अडाण्यांचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी काढा
संकीर्ण - विनोदनामा
राजन मांडवगणे
  • ताजमहाल
  • Tue , 31 October 2017
  • विनोदनामा ताजमहाल पु. ना. ओक ताजमहाल हे तेजोमहालय आहे

गेले काही दिवस मी सातत्यानं भाजप-संघाच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या बातम्या वाचतो आहे. त्यावरील इंग्रजी-मराठी वर्तमानपत्रांतील संपादकीये, संपादकीय स्फुटं आणि इतर लेख वाचतो आहे. ते सतत वाचून वाचून डोकं भणाणायला लागलं. अशा वेळी टीव्ही पाहण्याचा पर्याय माझे अनेक लेखक-पत्रकार मित्र निवडतात. माझ्या घरी टीव्ही नसल्यानं तो पर्याय माझ्यासाठी शहाणपणाचा ठरत नाही. संगणक आहे, पण सिनेमेही मी फारसे पाहत नाही. त्यामुळे यूट्युब वगैरेचाही काही उपयोग होत नाही. शेवटी संध्याकाळच्या सुमाराला घराबाहेर पडलो, तेव्हा पुस्तकाच्या दुकानात जाऊन पु. ना. ओक यांचं ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक तिथंच उभं राहून वाचण्याचा प्रयत्न केला.

ओकांच्या विनोदांची सुरुवात सुरुवातीपासूनच सुरू होते.

इतक्या विनोदी पुस्तकाला तब्बल पंचवीस वर्षं मराठी प्रकाशक मिळू नये? केवढा हा कर्मदरिद्रीपणा!

इतरांना चूक ठरवलं की, आपलं बरोबर ठरतं, याचे पुरावे ओकांच्या पुस्तकाच्या केवळ मलपृष्ठावरच नाहीत तर ते या पुस्तकाच्या पानापानावर आहेत. त्यामुळेच या पुस्तकाचे पाननपान विनोदांनी खच्चून भरलेलं आहे. जेव्हा जेव्हा मनाला मरगळ येते, तेव्हा तेव्हा मी हे पुस्तक काढून वाचतो.

तर मुद्दा असा की, एकेकाळी पु.ना. ओकांच्या या पुस्तकानं माझी भरपूर करमणूक केली होती. पण आज त्यातले विनोद फारच मिळमिळीत, शिळे वाटू लागले. त्यामुळे ते पुस्तक विकत घ्यायचा विचार सोडून द्यावा लागला.

शेवटी घरी आलो आणि पुन्हा कुठलं तरी पुस्तकच वाचायला घ्यायचं ठरवलं. पुस्तकाच्या कपाटासमोर उभं राहून बराच वेळ शोधाशोध केल्यावर मला ‘Turkish Fairy Tales’ हे छोटंसं मुलांच्या गोष्टीचं पुस्तक मिळालं. जेव्हा जेव्हा मला आजूबाजूच्या किंवा वर्तमानपत्रातल्या हास्यास्पद, निरर्थक आणि भंपक बातम्या वाचून वैताग येतो, तेव्हा तेव्हा मी मुलांच्या गोष्टीची पुस्तकं वाचायला घेतो. त्यामुळे ‘Turkish Fairy Tales’ हातात घेताच माझा चेहरा उजळला. छोट्या आकाराच्या जेमतेम ६० पानांच्या या पुस्तकात मोजून पाच गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे – ‘कारा मुस्तफा द हिरो’!

या बहादूर हिरोवर एके दिवशी पाणी आणण्याची वेळ येते. तेव्हा तो आपल्या सहकाऱ्यांकडून एक लांब दोर मागवून घेतो. केवळ दोराच्या साहाय्यानं कसं पाणी आणणार म्हणून त्याचे सहकारी कुतूहलानं पाहत राहतात. कारा मुस्तफा दोर विहिरीभोवतीच्या दगडांना करकचून बांधू लागतो. ते पाहून त्याचे सहकारी विचारतात, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ कारा मुस्तफा म्हणतो – ‘ही एवढ्या लांबवर असलेली विहीर मी पाठीवर बांधून आपल्या वस्तीजवळ नेऊन ठेवतो, म्हणजे आपल्याला पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.’ कारा मुस्तफाचा लौकिक असा असतो की, चाकूच्या पहिल्या फटक्यात त्यानं ६० मधमाशांना तर दुसऱ्या फटक्यात ७० मधमाशांना मारलेलं असतं. त्यामुळे यानं खरोखरच असं केलं तर आपली सोय होईल, पण इतरांचं नुकसान होईल म्हणून सहकारी त्याला अडवतात.

आणखी काही दिवसांनी एक दिवस कारा मुस्तफावर जंगलात जाऊन लाकडं आणण्याची वेळ येते. तेव्हा तो पुन्हा सहकाऱ्यांकडे लांब दोर मागवून घेतो आणि जंगलात जातो. सहकारी त्याचा पराक्रम पाहायला त्याच्या मागोमाग जातात. कारा मुस्तफा तो दोर अनेक झाडांना गुंडाळू लागतो. तेव्हा सहकारी त्याला विचारतात, ‘हे तू काय करतो आहेस?’ कारा मुस्तफा म्हणतो – ‘ही सगळी झाडंच मी उचलून आपल्या वस्तीजवळ आणून ठेवतो, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला जंगलात लाकडं आणायला यावं लागणार नाही.’ कारा मुस्तफाचा लौकिक असा असतो की, चाकूच्या पहिल्या फटक्यात त्यानं ६० मधमाशांना तर दुसऱ्या फटक्यात ७० मधमाशांना मारलेलं असतं. त्यामुळे यानं खरोखरच असं केलं तर आपली सोय होईल पण इतरांचं नुकसान होईल म्हणून सहकारी त्याला अडवतात.

पण आज कारा मुस्तफाची गोष्ट वाचताना तेवढी मजा आली नाही. वाचाळ भाजपेयी कारा मुस्तफाचेच वंशज आहेत, अशी कल्पना मी करून पाहिली थोडा वेळ. पण बात कुछ हजम नहीं हुई.

मग मी ते पुस्तक बाजूला ठेवून पु.ल.देशपांडे यांचं ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हे पुस्तक वाचायला घेतलं. या पुस्तकाच्या मनोगतात पुलंनी लिहिलंय की, लेखाचं शीर्षक वाचूनच लोक तो वाचायचा की नाही हे ठरवतात हे कळायला मला पन्नाशी गाठावी लागली! पुलंच ते! हा विनोद पत्रकारितेमध्ये असल्यानं नेहमीच आवडतो, आजही आवडला. बाकी ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हे पुस्तक बहारदार आहे. अर्थात ज्यांनी मराठी वाङ्मय इतिहासाचे खंड वाचले आहेत, त्यांना पुलंनी केलेलं हे विडंबन जास्त चांगल्या प्रकारे कळतं. त्यामुळे हे पुस्तक अर्धवट असूनही उत्तम करमणूक करतं.

पण आधीचा वैताग इतका होता की, पुलंच्या विनोदांनी मन रिझवेना. मग त्यांना बाजूला ठेवून चिं.वि.जोशींचं ‘लंकावैभव’ हे पुस्तक वाचायला घेतलं. चिंवि हे कायमच हसवणारे लेखक. तेही पुलंपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे. त्यात ‘लंकावैभव’ हे तर चिंविंच्या लेखनीचा अत्युत्तम नमुना असलेलं पुस्तक. त्यात पुन्हा पत्रकारितेचा खरपूस समाचार घेणारं. म्हणजे असं की, रामायणकाळी वर्तमानपत्रं असती तर त्या विषयीच्या विविध बातम्या वर्तमानपत्रांमध्ये कशा प्रकारे आल्या असल्या याचं अतिशय बहारदार चित्रण चिंविंनी केलं आहे. वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या आणि बातमीदारांच्या मानसिकतेची खिल्ली उडवत चिंविंनी सादर केलेलं ‘वर्तमानपत्रीय रामायण’ खमंग, खुसखुशीत आणि हास्याचे प्रस्फोट घडवतं.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी म्हणजे १९४७ सालीच प्रकाशित झाली आहे. तेव्हापासून वर्तमानपत्रांमध्ये शिरलेल्या अपप्रवृत्ती जराही कमी झाल्या नाहीत, याची खात्रीच या पुस्तकातून पटते. प्रस्तावनेत चिंविंनी म्हटलंय की – “रामायणातील कथेशी ह्या अंकातील वृत्तांताचे काही ठिकाणी साम्य दिसणार नाही. अशा स्थळी रामायणांतल्या कथेपेक्षा हा वृत्तांत अधिक विश्वस्य आहे; कारण काव्यापेक्षा समकालीन पुरावा अधिक योग्यतेचा असतो हे उघड आहे.”

‘लंकावैभव’ची अधलीमधली काही पानं वाचल्यावर मनाला जरा उभारी आली. चिंविंना वर्तमानपत्रांमध्ये विनोदाचा एक अख्खं पुस्तक लिहिण्याइतका मालमसाला मिळतो, तर आपली घटकाभर करमणूक का होऊ नये वर्तमानपत्रांतून? या प्रश्नानं थोडंसं भान दिलं, जरा हुशारीही आली. आणि धाडसही. मग ताजमहालाबाबतच्या बातम्यांची कात्रणं जवळ घेऊन बसलो. आणि का सांगू, पुल. चिंविपेक्षाही जास्त करमणूक ताजमहालाबाबतच्या बातम्या करू लागल्या. आता या बातम्या भाजपेयी भक्तांना सुखावणाऱ्या, त्यांचा जाज्वल्य अभिमान, ५६ इंच छाती वगैरे फुलून येत असेलही. पण माझी मात्र या बातम्या वाचून हसून हसून मुरकुंडी वळू लागली.

या विनोद-चिंतामणीला सुरुवात झाली संगीत सोम नामक तज्ज्ञापासून. हे आधुनिक पु.ना.ओकच.

ज्यांचं एकंदर कुठेच, कसलंच स्थान नाही अशी व्यक्ती ‘ताजमहाल’चं इतिहासातील स्थान काय? असा प्रश्न विचारते तेव्हा ती निखालस बातमी होते, व्हायलाच हवी. नाहीतर आमच्यासारख्या वाचकांची करमणूक होणार कशी?

ताजमहालची निर्मिती भारतमातेच्या सुपुत्रांच्या रक्त व घामातून झाली असल्याचा निर्वाळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानंद यांनी दिला आणि ताजमहाल कोणी आणि कसा बांधला या गोष्टींचा शोध घेण्याची गरज नसल्याचेही सांगून टाकले. ते बरंच केलं!

बरोबरच आहे, ताजमहाल हा तेजोमहालच आहे, पण लक्षात घेतो कोण? ही वास्तू आग्रा या ठिकाणी आहे. हा भाग उत्तर प्रदेशमध्ये येतो. या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. आणि ते तर म्हणतात की, ‘ताजमहाल कोणी आणि कसा बांधला या गोष्टींचा शोध घेण्याची गरज नाही. तो स्थापत्यकलेचा जागतिक वारसा आहे.’ बहोत ना इन्साफी है.

‘ताजमहाल हे रत्न असून भारताच्या इतिहासाचा अविभाज्य घटक आहे’ असं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले. ही तर हद्दच झाली. यालाच घरभेदी म्हणतात! दुसरं काय!!

कशाला संशोधन व्हायला हवं? त्यातून काय सिद्ध होणार आहे? जे काही सिद्ध करायचं आहे ते पु. ना. ओक यांनी कधीच सिद्ध केलं आहे. त्यांचं या विषयावरील जागतिक पातळीवर मान्यता पावेल असं संशोधन ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ या नावाने मराठीबरोबर हिंदी, इंग्रजीतही उपलब्ध आहे. त्याची दखल कशी घेता येईल, यावरच संशोधन व्हायला हवं आधी.

आधुनिक मराठी, किंबहुना एकंदरच भारतीय साहित्यात विनोदाची निर्मिती मुबलक प्रमाणात होते आहे. पण त्याचा दर्जा ‘चला, हवा येऊ द्या’ छाप असतो. खरा अत्युच्चतम, उत्कृष्ट दर्जाचा विनोद वाचायचा असेल तर भाजपच्या मंत्र्यांची कुठल्याही एकाच विषयावरील संशोधनपूर्व बातम्या यांची कात्रणं वर्तमानपत्रातून न विसरता काढून ठेवावीत आणि ती तारखेनुसार लावून त्याच क्रमानं काळजीपूर्वक वाचावीत. इतका श्रेष्ठ दर्जाचा विनोद संबंध भारतीय साहित्यात कुठे सापडणार नाही! खोटं नाही, शपथेवर सांगतो, तुम्ही अनुभव घेऊन पहा. (काही फुरोगामी लोक भाजपमधलं जरा कुणी काही मौलिक बोललं की, ‘भाजपची यत्ता सुधारणार तरी कधी?’ असा भंपक प्रश्न विचारत असतात. या फुरोगाम्यांना ‘अडाण्यांचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी काढा’ ही ग्रामीण भागातली म्हण माहीत नसते. जी म्हण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, त्याबरहुकूम कृती केली तर काय बिघडलं? काय बिघडल? आँ?)

.............................................................................................................................................

लेखक राजन मांडवगणे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 04 November 2017

ताजमहाल शहाजहानने बांधला याला काहीही पुरावा नाही. अगदी शहाजहाननाम्यातही बांधल्याचा उल्लेख नाही. मग कारा मुस्तफाच्या परीकथा आणि मुमताजमहलची कथा यांत फरक तो काय? -गामा पैलवान


ADITYA KORDE

Tue , 31 October 2017

टर मस्त उडवली आहे. शैली आवडली आपल्याला ... पण त्यांच्या मुद्द्यांचे सप्रमाण खंडन केले असते तर अधिक उत्तम झाले असते आणि आपल्या म्हणण्याला वजनही प्राप्त झाले असते. असो ही लिंकही बघा( कदाचित आधीच बघितली असेल आपण पण तरीही ...) त्यात छायाचित्रही आहेत . आपल्याला त्यांच्ये खंडन करणे सोयीचे जाईल. ( ह्याविषयवर फारसा अभ्यास नसल्याने ठाम पाने नाही पण ताजमहाल अगदी शिवमंदिर नसले तरी आधीच एखाद्या राजपुत राजा किंवा सरदाराची हवेली वगैरे असावी...)ज्यांनी औरंगाबादचा बीबी का मकबरा पहिला आहे जो आलमगीराच्या मुलाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलाय त्यात आणि ताज मधला फरक( कबरी ठेवण्याच्या त्यांच्यापर्यंत दर्शनासाठी पोहोचण्याच्या वाटेच्या ठेवणीवरून ताज आणि बीबी का मकबरा मधील फरक लगेच लक्षात येईल.... (हे दोन्ही मी स्वात: बारकाईने पहिले आहेत ..) https://www.stephen-knapp.com/was_the_taj_mahal_a_vedic_temple.htm