टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अयोध्येतील भावी राम मंदिराची प्रतिकृती
  • Mon , 25 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi राम मंदिर Ram Mandir विराट कोहली Virat Kohli

१. मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यांना भगवा रंग देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. भगवा रंग हा धैर्य आणि शौर्याचा रंग आहे, त्याग आणि धाडसाचा रंग आहे. त्यामुळे हा रंग दिला तर महिलांचे डबे लगेच लक्षात येतील. तसंच या डब्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांचं मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल, असं रेल्वेच्या प्रस्तावात म्हटलं आहे. या महिलांवर छेडछाडीचा प्रसंग आलाच तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी हा रंग महिलांना आणि मुलींना प्रेरणाही देईल, असंही रेल्वेनं प्रस्तावात म्हटलं आहे.

जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी सीमेवरच्या तारांच्या कुंपणांना हा रंग देता येईल का? तसंच लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्व स्त्रियांना याच रंगाचे कपडे घालण्याची सक्ती करता आली तर? पुरुषांच्या डब्यातही गर्दीच्या वेळी अतोनात मनोधैर्याची गरज पडत असते, त्यांच्यावर अन्याय का? भगवे कपडे घातलेल्या भोंदू साधूंच्या अत्याचारांपासून रक्षण करण्यासाठी महिलांनी हेच कपडे परिधान करायला हवं होतं खरं तर. आता रेल्वेचे हे अतिहुशार अधिकारी हिरव्या सिग्नलचा रंग भगवा कधी करतात ते पाहूयात.

.............................................................................................................................................

२. गतवर्षात हॉटेलात जेवायला गेलेल्या भारतीयांनी ‘चिकन बिर्याणी’ला सर्वाधिक पसंती दिली आहे. ‘स्विगी फूड सर्व्हिस’नं केलेल्या सर्वेक्षणात चिकन बिर्याणी पाठोपाठ ‘मसाला डोसा’, ‘बटर नान’, ‘तंदुरी रोटी’ आणि ‘पनीर बटर मसाला’ यांचा नंबर लागतो. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला. दाल मखनी, चिकन फ्राईड राईस हे पदार्थही बऱ्याच वेळा मागवले जातात, असं त्यातून स्पष्ट झालं आहे.

सत्ताधारी विचारवर्तुळातल्या संस्कारी मंडळींनी इतके प्रयत्न करूनही हा देश मांसाहाराला प्राधान्य देतो आणि त्यातही बिर्याणी या वेदांमध्ये उल्लेख नसलेल्या, आपल्या पौराणिक महापुरुषांनी न चाखलेल्या इस्लामी परंपरेतल्या पदार्थाचं सर्वाधिक सेवन करतो, ही गोष्ट खरं तर काही कट्टरवादी संघटनांच्या काही सदस्यांना आत्महत्या करण्याची प्रेरणा देण्यासारखीच आहे. सनी लिओनीनं संधी हिरावून घेतली, तर काय झालं; बिर्याणीनं ती पुन्हा दिली आहे, सोडू नका, लवकर जीव द्या.

​​​​​​​.............................................................................................................................................

३. देशात सगळीकडेच थंडीची लाट पसरली असताना अयोध्येतील राम मंदिरात प्रशासनानं रामाला थंडी वाजू नये म्हणून हिटर बसवावा आणि रामाच्या मूर्तीला स्वेटर घालावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले, अयोध्येतील राममंदिर हे करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे रामाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. जो प्रभू राम आपल्या खाण्या-पिण्याची, राहण्याची आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेतो त्याची आपण काळजी घ्यायला हवी.

लहानपणी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राखणाऱ्या सगळ्या लसी ज्यांना वेळेवर दिल्या जात नाहीत, अशा बालकांचं प्रमाण लोकसंख्येत किती आहे, हे यावरून कळतं. बाकी शर्मा छाप लोकांचा उदरनिर्वाह प्रभू रामचंद्र चालवतात, याबद्दल काहीच शंका नाही. त्यांची सगळी दुकानदारीच या एका नावावर चालतं. त्यांनी वर्गणी काढायला काहीच हरकत नाही.

​​​​​​​.............................................................................................................................................

४. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘गुजरात’ हा शब्द उच्चारल्यानंतर भावुक झाले. मोदी म्हणाले, तीन वर्षे सत्तेत राहिल्यांनतर देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये इतर कुठल्याच पक्षानं इतकी चांगली कामगिरी केली नाही. बैठकीत मार्गदर्शन करताना मोदींनी खासदार आणि कार्यकर्त्यांना आत्मसंतुष्टीपासून वाचण्याचा सल्ला दिला.

गाडीखाली कुत्रा सापडला तर जराही चित्त विचलित न होणारे छप्पन्न इंची छातीचे प्रधानसेवक गुजरातच्या उल्लेखानंही इतके हळवे होतात, म्हणून हल्ली कोणी त्यांच्यापुढे ‘गोध्रा’ असा शब्दही काढत नाही, ढसढसा रडूच लागतील बहुतेक. असा लोभस हळवेपणा हा पराक्रमी पुरुषाचा एक वेगळाच अलंकार म्हणायला हवा.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. अभिनेत्री अनुष्का शर्माशी इटलीत लग्न करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या देशभक्तीवर मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी शंका उपस्थित केली आहे. परदेशात लग्न करणं ही देशभक्ती नाही, असं वक्तव्य या आमदारानं केलं आहे. कोहली करोडो लोकांचा आवडता क्रिकेटपटू आहे. जागतिक स्तरावर तो भारताचं प्रतिनिधीत्व करतो. त्यानं भारतात विवाहाचं आयोजन का केलं नाही? ही राष्ट्रभक्ती नाही. या भूमीवर भगवान राम यांचा विवाह झाला. भगवान श्रीकृष्ण यांचाही विवाह इथंच झाला. मात्र या माणसानं इटलीला जाऊन विवाह केला, अशा शब्दांत पन्नालाल यांनी नाराजी व्यक्त केली.

आपल्या देशात मेंदूच्या पोलिओची एक स्वतंत्र लस विकसित करायला हवी, हे आता कोणाही विज्ञान संशोधकाच्या लक्षात यायला हरकत नाही. लगेहाथ पन्नालाल यांनी हनीमूनला परदेशात जाणाऱ्यांच्या देशभक्तीविषयीही मार्गदर्शन करायला हवं होतं. शिवाय, तो देशी कामसूत्रानुसारच साजरा होतोय की नाही, यावर काही देखरेख ठेवणारी यंत्रणाही खरं तर निर्माण व्हायला हवी. पन्नालाल यांच्यासारखे देशभक्त प्रभू रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णाच्या काळात जन्मले असते, तर कदाचित त्यांनीही लग्नाचं डेस्टिनेशन बदलण्याचा विचार केला असता.

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......