टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नारायण राणे आणि पृथ्वीराज चव्हाण
  • Tue , 26 September 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya राहुल गांधी Rahul Gandhi अरुण जेटली Arun Jaitley नारायण राणे Narayan Rane पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan नरेंद्र मोदी Narendra Modi

१. भारताच्या जनतेनं आपल्याला भरभरून दिलं आहे. केंद्र सरकारसह अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. सत्तेचा उपयोग सुखासाठी नाही तर जनसेवेसाठी करायचा आहे, असा मंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, लोकांना भेटावं, गरिबांचं कल्याण करणं हे आपल्या सरकारचं लक्ष्य आहे. ‘मुद्रा योजना’ असो, ‘जनधन योजना’ असो किंवा ‘उज्ज्वला योजना’ ज्या योजनांमुळे गरीबांचं कल्याण होतं, त्या सगळ्या मला समाधान देतात, असंही पंतप्रधानांनी म्हटल्याचं जेटली यांनी सांगितलं.

अरेच्चा, पण, पक्षाच्या निरलस, निरपेक्ष, फकिरी वृत्तीच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालचं सरकार येऊन तीन वर्षं झाल्यानंतर त्यांना हे का सांगावंसं वाटतंय? सामान्य जनतेला तर गेली तीन वर्षं देशात निव्वळ सेवाभावी रामराज्यच अवतरल्याचं जाणवतं आहे. दिवसाला चार सूट आणि महिन्यातून दोन-पाच परदेशवाऱ्या (त्याही संपूर्णपणे देशहितासाठी) एवढ्याच लौकिक गरजा असलेले आणि सदासर्वकाळ केवळ गरिबांच्याच हिताचा विचार करणारे पंतप्रधान देशाला पहिल्यांदाच लाभले आहेत.

.............................................................................................................................................

२. पाकिस्तानबरोबर भारताला मैत्रीपूर्ण संबंध हवे होते, म्हणूनच पंतप्रधानांनी शिष्टाचार मोडून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती; एवढंच नाही तर दहशतवादाचा बिमोड करणे ही प्रत्येक देशाची प्राथमिकता असली पाहिजे हे उद्दिष्ट जगभरात पोहचवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे देखील पंतप्रधानांच्या धोरणामुळे स्पष्ट झालं. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नोटबंदी कशी यशस्वी झाली, हे सांगण्यासाठी एकाच मजकुराची ट्वीट सगळ्या मंत्र्यांनी केली होती. त्यापेक्षा ही बरीच बरी परिस्थिती आहे. प्रत्येक मंत्री निदान वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तरी बोलतो आहे. गडकरी हे सगळं बोलत असताना मनोमन काय बोलत असतील, याची कल्पना त्यांना ओळखणाऱ्यांना येत असेल. एकीकडे पाकिस्तान हा कसा दहशतवादी देश आहे, हे जगापुढे आणल्याचा (जणू जगाला तो साधुसंतांचा देशच वाटत होता आधी) दावा करायचा आणि तिथे आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींचे व्यवसाय सुरळीत करून देण्यासाठी बिर्याणी खायला उतरायचं, हे मैत्रीपूर्ण संबंधांचं व्यापक धोरणही जगजाहीरच आहे की नितीनजी!

.............................................................................................................................................

३. नारायण राणे यांना भाजपच्या विचारधारेनुसार काम करणं शक्य असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत जरूर विचार केला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया सोमवारी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली. नारायण राणे यांना भाजपच्या विचारधारेवर विश्वास आहे का? भाजपच्या पद्धतीनं काम करणं त्यांना शक्य आहे का? तसं असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अमित शहाच घेतील, असं सरोज पांडे यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी सांगितलं.

राणेंना आता विचारलं, तर ते ‘मित्रों, मैं बचपन से कमल खिलाना चाहता था,’ असं म्हणायलाही तयार होतील. भाजपच्या प्रभारींची वक्तव्यं ऐकल्यानंतर राणे यांना आपण चुकून काँग्रेसच्या प्रभारींचंच बोलणं ऐकत आहोत, असा भास झाल्यास त्यात त्यांचा दोष नसेल. भाजपच्या विचारधारेत फिट बसण्यासाठी ते आता शाकाहारीही बनतील किंवा आपण मुळातच शाकाहारीच आहोत, असा दावाही करायला तयार होतील, अशी परिस्थिती आहे.

.............................................................................................................................................

४. भारतात घराणेशाही आहेच आणि भारतात घराणेशाहीचंच चलन आहे, अशा आशयाचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेत केलेलं वक्तव्य अजूनही भारतीय जनता पक्षाच्या टीकेचे धनी होत आहे. आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो. मात्र काँग्रेसमध्ये घराणेशाहीला स्थान दिलं जातं. भाजपचा कामगिरीवर, तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे,’ अशा शब्दांमध्ये शहा यांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा उत्तर दिलं. अमित शहांसोबतच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधींवर टीका केली.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यात किंवा एकंदरच अमेरिकेतल्या भाषणांमध्ये भाजपनं इतका काळ दखल घेण्यासारखं इतकं काय आहे, असा प्रश्न पक्क्या काँग्रेसींनाही पडला असेल. भारतीय जनता पक्षाच्या राज्याराज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जुन्या नेत्यांच्या पुत्रपौत्रांचा भरणा आहे, हे शहा यांना ठाऊक नाही की काय? यांनी बाहेरच्या पक्षातलेही घराणेशहा घाऊक प्रमाणात आयात केलेले आहेत आणि गफ्फा कामगिरीच्या मारतायत.

.............................................................................................................................................

५. इतकी वर्षं पक्षात राहूनही राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नसल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणेंना लगावला. पक्षाकडे मी पद मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला हे पद दिलं होतं, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. राणेंना काँग्रेसची संस्कृतीच समजली नाही. काँग्रेसमध्ये कोणाला मंत्री करायचं, कोणाला काय पद द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष, त्यांचे सल्लागार, त्यावेळचे पक्षाचे सरचिटणीस अँटोनी यांच्या बैठकीत हे ठरलं, त्यामुळे माझं पद बदललं हा त्यांचा आरोप चुकीचा आहे, असं सांगत मला श्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदी नेमल्याचं त्यांनी म्हटलं.

पृथ्वीराज बाबांनी आपल्याही नकळत काँग्रेसच्या संस्कृतीचं जे दर्शन घडवलं आहे, ते पाहता बसता-उठता लोकशाहीचा राग आळवणाऱ्या या पक्षामध्ये कशा प्रकारे हुकूमशाही चालते, याचंच दर्शन घडतं. पक्षश्रेष्ठ सल्लागारांच्या मसलतीनं नेता निवडतात, खुद्द त्या नेत्यालाही आपली निवड झाल्याचं माहिती नसतं, पक्षाच्या आमदारांनी फक्त या निवडीवर तथाकथित लोकशाही निवडीचं शिक्कामोर्तब करायचं असतं, हीच काँग्रेसची तथाकथित संस्कृती असेल, तर ती फारशी भूषणावह नाही, हे चव्हाणांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या आता तरी लक्षात आलेलं आहे का?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.