घराणेशाहीपासून जगातला कोणताही माणूस अलग नसतो
पडघम - सांस्कृतिक
किशोर रक्ताटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 18 September 2017
  • पडघम अर्थकारण घराणेशाही Nepotism राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi गांधी घराणं Gandhi Family

‘राजकारण असो, वा उद्योग क्षेत्र, भारतात सर्वच क्षेत्रांच घराणेशाही आहे. हा देशच घराणेशाहीवर चालतो,’ असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात भाषणानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. १२ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी या विद्यापीठात भाषण केले, त्याच्या आधीपासूनच त्यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठली होती. ती ‘घराणेशाही’च्या निमित्ताने मागील पानावरून पुढे चालू राहिली. तो भाजप-संघ यांच्या राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे त्यात आश्चर्य काही नाही. मात्र घराणेशाहीची संकल्पना, तिचे भारतीय पैलू आणि व्यापकता यांची तटस्थपणे चर्चा करणारा हा लेख...

.............................................................................................................................................

घराणेशाहीची पूर्वपीठिका प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली दिसते, परंतु राज्यसंस्थेच्या उदयानंतर राजकीय घराणेशाहीला खऱ्या अर्थानं एक अवास्तव महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं. ‘जागतिक पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत घराणेशाही आहे, परंतु यातून उपस्थित होणारा एक प्रश्न म्हणजे, घराणेशाही चांगली की वाईट? या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज भासते. मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये (राजकारण, कला, क्रीडा, संगीत) घराणेशाही आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव लक्षात घेऊन या गोष्टीचा आपण जास्त बाऊ करू नये किंवा या गोष्टीला अधिक महत्त्व देऊ नये. त्याचबरोबर घराणेशाहीमुळे राजकारणाला खीळ पडेल असेही मानू नये. अर्थात, आपण घराणेशाही स्वीकारलेल्या समाजात राहत आहोत, एवढाच याचा अर्थ आहे. भारताच्या घराणेशाहीची कारणे आपल्या सांस्कृतिक, धार्मिक इतिहासात सापडतात.’ (हर्डीकर विनय; मुलाखत : १० फेब्रुवारी २०१३) 

घराणेशाहीची बीजं शोधताना भारतातील समाजरचनेचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं. भारतात गेल्या दोन हजार वर्षांपासून चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. या वर्ण-जाती-व्यवस्थेमागे खरी घराणेशाहीची बीजं दडलेली दिसून येतात. भारतानं लोकशाहीचा स्वीकार केला नसता, तर देशात प्रत्यक्ष घराणेशाही नांदली असती. मुळात लोकशाही व्यवस्था सर्वांना नेतृत्व करण्याची संधी देत असली, तरी वर्चस्व मात्र घराणेशाहीचंच दिसून येतं.

भारतात प्राचीन काळापासून घराणेशाही अस्तित्वात आहे. घराणेशाहीचा आदिम काळापासून विचार करता, राजन खान म्हणतात, ‘माणसाची जात आदिम काळात सामुदायिकपणे जगू लागली आणि 'सर्वांना अन्न मिळाले पाहिजे', या विचारापर्यंत आली. मिळविलेल्या शिकारी आणि वनस्पती वाटून खाऊ लागली. तेव्हापासून या घराणेशाहीला सुरुवात झाली’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. २६). या प्रतिपादनावरून असं सिद्ध होतं की, घराणेशाहीची पाळंमुळं आधुनिक व्यवस्थेतच नव्हे; तर आदिम व्यवस्थेतही सापडतात. घराणेशाहीच्या मुळाशी माणसा-माणसांमध्ये असलेली 'अन्नाची संकल्पना' आहे. 'आपल्याप्रमाणेच इतरांनाही भूक असते. ती भागवण्यासाठी आपण मदत करायची असते', याची एके काळी आदिम समाजात राहत असलेल्या मानवी समाजाला अजिबात जाणीव नव्हती. स्वत:ची भूक भागवण्यातच समाधान मानणाऱ्याला या मानवाला इतरांच्या भूकेशी काही देणंघेणं नव्हतं. स्वत:ची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याचं अन्न हिसकावून, ओरबाडून, मारामारी करून बळकवण्याची तयारी, यातून येणारं क्रौर्य, होणारी हिंसा आणि दुसऱ्याबद्दल सतत वाटणारा अविश्वास या सर्व अवस्थांमधून मनुष्य कालांतरानं सावरत गेला. माणसानं एकेकटं राहण्यापेक्षा एकत्र येऊन काही केलं, तर जगण्याचे अनेक प्रश्न सुटू शकतात, गरजा भागवणं सोपं होतं आणि पर्यायानं सर्वांनाच जगता येतं, या भावनेतून अन्नाचं वाटप करून जगण्याची प्रथा सुरू झाली. या वाटप पद्धतीनं इतरही गरजा भागवता येऊ शकतात, हे मानव जातीच्या लक्षात येऊ लागलं. यातून मानवाची एक सर्जनशील व्यवस्था बनत गेली. यातूनच मानवी जीवनाविषयीचे आचार, कायदे बनत गेले, असं म्हणता येईल.

तात्पर्य, 'घराणेशाही' हा माणसाचा आदिम काळापासून गुणधर्म आहे. हा गुणधर्म प्रत्येक माणसात कोणत्या ना कोणत्या रूपानं असतोच. माणसाच्या जगण्याच्या हक्कांचे, अधिकारांचे, मालकीचे मुद्दे जिथं येतात तिथं खऱ्या अर्थानं घराणेशाहीचा प्रादुर्भाव होतो. त्याचं स्वरूप वेगळं असलं, तरी जगातील कोणत्याही व्यक्तीला घराणेशाही वर्ज्य नाही. जगण्यासाठीच्या उद्योगात आणि व्यवसायातही घराणेशाही असतेच. राजन खान म्हणतात, ‘घराणेशाहीचा अर्थ आहे तो, माझी सत्ता, माझी मालकी, माझे वर्चस्व. जगण्यातून जे मिळेल ते एकतर सर्वच्या सर्व मला मिळायला हवं आणि तेही इतरांहून जास्त मिळायला हवं’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. २७).

याचाच अर्थ 'सर्व गोष्टींचा उपभोग मलाच मिळाला पाहिजे', अशी एक धारणा रूढ झालेली दिसून येते. आदिम काळात टोळ्या एकत्र राहत असत. कोणत्याही स्त्रीशी कोणताही पुरुष संबंध प्रस्थापित करी आणि त्यांना होणारं अपत्य संपूर्ण टोळीच्या मालकीचं असे. 'टोळीतील सर्वांत जास्त स्त्रिया माझ्या असायला हव्यात' किंवा 'सर्वांत जास्त पुरुष माझे असायला हवेत', हा स्वभाव असेपर्यंत घराणेशाही प्राथमिक स्वरूपात होती, पण पुढे 'माझी स्त्री फक्त माझीच असायला हवी' किंवा 'माझा पुरुष फक्त माझाच असायला हवा आणि आम्हाला होणारी अपत्यं ही फक्त आमचीच असायला हवीत', अशी कुटुंबसंस्थेची पायाभरणी झाली. तेथून खऱ्या अर्थानं घराणेशाहीला आकार यायला लागला.

वंशसातत्याची कल्पना अमलात आली आणि घराणेशाहीचा दुसरा अर्थ जन्माला आला. मात्र या दुसर्‍या अर्थासोबत 'माझी मालकी, मी मोठा, माझ्या वंशाला अधिक मिळायला हवे', असा आधीचा अर्थ होताच. त्यालाच 'माझ्यानंतर माझ्या वंशाची मालकी, माझा वंश मोठा, माझ्या वंशाला जास्त मिळायला हवे', हा दुसरा आणि काळाबरोबर अखंड चालणारा अर्थ मिळाला. कुटुंबव्यवस्था ही समाजातल्या घराणेशाहीची एक प्रकारे वाहक झाली. या विचाराचं मंथन करताना राजन खान म्हणतात, ‘समाजाशिवाय माणसाचं अस्तित्व नाही हे लक्षात घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला समाजाला सामंजस्यानं किंवा संघर्षानं वापरायचं. समाजाला आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी वापरायचं, हे घराणेशाहीचं खरं रूप प्रत्येक माणसात असतंच. जगातील प्रत्येक माणूस घराणेशाहीच्या स्वभावाचा असतो. आणि जगातल्या सर्व माणसांमध्ये एकमेकांत जगण्याची जी स्पर्धा चालते, ती घराणेशाहीची असते.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. २७) यातूनच पुढे असं समोर येतं की, ‘मी’त्वाची भावना असलेला माणूस दिसतो. मला सर्वांत जास्त मिळालं पाहिजे, माझ्या कामी सगळे लोक आले पाहिजेत, अशी भावना प्रत्येक व्यक्तीत बळावताना दिसते. ही भावना घेऊनच व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजात वावरत असते. यातूनच माणूस ‘स्व’केंद्री विचारशील कक्षेमध्ये गुरफटलेला दिसतो. यातूनच पुढे वर्चस्ववादी सत्ताकारणाला सुरुवात झाली, असं म्हणता येईल.

समाजामध्ये एकमेकांशी एकमेकांवर विजय मिळवायची व इतरांना आपल्या कामासाठी वापरून घ्यायचं म्हणजेच घराणेशाहीची स्पर्धा होय. ही अशी स्पर्धा जगातील प्रत्येक माणसाला जीवनभर करावी लागते. त्यासाठी चातुर्याची गरज असते. थोडक्यात, त्याच्याकडे इतरांना मोहित करण्याचं, आकर्षित करण्याचं, ताब्यात ठेवण्याचं आणि तो ताबा अबाधित राखण्याचं, कौशल्य असणं गरजेचं आहे. ज्याला हे चातुर्य जमलं नाही, तो सामान्य माणूस व ज्याला हे तंत्र जमलं, तो असामान्य माणूस! जो अधिकाधिक माणसांवर ताबा मिळवू शकला, तो महान माणूस म्हणून घराणेशाहीच्या इतिहासात ओळखला जातो. याच अनुषंगानं राजन खान म्हणतात, ‘ज्याच्या ताब्यात जितकी माणसं अधिक तो तितका महान आणि समजा तो शरीरानं मेला, तरी मरणानंतरही त्याचा प्रभाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे टिकून राहिला, तर तो जास्तच महान.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. २८) व्यक्तीची महानता, अनन्यसाधारणत्व हे त्याच्या एकूण मानवी सत्तासंघर्षाच्याच भोवती फिरताना दिसतं. आजच्या आधुनिक काळात मानवानं जगण्यासाठी अगणित क्षेत्रं शोधून काढली आहेत. ही सगळी क्षेत्रं माणसाच्या पोटातील भूकेतून आणि आपल्याला अधिक मिळावं, या स्वार्थातून जन्माला आली आहेत आणि विकसित झाली आहेत. थोडक्यात, ती सर्व क्षेत्रं घराणेशाहीच्या माणसातल्या आदिम भावनेतून आकाराला आली आहेत. त्यात मग माणसाच्या जगण्यात येणारी प्रत्येक गोष्ट घराणेशाहीचं प्रतीक ठरते.

समाजात जीवन जगताना माणसाच्या अंगात अनेक वारसे असतात. मानवी जीवनात जगण्याच्या अनेक प्रथा असतात. माणसाला त्याचं शरीरही वारशात मिळालेलं असतं. शरीरानं, मनानं, मेंदूनं तो अनेक वारसे जोपासत असतो. याशिवाय, मानवी जगण्यात अनेक प्रकारच्या प्रथा असतात. त्याचे सामुदायिक वारसेही तो जोपासतो. तसेच, पिढ्यांच्या प्रवासात सामुदायिकपणे वारशात बदल झाला, तर तोही स्वीकारतो. राजन खान म्हणतात, ‘माणसानं अन्न खावं हाही एक वारसा आहे. एकूण माणसाच्या जगण्यातील प्रत्येक कृती जगण्यातलं एकूण क्षेत्र हे वारशातलंच असतं.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. ३१) म्हणजेच माणसानं लावलेले विविध शोध, संशोधन आणि विकासही मागच्या वारशातूनच जन्माला येतात. त्याचा नवा वारसा निर्माण होत जातो. माणसाच्या जगण्यात वारसा पद्धतीपासून काहीही फरक नसते आणि वारसा म्हणजेच घराणेशाही आणि घराणेशाहीपासून जगातला कोणताही माणूस अलग नसतो. माणसाचं जग म्हणजेच घराणेशाहीचा अखंड चालणारा प्रवास, असं प्रतिपादन करणं अधिक संयुक्तिक ठरेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपल्याकडे राजेशाहीचा मोठा इतिहास आहे. आताची लोकशाही आणि पूर्वीची राजेशाही म्हणजे, या दोन्हीतही माणसाचं पोट भरणं आणि संरक्षण या दोन्ही बाबींना अधिक प्राधान्य होतं आणि आहे. इतिहास सांगताना फार लालित्यानं आणि त्यातील निष्ठेच्या आणि निष्ठावानाच्या गप्पा सांगितल्या जातात. घराणेशाहीत तर या निष्ठेच्या गप्पांना फार जोर येतो. तर, निष्ठा हे मूल्य पोट आणि संरक्षणाशी जखडलेलं असतं. उदा. मोगलांनी खूप वर्षं राज्य केलं, त्याचं कारण त्यांच्यावर खूप लोकांची निष्ठा होती म्हणून नव्हे; तर त्यांनी जनतेला पोटभर खायला आणि संरक्षण दिलं. त्यामुळे त्यांची सत्ता टिकून राहिली. जगातील कोणत्याही सत्तेचं असंच आहे.

लोकांची सत्ताधीशांवर निष्ठा नसते, तर स्वत:चं पोट भरण्यावर आणि स्वत:च्या संरक्षणावर निष्ठा असते. त्यामुळे राज्यकर्ते आणि त्यांच्यावरील लोकांची निष्ठा यात पोटाची आणि संरक्षणाची हमी यांचा चिवट धागा लक्षात घ्यावा लागतो. जो माणूस उठून समूहाला सांगतो की, ‘मी तुमच्या पोटाची आणि इतरांपासून संरक्षणाची हमी घेतो,’ तो माणूस आपसूकच नेतृत्व करत असतो. हे कुटुंबात आणि सर्व प्रकारच्या सामूहिक उपक्रमांतही घडतं. अध्यात्मवाले बुवा, धर्मगुरू, राजकीय पक्षांचे नेते हे याच भांडवलावर जगतात. जगातील कोणतीही संघटना असो, तिचं मानसशास्त्रही हेच असतं. जगात राजेशाही, लोकशाही, हुकूमशाही, साम्यवादी असे राजसत्तेचे कोणतेही प्रकार असले, तरी राज्यकर्त्यांकडून जनतेला पोटाला खायला अन्न आणि इतरांपासून संरक्षण या दोन मूलभूत गोष्टी मिळण्याची हमी असेल, तरच त्यांची राज्यं उभी राहतात आणि चालतात. त्या हमीवरच अन्य लोकही त्यात सहभागी होतात. अन्न आणि संरक्षणाच्या आश्वासनांच्या आधारावरच अनेक राज्यकर्त्यांनी आजवर राज्य केल्याचा आपला इतिहास आहे.

घराणेशाहीचं स्वरूप जसं व्यापक आहे, तसंच ते ऐतिहासिकही आहे, हे आपल्याला वरील विवेचनावरून म्हणता येतं. भारतातील घराणेशाहीची चर्चा राजकीय प्रांगणात तशी पूर्वीपासून म्हणजे, इंदिरा गांधींच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय प्रवेशापासून सुरू झाली, असं मानावं लागेल. काळाच्या ओघात राजकीय प्रांगणातील घराणेशाही अधिकाधिक घट्ट होत गेली, असं दिसतं. आता राजकीय घराणेशाहीसोबत अन्य क्षेत्रांतही घराणेशाही आहे. फरक फक्त इतकाच आहे की, राजकीय घराणेशाहीच्या तुलनेत अन्य क्षेत्रांतील घराणेशाहींची चर्चा कमी होते. आणि त्या चर्चेला सकारात्मक मान्यता आहे. उदा – ‘संगीत क्षेत्रातील घराणी’ हा शब्द अभिमानानं उच्चारला जातो.

भारताला संगीत घराण्याची मोठी परंपरा आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं, तर मंगेशकर हे घराणं विचारात घ्यावं लागेल. संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर घराण्याच्या तीन पिढ्या वावरताना आपण पाहतो. पहिली पिढी, संस्थापक मास्टर दीनानाथ यांची. दुसरी, हृदयनाथ, लता, आशा यांची. तर, तिसरी, राधा मंगेशकर आणि हेमंत भोसले या दीनानाथ मंगेशकर यांच्या नातवंडांची. संगीताचं क्षेत्र मोठ्या मेहनतीचं आहे. केवळ कुटुंबाचा वारसा आहे, म्हणून गायन करता येईल. मात्र, समाजप्रिय गायक होण्यासाठी उपजत गुण आणि भगीरथ अंगमेहनत लागतेच. मात्र, तरीही त्या क्षेत्रात नैपुण्य मिळवण्यासाठी केवळ मेहनत व  गुणवैशिष्ट्यं असून चालत नाही. तर, ते सिद्ध करण्यासाठी तितक्याच थोर संधीही मिळायला हव्यात. नेमका इथंच त्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा फायदा होतो. थोडक्यात, क्षेत्र कोणतेही असो, कौटुंबिक पार्श्वभूमी तितकीच महत्त्वाची ठरते. घराणेशाहीचं हे कुंपण पुढच्या प्रत्येक पिढीला कसं आधारभूत ठरतं, याची प्रचिती देणारं आहे.

भारतात उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. उद्योग क्षेत्रातील घराणेशाही ही काही प्रमाणात राजकीय घराणेशाहीच्या हातात हात घालून चालणारी आहे. नेहरू-गांधी घराणं आणि टाटा व अंबानी या घराण्यांचा पिढीजात संबंध असल्याचं अनेकदा प्रसारमाध्यमातून सांगितले जातं. या संबंधांना राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून एक स्वाभाविक अशी वीण आहे. टाटा उद्योग समूह शंभर वर्षांहून अधिक काळ यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. अर्थात, यात समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीचा वाटा आहेच. शिवाय, विश्वासाच्या आणि व्यवस्थापनाच्या जोरावर जेआरडी टाटा, नवल टाटा व रतन टाटा यांनी हा उद्योगसमूह अव्याहतपणे यशाकडे नेला आहे. व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व नीतीनियमांचं काटेकोर पालन केल्यानं टाटा उद्योगसमूहाला आणि पर्यायानं टाटा परिवाराला घवघवीत यश संपादन करता आलं आहे.

उद्योगविश्वात गेल्या शतकभरात जवळजवळ प्रत्येक कुटुंबनियंत्रित भारतीय उद्योगसमूहात फूट पडली आहे. कित्येक समूह तर अनेक वेळा फुटले आहेत आणि नव्या पिढीनं वेगवेगळ्या क्वचित अगदी लहान भागांवर कब्जा केला आहे. कालौघात काही कौटुंबिक उद्योग लयास गेले आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. टाटासारखे उद्योग तग धरू शकले ते म्हणजे, त्यांचा आवाका, व्यवसायाभिमुख कौशल्य आणि समूहाची विश्वसनीय संस्कृती या बळावर. टाटांची कौटुंबिक घराणेशाही ही त्यांच्या व्यावसायिक नीतीमत्तेवर टिकून आहे. विशिष्ट प्रकारची ध्येयनिष्ठा अंगी बाळगल्यानं टाटांना यशस्वी होता आलं.

घराण्यांचा वावर खरं तर सर्वच क्षेत्रांत झाला आहे, असं मानावं लागेल. आयुर्वेदाच्या क्षेत्रात प्रभाकर महाराज सरदेशमुख यांच्या सात पिढ्या कार्यरत होत्या. सरदेशमुखांच्या मागील सात पिढ्यांपासून आयुर्वेद, संगीत, ज्योतिष या गोष्टी वारशानं चालत आल्या. ‘मूळचे सांगलीकर सरदेशमुख पूर्वी देसाई आडनावाने ओळखले जात होते. पुढे सांगलीहून हे कुटुंब सोलापूर येथील तडवळ येथे स्थिरावले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आयुर्वेद, संगीत व ज्योतिषाचा वारसा सरकू लागला. आबाजी सरदेशमुख यांच्यावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची विशेष कृपा होती. स्वामी समर्थांकडे त्यांचे नेहमी येणे- जाणे होते. त्यांचे चिरंजीव केशव यांनाही समर्थांचा सहवास लाभला होता. सरदेशमुख घराण्यातील स्त्रियाही अनेकदा रुग्णांना औषधे देत असत.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. ७१)

थोडक्यात क्षेत्र कोणतेही असो, कुटुंबाच्या व्यवसायाचा म्हणा, संस्काराचा म्हणा त्याचा परिणाम आणि प्रभाव सबंध कुटुंबावर होतो आणि आनंदानं, उत्साहानं, किंबहुना अंतप्रेरणेनं कुटुंबातील सर्व घटक सहजरीत्या त्या-त्या व्यवसायात किंवा कौटुंबिक कार्यात पुढारलेपण करत असतात.

अलीकडील काळात चित्रपटाच्या क्षेत्रात घराणेशाही फारच मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. अर्थात, या क्षेत्रात घराणेशाहीची संख्यात्मक वृद्धी अलीकडच्या दोन दशकांतील असली, तरी परंपरा मात्र शतकभराची आहे. उदाहरण म्हणून सुनील दत्त यांचं घराणं घेतलं, तर अधिक स्पष्टता येईल. या घराण्याला प्रचंड गुंतागुंतीचा इतिहास आहे. कला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात अव्वल दर्जाच्या संधी सुनील दत्त घराण्याला मिळाल्या आहेत. स्वत: सुनील दत्त खासदार (१९८४, १९८९, १९९१, १९९९) होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कन्या प्रिया दत्त यांची वर्णी लागली आहे. विशिष्ट संधी प्राप्त झाल्यानंतर किंवा मिळवल्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी कशी महत्त्वाची ठरते, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दत्त घराणं.

वर उल्लेख केल्याप्रमाणे कलेच्या क्षेत्रातील घराणेशाही गेल्या दोन दशकांत फारच वाढली आहे. वाढत्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून, नवनवीन कार्यक्रमांतून पुढील पिढीचं लाँचिंग सुरू आहे. मराठी आणि हिंदी तसंच अन्य भाषिक कलाक्षेत्रात सर्वत्र जवळपास सारखीच परिस्थिती आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन (दुसरी पिढी - अभिषेक बच्चन), पृथ्वीराज कपूर (करिष्मा, करिना, रणबीर यांच्या रूपानं चौथी पिढी), जावेद अख्तर (तिसरी पिढी) इत्यादी घराणी आणि त्यांचा गोतावळा आहे. तसंच, मराठी चित्रपटसृष्टीत रमेश देव, अजिंक्य देव ही नावं वानगीदाखल सांगता येतील. अभिनयाच्या क्षेत्रातील घराणेशाहीविषयी दिवाकर गंधे म्हणतात, ‘जशी शास्त्रीय संगीतात, राजकारणात ‘घराणी’ असतात, तशी ती चित्रपटसृष्टीतही असतात. अर्थात हा सगळा मामला उपजत कलेचा असल्यामुळे अभिनय ही वारसा हक्काने मिळविण्याची वस्तू नाही. कपूर घराण्याचा चार पिढ्यांचा झगमगता अपवाद सोडल्यास बाकी घराणी तशी बऱ्यापैकी झगमगली. काही तर निष्प्रभ ठरतील. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? मनोज कुमार, राजकुमार इत्यादी कैक घराणी पुढे जाता जाता थांबली. कपूर घराण्याच्या जवळपास पोहोचेल ते साधना समर्थ यांचे घराणे. देवानंदच्या ‘आनंद आनंद’नंतर सगळा आनंदी आनंदच झाला. अभिनयात पिढ्यानपिढ्या लागणारे सातत्य हे फार कमी घराण्यांच्या नशिबी आले आहे.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. १३१)

‘आज भारतात गोवारीकर हे नाव खरे म्हणजे आडनाव सुपरिचित आहे. हे नाव विविध क्षेत्रात तळपत आहे. शास्त्रज्ञ बंधू डॉ. शंकर गोवारीकर व डॉ. वसंत गोवारीकर, लेखिका दीपा गोवारीकर, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व विख्यात छायाचित्रकार अविनाश गोवारीकर ही त्यातील काही ठळक नावे आहेत.’ (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. १०९) हे तसं आडनावाचं प्रस्थ असलेलं घराणं आहे. उच्च शैक्षणिक, सामाजिक वारशाच्या आधारे या घराण्याचं प्राबल्य दिसतं.

आपल्या देशात घराणेशाहीनं सर्वच क्षेत्रांत आपलं स्थान बळकट केलेलं आहे. या घराणेशाहीचं वर्गीकरण करायचं झाल्यास ‘सकारात्मक घराणेशाही’ आणि ‘नकारात्मक घराणेशाही’ असं ढोबळ वर्गीकरण होऊ शकतं. अगदी मानवसमूहाच्या पृथ्वीतलावावरील वावरापासून ते आजतागायत आपल्याला घराणेशाही पाहावयास मिळते. इतिहासात घराणेशाहीची अनेक रूपं आणि प्रारूपं सापडतात. तशीच ती विभिन्न प्रकारात वर्तमानातही आहेत आणि भविष्यातदेखील किमान काही क्षेत्रांत राहतीलच असं दिसतं. घराणेशाहीचा संबंध कुटुंबातील संस्कारात आहे. कुटुंबाच्या आडनावात आहे. कुटुंबाच्या सर्वांगीण अधिसत्तेत आहे. भौतिक-अभौतिक सत्तेत आहे. घराणेशाहीचा संबंध विचारात आहे, तसाच व्यवहारात आहे. तसाच तो अंत:प्रेरणेत आहे. कला, संगीत आदी क्षेत्रात तो स्वाभिमानाचा भाग आहे; तर राजकीय प्रांगणात तो सत्तेच्या महत्त्वाकांक्षेत आहे. इतिहासातील घराणेशाहीला किमान काही तत्त्वं, परंपरा होती. मात्र, आता पूर्णपणे नि:स्वार्थी भावाचा, वृत्तीचा घराणेशाहीचा संस्कार पाहायला मिळणं दुर्मीळ आहे. सध्याच्या गतिमान जागतिक युगातील समाज व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेनं पछाडलेला आहे. ध्येयनिष्ठा व्यक्तिगत पातळीवर अधिक संकुचित होत आहेत. स्वार्थासाठी जगत असलेल्या समाजात नि:स्वार्थी भाव क्वचितच पाहायला मिळेल. तशीच नि:स्वार्थी भावनेची कौटुंबिक परंपराही क्वचितच पाहायला मिळेल.

सर्वच क्षेत्रांतील घराणेशाहीचा वावर एका अपरिहार्यतेचा भाग आहे. ज्या घराणेशाहीवर (संगीत, कला) टीका होत नाही, ती घराणी आणि ज्यांच्यावर टीका होते ती राजकारणातील घराणी (गांधी- नेहरू) यांच्या चौकटीत काही चांगल्या बाबी निश्चितच आहेत. राजकीय नेतृत्वाची संधी कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मिळत असली, तरी ती टिकवण्यासाठी धडपड करावी लागते. तसंच, गायनाला कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे व्यासपीठ मिळत असलं तरी गायनासाठीचा रियाज करावाच लागतो. म्हणूनच घराणेशाहीच्या बाबतीत पूर्णपणे सकारात्मक किंवा पूर्णपणे नकारात्मक भावनेनं पाहणं उतावळेपणाचं लक्षण ठरेल. यातील सुवर्णमध्य हाच की, समाजाच्या ज्या अपरिहार्यता आहेत, त्या (राजकीय घराण्यांनी) लक्षात घ्याव्यात. आणि आपण समाजाच्या भल्यासाठी आहोत, या भावनेनं काम करावं. काम करणारा कोण यापेक्षा विधायक काम करणारा सार्वजनिक जीवनात अधिक महत्त्वाचा. आणि राजकारणातील घराणी ही स्पर्धेच्या क्षेत्रात वावरत असल्यामुळे तिथं गुणसंपन्न व्यक्तीला एक दिवस नामी संधी मिळणार! मिळतेच!!

थोडक्यात, घराणेशाहीचं प्रत्येक क्षेत्रातील स्वरूप वेगळं आहे. प्रत्येक क्षेत्रातील घराणेशाहीचा इतिहासही वेगळा आहे. प्रत्येक क्षेत्रातील घराणेशाहीचं भवितव्यही निराळं आहे. काही राजकीय अभ्यासकांना राजकीय घराण्यांनी लोकशाहीला कुंठित अवस्था आणली, असं वाटतं; तर काहींना ही अपरिहार्यता वाटते; तर काहींना नेतृत्व ही सर्वांनी करावयाची बाब नाही, असं वाटतं!

.................................................................................................................................................................

लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......