हिटलर आणि मुसोलिनीचा राष्ट्रवाद (पूर्वार्ध)
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
किशोर बेडकीहाळ
  • बेनिटो मुसोलिनी
  • Tue , 28 November 2017
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बेनिटो मुसोलिनी Benito Mussolini अडॉल्फ हिटलर Adolf Hitler राष्ट्र राष्ट्रवाद

मुसोलिनी आणि हिटलर या हुकूमशहांबद्दल बहुतेक सर्वजण ऐकून असतात. पण त्यांच्याविषयी अनेकांना सविस्तर  माहिती नसते. या हुकूमशहांना जाणून घेणं आजच्या काळात नितांत निकडीचं झालं आहे. त्यामुळे या प्रदीर्घ लेखाचं हे पुनर्प्रकाशन. या लेखाचा उत्तरार्ध उद्याच्या अंकात प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

मुसोलिनी आणि हिटलर हे दोन हुकूमशहा होऊन गेलेले आहेत. त्याच्यावर चित्रपटही आहे ‘द ग्रेट डिक्टेटर’ नावाचा. जगाचा थरकाप उडवून देणारी ही दोन व्यक्तिमत्त्वं होती. सबंध मानवी संस्कृतीचा नाश त्यांच्या हातून होणार अशा एका टप्प्यावर त्यांनी जग आणून ठेवलं होतं. अशा दोन हुकूमशहांच्या राष्ट्रवादविषयक भूमिका, विचार काय होते यासंबंधात पाहायचे आहे. सुरुवात मी मुसोलिनीपासून करणार आहे.

राष्ट्र ही संकल्पना तशी तीन-चारशे वर्षांची आहे, ती अनादि व अनंतही नाही आहे. भारतामध्ये ज्या प्रकारचा राष्ट्रवाद आज मानला जातो आणि एकूणच सर्वसामान्य भारतीय माणसांच्या मनात राष्ट्र नावाच्या गोष्टीविषयी गैरसमजूत आहे की, राष्ट्र ही कल्पना खूप प्राचीन आहे, अनंत काळापासून आहे आणि अनंत काळ टिकून राहणार आहे. या गैरसमजुतीतून बाहेर आल्याखेरीज आपण राष्ट्रवादाचा विवेकी विचार करू शकणार नाही. मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये तीन-चारशे वर्षांचा कालखंड नगण्य. साधारणत: युरोपातील प्रबोधनपर्व सुरू झालं आणि जसजसं वसाहतीकरण व्हायला लागलं, इंग्लंड, जर्मनी असेल, फ्रान्स असेल यांनी ज्या वसाहती निर्माण केल्या त्या वसाहतींमधून (उदा. भारत) हळूहळू राष्ट्र नावाच्या संकल्पनेचं बीजारोपण झालं. भारताचा इतिहास पाहिला तरीसुद्धा ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात आपण कोण आहोत? याचा शोध भारतीयांनी घ्यायला सुरुवात केल्यानंतर आपण एक राष्ट्र आहोत का, कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहोत, कोणत्या प्रकारचं राष्ट्र असलं पाहिजे या सगळ्याचं विचारमंथन १९व्या शतकात आपल्याकडे सुरू झालं आणि ते अजूनही चालू आहे. मधल्या काळात आपण स्वतंत्र झालो, स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आलो, राज्यसंस्था निर्माण झाली तरीही पूर्ण अर्थानं आपण राष्ट्र झालेलो नाही. कारण बऱ्याचदा आपल्या मनामध्ये राष्ट्र ही एक परिपूर्ण कल्पना आहे असं आपण समजून चालत आलो आहोत.

भारत हे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अजूनही झगडत असलेलं राष्ट्र आहे असं मानलं पाहिजे. कारण आपण अजूनही परिपूर्ण राष्ट्र नाही. जगभर राष्ट्रांचे किती प्रकार अस्तित्वात आले? आपल्या अनुभवाप्रमाणे शेजारी राष्ट्रांकडे नजर टाकली तर तिथे धर्मावर आधारलेली राष्ट्रं निर्माण झाली. पाकिस्तान व बांगलादेशामध्येच नव्हे तर सबंध अरबस्तानात धर्मावर आधारलेली राष्ट्रं आहेत. पण धर्मावर आधारलेलं एकच एक राष्ट्र नाही. इस्लाम धर्माची अनेक राष्ट्रं आहेत, दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्म घेतला तर सबंध युरोपभर ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य आहे. यांसारखी राष्ट्र ही ख्रिश्चन धर्माची आहेत. ख्रिश्चन धर्माची अनेक राष्ट्रं निर्माण झालेली आहेत. काही राष्ट्रं धर्माच्या आधारावर निर्माण झाली, काही राष्ट्रं धर्माचा आधार न घेता निर्माण झाली. काही ठिकाणी वंशाच्या आधारे राष्ट्रं निर्माण करण्याचे प्रयत्न चालू झाले, ज्यात जर्मनी, इटली यांची नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील.

भाषेच्या आधारावरही अनेक राष्ट्रं निर्माण झाली. युरोपातील बहुतेक राष्ट्रं पाहिलीत तर ती भाषेच्या आधारावर आहेत. जर्मन भाषा बोलणारे जर्मन, फ्रेंच भाषा बोलणारे फ्रेंच, इटालियन भाषा बोलणारे इटालियन अशी प्राधान्याने भाषेच्या आधारावर उभी राहिलेली राष्ट्रं आहेत. भाषा, धर्म आणि वंश या तीन आधारांवर उभी राहिलेली राष्ट्रं आपल्याला दिसतील.

दुसऱ्या बाजूला याचा कुठलाही आधार घेतलेला नाही तरीही उभं राहिलेलं राष्ट्र आहे अशी भारताची स्थिती आहे. भरपूर भाषा आहेत भारतात, (घटनेत नोंदवलेल्या अधिकृत भाषा चोवीस आहेत) अनेक धर्म, जातिव्यवस्था इ. आहे, बारीक बारीक पंथ-उपपंथ भारतात अस्तित्वात आहेत तरीसुद्धा भारतीय राष्ट्र म्हणून घडवत असताना या मुद्द्यांच्या आधारावर आपण राष्ट्र उभं केलेलं नाही. धर्म-भाषा-वंश याच्या जोडीला या तीन गोष्टी टाळूनसुद्धा राष्ट्रनिर्मिती होते हे भारताच्या उदाहरणाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून हिटलर वा मुसोलिनीच्या राष्ट्रवादाची तुलना कशाशी करायची तर ती भारतासारख्या देशाच्या सर्वसमावेशक अशा राष्ट्रवादाशी केली पाहिजे.

मुसोलिनीचा राष्ट्रवाद

आता मुसोलिनीकडे वळू. मुसोलिनीचा जन्म १९ जुलै १८८३चा. १९वे शतक संपत आलेलं आहे. शेवटची १७ वर्षे बाकी आहेत. १९व्या शतकात जगभर प्राधान्याने कोणत्या विचाराला प्रतिष्ठा मिळाली असं आपण पाहिलं तर व्यक्तिवाद, राष्ट्रवाद, उदारमतवाद व समाजवादाचा विचार या विचारांना १९व्या शतकात जगभर मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठा मिळाली. या सगळ्या विचारमंथनाचा गाभा आहे तो १९व्या शतकात आहे. इंग्लंडसारख्या देशाचं जगावर प्रभुत्व होतं ते १९व्या शतकात. व्यक्तिवाद, समाजवाद राष्ट्रवाद, उदारमतवाद याचा प्रभाव १९व्या शतकात जास्त दिसतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण मुसोलिनीच्या भाषणांमध्ये, कृत्यामध्ये आणि व्यवहारामध्ये याचा संदर्भ सतत आपल्याला दिसतो.

मुसोलिनीचे वडील समाजवादी विचारांचे होते. आणि तत्कालीन समाजवादी पक्षासाठी ते कामही करत होते. मुसोलिनी १९०२ला स्वित्झर्लंडला गेला तिथून तो परत आला आणि १९१४ला पहिलं महायुद्ध सुरू झालं. त्या महायुद्धात इटालीनं जावं की जाऊ नये, सहभागी व्हावं की होऊ नये असा प्रश्न तिथल्या राज्यकर्त्यांपुढे होता. कारण त्या काळातील इटली हे राजकीयदृष्ट्या अतिशय कमकुवत आहे. राजा आहे, पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळ आहे. लोकशाही रचना असल्याने संसद आहे त्या काळातली. त्या काळात संसदेला तिथे ‘ग्रेट कौन्सिल’ असा शब्द वापरला जात होता. युरोपला हजार वर्षांची युद्धाची परंपरा असल्यामुळे इटाली हा देश १९व्या शतकामध्ये व २०व्या शतकाच्या पूर्वार्धात जवळपास आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला, रसातळाला लागलेला आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत वाटणारा असा देश होता. तेव्हा पहिल्या महायुद्धात जावं की जाऊ नये याच्याबद्दल त्यावेळच्या समाजवादी पक्षामध्ये दोन प्रवाह होते.

एक प्रवाह तटस्थ राहावं असा होता. युद्ध इटलीला झेपणार नाही, तिचं कंबरडं कायमचं मोडलं जाईल असं मानणारा एक प्रवाह होता. आणि जोखीम घेतली पाहिजे, युद्ध हा शांततेचा खरा पर्याय असतो अशी भूमिका घेतलेला मुसोलिनी हा समाजवादी पक्षाच्या दुसर्‍या बाजूने होता. अंतिमत: समाजवादी पक्षाचा जो निर्णय झाला तो बहुमताने युद्धामध्ये जायचं नाही असा झाला आणि म्हणून शेवटी मुसोलिनीला पक्षातून हाकललं गेलं. कारण त्याची भूमिका पक्षाच्या चौकटीला धरून नव्हती.

हाकललं गेल्यानंतर त्याने १९१९ साली फॅसिस्ट पक्ष नावाचा एक पक्ष निर्माण केला. आज फॅसिस्ट हा शब्द जो ऐकतो तो तिथून आला. त्याच्या पक्षाचं नावच फॅसिस्ट पक्ष असं होतं. सशस्त्र आंदोलनं, हिंसक कारवाया, शत्रूचा नायनाट करणं, नाश करणं म्हणजे ‘फॅसिस्ट’ असणं या प्रकारची भूमिका घेऊन त्याने तीन लाख विद्यार्थ्यांची संघटना उभी केली. त्या संघटनेचं नाव ‘ब्लॅक शर्ट्स’ असं होतं. ही युथ ऑर्गनायझेशन मुसोलिनीला इटलीमध्ये कोणत्याही प्रक्रियेत स्थान नसताना, समाजवादी पक्षातून हाकलला गेला असताना, त्यावेळी राजकीय पुढारी म्हणून त्याला कोणतंही नाव नसताना त्याच्या पाठीमागे तीन लाख युवकांची प्रचंड संघटना निर्माण केली आणि रस्त्यावर त्याने दंगे घडवून आणले.

त्याच वेळी अशी घटना घडली की, १९१८ला महायुद्ध संपलं होतं, इटलीचा दारुण पराभव झालेला होता. अर्थव्यवस्था ढासळलेली होती. एखाद्या वेळी युद्धामध्ये एखाद्या देशाचा पराभव होतो त्यावेळी स्वाभाविकपणे अर्थव्यवस्था दिवाळं निघण्यापर्यंत आलेली असते. कारण प्रमुख सगळे प्राधान्यक्रम युद्धाकडे वळलेले असतात, युद्धाला पूरक असण्याकडे अर्थव्यवस्थेचा ओघ वळवण्यात येतो. त्यामुळे बेकारी प्रचंड आहे. तरुणवर्ग असंतुष्ट आहे. या असंतुष्टतेचा फायदा त्याने घेतला आणि युवकांना संघटित केलं आणि तिथल्या समाजावर दहशत निर्माण होईल अशा प्रकारची संघटना त्यातून निर्माण केली.

१९१९ साली त्याने फॅसिस्ट पक्ष काढल्यानंतर हा पक्ष त्याच्या राजकीय कामाचा प्राधान्याने आधार आपल्याला दिसतो. दरम्यान इटालीतील जी राजकीय स्थिती होती १९१९ नंतरच्या काळात ती खूप खालावलेली आहे. खालावलेली या अर्थाने की राज्य स्थिर नाही आहे आणि त्यावेळचे जे काही डेमोक्रॅट्स इटलीमध्ये सत्तेवर होते त्यांना सत्ता सांभाळता येत नव्हती. म्हणून त्यावेळचा इटलीचा राजा अस्वस्थ होता. अशा वेळी काय करावं असा सल्ला इटालीच्या पंतप्रधानाला विचारला तर तो म्हणाला, की तुम्ही आणीबाणी जाहीर करा आणि हे सगळं अमुक करा तमुक करा हे सगळे जे मोर्चे आहेत यासाठी आणीबाणी जाहीर करा.

राजाला तो सल्ला मानवला नाही कारण आधीच राज्यसत्ता अस्थिर आहे आणि अशा वेळी आणीबाणीसारखी स्थिती जाहीर केली, जनतेच्या माथी मारली तर ती पेलण्याला इटालियन जनता सिद्ध नाही असं राजाचं मत. म्हणून त्याने मुसोलिनीच्या पक्षाला निमंत्रण दिलं की, तुम्ही मंत्रिमंडळात सहभागी व्हा. आघाडीचा घटकपक्ष म्हणून. मुसोलिनीला ही संधी अनायसे मिळालेली आहे. तो कुठल्याही प्रकारच्या कर्तृत्वाने तिथे गेलेला नाही. पण तीन लाख लोकांचं सशस्त्र संघटन मागे आहे, दंगे घडवून आणण्याची क्षमता आहे म्हणून हा माणूस मंत्रिमंडळात आला तर कदाचित इटालीची राजकीय स्थिती सावरण्यासाठी उपयोग होईल म्हणून त्याला मंत्रिमंडळात घेतलं. १९२२ला मुसोलिनी पंतप्रधान झाला. १९२५ला स्वत:ला त्याने इटालीचा एकमेव हुकूमशहा नेता म्हणून जाहीर केलं. म्हणजे १९१९ ते १९२५ या सहा वर्षांच्या मंत्रिमंडळाच्या काळात त्याने सत्तेचा जो वापर केला त्याच्यामध्ये प्राधान्याने गुप्त पोलिसांचा वापर सगळ्यात जास्त केला. १९१९ला त्याने दंगे घडवून आणले. मंत्रिमंडळात आल्यावर त्याने १९२० ते १९२२ या दोन वर्षांच्या काळात दोन हजार विरोधकांचं शिरकाण केलं, त्यांना ठार मारलं आणि दुसऱ्या बाजूला रोमवर त्याने आक्रमण केलं. ऑस्ट्रियावर आक्रमणाचा त्याचा इरादा होता. असं करत करत तो १९२२ साली पंतप्रधान झाला.

इटलीत एकूण राजकीय स्थैर्य येण्यासाठी त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर, स्त्रियांचा मतदानाचा हक्क नाकारला. कोणत्याही स्त्रीला मतदानाचा अधिकार नाही. त्याने सांगितलं की, स्त्री ही फक्त गृहिणी आहे. युद्धकाळातील आवश्यक सेवा सोडल्या तर तिला घराबाहेर पडता येणार नाही. तिचं काम सैनिकांना जन्म देणं, म्हणजे तिच्या पोटी जो मुलगा निर्माण झाला तो सैनिकच होणार. त्याचं संगोपन करण्याचं तिचं मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे तिने घराबाहेर पडायचं नाही. नोकरीस जायचं नाही, शिक्षणात शिरायचं नाही.

आपल्याकडे भारतामध्ये याचं सगळं रिपोर्टिंग ज्या वर्तमानपत्राने त्या काळामध्ये केलं त्यामध्ये ’केसरी’ नावाचं वर्तमानपत्र होतं, ज्याने कौतुकाने त्याच्या वाचकांना फॅसिझमची माहिती दिली. सर्व कामगार संघटना बेकायदा ठरवल्या आहेत. हा समाजवादी विचारातून आलेला, समाजवादी वडिलांच्या पोटी जन्माला आलेला पण समाजवादाचा सगळा विचार त्याने धाब्यावर बसवला. सगळ्या कामगार संघटना बेकायदा ठरवल्या. सगळे राजकीय पक्ष बेकायदा ठरवले. फक्त फॅसिस्ट पक्ष हा इटलीमध्ये एकमेव राजकीय पक्ष असेल. त्याने कामगार कायदे व कार्यकर्ते संपवले, कामगारांच्या हत्याही झाल्या.

तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याने काय केली तर त्याने पार्लमेंटच बरखास्त केली. यापुढे इटलीमध्ये पार्लमेंटरी निवडणूक होणार नाही. पार्लमेंट म्हणजे लोकांचे प्रतिनिधी ते मुसोलिनीकडून नेमले जातील. तो निवडेल तो लोकांचा प्रतिनिधी आहे. निवडणुका नावाची गोष्ट संपली, पार्लमेंट नावाची गोष्ट संपली.

चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही संपली. मुसोलिनीने १९४३ पर्यंत हुकूमशहा म्हणून राज्य केलं. १९२२ ते १९४३ तब्बल २१ वर्षे इटली हुकूमशहाच्या टाचेखाली होता. १९१८ला पहिल्या महायुद्धात इटलीचा, जर्मनीचा सडकून पराभव झाला. त्यांच्या अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आल्या. त्यावेळेला दोस्त राष्ट्रांनी इटली आणि जर्मनीवर अत्यंत कठीण अशा अटी व्हर्सायच्या तहाद्वारे लादलेल्या होत्या. १० नोव्हेंबर १९१८ला युद्ध संपलं आणि व्हर्सायचा तह झाला त्याच्यामध्ये अनेक अटी लादल्या गेलेल्या होत्या. शस्त्रास्त्र साठा करायचा नाही, लष्करी उत्पादनं किती करायची या प्रकारच्या अटी होत्या. त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि आपली सत्ता बळकट करायची तर कशाकशाला विरोध केला पाहिजे हे त्याने सांगितलं.

त्याने असं म्हटलं, १९वं शतक हे व्यक्तिवादाचं, उदारमतवादाचं, समाजवादाचं होतं याचा अर्थ २०वं शतक त्याच तर्काने पुढं जाणारं असेल असं नाही. २०वं शतक हे सगळं मागे टाकून नवीन काहीतरी उभं करणारं असेल आणि म्हणून २०वं शतक कशाचं असेल? ते समाजवादाचं असणार नाही, उदारमतवादाचं असणार नाही, व्यक्तिवादाचं नाही तर ते हुकूमशाहीवर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाचं असेल. तेथून तो राष्ट्र या गोष्टीकडे वळताना दिसतो.

मुसोलिनीसारख्या सत्ताधाऱ्यांना नेहमी भीती असते की, जनतेच्या मनामध्ये आपल्याविषयी काय चाललेलं असेल आणि म्हणून असा सत्ताधारी लोकांकडून काही गोष्टी करवून घेतो. मुसोलिनीने त्या काळात विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मचारी, कुलपती, प्रशासक या सगळ्यांकडून एक शपथ लिहून घेतली की, माझी शासनावर पूर्ण निष्ठा आहे, ही कमिटमेन्ट नसेल त्याला नोकरी नाही.

दुसरं ज्याला पत्रकार व्हायचं आहे त्याने मुसोलिनीची परवानगी आणली तरच त्याला पत्रकार होता येईल. जी व्यक्ती मुसोलिनीला पत्रकार व्हायला योग्य वाटणार नाही तिला पत्रकारिता करता येणार नाही. वर्तमानपत्राचे संपादक तो निवडत असे. वर्तमानपत्राच्या मालकाला संपादक नेमण्याचा अधिकार नसे. हुकूमशहाला आपली सत्ता भक्कम करायला जी जी काय प्रभुत्वाची साधनं असतात त्या सगळ्या साधनांवर स्वत:ची पकड निर्माण करावी लागते. त्यामुळे संपादक, वार्ताहर नेमणं असो, ही सगळी कामं मुसोलिनी किंवा त्याने ठरवलेला जो कोणी माणूस असेल त्याच्याकडे दिली होती. दूरध्वनी कार्यालय हे संपर्क आणि हुकूमत गाजवण्यासाठीची प्रभावी यंत्रणा होती त्याकाळातली. दूरध्वनी कार्यालय, सरकारी कार्यालयं या प्रशासन यंत्रणेवर त्याने पकड बसवली. फॅसिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रशासन त्याने ठासून भरले. त्यामुळे प्रशासनावर पकड, संपर्काच्या यंत्रणांवर पकड आणि लष्करावर पकड हे त्याचे वैशिष्ट्य.

मुसोलिनी राष्ट्रवाद म्हणजे काय म्हणतो ते पहा. त्याचं पहिलं म्हणणं असं आहे की, बहुमत कुचकामी असतं. बहुमताला शहाणपण असतं हीच गोष्ट त्याने अमान्य केली आहे. लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्यांना बहुमत मान्य करावं लागतं हेच त्याला मुळात मान्य नाही. त्यामुळे बहुमताला शहाणपणा नसतो ही त्याची ठाम समजूत. लोकशाहीमध्ये जी समता तुम्ही सांगत आहात, ती समता अनैसर्गिक समता आहे. मग नेमकी समता म्हणजे काय, तर निसर्गाने ज्यांना श्रेष्ठत्व बेहाल केलेलं आहे, असे जे वंश आहेत त्यापैकी इटालियन वंश ज्यांचा जन्मच मुळी राज्य करण्यासाठी आहे. म्हणून इटालियन जनतेसाठी चांगलं राज्य आणि चांगलं राष्ट्र कसं निर्माण होईल तर ते राज्य हे अनिर्बंध सत्ता असणाऱ्या हुकूमशहाच्या नेतृत्वाखालीच म्हणून त्याने ‘अ‍ॅब्सलूट स्टेट’ स्वीकारलेलं आहे.

हिटलरच्या काळात“राइट टू डेथ’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध होतं. कुठल्याही माणसाला मारायचा अंतिम अधिकार स्टेटलाच असला पाहिजे. मुसोलिनीच्या मते फॅसिस्ट स्टेट ही संकल्पना ऑरगॅनिक आहे. ऑरगॅनिक म्हणजे काय तर कोणताही सामान्य माणूस हा नेशनचा एक घटक आहे याखेरीज त्याला किंमत नाही. ‘नेशन’ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेशनसाठी जो काही त्याग करावा लागेल, तो त्याग प्रत्येक नागरिकाने केलाच पाहिजे. तो जो करणार नाही, तो राष्ट्रभक्त नाही, राष्ट्रवादी नाही. त्यामुळे राष्ट्रासाठी मरायला तयार असणारे तेच खरे राष्ट्रभक्त ही त्याच्या राष्ट्रवादाची संकल्पना आहे. म्हणून ऑरगॅनिक स्टेट, ऑरगॅनिक नेशन हे त्याच्या राष्ट्रवादाचं सूत्र आहे. त्याच्यामध्ये व्यक्ती दुय्यम आहे. व्यक्तीला महत्त्व नाही आणि अधिकारही नाहीत. तरीसुद्धा तो असं म्हणतो की, हे राष्ट्राचं सर्वंकष प्रभुत्व मान्य केल्यावरसुद्धा जी काही थोडीफार स्पेस शिल्लक राहील तेवढ्याच नागरिकांनी स्वातंत्र्य उपभोगायचं आहे, तेसुद्धा हुकूमशहा सांगेल त्या स्वरूपामध्ये. संपादक व्हायचं स्वातंत्र्य आहे का? नाही, ते मुसोलिनी ठरवणार. पत्रकार व्हायचं स्वातंत्र्य आहे का तर नाही. तुमची फॅसिझमवर श्रद्धा नसेल तर सरकारी नोकरी मिळेल का तर नाही. म्हणजे या सगळ्या बाबी गेल्यानंतर जे शिल्लक राहील तेवढंच स्वातंत्र्य नागरिकांना आहे अशी मुसोलिनीची श्रद्धा आहे. म्हणजे त्या अर्थानं खरखुरं स्वातंत्र्य नागरिकांना नाहीच.

दुसरं त्याचं काय म्हणणं आहे की, नागरिक आणि सैनिकांत फरक नाही. त्यामुळे आपण ज्याप्रकारे सैनिक आणि नागरिक यात फरक करतो तसा फरक त्याला मान्य नाही. प्रत्येक नागरिक हा सैनिकासारखाच असला पाहिजे. त्याची मानसिकता तशी असली पाहिजे आणि प्रत्येक सैनिक हा त्या अर्थानं नागरिक असणार नाही पण नागरिक मात्र सैनिक असेल. ही मानसिकता ज्या देशात तयार होईल तेच राष्ट्र चिरंतन राष्ट्र राहील.

इटलीच्या इतिहासामधली खेदकारक घटना त्याच्या दृष्टीने काय होती तर रोमन साम्राज्याची समाप्ती. रोमचं साम्राज्य इतिहासामध्ये किती मोठं साम्राज्य होतं आणि रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर एवढ्या मोठ्या साम्राज्याचा इटली मालक राहिला नाही आणि ते साम्राज्य संपवण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्याच्यामध्ये फ्रान्स होता. त्यामुळे फ्रान्स इटलीचा नैसर्गिक शत्रू ठरला.

दुसऱ्या बाजूला रोमन एम्पायरसारखं एम्पायर उभं करायचं आहे म्हणून त्याने अ‍ॅबिसिनियावर आक्रमण केलं, ऑस्ट्रियावर आक्रमण केलं. हे जे सगळं आहे ते कशासाठी तर यातून रोमन एम्पायर उभं होणार होतं. हा जो मुसोलिनी आहे तो विद्यार्थी असतानासुद्धा बेशिस्त आणि मनमानी पद्धतीने वागणारा होता. एका सहकारी विद्यार्थ्यावर त्याने चाकू हल्ला केल्याची नोंद आहे. धर्मगुरूवर काही अंशी त्याचा विश्‍वास होता पण सत्ता हातात घेतल्यानंतरचा मुसोलिनी आणि सत्तेपूर्वीचा मुसोलिनी याच्यामध्ये फरक आहे. जे सगळं तो नसताना मानत होता त्या सगळ्याच्या विरोधात तो स्वत: उभा राहिला आहे.

आणि म्हणून त्याची राष्ट्र नावाची जी संकल्पना आहे ती एका बाजूला ऑरगॅनिक आहे दुसऱ्या बाजूला लोकशाही हक्क संपुष्टात आणणारी आहे. तिसऱ्या बाजूला कामगार कायदे मोडीत काढणारी आहे. मग हे राष्ट्र कोणाचं?

१९२५ ते १९४३ तो हुकूमशहा आहे, त्याने विरोधक संपवले. हे सगळं एका बाजूला करत असताना वांशिक द्वेषाची भूमिका १९२८ पर्यंत त्याने घेतलेली नाही. १९३८ला एकाएकी त्याने ज्यू विरोधी मोहीम सुरू केली. त्याचं कारण हिटलरने १९२३ पासून त्यांच्या प्रश्नावर बोलायला आणि भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्या बाबतीतील त्याचं मॉडेल हिटलर. हिटलरच्या आधी तो सत्तेवर आला १९२९ला. १९३८ पासून हिटलरने ज्यूविरोधी मोहीम सुरू केली. ज्यूंना कुठे नोकरी मिळता कामा नये. जर्मनीतून हाकललं आहे. त्यांनी जावं पण त्यांना नोकरी नाही, सार्वजनिक क्षेत्रात कुठेही काम मिळणार नाही. ज्यूंच्या औद्योगिक कंपन्या असतील तर त्यांना कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार नाही, सरकारी कॉन्ट्रॅक्ट दिली जाणार नाही. ज्यूंना इतर समाजाच्या लोकांना घरात कामावर ठेवायचं असेल तर त्याला बंदी घातलेली आहे. कुठलाही ज्यूतेर हा ज्यू व्यक्तीकडे कामगार म्हणून, नोकर म्हणून असू शकणार नाही, इतकी त्याने ज्यूंवर बंधनं घातलेली आहेत.

१९व्या शतकामध्ये अखेरला युरोपमध्ये लोकशाहीला, व्यक्तिवादाला, उदारमतवादाला प्रतिक्रिया म्हणून एक जबरदस्त वंशवादाचं तत्त्वज्ञान पुढे आलं. वंशवादाची शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि ती कशाच्या प्रतिवादाचा भाग आहे तर ती या सगळ्या लिबरल मूल्यांच्या प्रतिवादासाठीचा भाग आहे. म्हणून एका बाजूला १९व्या शतकामध्ये लिबरल मूल्यांच्या आधारे राष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न चालू असताना दुसऱ्या बाजूला वंशवादाच्या आधारे राष्ट्र उभं करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांचा प्रभाव हिटलरवर आहे. म्हणून त्याचा सतत प्रयत्न असा आहे की शुद्ध वंशाचं राष्ट्र अस्तित्वात यायला पाहिजे. आणि शुद्ध वंशाचं राष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी त्याच्यामध्ये प्रदूषण निर्माण करणारे जे जे घटक आहेत त्यांचं निर्दालन केलं पाहिजे. हिटलरने तर स्पष्टच म्हटलं आहे म्हणजे १९४३ साली, जर्मनीमध्ये ज्यू नावाची जमात हा एक ‘बायोकेमिकल बॅक्टेरिया व्हायरस’ निर्माण झालेला आहे. हा जगातील प्रचंड मोठा शोध आहे! म्हणून मुसोलिनीचं राष्ट्र हे हुकूमशाहीने उभारलेलं आहे, नुसती हुकूमशाही नाही तर अमर्याद सत्ता. सत्तेचं सर्व क्षेत्रातील प्रभुत्व आणि कोणत्याही पातळीवर जनतेला कसलाही हक्क बजावता येणार नाही याची तरतूद असणारं हे राष्ट्र आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/

.............................................................................................................................................

दुसरं त्याचं तत्त्वज्ञान काय आहे की, शांतता नावाची जी गोष्ट आहे त्याची जगाला गरज आहे, ती आर्थिक विकासासाठी आहे. ती शांतता कशी निर्माण होते. एकतर युद्धमान राष्ट्रांमध्ये तह होण्याने. मुसोलिनी असं म्हणतो की, शांतता ही युद्धानेच निर्माण होते आणि त्याशिवायची शांतता हा माणसांच्या इतिहासामधला शाप आहे. राष्ट्राला एक काल्पनिक शत्रू असतो. युद्ध हेच खरं तत्त्वज्ञान आहे आणि फॅसिझम हाच राजकीय विचार आहे. फॅसिझम लोकशाहीच्या विरोधात आहे, समाजवादाच्या विरोधात आहे, उदारमतवादाच्या विरोधात आहे ही त्याची सरळसरळ भूमिका आहे. म्हणून १९वं शतक जसं होतं तसं २०वं शतक असणार नाही अशा प्रकारची त्याची भूमिका आहे. हे सगळं त्याने अस्तित्वात आणलं आणि त्याच्या काळात दुसर्‍या महायुद्धात त्याने जे साहस केलं जर्मनीला साथ देण्याचं (१९३८ला तो हिटलरकडे गेला आणि १९३९ला महायुद्ध सुरू झालं.) त्याद्वारा महायुद्धामध्ये त्याने इटालीला परस्पर सहभागी केलं. तिथून पुढे युद्धकाळामध्ये अधिकाधिक देशांचे लचके तोडायला त्याने सुरुवात केली. त्याच्या दुर्दैवानं आणि जगाच्या सुदैवानं त्याला बऱ्यापैकी अपयश आलं आणि शेवटी १९४३ला दोस्त राष्ट्रांच्या फौजा इटालीमध्ये घुसल्या. त्यावेळी त्याला शोधून काढून त्याला आणि त्याच्या पत्नीला मारण्यात आलं. त्याही वेळेला तो असं म्हणाला, आपल्या छातीवरचा कोट त्याने बाजूला केला आणि मला थेट छातीत गोळ्या घाला, हे त्याचं धाडस होतं हे मान्य केलं पाहिजे. त्याला गोळ्या घालून मारलं. त्याला मारल्यावर इटलीत उठाव झाले नाहीत, कोणालाही काहीच वाटलं नाही. त्याच्या प्रेताची विटंबना झाली. ते झाडाला टांगून ठेवण्यात आलं होतं. लोकांनी त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही, इतका तो लोकांच्या मनातून उतरलेला होता.

जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, दोस्त राष्ट्रांच्या फौजा जेव्हा आल्या त्यावेळेला पुन्हा एकदा लोकशाही प्रदान करण्यात आली. दोन महायुद्धामधला जो काळ आहे हा इटालीतील हुकूमशाहीचा काळ आहे किंवा मुसोलिनीचा काळ आहे. ज्यात व्यक्तींना हक्काशिवायचं नागरिकत्व होतं, दावणीला बांधलेलं राष्ट्रीयत्व होतं व निरंकुश सत्तेचा पहारा होता.

.............................................................................................................................................

हा प्रदीर्घ लेख ‘साप्ताहिक युगांतर’च्या दिवाळी २०१७च्या अंकात प्रकाशित झाला आहे. लेखक-प्रकाशकांच्या पूर्वसंमतीने त्याचे पुनर्प्रकाशन करत आहोत. 

.............................................................................................................................................

लेखक किशोर बेडकीहाळ राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

kishor077@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 29 November 2017

काय हो किशोरबुवा, तुम्ही म्हणता की भारतीय राष्ट्राचं प्राचीनत्व ही गैरसमजूत आहे. पण इंदिरा गांधींनी 'आम्हाला ५००० वर्षांच्या विजयाचा इतिहास आहे' असे उद्गार १९७१ साली बांगला देश युद्धाच्या वेळेस काढले होते. तर मग हा ५००० वर्षांचा हिशोब भारतीय राष्ट्राच्या प्राचीनत्वाचा पुरावा नव्हे काय? तुमच्या मते भारतीय राष्ट्राचा विवेकी विचार करायचा असेल तर ते इंग्रजांनंतर उत्पन्न झालं असं मानायला पाहिजे. या विचारसरणीचा प्रमुख दोष म्हणजे भारत ही एक धर्मशाळा आहे असं यांतून सूचित होतंय. कोणीही भारतात यावं आणि वाट्टेल तो प्रयोग खुशाल करावा इतकी काही भारतीय लेचेपेचे नाहीत. असो. बाकी युरोपीय राष्ट्रांसंबंधी तुमचे विचार हास्यास्पद आहेत. जर्मन ही एक भाषा नाही. हिच्या अनेक बोली आहेत. प्रमाणित जर्मन ही केवळ लेखी भाषा आहे. ऑस्ट्रियन जर्मन आणि स्विस जर्मन या परत वेगळ्या भाषा आहेत. बव्हेरिया हा जर्मनीतला प्रांत स्वत:ची वेगळी बोली व संस्कृती टिकवण्याबद्दल आग्रही आहे. सांगण्याचा मुद्दा काये की तुम्ही म्हणता तसं जर्मनी हे राष्ट्र जर्मन भाषेच्या आधारावर उभं राहिलेलं नाही. वस्तुस्थिती नीट लक्षात घेऊन मगंच विधाने करावीत. तूर्तास इतकंच. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......