टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रघुराम राजन, विजय रुपानी, बिहारमधले उंदीर, फोर्ब्जची बातमी, संजय राऊत आणि लल्लन सिंह
  • Mon , 04 September 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रघुराम राजन Raghuram Rajan विजय रुपानी Vijay Rupani बिहारमधले उंदीर फोर्ब्ज Forbes संजय राऊत Sanjay Raut लल्लन सिंह Lalan Singh

१. नोटाबंदीमुळे होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यापेक्षा नजीकच्या काळात होणारे नुकसान मोठे असेल, असा इशारा त्या वेळी केंद्र सरकारला देण्यात आला होता. मात्र, तरीही नोटाबंदी करण्यात आली आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे नोटाबंदी यशस्वी झाली असे कोणीही म्हणणार नाही, असे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीत ते म्हणाले, नोटाबंदी करण्यामागे देशातील काळा पैसा बाहेर काढणे हा चांगला हेतू होता. मात्र, त्यासाठी वेगळे पर्याय होते. नोटाबंदी करू नये, असेही सरकारला तोंडी सांगण्यात आले होते. त्यांनतर रिझर्व्ह बँकेने सरकारला सविस्तर माहितीही दिली होती. तरीही हा निर्णय घेण्यात आला, असे राजन यांनी म्हटले आहे.

मुळात राजन यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे. ते परदेशात शिकून आलेले आहेत. या मातीतले अर्थव्यवहार त्यांना कळत नाहीत. राजकारण तर त्याहून कळत नाही. नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा होता, ही त्यांची समजूत त्यातूनच आली आहे. ते खरं असतं तर राजकीय पक्षांना पारदर्शक अर्थव्यवहारांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आधी झाला असता. राजन यांनी इतर उपाय सुचवले असतील; पण, त्या भावुक आवाहनबाजी, रडारड आणि आपण देशाचे तारणहार आहोत, अशी ड्रामेबाजी करण्याचा स्कोप नसणार.

.............................................................................................................................................

२. बिहारमधील पुराला उंदीर कारणीभूत असल्याच्या बिहारच्या मंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी समाचार घेतला आहे. उंदरांनी बिहारच्या किनारपट्टीचं नुकसान केल्यानं पूर आला, असं वक्तव्य बिहारचे जलसंधारण मंत्री लल्लन सिंह यांनी केलं होतं. यावर लालूप्रसाद यादव ट्विटरवरून म्हणाले की, पूर दोन पायाच्या उंदरांमुळे आला की चार पायांच्या उंदारांमुळे आला? कोणत्या उंदरांनी किनारपट्टीच्या निर्मितीसाठी खर्च केलेले हजारो कोटी रुपये खाल्ले, हे नितीश कुमार यांनीच सांगावं.

नियतीची लीला अगाध आहे आणि बिहारमधल्या उंदरांचा डीएनए वेगळाच आहे. ते कधी पोलिस ठाण्यातली जप्त केलेली दारूच पिऊन टाकतात, कधी किनारपट्टी कुरतडतात. काहींनी तर चाराही खाऊन टाकला होता. आताही आधी दारू प्यायलेल्या उंदरांनी त्या नशेत किनारपट्टी कुरतडली असणार. जाने दो, पियेला है, असं म्हणतात, तसं लालूंनीही या उंदरांना सोडून द्यावं. तशीही भ्रष्टाचारविरोधाची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही.

.............................................................................................................................................

३. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेनं अपेक्षेप्रमाणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) एकाही घटकपक्षाला स्थान दिलेलं नाही. भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका जवळ आल्यावरच, ‘एनडीए’ची आठवण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. सध्या एनडीए आघाडी केवळ कागदापुरती आणि बैठकांपुरती उरली आहे. किंबहुना एनडीएचा मृत्यू झाला आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते हेदेखील उपस्थित नव्हते. मंत्रिपदासाठी आम्ही हपापलो नाही. वेळ आल्यावर आम्ही आमचं म्हणणं मांडू. शिवसेनेचे सर्व नेते सध्या मुंबईत कामात व्यग्र आहेत, असं राऊत म्हणाले.

मोदींच्या तोंडावर राजीनामे फेकून मृत एनडीएमधून बाहेर पडण्याचा बाणेदार मार्ग शिवसेनेला खूप आधीपासून उपलब्ध होता. तो त्यांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे हा बाणा फक्त भाषणबाजीपुरताच आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. सत्तापदांना कोण किती हपापलेलं आहे, ते राज्यातली जनता रोज पाहतेच आहे. त्यामुळे या रोजच्या नक्राश्रूंनी, पोकळ गर्जनांनी आणि कडाकडा बोटं मोडण्यानं जनतेला थोडाफार विरंगुळा मिळतो इतकंच.

.............................................................................................................................................

४. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भगवान रामाच्या बाणांची तुलना इस्त्रोच्या क्षेपणास्त्रांशी केली आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सोशल इंजीनिअरिंगचं श्रेयही भगवान रामाला दिलं. इन्स्टिट्युट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट (आयआयटीआरएम)च्या दीक्षांत सोहळ्यात इंजीनिअरींगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. रामायणामध्ये रामाच्या बाणांचा उल्लेख केला आहे. ते बाण इस्रोची क्षेपणास्त्रं आहेत. रामाचा एकेक बाण म्हणजे क्षेपणास्त्रं होती. रामानं लोकांची सुटका करण्यासाठी त्यांचा वापर केला होता, असं रुपानी म्हणाले. रामाच्या इंजीनिअरिंग कौशल्याविषयी बोलताना त्यांनी रामसेतूचं उदाहरण दिलं. त्यांनी तयार केलेला सेतू आजही चर्चेचा विषय आहे. यावरून ते कोणत्या दर्जाचे इंजीनिअर होते, हे आपल्या लक्षात येतं, असंही ते म्हणाले. रामायणामध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्यानंतर उत्तर भारतातील एका वनौषधीनं त्यांची प्रकृती सुधारू शकते, असं समजतं. पण कोणती वनौषधी आणायची आहे, हे हनुमान विसरला आणि त्यानं पर्वतच उचलून आणला होता. त्या वेळी पर्वत उचलण्यास कोणतं तंत्रज्ञान मदत करू शकेल, असा प्रश्न उपस्थित करत, पायाभूत सुविधांच्या विकासाची ही कथा आहे, असेही ते म्हणाले.

गुजरातमध्ये दारूबंदी आहे. ती मुख्यमंत्र्यांना लागू नसावी. किंवा गुजरातमध्ये अन्य काही दिव्य ‘वनौषधीं’वर बंदी नसावी. भाजपला प्रिय असलेल्या तथाकथित साधुसंतांमध्ये चिलीम आणि छापीच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या या वनौषधींच्या सेवनानं लोक काहीही बरळू लागतात. फक्त अशा लोकांना कोणी इंजीनियरिंग कॉलेजच्या दीक्षान्त सोहळ्याला बोलावल्याचं कधी ऐकलं नव्हतं. ज्यांना रामरहीम आणि आसाराम वंदनीय असतात, त्यांना रूपानी विद्वान वाटले असल्यास आश्चर्य नाही म्हणा.

.............................................................................................................................................

५. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हणतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा मुद्दा मोदींच्या अजेंड्यावर होता. मात्र अद्याप तरी यामध्ये मोदींनी अपेक्षित यश आलेलं नाही. आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचं ‘फोर्ब्ज’च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबद्दलचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भ्रष्टाचाराचं प्रमाण भारतापेक्षा कमी असल्याचं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची आकडेवारी सांगते. भारतात भ्रष्टाचाराचं प्रमाण तब्बल ६९ टक्के असल्याचं सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मोदींना भारत भ्रष्टाचारमुक्त करायचा असता तर त्यांनी आपल्या पक्षातल्या आमदार-खासदारांपासून सुरुवात केली असती. त्यांनी देशोदेशीचे ‘वाल्या कोळी’ भगवा टिळा लावून ‘वाल्मिकी’ बनवून घेण्याचा उद्योग आरंभलेला आहे. कोणत्याही सरकारी ऑफिसमधलं कोणतंही काम चिरीमिरी दिल्याशिवाय आजही होत नाही. पोलिस स्टेशनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर लाचेच्या देवाणघेवाणीसाठी वेगळे कोपरे तयार झाले आहेत. अर्थात, कोणतेही नियम पाळण्याची इच्छा नसलेल्या समाजाला या मार्गानं कायद्यातून पळवाटाच काढायच्या असतात. अशा भोंदू समाजाचे ते नेते आहेत, त्यांची भाषणबाजी सिरीअसली घेण्याची गरज नाही. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल आणि ‘फोर्ब्ज’चे जे कोण साहेबलोक असतील, त्यांना काही चहापाणी देऊन अहवालात फिरवाफिरव होते का, हे पाहिलं पाहिजे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.