दैववादाची काजळी शिक्षणच दूर करील
पडघम - राज्यकारण
जयवंत पाटील
  • सातवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन
  • Tue , 23 January 2018
  • पडघम राज्यकारण सातवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन जयवंत पाटील

२० जानेवारी २०१८ रोजी मुंबईत सातवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष जयवंत पाटील यांचे अध्यक्षीय भाषण…

.............................................................................................................................................

शिक्षक बंधू-भगिनींनो,

नमस्कार!

देव, दैव, दैववाद, अंधश्रद्धा यांमुळे मानवी जीवनावर काजळी निर्माण होते. ती झाडण्याचं कार्य केवळ शिक्षणच करू शकतं, शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे, हे विचार मनात घेऊन शिकत होतो. शिकता - शिकता शिकवू लागलो. शिक्षकी पेशाकडे वळलो. हे राष्ट्र सेवा दलामुळे झालं. दिवसाच्या शाळेत शिक्षक झालो. मुलांची बालनाट्यं लिहू लागलो, ती सादर करू लागलो, हेसुद्धा सेवा दलामुळेच, कारण आताचे ज्येष्ठ कवी व निवेदक अरुण म्हात्रे यांच्या सोबत सेवा दल मित्रांसोबत कलापथकात काम करत होतो. याचवेळी रात्रशाळेतही शिकवू लागलो. रात्रशाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘छात्र भारती’च्या माध्यमातून काम करत होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांबद्दल विशेष आपुलकी. रात्रशाळेतील मुलांना शिकवता शिकवता त्यांच्या समस्या, त्यांचं जगणं, झगडणं मी जवळून पाहात होतो. चांदण्यांनी भरलेली रात्र पाहात उद्याची गुलाबी स्वप्नं पाहण्याच्या वयात या मुलांना परिस्थितीच्या काळोखाला सामोरे जाताना इथंच पाहिलं. त्यांची शिकण्याची धडपड आणि जगण्याची उमेद अगदी जवळून पाहात होतो.

ती मुलं आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी आत्मीयतेनं सांगत. यातून मला कथालेखनाचे विषय मिळत गेले अन् कथा लिहू लागलो. प्रतिभेला सत्याचा स्पर्श नसेल तर प्रतिमा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक ठरतात. लिहिताना आपल्या अवतीभवती ज्या गोष्टी दिसतात ते लिहीत गेलो. बहुजन समाजातील लोकांची सुख-दुःखं होती, जे मी अनुभवलं आहे तेच मी लिहीत गेलो. रात्रशाळेत मला सर्वांत जास्त कथेचे विषय मिळाले, पण त्याचबरोबर माझ्या मूळ गावी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात खोपटे गावी (या गावात साने गुरुजी येऊन गेले होते!) जात असे. येथील आगरी बोली बोलत असे. आगरी समाजाची संस्कृती, सण आणि येथील लोकांचा बेडरपणा मनाला भावत असे. तिथंही वेगवेगळी माणसं भेटली. त्यांचं जगणं-मरणं मी मांडत गेलो. आगरी समाजातील अनुभवावर लिहिलेल्या कथांपैकी एका कथेचा समावेश या वर्षी मुंबई विद्यापीठानं त्यांच्या अभ्यासक्रमात केलाय. हे श्रेय माझं नव्हे तर त्या समाजाचं आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक साहित्यिक आपल्या कलाकृतीबरोबर काही प्रमाणात जगत आणि मरतही असतोच.

आज हे शिक्षक साहित्य संमेलन मुंबईच्या परळ या भागात संपन्न होत आहे. लालबाग - परळ म्हणजे पूर्वीचा गिरणगाव. या भागात शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, द. ना. गव्हाणकर, आत्माराम पाटील आदी शाहिरांनी आपल्या पहाडी आवाजानं आणि धारदार लेखणीनं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हे आग्रहानं मांडून जनतेच्या व कामगार-शेतकरी वर्गाच्या स्वातंत्र्याला व जीवनाला प्रेरक असं साहित्य दिलं. ते ऐकून आपल्या जगण्याच्या संघर्षाचं सक्षम हत्यार बनू शकेल, असं साहित्य निर्माण करावं असं वाटू लागलं.

त्यावेळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचं वर्णन करताना अण्णाभाऊ साठे उद्वेगानं म्हणतात,

‘‘कामगार मैदानी आला

गिरण्यांची तोंडे दाबुनि साचा बंद केला

त्रासनात आऱ्या जाहला।

थैली फेकून बाजूवाला झाला बाजूला

कपड्याचा हात मोडला।

तिरिमिरी आली धोट्याला।

रोवीण केट भुलेरात गोंधळ माजला

मढ्यासमान पडल्या गिरण्या प्राणचि गेला’’

भांडवलदार वर्गाशी लढून ज्यांनी संघर्ष केला, जे या लढ्यात प्राणपणाने लढले, सारं कुटुंब ज्यांनी पणाला लावलं त्यांनीच या गिरणगावातील गिरण्या जिवंत ठेवल्या होत्या. मात्र ८०च्या दशकात या चिमण्या एक-एक करून विझू लागल्या. जागतिकीकरणामध्ये जगण्याच्या इच्छाच मरत गेल्या.

‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे

सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’

असं म्हणत, मराठी साहित्यात गिरणीचा भोंगा वाजवणारे कविवर्य नारायण सुर्वे याच कामगार वस्तीतले. नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, राजा ढाले ही सारी विद्रोही लेखक मंडळी गिरणगावातली. आज या गिरणगावातल्या गिरण्या जमीनदोस्त झाल्या आहेत आणि या कामगारांच्या मढ्यांवर उंच-उंच टॉवर उभारले गेले आहेत. कामगारांना संपवणाऱ्या भांडवलदारांची चाकरी सरकारच करू लागलं आहे. असं भीषण वास्तव समोर आहे. गरीब खपाटीला गेलेल्या पोटानं, भविष्याच्या चिंतेनं, निस्तेज झालेल्या चेहऱ्यानं कसाबसा जगत आहे. आता या पतनाची नोंद साहित्यानं घ्यावी असं वाटू लागलं आहे.

शिक्षण व शिक्षकांची वाताहत

कामगार चळवळीची वाट लागत असताना आता तर हे सरकार बहुजनांच्या शिक्षणावर व शिक्षकांवर घसरलं आहे. प्रगत महाराष्ट्र करण्याच्या सोसात महाराष्ट्रातील गोरगरीब, बहुजन, आदिवासी विद्यार्थ्यांचं अनुदानित शिक्षण बंद करू पाहात आहे. विना अनुदानित शिक्षणाचं भीषण वास्तव समोर येऊ लागलं आहे. कायम विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांना वारेमाप परवानगी दिली जात आहे. राजकारण्यांनी शिक्षण हे नवं कुरण स्वतःसाठी निर्माण केलं आहे. नवीन शिक्षण सम्राटांचा वर्ग निर्माण झाला आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक या घटकांचं आर्थिक व मानसिक शोषण करत आहेत.

त्याच बरोबर शैक्षणिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना एके काळी आदर्श मानल्या जाणाऱ्या शिक्षकांचंही अवमूल्यन सुरू आहे. अनुदानित शाळा पटापट बंद केल्या जात आहेत. वाड्या - वस्त्यांवरील शाळा बंद होत आहेत. शिक्षणासाठी आता कोवळ्या मुलांना रोज तीन-चार किमी अंतराचा प्रवास काट्याकुट्यांतून, ओढ्या-नाल्यांतून करावा लागणार आहे.

स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोफत शिक्षणाचा हक्क संविधानाद्वारे मिळवून दिला होता. त्या कायद्यातील ० ते १४ वयोगटातील मुलांची जबाबदारी झिडकारण्यासाठी शासनाने ६ ते १४ वयोगटातीलच मुलांची जबाबदारी स्वीकारली, पण ० ते ६ वयोगटातील मुलांची जबाबदारी नाकारली. अशा एक-एक जबाबदाऱ्या शासन झिडकारू लागलं आहे.

खाजगी शाळा-महाविद्यालयांना परवानगी देताना तेथील शिक्षकांकडून भरमसाट पैसे उकळून शिक्षणसम्राट गब्बर बनू लागले आहेत. गरजू शिक्षकांना दोन-तीन हजार रुपड्यांवर राबवून घेतलं जात आहे. आपली राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी याच शिक्षकांना दावणीला बांधलं जात आहे. भरमसाट फी आणि देणग्या घेऊन पालकांना वेठीस धरलं जात आहे. त्यात इंग्रजी माध्यमाचं पीक आता खेडोपाड्यांत घेतलं जाऊ लागलं आहे. इंग्रजी माध्यमात आपलं ‘पोर’ गेलं पाहिजे, तिथं शिकलं पाहिजे, अशी समाजाची मानसिकता केली जात आहे. यासाठी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणाऱ्या नवनवीन बोर्डांना परवानगी दिली जात आहे. या इंग्रजी माध्यमांच्या चकचकीत शाळांना पालकही भुलू लागले आहेत. सर्वसामान्य माणूस भपकेबाजपणा, दिखाऊपणा आणि मार्केटिंगला बळी पडू लागला आहे.

शिक्षणात तर सध्या ‘विनोदपर्व’ सुरू आहे. शिक्षण विभाग रोज नवनवीन परिपत्रकं काढतं. एका वर्षात सुमारे साडेपाचशेच्या वर परिपत्रकं काढून त्यांनी आपला विक्रमही नोंदवला आहे. या पत्रकांनी शिक्षण हतबल तर शिक्षक हैराण झाले आहेत. शिक्षक वर्गात कमी पण सायबर कॅफेत जास्त दिसावा व त्याने रात्र-रात्र जागून रोज माहिती संगणकावर भरावी, असं एकूण सरकारचं हे ‘प्रगत धोरण’ दिसतं आहे.

खरं तर शिक्षकानं रोज चांगलं वाचलं पाहिजे, नवनवीन सृजनशील प्रयोग शिक्षणात केले पाहिजेत अशी धारणा असते. मात्र आज त्याच्या सृजनशीलतेला खील घालण्याचं षडयंत्र शासनाकडून चालवलं जात आहे. परीक्षाकेंद्रावर होणारे कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाण्यासाठी एक मिनिट जरी उशीर झाला तरी परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही. आज लाखो विद्यार्थी खेडेगावात, दुर्गम भागात राहतात, त्यांना वेळेवर बस-वाहनं मिळतील याची शाश्वती नाही, तीच बाब मुंबई-पुण्यासारख्या शहरात आहे. या शहरात इतकी वाहतूक वाढली आहे की, रिक्षा, बस किंवा टॅक्सीनं दोन-तीन किमी अंतर पार करण्यासाठी अर्धा-एक तास लागतो. आपले विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत शिकतात, याची जाणीव शासनाला नाही असं नाही; तरीही मुद्दामहून ही गोष्ट शासन करत आहे.

तसंच विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे १० गुण पुढील वर्षापासून काढून टाकले आहेत. म्हणजेच पुन्हा ‘घोका व ओका’ ही पद्धत सुरू करून विद्यार्थ्यांनी आपलं ‘भाषण - संभाषण, वाचन कौशल्य वाढवावं’, या पद्धतीचा बळी दिला जाणार आहे. आता तर शासनानं शिक्षण हे कंपन्यांवर सोपवण्याचं ठरवलं आहे. इंग्रजांची ‘कंपनी राजवट’ घालवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी जिवाचं रान केलं होतं. पण या सरकारनं शिक्षण खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन शिक्षणाचं ‘कंपनीकरण’ केलं आहे. सरकार शिक्षणासारख्या मूलभूत विषयाकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. शासन शिक्षणाची जबाबदारी झटकून शिक्षणाचं खाजगीकरण करत आहे. यामुळे येत्या चार-पाच वर्षात मराठी शाळा बंद झाल्या तर नवलाची गोष्ट होणार नाही.

आज गोरगरीब, बहुजनांचं आणि रात्रशाळांतील विद्यार्थ्यांचं शिक्षण ज्या पद्धतीनं बंद केलं जात आहे, ही बहुजन समाजाच्या दृष्टीनं घातक गोष्ट आहे. २००९ साली शिक्षणाच्या हक्काचा कायदा केला असतानाही मोफत शिक्षणाची वाट लावली आहे. शिक्षण भांडवलदारांच्या दारात ‘बटिक’ म्हणून पाणी भरणार आहे. असं असतानाही समाजातील अभ्यासक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, वृत्तपत्रं, प्रसारमाध्यमं, लोकप्रतिनिधी सारे मूग गिळून बसले आहेत.

शिक्षणाच्या बाबतीतची ही असंवेदनशीलता, हा माझ्या चिंतेचा विषय आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षकांची खऱ्या अर्थानं कसोटी आहे. म्हणूनच शिक्षकांनी संघटित होण्याबरोबरच आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा जपली पहिले. प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करून आपल्या नियत कर्तव्यालाही न्याय देण्याची गरज आहे. मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरुजी म्हणत, ‘‘जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाशी दोस्ती करायला शिकवतो, तो खरा शिक्षक.’’

आज आपल्या साऱ्यांचं निसर्गाशी असलेलं नातं तुटत चाललं आहे. ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ पाहण्यास आपल्याला वेळ नाही, अनुभवायची इच्छा नाही. ओढ्याचं-नदीचं खळखळणारं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाची हिरवाई, पूर्व दिशेला उगवत्या सूर्याची लालिमा पाहण्यास वेळ नाही. सकाळच्या वेळी दवानं भिजलेल्या गवतातून चालावे यासाठी आपणाला वेळ नाही.

‘उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले’

अशा कवितेतून निसर्गाशी नातं जोडणाऱ्या भावनांना

‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

घेईल ओढ मन तिकडे सैर झुकावे’

अशा शब्दांतून, मनाला उभारी देणारी मानसिकताच अभ्यासक्रमातून बाद केली जात आहे. आज शिक्षकांनाही वेळ नाही, पालकांना सवड नाही, निसर्गाच्या सुंदर सोहळ्याला माणूस पारखा होत चालला आहे. भाकरी, चपातीऐवजी ‘पिज्जा’ आवडू लागला आहे. ‘ये रे ये रे पावसा’ म्हणणारी मुलं, ‘रेन रेन गो अवे’त नाचू लागली आहेत. आपली भाषा, संस्कृती, सांस्कृतिक परंपरा मागे पडत चालल्या आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण माणसाचं माणूसपण उद्ध्वस्त करणारं हे परिवर्तन माणूसपणाला नष्ट करणारं आहे.

या समाजात आणखी एक भीषण गोष्ट घडत आहे. माणसांचा आवाज दाबला जात आहे. प्रतिगामी विचारांच्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, डॉ. कुलबर्गी आणि गौरी लंकेश यांसारख्या पुरोगामी विचारांच्या धुरिणांना गोळ्या घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. नव्या पुरोगामी विचारांना घाबरणाऱ्यांनी भ्याडपणे हा हल्ला केला आहे. ‘अहिंसा’ हा परमधर्म मानणाऱ्या देशात, या विचारवंतांवर हिंसा मानणाऱ्या लोकांकडून हल्ला चढवला जात आहे. ज्यांनी ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा सारख्या संतांना छळलं आहे, त्यांनीच हे क्रूर हत्यासत्र चालवलं आहे. पण हे मारेकऱ्यांनो लक्षात ठेवा, या विचारवंतांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून त्यांच्या शब्दाशब्दांतून नवं नेतृत्व निर्माण होणार आहे, ते तुमची हिंसक प्रेरणा उद्ध्वस्त करेल याची मला खात्री आहे.

तथागत गौतम बुद्धांनी असं प्रतिपादन केलं होतं की, ‘मी सांगतो आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, धर्मग्रंथात आहे म्हणून आंधळेपणानं स्वीकारू करू नका; तर सर्व विचार तुमच्या बुद्धीवर तपासून पाहा आणि योग्य वा अयोग्य काय ते ठरवा.’ आपण प्रत्येक बाब विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणं गरजेचं आहे. आपल्या जगण्याला व जीवनाला वैज्ञानिक दृष्टिकोन हवा. कोणतीही गोष्ट आंधळेपणानं स्वीकारू नये.

माझ्या शिक्षक बांधवांनो, मी सांगू इच्छितो की देव, दैव, दैववाद यांत शिक्षकांनी अडकता कामा नये. त्यांनी विज्ञानवादी बनलं पाहिजे. म्हणजे आपले विद्यार्थीही विज्ञानवादी बनतील. सामाजिक उत्थानाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. समाज परिवर्तनात शिक्षकांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण असते. म्हणून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका वठवली आहे. ती समाजाला मार्गदर्शक ठरली आहे.

इतकी वर्षं, वर्गात इतरांचं साहित्य विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, समजून सांगणाऱ्या शिक्षक वर्गाला आता त्यांचंही अंतर्हृदय मोकळं करावंसं वाटतं आहे. अगदी वेगळ्या समाजातून आलेल्या शिक्षकांचं भावविश्व, स्वप्नविश्व आणि अनुभवविश्व साहित्याला नवं आहे आणि लक्षणीय वाटावं इतकं वेगळं आहे. त्यांनी हे अनुभव विश्व असंच विस्तारत ठेवलं पाहिजे. आपल्या विचारांना, अनुभवांना एकारलेपण येणार नाही, याची काळजी घेऊन रसरशीत साहित्य निर्मिती करावी. सर्वांना शहाणं करून सोडावं.

मला डॉ. सरोजिनी वैद्य, डॉ. उषा देशमुख, डॉ. सदा कऱ्हाडे, डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर, गंगाधर पाटील, केशव मेश्राम, डॉ. वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, पुष्पा भावे यांसारखे शिक्षक लाभल्यामुळे साहित्याची थोडीफार निर्मिती झाली. चांगल्या शिक्षकांचा ठसा प्रत्येक विद्यार्थ्यावर उमटलेला असतो. तसा या ‘साहित्यिक’ शिक्षकांचा ठसा माझ्यावर पडलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम व संशोधन मंडळावर थोडंबहुत काम करण्याची प्रेरणा मला याच माझ्या शिक्षकांकडून मिळाली. याचवेळी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा सहवास लाभला. त्यांचं मार्गदर्शनही लाभलं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

आणि जाता जाता, इथल्या साहित्य व्यवस्थेविषयी मला जाणवलेलं वास्तव.

देशात शिक्षणाचा पूर्ण प्रसार होण्याआधी किंबहुना शिक्षण ही एकाच कर्गाची मक्तेदारी असताना ‘साहित्या’सारखा व्यापक विषयही संकुचित झाला होता. सुखवस्तू समाजाच्या दिवाणखान्यात बंदिस्त झाला होता. त्यात ना शेतशिवार होतं, ना कामगार वस्ती, ना गावकुसाबाहेरचं जगणं, ना स्त्रियांच्या खऱ्या अभिव्यक्तीला जागा. बहुजन समाजाला ‘अक्षर’ ओळख झाल्यावर मात्र साहित्याला अपरिचित असलेलं ते सर्व वास्तव चित्र वेगानं मराठी साहित्यात आलं. लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुरू झालेलं स्त्री हृदयाचं स्पंदन, आताच्या नजुबाई गावित यांच्यापर्यंत साहित्यात आलं\येत आहे. आणि साने गुरुजींचा लेखनधर्म आताच्या अनेक संवेदनशील शिक्षकांपर्यंत पसरला आहे.

या शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्तानं माझ्यासारख्या असंख्य साहित्यिक शिक्षकांना आपला स्वतःचा आवाज मोकळा करण्यासाठी एक भारदस्त व्यासपीठ निर्माण झालं आहे. शिक्षकांच्या रूपानं पुढचा जाहीरनामा येईल असं वातावरण आहे. भालचंद्र नेमाड्यांपासून सदानंद मोरेंपर्यंत आणि डॉ. वसंत आबाजी डहाकेंपासून वीरधवल परबपर्यंत ही सारी शिक्षक मंडळी साहित्याच्या मोठ्या पटलावर आपल्या प्रतिभेनं चमकणारी आहेत. डॉ. म. सु. पाटील, प्रा. एम. पी. पाटील, प्रा. शंकर सखाराम, शाहीर संभाजी भगत, कवयित्री नीरजा ते गझलकार नीतीन देशमुख, कवी भरत दौंडकर, प्रा. सुरेश शिंदे ही सर्व शिक्षक मंडळी आपल्या प्रतिभेनंच शिक्षणक्षेत्रातही मोलाचं कार्य करत आपली साहित्य साधना करत राहिली आहेत.

विद्यार्थी प्रतिभावान व्हावेत हे जर शिक्षणाचं ध्येय असेल तर शिक्षकांतील प्रतिभेलाही योग्य कोंदण मिळायला हवं. ते कोंदण देण्याचं काम आमची शिक्षक साहित्य संमेलन संस्था आणि त्यांच्याद्वारे घेतलं जाणारं हे संमेलन करत आहे. हा पसारा उत्तरोत्तम वाढत जाईल हे तर स्पष्ट आहे. असं करत - करत एक दिवस संपूर्ण साहित्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी माझा शिक्षक बांधव येईल, याची मला खात्री आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......