टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रमेश शिंदे आणि कानपूर शहरातील पोस्टर
  • Mon , 16 October 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya सोशल मीडिया ट्रोलर रमेश शिंदे राजनाथ सिंह संजय राऊत किम जोंग उन

१. डोकलाम वादावेळी चीनला भारताची ताकद समजली आहे. आता दोन्ही देशांमध्ये कोणताच वाद नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. आपल्या मतदारसंघाच्या (लखनऊ) दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. सिक्किम सेक्टर येथील सीमेवर भारत आणि चीनचे सैनिक दोन महिन्यांहून अधिक काळ एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावरून दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नंतर चीनने माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. चीनबरोबरील आमचा वाद संपुष्टात आला आहे. त्यांना भारताची ताकद समजल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे आम्ही प्रत्येकवेळी ५ ते १० दहशतवाद्यांना यमसदनास धाडत आहोत. भारत आता दुबळा देश नाही, असे ते म्हणाले.

तरीच चीनमधून हास्याचे गडगडाट ऐकू येतायत मुंबईपर्यंत... इथल्या लोकांना उगाच वाटतंय विजा कडकडतायत आणि ढग गडगडतायत... काही म्हणा, भारतात तोंडच्या वाफेची ताकद मात्र २०१४पासूनच निर्माण झाली आहे आणि वावदूक बडबडीच्या बाबतीत आता जीभ दुबळी राहिलेली नाही, हे खरंच आहे. नाहीतर देशाचे गृहमंत्री दहशतवादी हल्ले किती झाले, किती जवान मृत्युमुखी पडले, आधी किती मरण पावले होते, याची आकडेवारी गुंडाळून ठेवून ‘दरवेळी पाच ते दहा दहशतवादी यमसदनी धाडतो’ असलं काहीतरी गोलमाल बडबडताना दिसले असते का?

.............................................................................................................................................

२. एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्यामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील या अंगरक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सोशल मीडियावर राजवटीविरोधात लिखाण केल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्याच्या निलंबनाची ही पहिलीच घटना असावी. शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅपवरून मोदींविरोधातील लिखाणाचा मजकूर अनेक ग्रूपवर पाठवल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. मोदीविरोधातील मॅसेज शिंदे यांच्या मोबाईलवरून व्हायरल झाल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही एक पोस्ट केली होती. त्यावेळी त्यांना समज देण्यात आली होती. तरीदेखील शिंदे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिखाण केले, अशी तक्रार संगमनेरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर सायबर विभागाकडे केली होती.

पोलिस दलातीलच नव्हे, तर अनेक सरकारी खात्यांमधील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑर्डर्ली म्हणून म्हणजे घरकामगार म्हणून राबवून घेतले जातात. सरकारी कर्मचाऱ्यांची निष्ठा त्यांच्या कामाच्या, सरकारी यंत्रणेच्या आणि जनहिताच्या प्रति असली पाहिजे, ती दर पाच वर्षांनी बदलणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या प्रति असली पाहिजे, ही अपेक्षा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना घरकामगार समजण्यासारखंच आहे. मोदी किंवा फडणवीस यांच्याविरोधातल्या व्यक्तिगत मतांचा परिणाम कर्मचाऱ्याच्या कामकाजावर होत असेल, तरच त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असावा. उद्या एखादा कर्मचारी चार मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात बोलला, तरी त्याचं निलंबन होईल.

.............................................................................................................................................

३. सोशल मीडियाबाबत केंद्र सरकार कठोर कायदे आणणार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. देशात तालिबानी राजवट येत आहे का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांची मनं कलुषित करून सत्तेवर येणाऱ्या भाजपवर हे अस्त्र उलटले असून आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सायबर सेलचे अधिकारी हे भाजपचे एजंट असल्याचा आरोपच त्यांनी केला. दरम्यान, ‘समाजमाध्यमांपासून जपून राहा,’ असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर काही दिवसांतच भाजपची मातृसंस्था असलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या कार्यकर्त्यांनीही हळूहळू या माध्यमांतून मोदी प्रचाराचा आक्रमक पवित्रा आवरता घेण्यास सुरुवात केली आहे. मोदीविरोधकांचा आक्रमक प्रचार आणि समर्थकांची आक्रमक प्रत्युत्तरे यांमुळे समाजात वैचारिक वैर वाढत असल्याने संघ स्वयंसेवकांनी मोदीविरोधी प्रचाराला प्रत्युत्तर देण्यापासून दूर राहावे, असा संदेश संघ कार्यकर्त्यांच्या वर्तुळात समाजमाध्यमांद्वारेच फिरू लागला आहे.

समाजमाध्यमांतून मोकाट सोडलेला भेसूर उन्मादाचा भस्मासूर उलटू लागल्याचीच ही सगळी लक्षणं आहेत. पण, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गयी खेत? खुद्द पंतप्रधानच समाजमाध्यमकंटकांचे फॉलोअर असल्याने गेलेला संदेश आता परत फिरू शकत नाही. या टोळ्या आता नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. त्यांना उन्मादाची नशा चढली आहे. आता त्या नशेला अटकाव करणाऱ्या कोणालाही ते सोडणार नाहीत. बाकी विरोधी मत व्यक्त केल्यावर हिंस्त्र हल्ले चढवणाऱ्या शिवसेनेने आणि राऊतांनी तालिबान वगैरे शब्द वापरणं मौजेचं आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केल्याचं आणि त्यांचे कान उपटल्याचं नेहमीचं यशस्वी नाटक करणाऱ्या अमेरिकेने पुन्हा पाकच्या गळ्यात गळे घातले आहेत. ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ या आशयाचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यावर ‘त्वरा करा मोदीजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  पुन्हा एकदा गळाभेट घ्या’ अशा आशयाचं उपहासात्मक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेची नेमकी भूमिका काय आहे आणि अमेरिकेचं पाकिस्तानप्रेम कधीही का संपुष्टात येणार नाही, याची पुरेपूर कल्पना राहुल गांधी यांनाही असेलच. मात्र, आपण कसे आंतरराष्ट्रीय नेते झालो आहोत, जगातले सगळे नेते कसे व्यक्तिगत मित्रच बनले आहेत, याचा देखावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकंदर वर्तनशैलीने ही टीका ओढवून घेतली आहे खरी. ते हल्ली बरेच फुलटॉस वाटत सुटलेले दिसतात, त्यातला हा एक.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशी करणे उत्तर प्रदेशच्या व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. कानपूरमधील २३ व्यापाऱ्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या व्यापाऱ्यांनी मोदींची किमशी तुलना करणारे बॅनर आणि होर्डिंग्ज संपूर्ण कानपूर शहरात लावले होते. १० रुपयांची नाणी बँका स्वीकारत नाहीत, याचा विरोध दर्शवण्यासाठी १२ ऑक्टोबरला हे पोस्टर लावण्यात आले होते. या होर्डिंग्जवर एका बाजूला हुकूमशहा किमचा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली, मी संपूर्ण जगाला संपवून टाकेन अशी ओळ आहे. दुसऱ्या बाजूला मोदींचा फोटो लावण्यात आला असून, त्याखाली मी व्यापाऱ्यांना संपवून टाकेन अशी ओळ लिहिली आहे.

चला, म्हणजे व्यापाऱ्यांना संपवून टाकण्याच्या कामाला एका प्रकारे सुरुवातच झाली म्हणायची! जनतेकडून होणाऱ्या टीकेच्या बाबतीत इतके अनावश्यक संवेदनशील असलेले सत्ताधारी लवकर सत्तेतून पायउतार होतात. जनतेच्या तथाकथित हितासाठी का होईना काही जालिम निर्णय घेतल्यानंतर जनतेतून प्रतिक्रिया उमटतेच. ती समजून घेऊन आपली बाजू शांतपणे पटवून द्यावी लागते. हुकूमशाही खाक्या चालत नाही, हे विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडलेलं नाही. व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती, ती व्यापाऱ्यांचा कर्दनकाळ अशी झाली आहे, यावर विचार करण्याऐवजी टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकणं हे शेंडीला मलम लावण्यासारखं आहे. अर्थात उत्तर प्रदेशात वेगळं काही अपेक्षितही नाही म्हणा.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.