टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, डी. एन. जीवराज, अल्फॉन्स कन्ननथानम, अनुपमा जैस्वाल आणि एकनाथ खडसे
  • Fri , 08 September 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या गौरी लंकेश Gauri Lankesh नरेंद्र मोदी Narendra Modi डी. एन. जीवराज D.N. Jeevaraj अल्फॉन्स कन्ननथानम Alphons Kannanthanam अनुपमा जैस्वाल Anupama Jaiswal एकनाथ खडसे Eknath Khadse

१. बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात लिखाण केलं नसतं तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असं कर्नाटकातील भाजप आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र, सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारनं आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत, असं जीवराज भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या आहेत. पण ज्या पद्धतीनं त्यांनी भाजप आणि संघविरोधात लिखाण केलं, ते साफ चुकीचं होतं, असंही ते म्हणाले.

अरेच्चा, हा ऑनर किलिंगचाच प्रकार आहे म्हणायचा! या हत्येनंतर कसलाही पुरावा नसताना, तपास पुढे सरकला असताना हिंदुत्ववाद्यांनीच ही हत्या केली असेल, अशा स्वरूपाची सार्वत्रिक टीका का झाली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या खुनात हिंदुत्ववाद्यांचा काहीच हात नसणार, अशी पुराव्याविना खात्री असलेली ही मंडळी खून कोणी केला असेल, याची तर्कटं पुराव्याविनाच मांडत होती. आता त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जीवराज यांच्या या विधानांमधून मिळालं असेल!

.............................................................................................................................................

२. परदेशी पर्यटकांना गोमांस खायचं असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या, असा सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम यांनी परदेशी पर्यटकांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्या वेळी अल्फॉन्स यांच्याकडे पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आली. देशात अनेक राज्यांत गोमांसावर बंदी असून, त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसत असल्याबद्दल अल्फॉन्स यांना एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘ते (पर्यटक) त्यांच्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी भारतात येण्याआधी त्यांच्या देशातूनच गोमांस खाऊन यावं,’ असं उत्तर अल्फॉन्स यांनी दिलं.

चला, दोन दिवसांत अल्फॉन्स लायनीवर आले. कालपरवाच त्यांना, देशात कोणीही, कुठेही, काहीही खाऊ शकतो; भारतीय जनता पक्ष काही कोणाच्या खासगी खानपानात ढवळाढवळ करत नाही, असे काही अद्भुत साक्षात्कार झाले होते. दोन दिवसांत त्यांचं चांद्रयान भारतभूवर लँड झालेलं दिसतंय. आता केरळातल्या गायी त्यांना कधी वंदनीय होतात, ते पाहायचं.

.............................................................................................................................................

३. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कमी कुशल कर्मचाऱ्यांना येत्या काही वर्षांमध्ये ऑटोमेशन (स्वयंचलन) आणि आर्टिफिशियल इंटलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) मोठा फटका बसणार आहे. देशातील या क्षेत्रातील सात लाख नोकरदारांना याची झळ बसू शकेल. या क्षेत्रातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना २०२२ पर्यंत नोकरी गमवावी लागू शकते. एचएफएस रिसर्च या अमेरिकेन कंपनीनं केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २०२२ मध्ये १७ लाखांवर येईल. २०१६ मध्ये ही संख्या २४ लाख इतकी होती.

स्वयंचलनच्या जागी ही मंडळी स्वयंसंचलन शिकली, तर त्यांना अनधिकृत क्षेत्रात फार मोठी संधी आहे. अशीही त्यांच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आहेच. सरकारविरोधी मतं मांडणाऱ्याचं शक्य तेवढ्या गलिच्छ भाषेत ट्रोलिंग करून त्याला देशद्रोही ठरवणं, हे यापुढे सतत विस्तारत जाणारं आणि नोकरीच्या आकर्षक संधी असलेलं क्षेत्र आहे. त्यात सात लाख कर्मचारी सहजच सामावले जाऊ शकतात. आतापासूनच ती ‘कौशल्यं’ आत्मसात करायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

४. उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवशी रविवार असूनही सर्व शाळा सुरू राहणार असून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात १.६० लाख प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनुपमा जैस्वाल यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केल्यास मोदींचं ‘स्वच्छ भारत’चं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या. मोदींच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित आमदारांना दिल्या. मोदी हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. मुलांसमोरील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील बलशाली व्यक्ती आहेत, असं भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितलं. स्वच्छतेचा प्रसार आणि मुलांमध्ये त्याबाबत जागृती करणं, हा शाळांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असंही ते म्हणाले.

शिक्षण राज्यमंत्र्यांनी ही घोषणा करून बाकीच्या राज्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. पंतप्रधान हे केवळ उत्तर प्रदेशाचे पंतप्रधान आहेत का? ते सगळ्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे अनेक अनुयायी पाहून तसं वाटत असलं तरी केवळ ‘शाळकरी विद्यार्थ्यांचे पंतप्रधान’ आहेत का? ते सर्व स्तरांवरच्या, सर्व प्रकारच्या नागरिकांचे पंतप्रधान आहेत. रविवारी सगळी सरकारी, खासगी कार्यालयंही सुरू ठेवली पाहिजेत आणि सगळीकडे या ‘ऐतिहासिक अवतारपुरुषा’च्या कार्याला प्रत्यक्ष कृतीतून नमन केलं पाहिजे!

.............................................................................................................................................

५. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी स्थितप्रज्ञ असून, प्रत्येक चौकशीला मी हसतखेळत सामोरा जातो. मोपलवार यांचं प्रकरणही उघडकीस आलं होतं. त्यावेळी कथित समाजसेवक गप्प का होते?, दरवेळी फक्त मलाच टार्गेट का केलं जातं?, असा प्रश्न भाजप नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. सुनील तटकरे आणि अजित पवारांविरोधातील याचिकेतून माघार का घेतली, असा प्रश्नही त्यांनी अंजली दमानियांना विचारला. नुसते आरोप करायची लोकांना सवय असते. माझ्यावर यापूर्वीही असंख्य आरोप झाले. दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही झाला. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न झालं नाही. माझ्या एनआरआय जावयानं मोठी कार घेतली. त्यावरून आरोप झाले. या प्रकरणाच्या चौकशीतूनही काहीच निष्पन्न झालं नाही, असं त्यांनी सांगितलं. आमचं सरकार संवेदनशील असून, सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी आरोपांची चौकशी होते. मी स्वत:देखील चौकशीला सामोरा जातो, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

खडसे महोदय, आपली संवेदनशीलता केवढी विशाल आहे, ते दाखवणाऱ्या भाषणाची क्लिप (अनेक ठिकाणांवरून रातोरात गायब करण्यात आली असली तरी) सगळ्यांना उपलब्ध आहे, राज्यातल्या बहुतेकांनी ती पाहिलेली आहे. त्यामुळे, तुमच्या सत्चारित्र्यावर कोणालाही कसलीही शंका नाही. आता तुम्ही ट्विटरवर या. साक्षात पंतप्रधानच तुम्हाला फॉलो करू लागतील, यात काहीच शंका नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.