टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चित्र - अतुल जगताप
  • Wed , 06 September 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या गौरी लंकेश Gauri Lankesh देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सुरेश कलमाडी Suresh Kalmadi नितीन गडकरी Nitin Gadkari नरेंद्र मोदी Narendra Modi

१. महाराष्ट्र हे विविध संस्कृतीनं नटलेलं राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देशपातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सरकारची आणि काही उच्छादप्रेमी गर्दीपटूंची एकंदर उत्सवप्रियता पाहता चारमाही उत्सवांच्या जागी बारमाही उत्सव कसे साजरे करता येतील, यावर लक्ष केंद्रित करायला हरकत नाही. शांततेनं जगण्याचे सगळे अधिकार रद्द करून व्यक्तीला समष्टीच्या दावणीला बांधून टाकणंही सोपं जाईल आणि जनता १२ महिने १३ काळ उत्सवांच्या धुंदीत राहील. शिवाय, सगळ्या मूलभूत समस्या, जगण्याचे तिढे, विकासाच्या गरजा वगैरे विसरून सदासर्वदा उत्सवमग्न असलेला समाज दिसतो तरी कसा, हे पाहायला पर्यटकांच्या झुंडी लोटतील, तो फायदा वेगळाच!

.............................................................................................................................................

२. डोकलाम आणि लडाखमध्ये भारत-चीनचं सैन्य आमने-सामने आल्यानं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. डोकलामसारखी स्थिती पुन्हा नको, असा सूर दोन्ही नेत्यांनी आळवला. चीनमधील शियामेन इथं सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेतील या चर्चेकडे जगभराचं लक्ष लागलं होतं. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी शांतता आवश्यक असून यासाठी सीमवेर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी नमूद केलं. मसूद अझहरविषयी चर्चा झाली का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, या विषयावर चर्चा झाली नाही. मात्र, ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचं स्पष्ट होतं.

चला, चीननं तात्पुरती नांगी टाकलेली दिसते. पण, पुन्हा विष भरून नव्यानं डंख करायला तो सज्ज होत असल्यास आश्चर्य नाही. विद्यमान सरकारच्या धुरीणांनी सत्तेवर येण्याआधी इतकी चिथावणीखोर आणि युद्धखोर भाषा वापरली होती की, ते आधीच्या सत्ताधाऱ्यांना दुबळे ठरवण्याचं निव्वळ एक गिमिक होतं, हे आता त्यांचे समर्थक विसरले आहेत. चीन परवडला, पण घरात बसून मोबाइलवरून चीनला धडा शिकवायला निघालेले हे समर्थक परवडायचे नाहीत. त्यांना शांत करणं कठीण आहे.

.............................................................................................................................................

३. पुण्यातील गणेशोत्सवातील विसर्जन श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी सहभागी झाले, नंतर सर्व राजकीय पुढाऱ्यांनी मिळून नाश्ता केला. कलमाडी यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेला सहभाग अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावं लागलं होतं. त्यानंतर गेल्या चार वर्षांत कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रं पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपवण्यात येतील, अशी चर्चाही रंगली होती. मात्र, त्यांनी थेट भाजप नेत्यांबरोबर गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावल्यानं कलमाडी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

यूपीए सरकारच्या काळात घोटाळे झाले, असा गदारोळ माजवून भाजपनं सत्ता काबीज केली. सरकारकडे घोटाळे आणि अकार्यक्षमता दाबण्याची केवढी मोठी ताकद असते, याचं प्रत्यंतर भाजपच्या राज्य सरकारांकडे पाहिल्यानंतर येतं. ती न वापरता घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई झाली, हीच यूपीएची चूक ठरली. आता ज्यांच्याविरोधात रान उठवलं, त्याच वाल्या कोळ्यांना वाल्मिकी म्हणून पावन करून घेण्याची चढाओढ भाजपनं चालवली आहे. ‘पार्टी विद अ डिफरन्स’ म्हणतात ते उगाच नाही!

.............................................................................................................................................

४. कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळानी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे. डॉल्बी आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक काढून कोल्हापुरची जनता महाराष्ट्रात इतिहास घडवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ढोल आणि ताशा पथकाचे सूत्रबद्ध वादन तसंच मंडळांची केलेली विद्युत रोषणाई हे विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण होतं.

कोल्हापूरकरांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. एरवी सुबुद्ध म्हणवणाऱ्या शहरांमध्ये गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलिसांची, यंत्रणांची होता होईल तो अडवणूक करून मिरवणुकांचा काळ लांबवण्यासाठी आणि शक्य तेवढे ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडण्यासाठीच एकत्र येतात. अशा वेळी कोल्हापूरकरांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. डॉल्बी सिस्टमसारख्या लोकांचे कान फोडणाऱ्या प्रकारांना आळा घालायलाच हवा. मात्र, त्यांना तेवढ्याच आवाजाच्या पारंपरिक वाद्यवादनाचा पर्याय डॉल्बीबंदीच्या मूळ हेतूला हरताळ फासू शकतो, याचंही भान लवकरच येवो, ही सदिच्छा.

.............................................................................................................................................

५. पाण्याचा थेंब ना थेंब वाचवणं हेच माझ्या जीवनाचं मिशन आहे. गंगा शुद्धीकरणाचे आणि रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या आव्हानांची मला कल्पना आहे, पण त्याचबरोबर कामं कशी करवून घ्यायची, हेही मला पक्कं ठाऊक आहे. मी अशक्य ते शक्य करून दाखवीन, अशा शब्दांत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण या तिसऱ्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर रस्ते, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्यासमोरील आव्हानांचा आढावा घेतला. मी स्वत: शेतकरी आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व मी जाणतो. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी पाणी अडविल्याशिवाय, जिरविल्याशिवाय पर्याय नाही. किमान पन्नास टक्के तरी शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तरच आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो. शेतकऱ्यांशिवाय देश नाही आणि सिंचनाशिवाय शेतकरी नाही. म्हणून तर सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करीन. त्यातील सर्व अडथळे दूर करीन, असं गडकरींनी आत्मविश्वासानं सांगितलं. गंगेच्या शुद्धीकरणामधील सर्व आव्हानांची मला कल्पना आहे. पण कठोर राजकीय इच्छाशक्तीचं भांडवल असल्यास कोणतंही काम अशक्य नाही. सर्व काही शक्य करून दाखवीन. अडथळे दूर करण्यासाठी उमा भारतींचा समावेश असलेलं कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करेन, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकस्मिक पर्याय म्हणून कोणी (नागपूरकडचे कोणी हो) नितीन गडकरींचा विचार करत असेल, तर त्यात काही चूक नाही, हे सिद्ध करणारी ही भाषा आहे. नरेंद्र मोदी यांनाही सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचं मिशन वगैरे बनवून सांगण्याची सवय आहे. शिवाय गडकरी यांनी गंगा शुद्धिकरणात शुद्ध अपयशी ठरलेल्या उमा भारती यांच्यासारख्या बिनकामाच्या मंत्रीणबाईंना टास्क फोर्समध्ये घेण्याची भाषा करून त्यांच्या संभाव्य उपद्रवालाही चातुर्यानं लगाम घातला आहे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......