विचारकलह ते व्यक्तिकेंद्री भोगवाद
दिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व
संजय पवार
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 18 October 2017
  • दिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं सोशल मीडिया ऑनलाईन मीडिया मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं वर्तमानपत्रं वृत्तवाहिन्या संजय पवार Sanjay Pawar

‘पांढऱ्यावर काळं’ किंवा ‘काळ्यावर पांढरं’ हे शब्दसमूह आपण वापरतो तेव्हा आपण काहीतरी सूचित करत असतो. ‘पांढऱ्यावर काळं’ याचा संबंध लिखाण, छपाईशी प्रामुख्याने जोडला जातो. लिखाण मुनिमापासून ते अक्षर साहित्य निर्मितीपर्यंत काहीही असू शकतं. ‘काळ्यावर पांढरं’ यामध्ये ‘काळ्या दगडावरची रेघ’ हा शब्दप्रयोग ठाम, अपरिवर्तनीय गोष्टीसाठी वापरला जातो.

यानंतर जे काही आहे ते BLACK & WHITE मध्ये आहे अथवा BLACK & WHITE द्या, असा एक शब्दप्रयोग रूढ झाला. त्यामागे थोडीशी न्यायालयीन झाक आहे. B\W म्हणजे पुरावा या अर्थी! (न्यायालयात वापरली जाणारी B\W वेशभूषाही यासाठीच योजलीय?)

मुद्रणकलेचा शोध, प्रचार व प्रसार झाल्यानंतर लिखित शब्दाला वजन प्राप्त झालं. तोवरची मौखिक परंपरा- जबान दिली, शब्द दिला, काळ्या दगडावरची रेघ हे सगळं आता प्रत्यक्ष कापड, कागद ते आता डिजिटल माध्यमात मुद्रित, पुनर्मुद्रित होऊ लागलं.

मुद्रणाच्या शोधानं क्रांतीच केली. आजच्या डिजिटल युगातही आभासी प्रतिमा उमटवावीच लागते. त्या अर्थानं अक्षर, शब्द, भाषा, भाषिक व्यवहार आणि संवादातलं भाषेचं अस्तित्व चिरंजीवच.

मुद्रणानं एका गोष्टींच्या हजारो\लाखो प्रति काढण्याची जी सोय झाली, त्यातूनच कधीतरी प्रसारमाध्यमांचा जन्म झाला. आणि गेली अनेक शतकं (व आजही) कागद व शाई यांचं महत्त्व वाढत गेलं. आज डिजिटल माध्यमाच्या जोडीनं त्याचा वापर करत कागद व शाईवरची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, अनियतकालिकं समाजजीवनात आहेतच.

माध्यमांच्या पसाऱ्यात व त्याच्या इतिहासात फार न जाता आजच्या प्रसार व प्रचार माध्यमांपुरता विषय सीमित करताना प्रामुख्यानं वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, साप्ताहिकं, मासिकं, डिजिटल वेब पोर्टल यांचा विचार करू. शिवाय अवाढव्य, अजागळ, बेशिस्त समाजमाध्यमांचाही.

आपल्याकडे प्रचारमाध्यमांत सुरुवातीला दोनच प्रमुख माध्यमं होती. वर्तमानपत्रं आणि रेडिओ. पैकी रेडिओ पूर्णत: सरकारी मालकीचा. बातमीपत्रं व निमित्तानं सरकारी उच्च पदस्थांची भाषणं सोडली तर इतर वेळी सरकारी चाकोरीत मनोरंजन करण्यावर आकाशवाणीचा भर राहिला. इतर बातमीपत्रांइतकंच सर्व प्रकारचं संगीत, त्यातूनही चित्रपट संगीताचा प्रचार\प्रसार करण्यात आकाशवाणीचा मोठा सहभाग होता\आहे. बाकी नभोनाट्य, शालेय कार्यक्रम या जोडीनं भाषणं, मुलाखतीही आकाशवाणी प्रसारित करतं. मात्र बातमीवर भाष्य केलं जात नाही. सरकारी असूनही घातपात, अपघात, आनंद वार्ता यासाठी आजही आकाशवाणी अधिकृत सूत्र म्हणून गणलं जातं. क्रीडासमालोचकांनी तर खेळ मूर्तीमंत उभे केले.

याउलट वर्तमानपत्रं. ती पहिल्यापासून बिगर सरकारी व मुख्यत: सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी, जनतेचा आवाज पोहचवण्यासाठीच जन्मली, वाढली व टिकली. आजच्या बाजारकेंद्री समाज व्यवस्थेतही वर्तमानपत्र ‘वस्तू’ म्हणून मालकवर्ग विकत असला, काही प्रमाणात वाचकही ग्राहक होऊन ती घेत असला, तरी आजही ‘विश्वासार्हता’ हाच वर्तमानपत्राचा पाया वाचक समजतो. आणि ही कदाचित वर्तमानपत्रं या माध्यम प्रकाराची पुण्याई असावी. वर्तमानपत्रांचा आजवरचा इतिहास घासून घासून अतिपरिचित झालेली टिळक-आगरकरांची परंपरा हाच अजून पाया अथवा सत्वाचा रस्ता मानला जातो.

स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांची मालकी बहुतांश विशिष्ट ध्येयांनी प्रेरित व्यक्तींकडे राहिली. मालक, मुद्रक, प्रकाशक व मुख्यत: संपादक अशी ती सबकुछ छापाची नाममुद्रा असे. ‘केसरी’ = टिळक ते ‘मराठा’ = अत्रे इथपर्यंत ती परंपरा ठळकपणे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मग यामध्ये व्यापारी अथवा व्यापारी संस्थांचं भांडवल आलं. आणि वर्तमानपत्रं साखळी स्वरूपात, समूह प्रसिद्ध\प्रकाशित करू लागले.

माध्यमांच्या, राजकारण्यांच्या किंवा टीकाकारांच्या भाषेत ‘शेटजी’ भांडवलदार असा ज्यांचा उल्लेख होतो, ते मालक अलीकडच्या बाजारकेंद्री व्यवस्थेत पृष्ठभागावर येऊ लागलेत.

सुरुवातीच्या काळात हे शेटजी लोक वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य आणि मुख्यत: संपादक या पदाचं महत्त्व बऱ्यापैकी मानत, अपवादात्मकरीत्या काही शेटजी आजही ते पाळतात. तरीही संपादक आपल्या पे रोलवर आहे, ही स्वामित्वाची भावना सहजासहजी कुणी भांडवलदार सोडत नाही. (हे थोडंसं ‘माझा नवरा मला पेहरावाचं, वेशभूषेचं स्वातंत्र्य देतो’ असं म्हणणाऱ्या बायकांसारखं!)

या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचं माध्यमचित्र काय दिसतं? माध्यमं स्वतंत्र आहेत? पारदर्शी आहेत? निर्भय आणि निरकुंश, अंकुश ठेवणारी आहेत?

आजचा विचार करताना माध्यमं आज ‘वस्तू’ झालीत हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. कारण टिळक-आगरकर परंपरेतील मालकवर्ग आता अपवादानेच दिसेल. ‘नवाकाळ’चे खाडीलकर आणि ‘सामना’चे ठाकरे कुटुंब, याशिवाय काही प्रांतात चालणारी ‘देशोन्नती’सारखी वर्तमानपत्रं सोडली तर इतर सर्व वर्तमानपत्रं काही शेटजींच्या, तर काही शेटजीतून राजकारणी झालेल्या, तर काही थेट राजकारण्यांच्या मालकीची आहेत. ही सर्व वर्तमानपत्रं आता विचारांऐवजी व्यापारावर चालतात. जाहिराती हा वर्तमानपत्रांचा प्राणवायू. त्यातून सरकारी जाहिराती हा हक्काचा प्राणवायू. पण सत्ता बदलाप्रमाणे सरकारी जाहिरातींचा ओघ आटू वा वाढू शकतो. बाकी खुल्या बाजारपेठेतील जाहिराती छापण्यासंदर्भात ८०च्या दशकापर्यंत काही अलिखित आचारसंहिता होती. उदा. पहिल्या पानावर, उजव्या कोपऱ्यात, तीन कॉलम बाय २५ सेंमीपर्यंतची जाहिरात व मास्टरहेड शेजारी म्हणजे वर्तमानपत्राच्या नावाशेजारी दोन छोटे बॉक्स एवढंच छापले जाई. अग्रलेखाचं पान अजून तरी ‘जाहिरात मुक्त’ आहे. पूर्वी बातमी, मजकूर महत्त्वाचा असे, कालौघात जाहिरात महत्त्वाची झाली.

आज जसे खड्ड्यात रस्ते असतात, तशा जाहिरातीत बातम्यांचे तुकडे असतात. पूर्वीचं मुख्य पान, पहिलं पान याचे सर्व संकेत बाजूला ठेवून, वर्तमानपत्रांची पानंच्या पानं जाहिरातींनी व्यापलेली दिसतात. पहिलं पान कुठून सुरू होतं हेच कळत नाही.

आज संपादकीय विभागापेक्षा जाहिरात, विपणन (मार्केटिंग) व वितरण विभागाला अधिक महत्त्व आलंय. आता सगळीच माध्यमं बाजाराच्या ताब्यात आहेत. आणि बाजाराला ‘बारसं’ आणि ‘सुतक’ दोन्ही सारखेच!

अशा पूर्ण बाजारी वातावरणातही वर्तमानपत्रं, संपादक व संपादकीय पान या घटकांचं वाचकालेखी महत्त्व अबाधित आहे. यातूनच वर्तमानपत्र लोकप्रिय होताना संपादकही लोकप्रिय होणं, ही गेल्या ३०-४० वर्षांत रूढ झालेली परंपरा आता तितकीशी राहिलेली नाही. माधव गडकरींनी रुजवलेली ही पायवाट नंतर फारशी विस्तारली नाही. याउलट गोविंदराव तळवलकरांची अलिप्त (प्रसंगी तुच्छतावादी) संपादकाची प्रतिमा ही हल्ली प्रगल्भतेची मुद्रा होत चाललीय. असं असलं तरीही माध्यमांचं वस्तुकरण होण्याच्या काळात आज साक्षात गोविंदराव तळवलकर जरी असते तरी त्यांना कुणा सरकारी वकिलाला महाराष्ट्र भूषण प्रदान करावं लागलं असतं किंवा एखाद्या मराठी चित्रपटाच्या कलाकार तंत्रज्ञांना भेटावं लागलं असतं किंवा पाककृती विशेषांक प्रसिद्ध करावा लागला असता!

सगळीकडची राज्य सरकारं आजकाल ज्याप्रमाणे सरकारी कामं विकासाच्या नावाखाली प्रायव्हेट पार्टनरशिपखाली आऊससोर्स करतात, त्याप्रमाणे वर्तमानपत्रंही वाचकाभिमुख किंवा प्रत्यक्ष वाचक सहभाग असलेलं गंभीर आणि गमतीदार कार्यक्रम सादर करण्यावर सध्या भर देतात. त्यामागे बाजाराचा दबाव आहे. आता गुंतवणूक, शिक्षण, उद्योग, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, स्त्रिया अशा गंभीर विषयाची चर्चा ही ‘सोहळा’ म्हणून सादर\साजरी करायची!

सभागृहात, सभागृहाबाहेर, मंचावर प्रायोजकांचं ठसठशीत अस्तित्व प्रचारकी किंवा जाहिरात म्हणूनच. प्रत्यक्ष चर्चेपेक्षा आगतस्वागत, वाटण्यात येणारी सामग्री, चहापान, जेवण यावरच अधिक खर्च व डामडौल. चर्चाविषय हे निमित्त. साजरं करणं हे उद्दिष्ट्य आणि त्यानिमित्तानं चर्चेत राहणं आणि जाहिरातीतून महसूल मिळवणं हे प्रमुख वैशिष्ट्य. इथं संपादक हा पूजेच्या मूर्तीसारखा अनिवार्य, पण अस्तित्वानं लहान ठेवला जातो. मालक आणि जाहिरात प्रायोजक यांचं स्थान ज्येष्ठ, श्रेष्ठ, स्वतंत्र, विचारी, प्रगल्भ, अभ्यासू संपादकांनीही बिनबोभाट स्वीकारलंय. यातल्या विरोधाभासावर ते बोलत नाहीत, मात्र जगातील इतर सर्व विरोधाभास, गुलामी, चापलूसी, मालकी यावर सडेतोड भाष्य करत राहतात. हा दिव्याखालचा अंधार अधिक लाजिरवाणा आहे.

बाजारपेठेचा, मालकांचा, पर्यायानं जाहिरातदारांचा वरचष्मा कुठल्याही संपादकाच्या चष्म्यातून व्यक्त झालेला दिसत नाही. कारण मग त्या व्यवस्थेबाहेर पडावं लागेल. व्यवस्थेबाहेर पडायचं तर व्यवस्थेनं आजवर दिलेली सुबत्ता आणि स्थिरता यावर पाणी सोडावं लागेल. आणि आजचा काळ काही स्वत:च्या वतर्णुकीनं आदर्श निर्माण करण्याचा नाही. तर आपण जी वर्तणूक करतो, तो तत्त्व आणि व्यवहार, पर्यायानं बाजार यातला सुवर्णमध्ये कसा आहे व तोच आदर्श आहे, हे बिंबवलं जातं. जे अशा व्यवस्थेला शरण येत नाहीत, त्यांना भाबडे समाजवादी किंवा पोथिनिष्ठ कम्युनिस्ट, अतिरेकी पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी अशी शेलकी विशेषणं लावून बेदखल करण्याची सामूहिक खेळी खेळली जाते.

जगभरच्या हुकूमशाहीवर भरभरून लिहिणारे स्वत:च्या मर्यादित अधिकारात लेख, वाचकांची पत्रं सोयीनं दडपून टाकतात. काही व्यक्ती\संस्था\विचारधारा व्यक्तिगत आकसाचे, तुच्छतेचे विषय म्हणून आपल्या १२\१६ पानी साम्राज्यात लक्षपूर्वक टाळणारे संपादक समतोल, पारदर्शी कसे? त्यामुळे आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्यावर आपल्या पानांमधून भाष्य करताना अनेक वर्तमानपत्रं स्वत:च्या लोकप्रियतेचा वरवंटा अनेकांवर फिरवत असतात!

वर्तमानपत्रांतर्गत बढत्या, बदल्या आणि संपादकाच्या खुर्चीसाठी राजकारणी, उद्योगपतींची मदत हे काय आता गुपित राहिलेलं नाही. त्याप्रमाणेच जगाला तारतम्य शिकवणारे कुणा राजकीय व्यक्तीच्या पिताश्रींचं चरित्र लिहिण्यात कमीपणा मानत नाहीत. वर्तमानपत्रांतून जशा वाचक चळवळी चालवल्या गेल्या, त्याप्रमाणेच रविवार पुरवण्या आणि मराठी प्रकाश यांचं श्रीखंड-पुरीचं नातंही सर्वदूर माहितीय. त्यामुळे माध्यमांचं ऱ्हासपर्व आत्ताच नाहीतर, ते पूर्वीपासूनच आहे. आता त्याची जाहीर वाच्यता होते किंवा माध्यमंच स्वत:च्या बाजारी स्वरूपाचं ‘नवं युग’ म्हणून समर्थन करत करतात.

आजही अनेक वर्तमानपत्रं जाहिरातवजा मजकूर जाहिरात न लिहिता छापतात. बोरीबंदरच्या सुप्रसिद्ध म्हातारीनं तर चटकदार पुरवण्यांच्या पानावरील मजकुराचं दरपत्रकच ठरवलंय! त्यामुळे एकाच चित्रपटाचं परीक्षण ‘वाईट चित्रपट’ म्हणून छापलं जातं आणि त्याच वर्तमानपत्राच्या चटकदार पुरवणीत पैसे भरून ‘उत्कृष्ट चित्रपट’ म्हणून त्याच चित्रपटाची वाहव्वा करता येते. इतकी व्यावसायिक भ्रष्टता ठासून भरलेली असूनही, हे लोकशाहीचे चौथे खांब नैतिक, विचारी, प्रबोधन, परिवर्तनवादी वगैरे वगैरे!

महिलांच्या बाबतीत देवी आणि दासी या दोन ध्रुवात आजची वर्तमानपत्रं फिरत असतात. एका बाजूनं दुर्गा, नवदुर्गा, अशी विशिष्ट धार्मिक प्रतिमा उजागर करायची आणि दुसऱ्या बाजूनं सणवार उपासतापास, वारानुसार रंग, साडी, स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करणारे पारंपरिक खेळ उत्सवी स्वरूपात सादर करायचे. स्त्री-समानतावाल्यांना हे विचारणार ‘तुम्हाला पुरुषांची बरोबरी करून पुरुष व्हायचंय काय?’ आणि हे नऊवारी नेसवून फेटे बांधून, बायकांना घोडे किंवा स्कुटरीवर ‘मर्दानी’ म्हणून वाजतगाजत फिरवणार, नाकातल्या नथीसह!

आजची वर्तमानपत्रं किती विरोधाभासात प्रकाशित होतात! पहिल्या पानावर ध्वनिप्रदूषणावरचा न्यायालयाचा निकाल छापायचा, संपादकियात त्याचं समर्थन करायचं आणि रंगीत पुरवणीत ‘उत्सव दणक्यात करू या’ म्हणून सचित्र लेख छापायचा! राजकीय बातम्या पहिल्या पानावरून आतल्या पानात आणि आतल्या पानातून थेट गायब हे प्रकार तर नित्याचेच. याशिवाय सुपारीबाज प्रतिनिधींवर आपला प्राईझ टॅग दाखवायचा बाकी ठेवतात. करमणूक, उद्योग, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांतली बातमीदारी आता थेट टक्केवारीत आलीय. जे या हमामात नाहीत, त्यांनाच नग्नतेची अधिक लाज वाटते. आणि अशांची संख्या कमी होतेय हे वास्तव आहे.

वृत्तवाहिन्या तर सर्व प्रकारच्या भ्रष्टतेचं आगारच. इथली पत्रकारिता जन्मापासूनच विक्रीमूल्य घेऊन आलेली. कारण या प्रचंड भांडवली उद्योगात उतरलेले मालक, चालक, समूह यांना त्यांच्या दृश्यरूपाची ‘किंमत’ फार लवकर कळली. तशीच ती काही राजकारणी व उद्योगपतींनाही. जाहिरात उद्योगासाठी तर हे हक्काचं पाणलोट क्षेत्र झालं. कारण वर्तमानपत्री जाहिरातींपेक्षा दृश्य जाहिरातीचा परिणाम हजारो टक्के. आणि त्यात जागतिकीकरणानंतर तर अंतर्वस्त्रापासून कंडोमपर्यंत सर्वच क्षेत्रं खुली झाली. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अक्षर साक्षरता जिथं अजून रुजतेय, तिथं दृश्य साक्षरता तर अजून पाळण्यातच कूस बदलायची धडपड करतेय. भारतीय प्रेक्षकांचं (दृश्य माध्यम) मानसिक वय चार ते सहा वर्षांच्या मुलाइतक असतं, असं एक सर्वेक्षण आहे. मालिकांच्या टीआरपीनं ते सप्रमाण सिद्धही केलंय.

यात वृत्तवाहिन्यांचा जन्म आणखी अलीकडचा. त्यामुळे त्यांना वेळ (पर्यायानं बातमी) विकण्याचं बाळकडू पाळण्यातच मिळालं. निवडणुका, सण, क्रिकेट, सिनेमे हे त्यांच्या कमाईचे व लोकप्रियतेचे मूलभूत घटक. ही क्षेत्रं माध्यमांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडवतात! तुमची ऐपत काय, त्याप्रमाणे तुम्हाला न्याय (बातमी!) मिळेल. वर्तमानपत्रांप्रमाणे वाहिन्यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कल सहज लक्षात येतो. पण याचा कहर झाला २०१४नंतर. गेली तीन वर्षं वृत्तवाहिन्या कोमात होत्या, तर काहींनी सत्ताधाऱ्यांचे सलाईन चोवीस लावून ठेवलं होतं. आता लोकांमधून प्रक्षोभ दिसू लागला, तशा या वाहिन्या जनाची नाही पण मनाची लाज वाटून थोड्याफार सरकार विरोधी सूर लावू लागल्यात. पण यातून कधी नव्हे ती मीडियाची होलसेल विक्री अगदी सर्वसामान्य माणसालाही जाणवली. राजकीय पक्षांनीही लाजेनं मान खाली घालावी असा माध्यमांचा बैलबाजार गेल्या तीन वर्षांत आपण सर्वांनीच अनुभवला.

काही काळ पुनरुज्जीवनवाद्यांच्या दहशतीचं कारण पद्धतशीर पुढे आणलं गेलं. हा पुनरुज्जीवनवादही एका परीनं माध्यमांनीच वाढवला. त्यांनी आपली संविधानिक जबाबदारी पार न पाडता स्वत:तल्या छुप्या मनोवृत्तींना काही काळ मोकळं केलं. या पर्वात भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडले.

माध्यमांच्या या पसाऱ्यात देशभर नजर टाकली तर शंभरातले ९९ आक्रमक, व्यक्तिकेंद्री, हम करे सो कायदा, आम्ही म्हणू ती नैतिकता, आम्ही मांडू तो प्रश्न आणि आम्ही शोधू तेच उत्तर अशा दर्पात आहेत. इंग्रजी वृत्तवाहिन्या तर अभिजनांच्या ताटातलं मांजर. अभिजनांची राजकीय तुच्छता किंवा तितकीच लंपटगिरी याचं उत्तम मिश्रण या वाहिन्यांत दिसतं. तर हिंदी भाषिक वाहिन्या सनसनाटी सोबत भूत, प्रेत, आत्मा, विनाश, प्रलय याच्या ‘चांदोबा’ला मागे टाकतील अशा कहाण्या दाखवत राहतात.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मराठी वृत्तवाहिन्यांवरही अजून भावगीतांना बाजारमूल्य आहे, तसंच देवीदर्शनाचं झटपट पर्यटन आहे. २० रुपयात पाच वस्तू खरेदीची सेलिब्रेटींची लाडं लाडं खरेदी आहे. त्यांच्या घरच्या गौरी गणपती, दिवाळी, मराठी गरबा, मराठी दहीहंडी, मराठी होळी या बाजारबुणग्या उत्सवप्रियतेला हटकलं की, तुम्ही आपोआपच हिंदूविरोधी किंवा तथाकतित सेक्युलर ठरता. पण ना कधी सेलिब्रेटींचं वाचनप्रेम दाखवलं जात, ना त्यांची विज्ञाननिष्ठ भूमिका किंवा विचारपूर्वक झुगारलेली एखादी अंधश्रद्धा. वैचारिक, मनाची मशागत करणारे कार्यक्रम नसतातच. कारण जडत्व नको. हलकंफुलकं हवं. नवं मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र असं सांगतं की, वाढत्या मुलासोबत आपण त्याच्यासारखं बोबडं बोलू नये. आपण नीटच उच्चार करावेत म्हणजे मूल लवकर आत्मसात करेल. हाच नियम सर्व प्रकारच्या वाहिन्यांना केव्हा कळणार आहे?

शेवटी या सगळ्यापासून वेगळा पण महत्त्वाचा एक मुद्दा मांडायचा आहे. आज या माध्यमांतून विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर स्त्रिया काम करताहेत. आजच्या सर्वच क्षेत्रातलं क्रियाशील वय ३५च्या आतलं आहे. फार तर चाळीस. सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर स्त्री कार्यरत असल्यानं स्त्री-पुरुष संबंध, मैत्री, लिंगभाव, लैंगिकता, लग्न, कुटुंब याची पारंपरिक परिमाणं मागे पडताहेत. कामाचे अडनिडे तास, प्रचंड स्पर्धा, मोठाली टार्गेट्स यामुळे स्त्रियांमध्येही धुम्रपान, मद्यपान यांचं प्रमाण व्यसनाधीन होईपर्यंत वाढलंय. घटस्फोट, आत्महत्यांचं प्रमाणही वाढतं आहे.

माध्यमातल्या भांडवली मोकळीकीमुळे लैंगिकता व लैंगिक वर्तनाचे नवे प्रश्न उभे राहताहेत. स्त्रीचं मोकळं होणं म्हणजे सर्व गोष्टींना संमती गृहित धरलं जाणं, असा या मोकळिकीचा गैरअर्थ काढून गैरप्रकार करणं, पुरुषी मानसिकता न बदलणं हे ‘तहलका’च्या उघडकीस आलेल्या एका प्रकरणातून कळलं, पण ते हिमनगाचं टोक आहे. माध्यमांमधलं स्त्री कर्मचाऱ्यांचं शोषण हा विवाहातंर्गत बलात्काराइतकंच म्हटलं तर आतला म्हटलं तर चावडीवरचा विषय आहे.

माध्यमांच्या ऱ्हासपर्वात हे वर्तनही नोंद घ्यावी असं आहे. कारण पारंपरिक नैतिकता आणि बाजारी स्वातंत्र्य या सापटीत आवाज उठवणारं बोट सापडलंय किंवा ते जाणीवपूर्वक तिथं ठेवलंय.

मूळ ध्येयापासून बाजूला गेलो की, मग अंतर फुटाचं की मैलाचं हा प्रश्न गैरलागू ठरतो!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.