टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, तन्वीर सेत, बाबा रामदेव, राम माधव आणि साध्वी देवा ठाकूर
  • Thu , 17 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev राहुल गांधी Rahul Gandhi

१. स्वित्झर्लंडची लष्करी ताकद भारताच्या दहा टक्केही नाही; त्यामुळे, भारत सरकार तिथून भारतीयांनी दडवलेला काळा पैसा आणल्याशिवाय राहणार नाही : बाबा रामदेव

पतंजलीची गोमूत्रमिश्रित भांगही आलीये काय बाजारात? भारत कुठे, स्वित्झर्लंड कुठे? लष्करी ताकदीचा संबंध काय? बाबा थंड घ्या जरा… हवं तर तेही पतंजलीने बनवलेलं (म्हणजे कुणाच्या तरी बाटलीतून काढून आपल्या बाटलीत भरलेलं) घेतलंत तरी चालेल!!!

....................

२. गोरगरिबांचा बँकेत जमा झालेला पैसा मोदी मोजक्या उद्योजकांना देणार. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी सामान्यांच्या खिशातून बँकेत आलेल्या पैशांचा वापर केला जाईल : राहुल गांधी

आरोप गंभीर आहे, विचारात पाडणाराही आहे, त्यामुळे तो तुम्ही केलाय यावर चटकन् विश्वास बसत नाही चटकन, 'रागा'वू नका हं पटकन्. शिवाय, हे सगळे उद्योगपती तुमच्या सत्ताकाळात समाजवादी साथी बनून एकसुरात देशोन्नतीचा राग आळवतानाही दिसले नव्हते. त्यांना तुम्हीच पोसून, तुस्त करून ठेवलेले आहेत, त्याचं काय?

....................

३. हरियाणातील कर्नालमध्ये एका लग्नसमारंभात हिंदू महासभेच्या स्वघोषित साध्वीने आणि तिच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक ठार, तीन जखमी

हिंदू धर्माची अद्भुत व्यापकता दाखवणाराच हा प्रकार आहे. स्वत:ला साध्वी म्हणवून घेण्यासाठी जिने सर्वसंगपरित्याग केलेला असला पाहिजे, ती लग्नसमारंभात आनंदित होऊन नाचते; जिच्या मनातून किडेमुंगींबद्दलचीही हिंसेची भावना निपटून गेली पाहिजे, ती बंदुका झाडण्यासारख्या हिंस्त्र प्रकारांनी आनंद साजरा करते, यातून काय दिसतं. या बयेने हिंदूंना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं होतं, एक देशसेवेला, एक गोसेवेला, एक हिंदु महासभेला आणि एक मातापित्यांच्या सेवेला (नशीब!) अर्पण करावा, असं तिचं म्हणणं होतं. आता आणखी दोनचार मुलं प्रत्येकानेच जन्माला घालायला हवीत, हिला आनंदाचं भरतं येऊन गोळ्या झाडाव्याशा वाटल्या तर त्या खाऊन मरायला नकोत का कोणी?

....................

४. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सेत हे जाहीर कार्यक्रमात पॉर्न पाहताना सापडले होते; ते पॉर्न पाहात नव्हते, तर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलोनिया हिचे फोटो पाहात होते, असा बचाव पुढे आला आहे.

मेलोनिया ही पूर्वाश्रमीची मॉडेल आहे आणि तिचे काही फोटो पाहणं हे पॉर्न पाहण्यापेक्षा वेगळं नाही, हे आम पब्लिकला माहिती नसेल का सेत काका? आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आहे, इंटरनेट आहे, डेटा पॅक आहे आणि ट्रम्पची चर्चा सुरू झाल्यापासून सगळे मोबाइलवर फोटो पाहतायत ते कोणाचे? डोनाल्ड ट्रम्पचे?

....................

५. कठीण समयीच ‘देशभक्ती’ची कसोटी लागते, अन्यथा इतर वेळी आरामखुर्चीवर बसून प्रत्येकजण देशभक्त बनलेला असतो : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव

सांगा पाहू राम माधव यांनी हे विधान कुठून केलं?

अ. सियाचेनमधून, ब. कारगिल-द्रासमधून, क. नोटा बदलून घेण्यासाठी लावलेल्या रांगेतून आणि ड. आरामखुर्चीत बसून

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......