टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, कमल हासन, पद्मावती, नरेंद्र मोदी, शरद पवार आणि राज ठाकरे
  • Sat , 23 September 2017
  • विनोदनामा टपल्या अरविंद केजरीवाल कमल हासन पद्मावती नरेंद्र मोदी शरद पवार राज ठाकरे

१. भाजपच्या आधी सत्तेवर असलेल्या सरकारनं सरकारी तिजोरीचा उपयोग विकासासाठी नाही, तर निवडणुका जिंकण्यासाठी केला. ‘विकास’ हा शब्दच आधीच्या सरकारला आणि विरोधकांना आवडत नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला. शुक्रवारी वाराणसीत झालेल्या सभेत त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांचं लोकार्पण, तसंच काही प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. ‘विकास साधून आम्हाला गरिबांचा उद्धार करायचा आहे. प्रत्येक गरीब माणूस जे स्वप्न पाहतो ते पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. देशातील तळागाळातल्या घटकांपासून सगळ्याच घटकांचा विकास व्हावा. २० ते २५ वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’ असंही मोदी म्हणाले.

मोदी साहेब, रेकॉर्ड किमान पलटी तरी करा, घासून घासून झिजली आता ती. आधीच्या सरकारनं सुरू केलेल्या आणि काही पूर्णत्वाच्या टप्प्यापर्यंत आणलेल्या योजनाच पूर्ण करून त्या आपणच जन्माला घातल्याच्या थाटात फोटो काढून घेणं, याला प्रचार म्हणतात, विकास नव्हे. तुमच्या सरकारचा सगळा भर या प्रचारावरच दिसतो. आधार कार्डापासून जीएसटीपर्यंत आधी कडाडून विरोध केलेल्या आधीच्या सरकारच्या योजनाच तुम्ही पूर्ण केल्या आहेत. नोटाबंदी, शेतकरीद्रोही धोरणं आणि बीफ बॅनमधून गरीब माणसाला भिकेला लावून त्याचा विकास करत असल्याच्या गफ्फा ऐकून लोकही कंटाळलेत. किमान भाषण तरी बदला. असंही तेच तुम्हाला उत्तम जमतं!

.............................................................................................................................................

२. तुमचं बोट धरून राजकारणात आलो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर महिनाभर दिल्लीला जाण्याचं टाळलं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदींना चिमटा काढला. गेल्या वर्षी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी पवारांची स्तुती करताना, आपल्याला पवारांनी बोट धरून राजकारणात चालायला शिकवलं, असं केलं होतं. पवार म्हणाले की, माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे. राजकीय निर्णय घेताना स्वच्छ भूमिका हवी. तसंच प्रशासन चालवताना तुम्ही राज्याचं किंवा देशाचं प्रतिनिधित्व करत असता हे सूत्र लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज चौहान यांचं कौतुक करताना पवार म्हणाले, ‘चौहान यांनी चांगलं काम केल्यामुळे त्यांच्या राज्यातील गहू- तांदूळ उत्पादनात वाढ झाली. त्यांनी मध्य प्रदेशाला पंजाब-हरयाणाच्यापुढे नेऊन ठेवलं. तर छत्तीसगड आणि गुजरातचे उत्पादनदेखील वाढलं आहे. या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा समज करून घेऊ नये,’ असंही पवारांनी आवर्जून सांगितलं.

पवारांबद्दल लोक गैरसमज करून घेतात, असा त्यांचा दावा आहे. ते का करून घेऊ नयेत, असा प्रश्न त्यांचं हे भाषण वाचणाऱ्यालाही पडणार नाही का? साक्षात् पवारांनी धास्ती घेतली म्हणजे मोदींना मानायलाच हवं. मोदींना आपल्याशी काही संबंध जोडू न देण्याबद्दल इतके काटेकोर असलेले पवार त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करतात. त्यांनी मध्य प्रदेशाला धान्योत्पादनात पुढे नेलं, असं सांगतात आणि यात भाजपचा मुख्यमंत्री असल्याचा काही वाटा नाही, असंही त्याच दमात म्हणतात, तेव्हा ऐकणाऱ्यांचं भिरभिरं होतं आणि ते कुठलातरी एक मुद्दा धरून त्या बाजूनं पवारांकडे पाहतात. त्यात त्यांचा काय दोष? असा गूढरम्य एनिग्मा बनून राहण्याचं पवारांचं धोरणच नाही का?

.............................................................................................................................................

३. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिनेता कमल हासन हे दोघेही ‘झीरो’ आहेत. या दोघांच्या भेटीला काहीही अर्थ नाही, अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. दोन शून्यांची भेट होऊन काहीही उपयोग होणार नाही असंही त्यांनी म्हटलं. कमल हासननं आधी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली होती. या भेटीनंतर केजरीवाल यांनी कमलच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. दोन शून्यांची बेरीज केली तरीही उत्तर शून्यच येतं हे आपण शिकलो आहोत, असा टोला स्वामी यांनी लगावला आहे. एवढंच नाही, तर अभिनेत्यांना राजकारणात यायची गरजच काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

अनेक पक्षांच्या मांडवाखालून गेलेल्या अतिबुद्धिमान स्वामींना भाजपच्या टिपिकल वृत्तीची लागण झालेली दिसते. एखाद्याला बिनमहत्त्वाचं म्हणायचं आणि तो कसा बिनमहत्त्वाचा आहे, हे सांगायला महत्त्वाची, इतर कामधंदे असलेली मंडळी चर्चेत उतरवायची, ही ती मानभावी वृत्ती. कमल आणि केजरीवाल हे दोघेही शून्यच असतील, तर लाखमोलाच्या स्वामींनी त्यांच्या भेटीची दखल घेण्याचं कारण काय? केजरीवालांनी आधीचं सगळं आततायी धोरण बाजूला टाकून स्वत:ला नव्यानं घडवायला घेतलं आहे. त्यांच्या पक्षानं दिल्लीकरांना दिलेली बहुतेक आश्वासनं पूर्ण केली आहेत. आताची पोटनिवडणूकही जिंकली आहे. त्यांच्या पक्षानं भाजपला दिल्लीत केवढ्या मोठ्या फरकानं पराजित केलं, ते स्वामी विसरले की काय? शिवाय आजवर जिथं पाय रोवता आला नाही, त्या तामीळनाडूत अम्माविना पोरक्या एआयडीएमकेचा घास घेऊन शिरकाव करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना एकटा कमल हासन सुरुंग लावू शकतो, हेही त्यांना नीटच माहिती आहे. ज्या पक्षानं असंख्य नटनट्यांना थेट खासदार आणि मंत्री बनवलं, त्यात राहून स्वामींनी अभिनेत्यांच्या राजकारणप्रवेशाबद्दल लांब जीभ करून बोलावं, हे त्यांच्या थोर बुद्धिमत्तेला साजेसंच आहे.

.............................................................................................................................................

४. राजकारणाच्या पिचवर फारसं यश मिळत नसलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं फेसबुकवरील पाऊल जबरदस्त हिट ठरलं आहे. राज यांच्या फेसबुक पेजला तब्बल पाच लाखांवर लाइक्स मिळाले असून काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ५ लाख १३ हजारांवर पोहोचली आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक हे उत्तम माध्यम आहे, अशी पावती देत राज ठाकरे यांनी कालच 'राज ठाकरे ऑफिशियल' हे फेसबुक पेज थाटामाटात सुरू केलं. या पेजच्या उद्घाटनाच्या भाषणात राज यांनी भाजप आणि दाऊद कनेक्शनचा सनसनाटी आरोप करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. राज यांच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम लाइव्ह होता आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. राज यांच्या या भाषणाचा एक तासाचा संपूर्ण व्हिडिओ या पेजवर उपलब्ध असून आतापर्यंत २ लाख ७६ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी ४ हजारावर लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून राज यांचं फेसबुकवर स्वागत करणाऱ्या आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या कॉमेंट्सचाही पाऊसच या पेजवर पडला आहे.

ही बातमी वाचून लाखो फेसबुककर गालातल्या गालात हसत असतील. इथं कोणाही सोम्या-गोम्या-हौशा-नवशाच्या पोस्टींना असाच दणदणीत वगैरे प्रतिसाद मिळतो आणि लाइक करणाऱ्यानं सवय म्हणून लाइक केलंय, मजकूर वाचलेलाच नाही, हे त्याच्या नंतर लक्षात येतं. इथलं जग आभासी आणि लाइक्स तर त्याहून आभासी. शिवाय फेक अकाउंट्सचा सुळसुळाट. जिथं पंतप्रधानांच्या फॉलोअर्समध्ये दीड कोटी थेट बनावट अकाउंट असतात, तिथं हा प्रतिसाद ताकाप्रमाणेच फुंकून प्यायला हवा. अर्थात, राज यांना थेट जनतेशी संपर्क साधण्याची हातोटी साधलेली आहे, त्यांचा सोशल मीडियावरचा प्रवेश त्या अर्थानं आवश्यक होता, तो संवादाच्या पातळीवर आला तर लाभदायक ठरेल, यात शंका नाही.

.............................................................................................................................................

५. 'पद्मावती' या बहुचर्चित सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत, तोच राजपूत समुदायानं विरोधाचे सूर छेडले आहेत. निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळीनं राणी पद्मावतीबाबतच्या इतिहासाशी छेडछाड केली, तर आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा श्री राजपूत करणी सेनेनं दिला आहे. २० दिवसांपूर्वी भन्साळी यांच्या एका सहकाऱ्यानं आम्हाला फोन केला होता आणि हा चित्रपट पाहण्यासाठी बोलावलं होतं. परंतु, हा सिनेमा इतिहासतज्ज्ञांना, जाणकारांना दाखवा आणि त्यांचं मत जाणून घ्या, असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, अशी माहिती सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह काल्वी यांनी दिली. जानेवारी महिन्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर जाऊन धुडगूस घातला होता. सिनेमात खरा इतिहास दाखवण्यात आला नसल्याचा आक्षेप घेत त्यांनी भन्साळींच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की आणि सेटवरील सामानाची मोडतोड केली होती. १३व्या-१४व्या शतकातील दिल्लीतील खिलजी वंशाचे राज्यकर्ते अल्लाउद्दीन खिलजी यांचं राणी पद्मावतींवर प्रेम होतं, अशी नोंद इतिहासात कुठेही नाही. तसं काही दाखवलं गेलं, तर ते आम्ही सहन करणार नाही, असं काल्वी यांनी बजावलं.

भन्साळी यांच्या पुढच्या सिनेमात एखादी विनोदी व्यक्तिरेखा आहे का? तिच्यात काल्वी बहार आणतील. तुम्हाला इतिहास कळत नाही, सिनेमा इतिहासतज्ज्ञांनी पाहून निर्वाळा द्यायचाय ना, मग इतके दिवस, सिनेमात काय आहे, हे माहिती नसताना धुडगूस घालून फुटेज कसलं खात होता? इतिहासात पद्मावतीचीही नोंद नाही, ती एका काव्यातून जन्मलेली दंतकथा आहे. मग पद्मावतीच्या प्रेमात खिलजी पडला होता की नव्हता, याचीही, तुम्हाला पटेल अशी नोंद इतिहासात कुठून सापडणार? शिवाय तुम्हाला पटणं ना पटणं हे काही वैश्विक महत्त्वाचं नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.