टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा आणि पद्मावती सिनेमाचे पोस्टर
  • Mon , 13 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya जावेद अख्तर Javed Akhtar शत्रुघ्न सिन्हा Shatrughan Sinha पद्मावती Padmavati

१. अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला ४.५ हजार कोटी रुपयांच्या (७० कोटी डॉलर) मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात पाकिस्तानला ही रक्कम दिली जाणार आहे. अमेरिका आघाडी सहायता निधीकडून (सीएसएफ) ही रक्कम पाकिस्तानला देण्यात येणार आहे. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबाविरोधात पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी प्रमाणित केल्यानंतर त्यांना ३५ ते ७० कोटी डॉलरपर्यंत मदत केली जाईल, असे यात म्हटले आहे. पाकिस्तानने त्यांना मिळालेली मदत दहशतवादी समूहाला पुरवू नये, याकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लक्ष ठेवावे, अशी विनंती अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहांनी केली आहे.

काट्याने काटा काढणे ही म्हण अमेरिकी मंडळींनी इतक्या सिरीयसली घेतलीये की, पाकिस्तानच्या रूपाने त्यांनी भारतीय उपखंडाच्या छातीत एक काटा घुसवून ठेवलाय. जागतिक महासत्ता असल्याच्या बळावर इतर सार्वभौम देशांमध्ये लुडबूड करणारी अमेरिका दहशतवादाची व्याख्या करणार आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या धर्मवादातून जन्मलेला पाकिस्तान तिच्यावतीने दहशतवादाशी लढणार, हीच मोठी मनोरंजक गोष्ट आहे. कधीतरी कुत्र्याला चापटवावं लागतं, कधी बिस्कीट टाकावं लागतं, त्यातलं बिस्कीट टाकणं सुरू आहे इतकंच.

.............................................................................................................................................

२. एकीकडे देशात महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यावर केंद्र सरकारचा भर असताना राजस्थान शिक्षण विभागाने महिलांना तंदुरुस्त राहण्यासाठी घरात झाडू मारणे, दळण दळणे, अशी कामे करण्याचा सल्ला दिला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील अंकात ‘तंदुरुस्त राहण्याचे सोपे उपाय’ या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात तंदुरुस्त राहण्यासाठी १४ उपाय सांगितले आहेत. त्यात सकाळी-सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकल चालवणे, खेळाचे प्रकार, व्यायाम हे उपाय सांगितले आहेत. दळण दळणे, पाणी भरणे, झाडू मारणे, फरशा पुसणे आदी घरकामांमुळे महिलांचा चांगला व्यायाम होऊ शकतो, असं या लेखात म्हटलं आहे.

ही मंडळी ज्या पुराणमतवादी विचारधारेतून पुढे आली आहेत, तिचाच हा परिपाक आहे. बायकांची खरी जागा चुलीपाशी, ही त्यांची मूलभूत विचारसरणी आहे. आता महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तरी त्यांना व्यायामाच्या निमित्ताने पुन्हा घरगाड्याला जुंपण्याची ही सनातनी आयडिया आहे. तसे नसते तर पुरुषांनीही असे व्यायाम केले पाहिजेत, असे लेखात म्हणता आले असते. अर्थात, त्यांना हसण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आपल्याकडे कामावर जाण्यासाठी सकाळी सहाची गाडी पकडणारी बाई चार वाजता उठून नवऱ्याचा आणि आपला डबा करतेच आणि हे सगळे ‘व्यायाम’ही तीच करते... आपण फक्त पुस्तकांत लिहून उघडे पडत नाही, इतकेच.

.............................................................................................................................................

३. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ‘पद्मावती’ची कथा सलीम-अनारकलीच्या कथेसारखीच काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. या कथेचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ज्यांना इतिहासाची आवड आहे, त्यांनी चित्रपट पाहण्याऐवजी इतिहासाची पुस्तके वाचली पाहिजेत आणि त्यातील इतिहास समजून घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘साहित्य आज तक’ या कार्यक्रमात जावेद म्हणाले की, ‘मी इतिहासकार नाही, मात्र इतिहासाच्या एका प्राध्यापकाने दिलेली माहिती मी इथे सांगू इच्छितो. ‘पद्मावती’ची रचना आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या कालावधीत फार अंतर आहे. जायसी यांनी ज्यावेळी ही कथा लिहिली तो काळ आणि खिल्जीची कारकीर्द यांच्यात जवळपास २०० ते २५० वर्षांचा फरक होता. अल्लाउद्दीनच्या कारकीर्दीत इतिहासावर बरेच लेखन झाले. तेव्हाची सर्व माहिती उपलब्ध आहे, मात्र त्यात पद्मावतीचा उल्लेखच नाही. जोधा-अकबरवर चित्रपट निर्मिती झाली. जोधाबाई ‘मुघल ए आजम’मध्येही होती. मात्र, जोधाबाई अकबरची पत्नी नव्हती. वास्तवात अकबरच्या पत्नीचे नाव जोधाबाई नव्हते.

मुळात जावेद अख्तर यांना, ते मुसलमान असताना हिंदूंच्या कथांबद्दल बोलण्याचा अधिकार काय? आता या कथेतली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा मुस्लिम असली, मुघल शासक असली, तरी काय झाले. जावेद यांना सर्व धर्मवेड्यांच्या बाबतीतली एक गोष्ट अजून लक्षात आली नाही का? अभ्यासाचे त्यांना वावडे असते. त्यांच्या फॉरवर्डबाज मेंदूला फक्त उथळ अस्मिता कळते. इतिहासात उतरले तर त्याचे नानाविध पदर कळतात, तो अस्मिता चेतवण्यासाठी काही योग्य कच्चा माल नाही. अस्मिता चेतवायला दंतकथा आणि भाकडकथा उपयोगी पडतात. बहुतेक लोक त्यालाच इतिहास समजतात. आणखी तीनशे वर्षांनी मुघल-ए-आझम, जोधा-अकबर, बाजीराव-मस्तानी आणि पद्मावती हीच तेव्हाच्या संस्कृतीरक्षकांची संदर्भसाधने ठरणार आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285

.............................................................................................................................................

४. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील हॉटेलचा लिलाव होणार असून या लिलाव प्रक्रियेत हिंदूमहासभेचे नेते स्वामी चक्रपाणी हेदेखील सहभागी होणार आहेत. दाऊदचे हॉटेल पाडून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणार अशी घोषणाच त्यांनी केली आहे. दोन वर्षांपासून दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी प्रक्रियादेखील पार पडली. मात्र लिलाव होऊ शकला नव्हता. भेंडीबाजारमधील हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका या नावानेही हे हॉटेल ओळखले जाते) या हॉटेलचा यात समावेश आहे. चक्रपाणी म्हणाले, अफरोज हॉटेल खरेदी केल्यावर मी ते पाडणार आणि त्या जागेवर जनतेसाठी सार्वजनिक शौचालय बांधणार आहे. गुन्हेगाराची संपत्ती विकत घेऊन त्यावर शौचालय बांधून मी गुन्हेगारांना संदेश देऊ इच्छितो. दहशतवादाचा अंत असा होतो हे मला दाखवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. या सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ऐकून तो दाऊद तिकडे हसून हसून काळापिवळा झाला असेल. तो सातासमुद्रापार आहे. तो जिथे आहे, तिथे नाही अशी त्या देशाची अधिकृत भूमिका आहे. त्याला फरपटत आणण्याची भाषा करणारे सत्तेत येतात-जातात, तो तिथेच मजेत आहे. यांना दोन वर्षांत एका गाळ्याच्या किरकोळ हॉटेलाचाही लिलाव करता येत नाही. ते हॉटेल पाडून शौचालय बांधलं की दहशतवादाला धडा शिकवला जाणार, ही टोकनबाजी नोटबंदीमुळे दहशतवादाला आळा बसला, असं मानणाऱ्यांच्या टाळ्या खेचेल फारतर.

.............................................................................................................................................

५. नोटाबंदी आणि जीएसटीवरून भाजपला त्यांचेच काही नेते घेरत असल्याचे दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी एक ट्विट करत भाजप सरकारला टोला लगावला आहे. ‘नोटबंदी’मुळे लोक खूश असते तर जल्लोष सरकार नव्हे तर लोकांनी केला असता...’ असे ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला आत्मस्तुती थांबवण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी जीएसटीची अंमलबजावणी व्यवस्थित न केल्यामुळे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘हे दोन सिन्हा आहेत की जिन्ना आहेत’, असे एखादे ट्वीट माननीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अनुपम खेर, संबित पात्रा किंवा गेला बाजार साक्षी महाराजांनी तरी करायला काय हरकत होती? हे दोघे पक्षात राहून नेतृत्वाच्या मागे हात धुवून लागले आहेत. ही कुकरची वाफ काढत राहण्याची युक्तीही असू शकते. म्हणजे दोन्ही सिन्हांच्या ते लक्षात येत नसेल, पण, त्यांच्या या बडबडीचा ‘पाहा पक्षात किती लोकशाही आहे,’ असे ढोल वाजवायलाच उपयोग होणार नाही का?

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.