टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स, न्यूड, एस. दुर्गा आणि मोहन भागवत
  • Sat , 25 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स Standard & Poor's न्यूड Nude एस. दुर्गा S. Durga मोहन भागवत Mohan Bhagwat

१. अर्थ क्षेत्रातील अग्रगण्य मानांकन संस्था असलेल्या ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’ने (एस अॅण्ड पी) यंदाही भारताच्या मानांकनात कोणतीही सुधारणा केलेली नाही. ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून भारताचे BBB- मानांकन कायम ठेवण्यात आलं आहे. मात्र येणारा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला असेल, असं भाकीत या मानांकन संस्थेनं वर्तवलं आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून वर्तवण्यात आला आहे. भारताकडे असणारी परकीय चलनाची गंगाजळी या काळात वाढेल, असंदेखील या संस्थेनं अहवालात नमूद केलं आहे.

या संस्थेचं स्टँडर्ड पुअर दिसतं आहे, अशी गचाळ कोटी करायची की, पुढच्या काळात देशाचं रेटिंग सुधारणार आहे, असं भाकीत त्यांनीही केलं आहे, याची शेखी मिरवायची, याचा अभ्यास सुरू आहे. निर्णय झाला की त्यानुसार एका छापाची विधानं, फॉरवर्ड, फेसबुक पोस्टी वगैरे प्रसृत करूच!

.............................................................................................................................................

२. राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभारलं जाईल, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ‘राम मंदिरावर लवकरच भगवा ध्वज फडकताना दिसेल आणि हा दिवस आता दूर नाही,’ असंही त्यांनी म्हटलं. कर्नाटकमधील उडुपीमध्ये आयोजित धर्मसंसदेत भागवत म्हणाले की, लोकांकडून आमच्या गोरक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गायीचं रक्षण ही आमची संस्कृती आहे. जोपर्यंत गोहत्येवर बंदी आणली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांतपणे जगू शकत नाही,’ असं त्यांनी म्हटलं.

अंतिम निकाल जवळ येत चालला आहे, तसतसे भागवत काका आपल्या मूळ रंगात येऊ लागलेले दिसतायत. गोरक्षकांच्या गुंडगिरीबद्दल लोक बोलले नव्हते, तुमच्याच पंतप्रधानांनी कान उपटले होते, त्यांना संघस्थानावर बोलावून कानपिचक्या का दिल्या नाहीत? शिवाय तुम्ही फक्त गोवंशहत्याबंदी करू पाहणाऱ्या हिंदूंचेच प्रतिनिधी आहात, गोमांससेवन करणाऱ्या आणि गोगुरांपलीकडे जगण्याचे अनेक महत्त्वाचे, गुंतागुंतीचे प्रश्न पडलेल्या हिंदूंचे आणि अन्य जातीधर्मांचे प्रतिनिधी नव्हतातच; फक्त आता हेही स्पष्टपणे बोलून दाखवलंत, हे बेस्ट.

.............................................................................................................................................

३. देशाच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं तरुणांसाठी सुरू केलेल्या कौशल्य विकास योजनेवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टीका केली आहे. मोदींनी दिल्लीत कौशल्य विकास योजनेचं भाषण केलं. त्यासाठी स्वतंत्र खातंदेखील सुरू केलं. मात्र, या योजनेतून केवळ आठ टक्के विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचं प्रशिक्षण मिळालं, याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं, असे पवार म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात सध्याची तरुण पिढी नाविन्यपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जागतिक पातळीवर भारताचं स्थान शंभरावं आहे. आपण किती मागे आहोत, हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. यावर विशेष काम करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पवारांचा सहभाग असलेल्या सरकारांनी शिक्षणसम्राट पोसून आणि  पैशाच्या बळावर आरक्षण देणारी इंजीनिअरिंग कॉलेजं आणि मेडिकल कॉलेजं काढून केलेल्या कौशल्यविकासातून काय साधलं, याचाही ताळेबंद त्यांनी मांडायला हवा. बाकी आताच्या काळात फोटोशॉप, विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तींचं चारित्र्यहनन, ट्रोलिंग, शिरच्छेद, जिव्हाच्छेद, भांगेच्या तारेतली बडबड, दाखवेगिरीची देशभक्ती या सगळ्या कौशल्यांमध्ये देश केवढा प्रगत झाला आहे, हे पवारांना का बरं नेमकं दिसत नाही?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. राज्यातील जनता तडतफडते, तळमळते, विव्हळते, त्यांच्या आक्रोशाकडे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं मत मांडतानाच मुख्यमंत्रीपद हे आपलं स्वप्न नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मी लोकांकडे दुर्लक्ष केलं, तर मी राजकारणात असलो किंवा नसलो तरी काहीच फरक पडत नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना दुतोंडी नाही. सरकार म्हणून आमच्याकडे अधिकार आहेत, यातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर त्या सत्तेला लाथ मारून जाणार, अशी गर्जनाही त्यांनी केली.

एकंदर लाथा मारणं या कलेतली पारंगतता पाहता वेगळं काही अपेक्षितही नाही. घटनात्मक पद स्वीकारलं की, घटनेची आणि मुख्य म्हणजे लोकशाहीची बंधनं येतात. सोयीस्कर रॉबिनहुडगिरी करता येत नाही आणि मुख्य म्हणजे कार्यक्षमतेनं राज्यकारभार करून दाखवावा लागतो. तिथं नुसती अस्मिताबाज भाषणबाजी पुरत नाही. त्यामुळे अनेक मंडळी आपल्याला सत्तेचा लोभ नाही, अशी बतावणी करत घटनाबाह्य सत्ताकेंद्रं बनून बसतात.

.............................................................................................................................................

५. गोव्यात सुरू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा चित्रपट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं निवडकर्त्यांना पूर्वसूचना न देता वगळल्याच्या निषेधार्थ इतर मराठी दिग्दर्शकांनी महोत्सवातून माघार घेतली नाही आणि मराठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांनी इफ्फीत आवाजही उठवला नाही.

मराठी आणि मल्याळी सिनेमातल्या गुणात्मक फरकाचं अधिष्ठान या बंदीवरची मराठीजनांची शेळपट प्रतिक्रिया आणि ‘एस. दुर्गा’कारांनी केरळ उच्च न्यायालयातून दिलेला दट्ट्या यातून दिसून येतो. मराठी सिनेमाकारांची सरकारसमोरची कूपमंडुक लाचारवृत्ती यानिमित्तानं ‘न्यूड’ झाली, एवढंच.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.