देवापेक्षा जास्त काळजी मेंदूची घेतलेली कधीही चांगलं!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
प्रतिक पुरी
  • ‘मोघ पुरुस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक मोघ पुरुस Mogh Purus प्रतिक पुरी Pratik Puri

‘मोघ पुरुस’ ही प्रतिक पुरी या तरुण लेखकाची नवी कादंबरी नुकतीच विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीतला हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

देवाशिवाय, त्याच्या विश्वासाशिवाय, माणसं जगू शकतात. कारण जगण्याची कारणं ही पूर्णतः व्यावहारिक असतात. देवावर विश्वास ठेवून जगणारी माणसंही मरतात. कारण मरण्याची कारणं देखील पूर्णतः व्यावहारिकच असतात. देवाच्या असण्या-नसण्याचा माणसाच्या जगण्या-मरण्याशी काहीही संबंध नाही. तो एक निर्विकार व्यवहार आहे, अटळ असा निसर्गक्रम आहे. त्यामुळे देवाशिवाय माणसाचं अस्तित्व पूर्वीही होतं आणि यापुढेही राहणार आहे. जर त्यानं स्वतःच स्वतःचा नाश ओढवून घेतला नाही तर. पण माणसांशिवाय देवाचं अस्तित्व क्षणभरही टिकणार नाही. करोडो मानवेतर प्राणी देवाच्या अस्तित्वाशिवाय, जाती-धर्माशिवाय जगत आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत. नवस करीत नाहीत. उपवास पाळत नाहीत. व्रत-उत्सव साजरे करत नाहीत. त्यांचं काहीच बिघडलेलं नाही. ‘पण म्हणूनच ते प्राण्यांच्या जन्माला आले आहेत आणि आपण माणसांच्या जन्माला’, असा युक्तिवाद कोणी करत असेल तर तो मला पटत नाही. आपण सर्वश्रेष्ठ आहोत, हा माणसांचा भ्रम आहे. माणसांची एकंदर वागणूक बघता ते नसतील तर हे जग अधिक सुंदर होईल यावर माझा विश्वास आहे. माणूस नसेल तर देवही नसेल. कारण मुळात देव आहे तो माणूस आहे म्हणूनच.

तर हा देव! देवाच्या उत्पत्तीविषयी सांगायचं तर माणसांचे सुरुवातीचे देव म्हणजे नैसर्गिक शक्तीच होत्या. सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी, वारा, पाणी, इत्यादी इत्यादी. पुढे माणसांमधून काही अचाट कामं करणारी माणसं निर्माण झाल्यावर लोकांनी त्यांना देवत्व बहाल केलं. पुढच्या पिढ्यांनीही परंपरांच्या ओझ्याखाली दबून, खरेखोटेपणाची कोणतीही चिकित्सा न करताच त्यांना मान्यता दिली. खरं तर ज्या माणसाशी, किंवा नंतर परावर्तीत झालेल्या देवाशी माझा थेट संबंध आला नाही. त्याला मी काही कारण नसताना देव म्हणून का मान्यता द्यावी? अचाट कृत्ये करणारी ही मुळात माणसंच होती. त्यांच्या संपर्कातील लोकांना त्यांच्यामुळे काही फायदा झाला म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या लोकांनी त्या माणसांचा गौरव करणं हे समजण्यासारखं आहे. काळाच्या ओघात त्यांना देवत्व मिळालं हेही समजण्यासारखं आहे. पण त्याचं ओझं किती काळ वागवत राहायचं आपण?

मला हे असे प्रश्न कायम पडत आले आहेत. देवाच्या भ्रामक जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला त्यांचा उपयोग झाला. तुम्हीही हे प्रश्न विचारू शकता. विचारा स्वतःला की जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा त्याला माणसंच जबाबदार असतात ना? त्या संकटांतून आपली सुटका करणारीही माणसंच असतात ना? हाच प्रश्न देवांच्या संदर्भातही विचारा. तुम्ही हे करायला लागलात की कळेल की, तुमच्या सुखाला तुमच्या अवतीभवतीची माणसंच बहुधा कारणीभूत असतात. तुम्ही त्यांना देवमाणूस म्हणून मान्यता द्यालच, पण त्यांना देव म्हणणार का? तुम्ही जरी त्यांचा देव म्हणून स्वीकार केला तरी इतर लोक त्याला मान्यता देतील का? नाही देणार. कारण त्यांचे वेगळे देव असतील. आता तुमच्या दुःखांना कारणीभूत असलेल्यांची यादी करा. ती माणसंदेखील तुमच्या अवतीभवतीचीच असतात. त्यांना तुम्ही राक्षस म्हणून मान्यता देणार की नाही? नक्कीच द्याल. पण इतरांना कदाचित त्यावर आक्षेप असेल. मान्यता देण्या न देण्याच्या या खेळांत ज्यांची बाजू मजबूत होती, त्यांचे देव अस्तित्वात आले आणि ज्यांची बाजू कमकूवत होती त्यांचे राक्षस अस्तित्वात आले. देव-राक्षसांची निर्मिती सुरुवातीच्या काळात अशी झाली आहे. प्रत्येक मानवी समूहांतील प्रतिभावंत कवींनी मग याच काही असामान्य माणसांचं व त्यांच्या लोकहितकारी घटनांचं उदात्तीकरण करून देवांमध्ये आणि चमत्कारांमध्ये रूपांतर केलं. त्यांच्या आड आलेल्या व्यक्तींना राक्षस म्हणून अपमानीत केलं.

माणसांनी देवांची निर्मिती केली आहे. त्याचे असंख्य पुरावे आहेत. पण देवांनी आपली निर्मिती केली आहे याचे किती पुरावे आहेत? सहा दिवसांत जग तयार केलं आणि सातव्या दिवशी माणसांना जन्म दिला किंवा डोक्यापासून, हातापायांपासून माणसांची निर्मिती झाली अशा गोष्टींवर कोणी विश्वास ठेवणार असेल तर त्यानं आधी आपलं डोकं तपासून घेतलेलं बरं. कारण देव काही तुमच्या मदतीला धावून येणार नाही, पण तुमचं डोकं, त्यांतला मेंदू कायम तुमच्या मदतीसाठी तयार असेल. म्हणून देवापेक्षा जास्त काळजी मेंदूची घेतलेली कधीही चांगलं!

माझा जर देवावर विश्वास नाही तर कोणावर आहे? माझा निसर्गावर विश्वास आहे. माझा माणसांवर विश्वास आहे. देव म्हणून ज्यांना आज मान्यता देण्यात आली, त्यांच्यावरही माझा विश्वास आहे, पण केवळ माणूस म्हणून. देव म्हणून नाही. त्यांच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टींवरही माझा विश्वास आहे. पण त्यांच्या कोणत्याच बाष्कळ चमत्कारांवर माझा विश्वास नाही. ती माणसं आजही मला अगदी जवळची वाटतात ती त्यांच्या मानवोपयोगी कृत्यांमुळे. त्यांच्या जातीधर्मामुळे नाही. देशामुळे नाही. लिंगामुळे नाही. माझा त्यांनी कोणता फायदा केला आहे म्हणून नाही. तर ती माझ्या सारखीच माणसं होती आणि माझ्यातही त्यांच्यासारखीच कर्तृत्त्वाची उत्तुंग झेप घेण्याची शक्यता आहे, याची जाणीव व प्रेरणा मला त्यांच्यामुळे मिळते म्हणून.

हिंदू धर्मियांनी वेदांमध्ये संपूर्ण विश्व म्हणजे एक कुटुंब आहे अशी सुंदर संकल्पना प्राचीन काळात मांडली होती. वेद हे आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी लिहिलेले प्रार्थना ग्रंथ. त्यांनाच पुढे धर्मग्रंथांची मान्यता मिळाली आणि मग सारी गडबड झाली. या ग्रंथांमध्ये अनेक सुंदर विचार मांडले आहेत. ते कृतींमध्ये फारसे उतरले नाहीत हा भाग निराळा. संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी ते धर्मग्रंथ व त्यातील विचार आहेत हाही तद्दन खोटा दावा. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले हे ग्रंथ होते. त्यातील विचारही त्यांच्यासाठीच लागू होते. त्यामुळे कोणी जर ते अखिल मानवतेसाठी व्यक्त केलेले विचार होते वगैरे दावे करू लागले की मला हसायला येतं. पण अर्थात आता परिस्थिती बदलली आहे कारण काळ बदलला आहे. त्यामुळे या धर्मग्रंथातील काही सुंदर विचारांचा अवलंब ब्राह्मणेतरांनी केला, तर त्याला कोणी काही हरकत घेणार नाही. दुसरं असं की असे विचार स्वतंत्रपणेदेखील कोणाच्याही मनात जन्माला येऊ शकतात. त्यासाठी ब्राह्मण असण्याची पूर्व अट नाही.

तर या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी कल्पना आहे की, संपूर्ण जगत हे चैतन्यमयी आहे. सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये वसणारं हे चैतन्य सजीव व निर्जीव चैतन्य आहे जे एकच आहे. आता ही अतिशय सुरेख अशी कल्पना आहे. मनुष्य व मनुष्येतर जीवांमध्ये आणि इतकंच नाहीतर अचेतन वस्तूंमध्येही एकत्वाचा धागा जोडणारी ही संकल्पना आहे. त्यामुळेच हिंदूंमध्ये निसर्गाची, प्राणीमात्रांची, वनस्पतींची पुजा करण्याची पद्धती आहे. दगडांना, शस्त्रांना, दागिण्यांनाही इथे पुजलं जातं. या संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे हे संपूर्ण जगत हे एकच एकक आहे. त्याला एकच अस्तित्व आहे आणि एकच मन आहे. यालाच आपण वैश्विक मन म्हणूया. या वैश्विक मनात कोणताही भेदाभेद नसतो. याला काळाचे नियम लागू होतात, पण इतर कोणत्याही मानवी परिमाणांमध्ये याचं मोजमाप करता येत नाही. आपण जिवंत आहोत तोवर या वैश्विक अस्तित्वाचे आणि या वैश्विक मनाचे भाग असतो. आपलं काही कर्तृत्व असेल तर आपण गेल्यानंतरही आपल्या कर्तृत्वाचा काही एक भाग या वैश्विक अस्तित्वात कायमस्वरूपी टिकून राहू शकतो. ही सारी प्रस्तावना यासाठी कारण मी स्वतःला या वैश्विक अस्तित्वाचा एक भाग मानतो.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4384

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Yogeshwar Misal

Fri , 16 February 2018

nice... great article


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......