अशा वाचकांचं आणि अशा पत्रकारांचं काय करायचं?
दिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व
हिनाकौसर खान-पिंजार
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 October 2017
  • दिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं तलाक खत्ना हलाला मुस्लिम हिंदू पत्रकार

गेल्या काही वर्षांत पत्रकारितेचं स्वरूप खूप झपाट्यानं बदललं आहे. सोशल मीडियानं मुख्य माध्यमांना फार मोठी टक्कर दिली आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य माणसालाही पत्रकाराचं स्वरूप प्राप्त झालं आहे. कुठेही, काहीही घडत असल्यास त्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकाराच्याही आधी घटनास्थळी उपस्थित सर्वसामान्य व्यक्तीच ती माहिती जगासमोर मांडू शकते. त्यामुळे सध्याच्या पत्रकारितेला माहिती पुढे पुढे धावतेय आणि त्यामागे पत्रकार असं स्वरूप आलं आहे. या सगळ्या धावत्या जगात माहितीसुद्धा धावत्या पद्धतीनंच सांगण्याची पद्धत प्रचलित होऊ लागली आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पुरेसा अवधीही न घेताच, बातमी ‘ब्रेक’ करण्याची धांदलघाई सुरू होते. ही धांदलच असल्यानं सुट्या सुट्या माहितीचा वाचकांवर भडिमार होत राहतो. विचार करण्याची उसंत आपण वाचकांनाही देत नाही आणि आपणही ती तसदी घेत नाही. एक माहिती संपली की, नवी माहिती, पुन्हा नवी, पुन्हा नवी ती असं नुसतं माहितीच्या मागे धावणं सुरू होतं.

या सगळ्यात वाचकांपर्यंत ‘काय’ पोहचतंय आणि वाचक ते ‘कसं’ घेतात, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकदा या धावत्या माध्यमांत आम्ही पुरेसा अवधी घेऊन, विषयाच्या खोलात शिरून, अभ्यास करून एखाद्या विषयाची मांडणी करतो. मात्र वाचक त्यावर ज्या स्वरूपात व्यक्त होतात, त्यातून अनेकदा प्रश्न पडतो तो खरोखरच पत्रकारिता-साक्षर झाला आहे का?

अगदी अलीकडील घटना सांगते. मुस्लिम ‘मुलीची सुंता’ (याला ‘खत्ना’ असंही म्हणतात!) या विषयावर काम करणाऱ्या ‘सहयो’ या संस्थेविषयी मी ‘साधना साप्ताहिका’त लेख लिहिला होता. भारतीय मुस्लिम समाजातील बोहरा जमातीत या प्रकारची प्रथा रूढ असून त्याविरुद्ध चळवळ उभी करू पाहणाऱ्या ‘सहयो’ या संस्थेचं काम लेखातून मांडलं होतं. याच संस्थेची संस्थापक सदस्य आणि पत्रकार असणाऱ्या आरेफा जोहरी हिची मुलाखत ‘दिव्य मराठी’च्या ‘मधुरिमा’ पुरवणीसाठी घेतली होती.

या दोन्ही लेखांच्या प्रसिद्धीनंतर वाचकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. मात्र त्यापैकी काही प्रतिक्रियांनी मला अस्वस्थ केलं. भारतीय मुस्लिम मुलींना ‘खत्ना/सुंता’ या दुर्दैवी प्रथेला सामोरं जावं लागतं, त्यातील वेदना वाचकांपर्यंत पोहचावी आणि त्यांचा शक्य असल्यास ‘सहयो’च्या चळवळीला हातभार लागावा, अशी एक सुप्त अपेक्षा पत्रकार म्हणून माझ्या मनात होती.

परंतु मला त्यावर प्रतिक्रया अशा आल्या-, ‘बापरे, मुसलमानांमध्ये असं घडतं? तसाही तो अमानुषच धर्म.’, ‘तुम्ही स्वत: मुस्लिम असून हे लेखन केलं ते धाडसाचं आहे आणि मी हिंदू वाचक तुमचं कौतुक करतोय, म्हणजे पहा हिंदू किती पुरोगामी असतात!’, ‘तुमच्या धर्मात बायकांवर केवढा अत्याचार होतो आणि पुरुषही त्यात सामिल असतात. किमान हिंदूधर्मिय पुरुष असं करण्यास विरोध करतील’, ‘इतकी राक्षसी वृत्ती शांत स्वभावाच्या बोहरा स्त्री-पुरुषांमध्ये असते ही हिंदू समाजाला मन:स्ताप देणारी वस्तुस्थिती आहे.’, ‘आता या समाजाकडे हे लोक मानव नसून राक्षस म्हणून पाहिलं जाईल. वाचताना मनाला फार फार वेदना झाल्या व डोळ्यातून अश्रू आले. या वरून हिंदू मन किती हळवं असतं हे कळलं असेल.'

या प्रतिक्रिया सर्वसामान्य वाचकांकडून जशा आल्या, तशाच पत्रकार मित्र-मैत्रिणींकडूनही आल्या. अशा स्वरूपात आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांचं काय करायचं?

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत तलाक, हलाला या प्रथांविषयीही लेखन केल्यावर मुस्लिमांविषयी द्वेष, घृणा वाटते हे सांगणाऱ्या ठळक प्रतिक्रिया आल्या. ‘हलाला ही किती अमानुष प्रथा आहे, असा इतका लैंगिक अत्याचार धर्माला मान्य आहे हे कसं काय?’ अशा चुकीचा अर्थ घेणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासारख्या पत्रकाराचं मानसिक खच्चीकरण करतात.

मी किंवा माझ्यासारखे अनेक जण समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवतो, तेव्हा त्या-त्या समाजाची बदनामी किंवा द्वेषमूलक वातावरण करण्यासाठी मुळीच नाही. अमूक एखादी चुकीची प्रथा, परंपरा, चालीरित, शोषण हे अन्य कुठल्या समाजात घडत नसेल तर ते अत्यंत आनंददायी आहे, परंतु ते अन्य कुठल्या समाजात घडतं तर त्या समाजाला समजून घेऊन बदलाच्या वाटेवर आणण्यासाठी मदत करण्याऐवजी त्याचा द्वेष करणं, त्याला वाळीत टाकल्यासारखं बोलणं हे क्लेशदायी आहे.

त्यामुळे असे विषय मांडताना, वाचक ते कसं घेतील, की प्रत्येक वेळी सुरुवातीला एखादी नोट लिहावी लागणार का, की- ‘अमूक एक विषय समजून घेण्यासाठी लिहिला जात आहे. संबंधित समाजाविषयी अढी ठेवण्यासाठी नव्हे.’ असं वाटायला लागतं.

काही वेळा लक्षात येतं की, नकारात्मक बातम्या/लेखांतून नकारात्मक मांडलेलं चटकन घेतलं जातं, मात्र त्यातून जे काही सकारात्मक मांडलेलं असतं, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. एकदा मी तलाकच्या विषयावर पीडित महिलांशी बोलून लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये एका वडिलांचं उदाहरण दिलं होतं. ते आधी जमातवादी विचारसरणीला बळी पडले. कालांतरानं स्वत:च्या मुलीचा तलाक झाल्यावर आपल्यासोबत कोणीही आलं नाही, ही खंत त्यांच्या मनात डोकावू लागली आणि ते जमातवादी विचारसरणीच्या माणसांपासून दुरावले. दुसरं उदाहरण तरुणांचं होतं. शहाणेसुरते तरुण अशा प्रथा बंद व्हायला हव्यात म्हणून कितीतरी तळमळीनं बोलत होते. मात्र लेखातील या दोन्ही सकारात्मक बाबी कुणीही लक्षात घेतल्या नाहीत. या लेखावर ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्या केवळ तलाक आणि हलाला यावरच होत्या. सकारात्मक बदलांचं कौतुक कोणालाच नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्रात मुस्लिम महिलांच्या विश्वातील सकारात्मक बदलांविषयीच्या नोंदी लिहिल्या होत्या. त्यावर क्वचितच वाचकांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली.

अर्थात प्रतिक्रिया देणारा वर्ग हा छोटा असतो. फारच छोटा. वाचकांची एकूण जी काही संख्या असेल, त्यातील खूप कमी जण बातम्या/लेखांवर विचार करतात आणि त्यातील खूप कमी जण प्रतिक्रिया देतात. त्यामुळे त्यातून उभं राहणारं चित्र सर्वव्यापी नाही, व्यापक नाही हे खरंच आहे. परंतु जर विचार करणारा वाचक मोठ्या प्रमाणात केवळ नकारात्मक गोष्टींवरच भर देणार असेल तर पत्रकारितेतून सकारात्मक मांडणाऱ्यांचा हेतू कसा सफल होणार?

अगदी माध्यमांच्या अंतर्गत संरचनेतही असाच प्रतिसाद मिळतो. एखादी चांगली घटना, सकारात्मक मूल्याची बातमी ‘सॉफ्ट स्टोरी’ होऊन तिची जागा आतल्या पानात जाते. त्या बातमीचं फारच सुदैव असेल तर पहिल्या पानाच्या अँकर पोझिशनला ती लागते. बातमीदारांनादेखील जे जे नकारात्मक, ते ते फार मोलाचं वाटतं. अर्थात यंत्रणांवर बोट ठेवताना अशा वरून नकारात्मक दिसणाऱ्या मात्र त्या बदलाची अपेक्षा असणाऱ्या सकारात्मक मूल्याच्याच बातम्या असतात. तरीही बातमीदार आणि वाचक केवळ नकारात्मकतेच्या मुद्दयावर अधिक हिरिरीनं चर्चा करतात.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मुद्दा इतकाच आहे की, चर्चा सम्यक असावी. एखाद्या उदाहरणावरून संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्याचं कारण नसतं.

शिवाय पत्रकारांनीदेखील आपला दृष्टिकोन घासून, तपासून पाहत राहायला हवा. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पूर्वग्रह न ठेवता नव्यानं जे जसं समोर येईल, त्याला तसं पाहणं आणि समजून घेण्याची गरज आहे. त्याकडे आपण मनावर ठसलेल्या ठशांवरूनच पाहिलं तर आपल्याला दिसणारी प्रतिमा कदाचित स्वच्छ व स्पष्ट दिसणार नाही.

आजच्या घडीला पत्रकारांमध्येही खुल्या दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. एकमेकांकडे विशिष्ट ग्रह करून पाहिलं जातं. त्यातूनच एकमेकांना आणि एकमेकांच्या बातम्यांना/लेखांना जोखलं जातं. त्यामागच्या भूमिका, त्यामागची दृष्टी समजून घेतली जात नाही. आपली पाटी सतत कोरी करणं आणि सतत त्यावर नवनव्या गोष्टींना उमटू देणं, हे आजच्या तरुण पत्रकारांपुढचं फार मोठं आव्हान आहे.

इथं मी दिलेली उदाहरणं ही एका विशिष्ट- मुस्लीम - समाजातील आहेत. ती जाणीवपूर्वक दिली आहेत. त्याचं कारण या समाजाविषयी खूप लवकर गृहितकं बनवली जातात. त्या गृहितकांना तडा देणाऱ्या इतर चांगल्या गोष्टींकडे सोयीनं दुर्लक्ष केलं जातं. मागास, भरकटलेला, अमानुष म्हणून एखाद्याला समाजाला धिक्कारताना, त्याच समाजातल्या या प्रतिमांना उभा-आडवा छेद देणाऱ्या घटकांना बेदखल करता येणार नाही. म्हणून मला याच, माझ्याच समाजातील उदाहरणं द्यावीशी वाटली. हीच बाब इतरही घटकांच्या बाबतीत घडत आहे.

पत्रकारिता एकांगीसुद्धा होता कामा नये आणि वाचकांनी त्यांच्या पातळीवर ते सारं एकांगीपणे घेऊ नये.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार  या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Pravin Shinde

Sat , 21 October 2017

खुपच चांगल्या पद्धतीने सुक्ष्म निरीक्षणे नोंदवली आहेत. यात बारकाईने मानवी मनाच्या विकासाचे टप्पे लक्षात घेऊन मांडणी केली असून वाचक म्हणून मला या लेखाने खुप खोलवर विचार करायला प्रवृत्त केले आहे. पत्रकार म्हणून देखील स्वतःच्या मानसिक व्यवहारांकडे कसे चिकित्सकपणे बघावे हे देखील हा लेख सांगतो. हे सर्व सांगताना खुपच सम्यक पद्धतीने कोठेही आलेल्या अनुभवांचा त्रागा न करता मांडणी केली आहे. ज्यामुळे लेखामगिल सकारात्मक बदलाचा उद्देश ठेवणारी जाणीव प्रकर्षाने होते.