंच नव्हे तर गावातल्या बहुतेकांचं वय गेलेलं आहे. खरं बोलायचं तर ते वय कधी आलंच नव्हतं. तेव्हा आपण आपली संस्कृतीच जपावी, असं गावातल्या अनेकांनी ठरवूनच टाकलं होतं.

पण काल अचानक ते १८४ रुपये परत मागायचं पत्र त्याच्यापुढे आलं. स्मार्ट होण्याची संधी परत मिळणार नाही, तेव्हा ती साधावी असं त्याच्या मनानं आता घेतलं. त्यानं त्या पत्रावर सही करण्याचा निर्णय घेतला. पटेल नको म्हणाले असते तरी आता त्यानं ऐकलं नसतं. डंम्बोचे दिवस थोडे उरले होते!

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......