टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शशी थरुर, सुब्रह्मण्यम स्वामी, रेड्डी कन्येचा शाही विवाह आणि पतंजली उत्पादने
  • Sat , 19 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali शशी थरुर Shashi Tharoor सुब्रह्मण्यम स्वामी Subramanian Swamy

१. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच अर्थ खात्याने आपत्कालीन नियोजन करून ठेवायला हवं होतं. तसं केलं असतं, तर लोकांना त्रास सहन करावा लागला नसता : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी हे एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही पंचाईत करतात, हे त्यांचं अदभुत सामर्थ्य आहे. आता स्वामी हुशार आहेत, बरोबरच बोलतात, असं सत्ताधारी किंवा भक्तगण म्हणू शकत नाहीत आणि ते तर निव्वळ वाचाळशिरोमणी आहेत, असं विरोधक किंवा अभक्तगण म्हणू शकत नाहीत.

...............

२. हजारो कोटींचे कर्ज थकवणाऱ्या धनाढ्य कर्जदारांनी वेळोवेळी परतफेड केली असती या देशाची अर्थव्यवस्था कोसळली नसतीच. पण त्यासोबतच हा नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला नसता : शिवसेना

व्हिडिओकॉनने पक्षाला ८५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी नेमकी याच दिवशी यावी, एवढा एक विलक्षण योगायोग सोडला, तर बाकी सगळं बरोबर आहे. आता निदान या कर्जबुडव्यांकडून मुखपत्राच्या मुखपृष्ठावरच्या जाहिरातींसाठी वार्षिक करार तरी करून घ्या घसघशीत. जनतेपर्यंत ज्वलंत विचार तरी पोहोचत राहतील व्यवस्थित.

...............

३. उदारमतवादी इतिहासकारांचं मत काहीही असलं, तरी ब्रिटिश राजवट अन्यायकारकच होती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी २०१६च्या सुरुवातीला तिथल्या शिखांची जाहीर माफी मागितली. ब्रिटिश पंतप्रधानांनीही जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी : डॉ. शशी थरूर

त्यानंतर लगेचच १९८४च्या दंगली आणि शीख हत्याकांडासंदर्भात, देशातल्या ६० वर्षांच्या दिशाहीन, भोंगळ कारभाराबद्दल, साफ चुकलेल्या निर्णयांबद्दल काँग्रेस पक्षही माफी मागेल देशाची, हो ना थरूरसाहेब?

...............

४. रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहात शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्यासाठी विदेशात नव्याने वापरलं जाणारं भ्रूण प्रत्यारोपणाचं (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) तंत्र आता वापरलं जाणार. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती होऊन ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध मिळणार.

देवा देवा देवा, केवढा हा अनाचार? देशी गाईंचा वंश सुधारण्यासाठी विदेशी तंत्राचा वापर? आपल्या देशात हजारो वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचं (तीही हत्तीचं मुख मानवी धडावर बसवणारी) तंत्र विकसित झालेलं असताना, पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिलेला असताना साक्षात देशी गोमातेसाठी विदेशी तंत्रज्ञान? दुधाबिधाचं जाऊद्याहो, ते नसलं तरी चालतं… आपले ३३ कोटी देव राहतील ना सुखरूप या नव्या देशी गायींच्या पोटात? गोठ्यात आणताना गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्ध करून घेत चला, बरं का!

...............

५. कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्यावर पाचशे कोटींचा खर्च; सर्व खर्च चेकनं केल्याचा रेड्डींचा दावा.

भर मांडवात नाट्यमय पद्धतीने आर्थिक विभागांचे अधिकारी काही कारवाई करतील, अशी अपेक्षा असताना खुद्द शुचितासम्राट येड्युरप्पा यांनी दोन वेळा हजेरी लावल्यामुळे लग्नकार्य पवित्र करून घेण्यात आलेलं आहे, हे स्पष्टच आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मंदीचं सावट पसरलेलं असताना लग्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला रोखविहीन चालना दिल्याबद्दल रेड्डी बंधूंचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक पक्षात परत आणलं पाहिजे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......