टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामचंद्र गुहा, अमित शहा
  • Tue , 12 September 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya रामचंद्र गुहा Ramchandra Guaha राजेंद्र सिंग Rajendra Singh अमित शहा Amit Shah जीएसटी GST कांचा इलाया Kancha Ilaiah

१. नदीजोड प्रकल्प ही भारत तोडण्याची योजना असून हा प्रकल्प कधीही यशस्वी होणार नाही, अशी टीका जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली. राज्यांमधील पाणीवाटपाचे वाद न्यायालयास अद्याप सोडविता आले नसताना नदीजोड प्रकल्पांमुळे देशात मोठे वाद निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गत दोन वर्षांत ठेकेदारांचा शिरकाव झाल्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत त्या योजनेची यशस्वीता घटल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

चला, पाकिस्तानला जाणाऱ्या देशद्रोहींच्या यादीत आणखी एका बुद्धिमंताची भर पडली. सध्याचं सरकार हे रामराज्यानंतरचं (तेही यशस्वीच होतं) सगळ्यात यशस्वी सरकार आहे आणि ते परमेश्वरकृपेनेच देशाला लाभलंय, त्यामुळे या सरकारची प्रत्येक योजना (भले ती काँग्रेसच्या, यांनी खरपूस टीका केलेल्या, योजनेचंच नामांतर करून आणलेली का असेना) ही देशहिताचीच असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. अशा प्रकल्पांचा राजकीय फायदा लक्षात येत नाहीये त्यांच्या. सगळ्या राज्यांमध्ये, नागरिकांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले, तर राज्य कसं करता येईल त्यांच्यावर?

.............................................................................................................................................

२. गुजरातच्या तरुणांनी सोशल मीडियावर काँग्रेसने चालवलेल्या भाजपविरोधी अपप्रचाराला बळी पडू नये, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. भाजपच्या राजवटीतील विकासाच्या तथाकथित गुजरात मॉडेलबद्दल प्रश्न उपस्थित करणारे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अमित शाह सोशल मीडियावरच्या अपप्रचाराबद्दल बोलतायत, हे वाचूनच अनेकांच्या हसून मुरकुंड्या वळल्या असतील. गुजरातच्या तथाकथित विकासाच्या नावाखाली बंगलोरपासून दुबईपर्यंत कुठलेही फोटो खपवणाऱ्या पोस्टींचा २०१४ साली सोशल मीडियावर पाऊस पडत होता. त्यात भिजून चिंब झालेल्या शाह अँड कंपनीला आताच्या पावसाने (पडत असल्यास) सर्दी होणं स्वाभाविक आहे. पेराल तेच उगवेल, हे त्यांना ठाऊक कसं नाही?

.............................................................................................................................................

३. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी भाजपने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएस आणि भाजपचा थेट संबंध नसला तरीही अशा हत्या व्हाव्यात, समाजात तेढ निर्माण व्हावी,  सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात भावना भडकवल्या जाव्यात असे वातावरण निर्माण करण्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हातभार लावला असल्याचे रामचंद्र गुहा यांनी एका दैनिकात प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे. अशा हल्लेखोरांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात या लोकांची माथी भडकवण्याचे कामही असेच नेते करत असतात, असेही गुहा यांनी म्हटले आहे. ज्यानंतर कर्नाटकच्या भाजयुमोने रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या खुनाशी रा. स्व. संघ किंवा भारतीय जनता पक्ष यांचा थेट संबंध आहे, असं गुहा यांनी म्हटलेलं नाही. ते ज्या वातावरणाबद्दल बोलत आहेत, ते वातावरण देशात आहे, याचा पुरावा लंकेश यांच्या हत्येनंतर ती साजरी करणाऱ्या ट्वीट्समधूनच मिळतो. लंकेश यांनी भाजप आणि संघाबद्दल लिहिलं नसतं, तर त्या आज जिवंत असत्या, असं विधान करणारा भाजपचाच आमदार अधिक ठळकपणे हा संबंध अधोरेखित करतो आहे. त्याला नोटीस कधी पाठवणार?

.............................................................................................................................................

४. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. कांचा इलाया यांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इलाया यांनी पोलिसांत तक्रार दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना जीभ छाटण्याची धमकी दिल्याचे उस्मानिया विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले. प्रा. इलाया यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “कालपासून मला अनेकदा निनावी धमकीचे फोन आणि संदेश येत आहेत. फोन उचलल्यानंतर पलिकडून मला शिवीगाळही करण्यात आली. काही जणांनी माझी जीभ छाटण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणामुळे मी भयभीत झालो आहे. माझ्या लिखाणावर ‘द इंटरनॅशनल आर्य-वैश्य संगम’ या संस्थेने टीका केली होती. त्यानंतरच हा प्रकार सुरु झाल्याने माझ्या जिवाचे जर बरे-वाईट झाले तर त्यासाठी या संस्थेलाच जबाबदार धरण्यात यावे, असे इलाया यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

परदेशी नागरिकांना हा देश एकेकाळी अद्भुत वाटायचा. तो अद्भुतपणा आजवर टिकवून धरला आहे आपण. इथे ज्याचा एखाद्या विषयाचा अभ्यास आहे, ज्याने त्याचं रीतसर शिक्षण घेतलं आहे, त्याच्या निष्कर्षांपेक्षा अनभ्यस्त समाजाची तथाकथित संवेदनशील भावना अधिक महत्त्वाची ठरते. ही अज्ञानमूलक आणि सदादुखरी भावना बुद्धिच्या डोक्यावर बसवणाऱ्या या समाजाला असल्या भोंगळ अवस्थेत महासत्ता बनण्याची स्वप्नंही पडतात, हा सर्वात मोठा विनोद.

.............................................................................................................................................

५. गुजरातमध्ये एका आईने आपल्या नवजात तिळ्या मुलींची नावे ‘जीएसटी’च्या आद्यक्षरांवरून ठेवली आहेत. सुरतेच्या कांचन पटेल या महिलेने तिळ्या मुलींना विशेष ओळख देण्यासाठी त्यांची नावं गारावी (जी), सांची(एस) आणि तारावी(टी) अशी ठेवली. त्यामुळे नातेवाईक या मुलींना ‘जीएसटी’ नावानेच हाक मारायला लागले आहेत. वस्तू व सेवा करामुळे प्रेरित होऊन आपण मुलींची नाव असं ठेवल्याचं कांचन यांनी सांगितलं. मुलांचं नाव ‘जीएसटी’ ठेवण्याची ही काही पहिलीच घटना नाही. राजस्थानमधल्या बिवा गावातील एका महिलेने देखील ३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनी जन्मलेल्या मुलाचं नाव ‘जीएसटी’ ठेवलं आहे.

या सरकारच्या दमदार कामगिरीने सर्वसामान्य लोकांच्या मनात कसं घर केलं आहे आणि काय स्थान मिळवलं आहे, याचं दर्शनच या नामकरणातून होतं. नोटाबंदी, बीफबंदी, जीडीपीची घसरण, पेट्रोलची दरवाढ, गोरक्षकांचा उन्माद वगैरे अन्य देदीप्यमान कामगिरींचं लघुनामांमध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे. म्हणजे जुळ्या-तिळ्यांच्या मातांना आणखी गौरवशाली पर्याय उपलब्ध होतील.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.