टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, राहुल गांधी, वरुण गांधी, पद्मावती आणि संजय लीला भन्साळी
  • Thu , 30 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi वरुण गांधी Varun Gandhi पद्मावती Padmavati संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali

१. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत सोमनाथ मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीनं मंदिराच्या अभ्यागत वहीत राहुल यांची ‘अहिंदू’ म्हणून नोंद केली. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक बिगर हिंदू व्यक्तीला अभ्यागत वहीत त्याचं नाव नोंदवावं लागतं, असा नियम आहे. आज कुणीतरी या वहीत राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचं नाव नोंदवल्याचं आढळून आलं. मंदिर प्रशासनाला याच्याशी काहीही देणंघेणं नसल्याचं लाहेरी यांनी स्पष्ट केलं. परंपरेनुसार सोमनाथ मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. परंतु बिगर हिंदूंना मंदिरात यायचं झाल्यास मंदिर प्रशासनाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. राहुल गांधी यांची शंकरावर खूप श्रद्धा आहे, त्यांचा सत्यावरही तेवढाच विश्वास आहे. अडचणीच्या मुद्यांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भाजपनं हे कुंभाड रचलं, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते दीपेंदर सिंह हुडा यांनी केला. राहुल हे केवळ हिंदू नसून ते 'जानवेधारी हिंदू' आहेत, असं काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

ही काँग्रेसच्या आजवरच्या सोयीस्कर सेक्युलरवादाची गोमटी फळं आहेत. निवडणुकांच्या काळात शंकराचे भक्त बना, सोमनाथला जा, जानवं काढून दाखवा, गंगेत डुबक्या मारा, इफ्तारी टोप्या घाला, यांसारख्या धार्मिक दाखवेबाजीच्या पलीकडे जाणारा नेता या देशाला काँग्रेसही देऊ शकत नाही, हे पुन्हा स्पष्ट होत चाललं आहे. आता राहुल कामधाम सोडून एखादी संध्याकाळ गंगेच्या आरतीत कधी खर्च करतात, ते पाहायचं.

.............................................................................................................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या जीएसटीच्या संकल्पनेची खिल्ली उडवली. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टुपिड थॉट’ असल्याचं त्यांनी म्हटलं. अशा प्रकारे जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के इतका कर आकारला गेला असता. त्याच वेळी सिगारेट आणि मद्यावरही १८ टक्के कर लागला असता. त्यामुळे सिगारेट आणि मद्य स्वस्त झालं असतं. जीवनावश्यक वस्तू आणि मद्यावर एकच कर लागणं, हे तर्काला धरून आहे का, असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटलं. त्यांनी आतापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे. मला जनतेला इतक्या वर्षांत त्यांच्याकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करायचा आहे, असं मोदींनी सांगितलं.

बाकी काही असो; मोदींच्या धारिष्ट्याला मानलं पाहिजे. रेटून बोलण्यात ते कुणाला हार जाणार नाहीत. नोटबंदीसारख्या थोर आयडिया राबवून अदभुत अर्थशास्त्रज्ञान दाखवल्यानंतर तेवढ्याच घाईनं जीएसटी लागू करायचा, मग त्यात दुरुस्त्या करत एकेक पावलानं माघार घेत जायचं, इतकं सगळं झाल्यानंतर जीएसटीच्या मूळ संकल्पनेलाच ‘स्टुपिड’ म्हणायला ‘डेअरिंग’ लागतं बॉस!

.............................................................................................................................................

३. राहुल गांधी यांचे चुलत बंधू आणि मनेका गांधी यांचे चिरंजीव, भाजपचे खासदार वरुण गांधी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण काँग्रेसमध्ये येतील, असं मानलं जातं. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपचे खासदार असलेल्या वरुण गांधींनी याबद्दल अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील आणि हे २०१९ च्या निवडणुकीआधी घडेल, अशी राजधानीत चर्चा आहे. ३५ वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून यात प्रियंका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असं सांगितलं जातं.

चला चला, आता संजय गांधी यांचं मूळ मुस्लिम नाव काय होतं, परदेशात संजीव गांधी या नावानं वावरत असताना त्यांच्याकडून घडलेल्या कोणत्या चुकांमुळे संजय गांधी नाव धारण करायला लागलं, त्यांनी आणीबाणीत कशी खलनायकी भूमिका वठवली, हे सगळं व्हॉट्सअॅपग्यान आता फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मलला येण्यासाठी ठेवायला हवं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. ‘पद्मावती’ या चित्रपटातील कलाकारांच्या, दिग्दर्शकाच्या विरोधात फतवे निघत असताना या चित्रपटाचे निर्माते असलेल्या अंबानींच्या कंपनीविरोधात आंदोलन का होत नाही, असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित झाला नसतानाही वाद निर्माण करणं, हे एक राजकीय कारस्थान असून, यामुळे देशातील वातावरणावर परिणाम होत असल्याचं सुभाषिनी अली यांनी म्हटलं. गुजरातमध्ये राजपूत समुदायाची ‘वोट बँक’ आहे. या वादामुळे मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यात येत असल्याचं त्या म्हणाल्या. गुजरात निवडणुकीपर्यंत हा वाद सुरू राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

गोहत्याप्रतिबंधाचा आणि बीफबंदीचा वाद शिगेला पोहोचला असताना, त्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला सत्ताधारी आमदार मांसनिर्यातदार कंपनी चालवत होता. अजूनही एकाही शाकाहारसमर्थक गोगुंडानं या निर्यातदार कंपन्या बंद करण्याची मागणी केलेली नाही; त्यांचेच भाऊबंद निर्यातीत आहेत, तिथं सगळ्यांना पोसणाऱ्या शेठकडे कोणी बोट तरी रोखून दाखवेल का? आजकाल सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा सिनेमाभोवतीच्या वादाचं स्क्रिप्ट लिहिणाऱ्याला अधिक पैसे मिळत असतील.

.............................................................................................................................................

५. ‘पद्मावती’ चित्रपटाला होत असलेल्या विरोधाची झळ चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत पोहोचली असून अलाउद्दीन खिलजीनं राणी पद्मिनीला पाहिल्याचा उल्लेख असलेला येथील शिलालेख झाकून टाकण्यात आला आहे. किल्ल्यावरील पद्मिनी महालाबाहेर हा शिलालेख असून राजपूत करणी सेनेनं दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारतीय पुरातत्व विभागानं हा शिलालेख लावला असून पद्मिनी महालात अलाउद्दीन खिलजीनं राणी पद्मिनीला पाहिलं होतं, असा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे. करणी सेनेच्या सदस्यांनी या शिलालेखावर आक्षेप घेतला असून हा शिलालेख तत्काळ हटवण्यात यावा अशीही मागणी केली आहे.

झाकताय कसला, तोडून टाका तो शिलालेख. इतिहासात कसलं आलंय अधिकृत आणि अनधिकृत, इतिहासात कसलं खरं-खोटं करायचं? जो जिंकतो, तोच इतिहास लिहितो. आता कोण कुठली फुटकळ करणी सेना जिंकली आहे ना, मग त्यांच्यातल्या एखाद्याला विचारा आणि झरझर उतरवून काढा नवा इतिहास. आहे काय त्यात?

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.