काँग्रेस तरुण नेतृत्वाला का घाबरते आहे?
पडघम - देशकारण
कलीम अजीम
  • राहुल गांधी आणि शहजाद पुनावाला
  • Sat , 02 December 2017
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi शहजाद पुनावाला Shehzad Poonawalla

राहुल गांधींच्या नियोजित पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला विरोध करून शहजाद पुनावाला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निशान्यावर आले आहेत. पण काँग्रेसमधला एक गट असाही आहे, जो शहजाद यांचं समर्थन करताना दिसतो आहे. काँग्रेसच्या वंशवादावर टीका केल्यानं ट्विटरवर शहजाद यांचे फॉलोअर्स वाढले आहेत. देशभरातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी उघडपणे शहजाद यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. गांधी घराण्याला प्रश्न पक्षनेतृत्वाबद्दल जाहीरपणे जाब विचारणारे शहजाद कदाचित इतक्या कमी अनुभवाचे पहिलेच नेते असावेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे.

शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर शंका उपस्थित करत एका पत्रातून काही प्रश्न पार्टी हायकमांडला विचारले. हे पत्र बुधवारी सार्वजनिक झालं आणि खासगी चर्चा सार्वजनिक झाली. या पत्रामुळे शहजाद चांगलेच चर्चेत आले. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहजाद म्हणतात, ‘राहुल गांधी ‘इलेक्शन’ नव्हे तर ‘सिलेक्शन’ पद्धतीनं पक्ष अध्यक्ष होत आहेत.’ शहजाद या निवड पद्धतीला ‘धोकेबाजी’ म्हणतात. त्यांनी दावा केला की, ‘पार्टी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मत देणाऱ्या प्रतिनिधींची नावं निश्चित करण्यात आली आहेत. प्रामाणिकपणाच्या आधारावर त्यांची नावं यादीत सामाविष्ट करण्यात आली आहेत. एका व्यक्तीच्या निवडीसाठी निवडणुकीचा देखावा केला जात आहे.’ 

शहजाद पुनावाला पुढे म्हणतात, ‘मी गेल्या काही वर्षांपासून घराणेशाहीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधींची वेळ मागत होतो. पण वेळ मिळत नसल्यानं मी पत्रातून माझ्या भावना व्यक्त केल्या. हे पत्र पूर्णपणे खाजगी होतं. ते सार्वजनिक करून पक्षातील काही लोकांनाच हा वाद चव्हाट्यावर आणायचा होता.’

शहजाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहेत. पण महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांना ‘काँग्रेसमन’ मानत नाहीत. चव्हाण म्हणतात, ‘पुनावाला यांनी कुठल्याच निवडणुकीत सहभाग घेतला नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात भाग घेतला नाही. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी गांधी कुटुंबावर ते चिखलफेक करत आहेत. पक्षविरोधात भाष्य केल्यानं त्यांच्यावर करावाई करू.’

अशोक चव्हाण यांच्या आरोपाला शहजाद यांनी काँग्रेसनं दिलेलं निवडीचं पत्र जाहीर करून उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे हे पत्र चव्हाण यांचीच सही असलेलं आहे. चव्हाण एका अर्थानं खरं बोलत असावेत की, पक्षाच्या कुठल्याच निवडणूक कार्यक्रमात सहभाग नसताना अधिकारवाणीनं पक्षाच्या धोरणावर टीका करणं योग्य नाही. पण त्यांनी शहजाद यांच्या वक्तव्याला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हटलं आहे. जे चुकीचं आहे. कारण मॉब लिचिंगपासून ते अलिकडच्या ‘पद्मावती’ वादापर्यंत शहजाद पक्षाकडून बोलत आले आहेत. आज काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांपेक्षा सर्वाधिक फुटेज शहजाद यांना मिळतं, हे नाकारता येत नाही. काँग्रेसचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून पुनावाला अलिकडे सतत प्रसारमाध्यमांमध्ये बाजू मांडत असतात. मग ते ‘पब्लिसिटी स्टंट’ का करतील?  

राहुल गांधींनी १२ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील कॅनिफोर्निया विद्यापीठात म्हटलं होतं की, ‘राजकारण असो वा, उद्योग क्षेत्र, भारताच्या सर्वच क्षेत्रात घराणेशाही आहे. भारत देश घराणेशाहीवरच चालतो.’ दुसऱ्या अर्थानं त्यांनी काँग्रेसमधील गांधी घराण्याच्या वर्चस्वाचं समर्थन केलं होतं. याच धोरणाला शहजाद यांनी प्रश्न विचारला आहे.

खरं पाहता आज प्रत्येक राजकीय पक्षात घराणेशाहीनं पाय रोवले आहेत. त्यामुळे मोठ्या नेतृत्वक्षमता असणारे अनेक तरुण कार्यकर्ते खुर्च्या मांडणे आणि शतरंज्या उचलण्याच्या कामाला जुंपले गेले आहेत. वर्षानुवर्षं वाट पाहूनही नेत्यांच्या अपत्यांना संधी मिळते, अशी परिस्थिती भारतीय राजकारणात आहे.

मुंबईत नुकताच रामदास आठवलेंच्या लहान मुलाचा फोटो एका बॅनरवर छापण्यात आला होता. यावेळी अनेकांनी ‘कवि आठवलेंचा राजकीय वारसदार’ म्हणून त्या बॅनर्सची खिल्ली उडवली. शहजाद दावा करतात- काँग्रेसमध्ये तब्बल ४८ टक्के जागा या नेत्यांच्या अपत्यांना वाटण्यात आल्या आहेत. ज्यांना राजकीय ‘गॉडफादर’ नाही अशांनी काय करावं, असा सवालही ते करतात. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या सून व सध्याच्या भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी काँग्रेसला ‘गांधी घराण्याची खासगी संपत्ती’ म्हटलं होतं.

एकीकडे वरुण गांधी काँग्रेसमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू आहे. या बातमीमुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते हवालदिल झाले आहेत. scroll.in या वेबसाईटवरील एका लेखात वरुण गांधीच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांची गोची होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही काँग्रेसमध्ये संजय गांधी समर्थक मोठ्या प्रमाणात आहे. वरुण गांधी काँग्रेसमध्ये संजय गांधींची जागा घेऊ शकतात, अशी शक्यता या लेखात वर्तवण्यात आली आहे. अशा वेळी शहजाद यांनी गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कदाचित या धोक्यामुळेच शहजाद यांना काँग्रेस पक्षातून छुपा पाठिंबा वाढत असल्याचं सांगण्यात येतंय.

यापूर्वीही अनेकांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेकांना बाहेरचा रस्ताही दाखवला गेला आहे. २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. याच कारण एकच होतं की, त्यांनी पक्षातील घराणेशाहीचा विरोध केला होता. २००९ सालीदेखील निवडणुकीच्या वेळी अशाच पद्धतीनं घराणेशाहीचा विरोध केल्याच्या कारणामुळे अनेकांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. शहजाद प्रकरणावर अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांची उत्तरं पाहता वरील विधान कुठल्या पार्श्वभूमीवर वापरलं आहे, हे स्पष्ट होतं.

शहजाद प्रकरणावरून काँग्रेसश्रेष्ठींना पक्षात तरुण नेतृत्व अमान्य असल्याचं लक्षात येतं. आज काँग्रसमध्ये अनेक तरुण प्रभावशाली चेहरे आहेत. पण काँग्रेसनं नेहमी पारंपरिक पद्धतीप्रमाणे ठेवणीतले चेहरे वापरले आहेत. २०१४ साली भाजपकडून मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. भाजपनं मोदींना ब्रँण्ड म्हणून वापरलं आणि मोठा विजय पदरात पाडून घेतला. पण काँग्रेसकडे त्यावेळी कुठलाच चेहरा किमान घोषित करण्यापुरताही नव्हता. काँग्रेसकडे डॅशिंग नेतृत्व नाही अशातला भाग नाही, पण हितसंबंध व गटागटांत काँग्रेस विभागली गेली आहे. यामुळे तरुण व चेहऱ्यांना संधी डावलली जाते हे सर्वज्ञात आहे. काँग्रसमध्ये शशी थरुर, जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, मनिष तिवारी, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट, मिलिंद देवरा यांसारखे अनेक नेते आहेत. यापैकी कुणाला तरी काँग्रेसचं अध्यक्षपद देता आलं असतं.  

२००४ साली सोनिया गांधींनी संधी असतानाही पंतप्रधान पदाचा त्याग केला होता. या निर्णयामुळे त्या वेगळ्या उंचीवर गेल्या. कदाचित काँग्रेसश्रेष्ठींना राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राज्याभिषेक घालायचा असेल, पण पुढे काय? पक्षातील वरिष्ठ मंडळींना अध्यक्षपद देऊन त्यांचा ज्येष्ठत्वाचा मान राखता आला असता. राहुल गांधींनाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला असता.  

काँग्रेसमध्ये तरुण चेहऱ्यांना कृती कार्यक्रम नसल्याची खंत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. तसंच राजकीय कृती म्हणून पुढे आलेल्य तरुणांना पाठबळ देण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना कमी लेखन्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील काही तरुणांनी पाठ्यपुस्तक मंडळ व भाजपविरोधात मोर्चा उघडला होता. तेव्हा या तरुण कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याऐवजी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. ही वेळ भाजपविरोधात मूठ आवळण्याची होती, पण काँग्रेसनं संधी गमावत त्या तरुण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं.

मे महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात अपशब्द वापरले होते. त्यावेळी दानवेंच्या घराबाहेर काही तरुण किसानपुत्रांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळीही काँग्रेसनं त्या तरुणांना कुठलंच सहकार्य केलं नाही. 

भाजप सरकारच्या धोरणांचे विरोधक म्हणून तरुणांचा एक मोठा गट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काँग्रेसचं काम करत आहे. या तरुणांना योग्य मार्गदर्शन व दिशेची गरज आहे, पण काँग्रेसचे मस्तवाल नेते अजूनही ‘व्हेकेशन मूड’मधून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे या तरुण पिढीत राजकीय फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारच्या धोरणावर टीका केल्यामुळे अनेक तरुणांना भाजपच्या सायबर सेलकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या घटनेनं तरुण धास्तावले होते. पण कुठलाच काँग्रेसचा पदाधिकारी या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नव्हता. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तरुणांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता.   

आजची तरुण पिढी विचारी झाली आहे, ती राजकीय नेतृत्व स्वीकारताना अनेक गोष्टींची काळजी घेत आहे. पण अनेक वेळा शंकाचं समाधान होत नसल्यानं ही तरुण पिढी पुरोगामी संघटनेच्या रस्त्यावरील कृती कार्यक्रमाच्या आहारी जाते. इथं तरुणांची क्रयशक्ती वेगळ्या कामासाठी वापरली जाते, पण विधायक व ठोस काही हाताला लागत नाही. परिणामी ही तरुण पिढी राजकीय नेतृत्वाच्या शोधात आहे, पण इथंही ठोस काही पदरी पडत नसल्यानं ही पिढी हवालदिल झाली आहे (अशाच तरुण पिढीच्या क्रयशक्तीचा २०१३-१४ साली भाजपनं वापर करून सत्ता मिळवली होती.).

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,

देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

दुसरीकडे नेतृत्वाची चुणूक असताना केवळ घराणेशाहीमुळे अशा तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. या तरुण कार्यकर्त्यांकडे स्वत:ची अशी एक अभिव्यक्तीची भाषा आहे. आज कुठल्याच काँग्रेस नेत्याकडे ‘मास अपील’ असणारी व ‘आम आदमी’ला समजणारी संवादी भाषा नाही. मनमोहन सिंग १० वर्षं पंतप्रधान होते. या काळात ते बोटावर मोजण्याइतके वेळा हिंदीत बोलले, कारण त्यांना हिंदीत अभिव्यक्त होता येत नाही. हेच इतर काँग्रेसी नेत्यांबाबत आहे. पण या तरुण चेहऱ्यांकडे ‘मास अपील’ करणारी भाषा आहे. त्यामुळे ते सहज सामान्य लोकांपर्यंत पोहचून त्यांची भाषा बोलू शकतात. याचा पक्षाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

शहजाद यांनी राहुल गांधींच्या एका वाक्याकडे लक्ष वेधलं आहे, पण हा मुद्दा इतर चर्चेत दुर्लक्षिला गेला आहे. शहजाद म्हणतात, ‘२०१३ साली ज्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी एक वायदा केला होता की, एनएसयूआयमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी व अधिकार देऊ. यावर राहुल गांधींनी अजून काहीच पाऊले उचलली नाहीत.’ शहजाद यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. जोपर्यंत तरुण कार्यकर्त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन व दिशा मिळणार नाही, तोपर्यंत काँग्रेसला ठेवणीतले चेहरे बाहेर काढावे लागतील. कारण तोपर्यंत तरुण चेहरे काँग्रेसपासून इतर ठिकाणी निघून गेले असतील.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. 

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......